G.. Ganveshacha - 3 in Marathi Moral Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | ग...गणवेशाचा - भाग ३

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

Categories
Share

ग...गणवेशाचा - भाग ३

ग…गणवेशाचा भाग३

मागील भागावरून पुढे…


दुपारचं ऊन डांबरी रस्त्याला चमकवत होतं. सामानानं गच्च भरलेला तो ठेला चढावावर चढवणं लख्याला त्रासाचं जातं होतं पण तो काय करणार?पैशाची जाणीव त्याला ठेला ओढायला सांगत होती. त्यातच काल लख्याने मिळालेले सगळे पैसे दारुत ऊडवल्यामुळे घरातले सगळेच उपाशी राहिले होते. रखमाला सारखं पैसे उधार मागणं बरोबर वाटायचं नाही.भुकेमुळेही लख्याचा ठेला ओढायला जोर लागत नव्हता. त्याच्या बरोबर त्याची दहा वर्षांची मुलगी मुन्नी होती.


आज लख्याबरोबर तिच्या आईनेच तिला पाठवलं होतं मिळालेली मजूरी घरी घेऊन यायला.कारण लख्या मजुरी हातात पडली की सरळ दारूच्या गुत्त्यावर जायचा आणि अर्धे पैसे संपवूनच घरी यायचा.


मुन्नीचां जीव ऊन्हानी कासाविस झालेला होता.पायातल्या चपलेला मध्येच भगदाड पडल्याने त्यातुन डांबरी रस्ता तिचे पाय भाजत होता.चप्पल नावालाच होती.तिनं कळवळून लख्याला विचारलं.


"किती दूर हाय रे तुझं दुकान?कवापासुन चालून राहिले." मुन्नी


" थोडं थांब " लख्या


लख्या भूक आणि थकवा त्यावर तळपणारा ऊन यांनी हैराण झाल्यामुळे जास्त बोलू शकला नाही. त्याच्या चेह-यावरून घामाच्या धारा वहात होत्या ते पाणी डोळ्यांत आलं की तो एक झटका द्यायचा डोक्याला तेव्हा ते ओघळणारे पाणी दूर होऊन त्याला समोरचा रस्ता दिसायचा.


मुन्नीचा जीव बापाचे कष्ट बघून कळवळत होता.पण ती इवलीशी मुलगी काय मदत करणार?एकदा तिनी बापाच्या ठेल्याला मागून ढकलण्याचा प्रयत्न केला होता. ठेला तर समोर गेला नाही उलट तिच्या पायातील चप्पल निघून तिचा पाय तापलेल्या डांबरी रस्त्यावर पोळून निघाला.




एका हातांनी पोळलेल्या पाय आणि पायातुन निघालेली चप्पल पकडून दुस-या हातांनी तिने ठेला पकडला होता. हे एका माणसानी बघीतलं तसा तो लख्याला म्हणाला,


"अरं बाप हाय का कोन तू?"


लख्याला त्यांच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही. त्याने एकवार त्या माणसाकडे बघीतलं आणि पुन्हा ठेला ओढू लागला. तशी तो माणुस म्हणाला,


"अरं तुझी पोरगी ठेला ढकलाया लागली.केवढी ती. तिला बरं कामाला लावले?" लख्याला कळेना तो ठेला ओढता ओढतात बोलला.,


"अरं मी कसाला लावू तिले ठेला ढकलाया असल इकडं कुठंतरी."


"जरा ठेला ठीव खाली अन् मांग बघ. कळल."


एवढं बोलून तो माणूस निघून गेला. लख्याला थोडावेळ ठेला उभा करून आलेला घाम पुसावासा वाटत होता. पण ठेला खाली ठेवला अन् ठेला मागे खाली गडगडला असता तर कठीण झालं असतं. म्हणुन ओढूनताणून दम आणून तो ठेला ओढता होता.


लंगडी करत ठेल्याला धरून चालणा-या मुन्नी च्या कानावर मुलांचा खूप गलका ऐकू आला तसं तिने मान वळवून आवाजाच्या दिशेनी बघीतली तर तिला एक शाळा दिसली आणि त्या शाळेची मुलं मुली शाळेचा गणवेश घालून, दंगामस्ती करत शाळेत जातांना दिसली. त्यांना बघताच तिचे डोळे वेगळ्या आनंदानी चमकले तिचा चेहरा आनंदानी फुलला.


लंगडत ठेल्यामागून जातांना ती त्या मुलांकडेच बघत होती.इतक्यात रस्ता आता सरळ झाल्याचं लख्याच्या लक्षात आलं. चढ संपला होता. त्यानं हळूच ठेला खाली ठेवला. त्याने ठेला खाली ठेवताच. मुन्नीच्या चालण्याची गती गचकन थांबली आणि तिचा तोल जाऊन ती खाली पडली. डांबरी रस्त्याचा चटका बसताच तिनं ठणाणा केला आणि कशीबशी उठून उभं राहण्याचा प्रयत्नं करत होती तेव्हाच लख्या ठेल्याच्या मागे आला. मुन्नीला उचलण्याऐवजी तिच्यावरच खेकसला.



" कशाले गेली मांग ठेला ढकलाले? पडली नं"


" बा तुले मदत करायले आली मी ."


" हं.चाल सामोरं ये लोक बोलतेत मले मुलीले कामाले लावलं म्हून"


लख्याच्या चेहे-यावर राग होता. मुन्नीला कळेना यात आपण काय चूक केली.ती आता लख्याच्या बरोबरीने चालू लागली.चालता चालता ती मान वेळावुन मागे शाळेकडे आणि त्या मुलांकडे बघत होती.मागे वळून बघतांना तिची मान दुखू लागली पण तरीही तिला त्या गणवेश घातलेल्या मुलांकडेच बघावं वाटतं होतं. शेवटी दु:ख सहन न होऊन तिनं मान सरळ केली


"आं..."ती मान सरळ करतांना जरा कळवळली. पण कानात मात्र मुलांचे आवाज घुमत होते.तिचं विव्हळणं ऐकून घामानी डबडबलेल्या लख्यानी तिच्याकडे बघतांना मानेला झटका दिला तसा त्यांच्या डोळ्यांवर आलेला घाम खाली ओघळला


"काय नाय"


"मंग वरडली कायले?"


लख्याचा जोर आता कमी पडू लागला होता. तो नेटानी ठेला ओढू लागला. डांबरी रस्त्यांनी पोळल्यामुळे मुन्नीच्या पायाची चप्पल घालूनही आग होत होती


"आ...हूं..." करत कण्हत मुन्नी चालत होती.


"कवा येनार तुझं दुकान बा"


"थांब जो घडीभर."


ओझं ओढून तोही दमून गेला होता.


मुन्नीपण बापाचा दमलेला चेहरा बघून कळवळली.


थोड्या वेळातच ते दोघं दुकानापाशी पोचले.


दुकानाचा मालक श्रीपती म्हणाला,


"लख्या एवढा उशीर का केलास यायला?" लख्या काहीच बोलला नाही. ठेल्याचा दांडा जमीनीवर ठेवून घाम पुसून लागला.


" मालक पानी पाहिजेन होतं."


"हो घे की त्या पिंपातलं"


लख्या पिंपाकडे वळला तस मुन्नीला जाणवलं आपल्यालाही तहान लागली आहे.दोघही पाणी प्यायले.थोड पाणी लख्यानी चेह-याला लावलं ते बघून मुन्नीनीही तसंच केलं.ओल्या चेहे-याला वारं लागल्यावर तिला इतकं छान वाटलं की तिचा चेहरा आनंदानी उजळला.त्याच आनंदात तिच्या तोंडून आपसूक शब्द बाहेर पडले,


"हां…! काय छान वाटून रहालं वं..थंड थंड"


पाणी पिऊन लख्या श्रीपती जवळ गेला ,


"मालक या खेपेचे पैसे"


"पैसे ? आरं संध्याकाळपर्यंत अजून दोन खेपा तुला करायच्या आहे त्या केल्या की देतो पैसे " श्रीपती


"मालक...मालक घरी मीठ मीरची नाय म्हणून माय न सांगतलं की मीठ मीरची आणाले एका खेपेचे पैसे घेऊन ये जो "


लख्या ऐवजी मुन्नीच बोलली. लख्याला तिचं मध्ये बोलणं अजीबात आवडलं नाही. तो तिच्याकडे रागानी बघू लागला. श्रीपतीला तिच्या धिटाईची गंमत वाटली. तो म्हणाला,


"ऐ चिमुरडे इकडे ये" श्रीपती म्हणाला


" माफ करा मालक तिला " लख्या घाबरून म्हणाला.


"अरे लख्या घाबरतो कशाला. तुझी मुलगी छान धीट आहे. येग इकडे नाव काय तुझं?".


" मुन्नी" गोंधळून मुन्नी म्हणाली


"हो...छान नाव आहे. हे घे मीठ मीरचीसाठी पैसे हवे न .हे घे"


श्रीपतीने मुन्नीला तीस रूपये दिले. मुन्नी पैसे बघून हरखून गेली.


"मुन्नी घरी जाईपर्यंत पैसे हरवायचे नाही...कळलं?"


श्रीपती नी मुन्नीला बजावलं.


"होजी".म्हणत आनंदी चेह-यानी मुन्नी त्या दहा दहाच्या तीन नोटा एका मुठीत गच्च धरुन धावतच घराच्या दिशेनी निघाली. श्रीपती आपल्या दुकानात गेला. लख्या पुन्हा ठेला भरून आणण्यासाठी गोदामाच्या दिशेनी रिकामा ठेला घेऊन चालू लागला. चालता चालता सहज त्याने मुन्नी गेली त्या दिशेनी बघीतलं. मुन्नी बरीच लांब गेली होती आता ती एक ठिबक्यासारखी दिसत होती.


लख्यासाठी मुन्नी हा ठिपका नसून त्याची लेक असल्याने त्यांच्या मनात तिच्याबद्दल ममत्व होतं. मुन्नी पैसे घेऊन गेल्यामुळे त्याच्या घरी आज चूल पेटणार होती.याचा आनंद मुन्नीच्या चेहे-यावर होता तसाच आनंद लख्याच्या चेहे-यावर पण झळकला.


लख्याच्या मालकासाठी मुन्नी एक चुणचुणीत हुशार मुलगी होती. तिने शिकावं असं त्याला वाटलं.

______________________________

क्रमशः ग…गणवेशाचा भाग ३

### मीनाक्षी वैद्य