ग…गणवेशाचा भाग २
मागील भागावरून पुढे…
हल्ली मुन्नीचं कशात लक्ष्य नसायचं हे तिच्या आईच्या आणि आजाच्या लक्षात आलं होतं. बाप शुद्धीवर नसायचाच तर त्याला मुन्नीत झालेला बदल कसा कळणार?
मुन्नीला आता त्या मुलांच्या दप्तरात काय आहे याची उत्सुकता लागली होती. एक दिवस त्यातील एका मुलाचं दप्तर खाली पडलं. त्याने ऊचलण्या आधी ते दप्तर ऊघडल्या गेलं. दप्तरातील पुस्तकं वह्या खाली पडली. ती पुस्तकं त्या मुलाने पुन्हा आत ठेवली. मुन्नीची इच्छा पूर्ण झाली. दप्तरात वह्या पुस्तकं असतात हे कळलं. लांबुन प्रत्येक पुस्तकाचा रंग नाही कळला पण जे कळलं त्यामुळे तिचे डोळे चमकले. भान हरपून ती दप्तराकडे बघत होती. एवढ्यात कोणीतरी तिचा दंड धरल्यामुळे ती भानावर आली.
तिच्या आजाने तिचा दंड धरला होता.खोकत खोकत तो बोलला.
"ए भयताडवाणी काऊन करत हाय? तुले पानी आन म्हनलं न.चाल अंदर "
तिच्या आज्यानी तिला जबरदस्ती आत नेले.ती वारंवार मागं वळून बघू लागली.
" थांब नं. मले मारतो काहून?"मुन्नी म्हणाली.
"भाईर का व्हय? तीनं टाईम आवाज दिला तुले तर ऐकू येत नाय का? भहिरी झाली?"
मुन्नी ने कंटाळल्या सारखं आज्याकडे बघीतलं. धावत जाऊन पाणी पेल्यात घेऊन आज्याला दिलं आणि धावतच झोपडीच्या बाहेरच्या दाराशी आली.
"ए भयताड पेल्यात अर्धच पानी देल्ल.ए मुन्नी…"
आज्या ओरडतच बसला मुन्नी केव्हाच झोपडीबाहेर गेली होती पण त्यावेळी तिला ती सगळी मुलं खूप लांब गेलेली दिसली. तिला मनातून फारच वाईट वाटलं. तिच्या चेहे-यावर ती खंत दिसत होती.
"मुन्नी का झालं? तू वळकते त्यायले?"
मुन्नीच्या लहान बहिणीने निरागसपणे मुन्नीला विचारलं.
मुन्नी तिच्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या मन: स्थितीत कुठे होती? तिचे डोळे अधाशीपणे त्या मुलांना पाठमोर बघण्यात गुंतली होती.
****
ती रंगीत पुस्तकं वह्या आता मुन्नीच्या स्वप्नात रोजच येऊ लागली. तिला तो गणवेश स्वतः घातल्याचे दिसू लागले. पुस्तकं, वह्या ती दप्तरात ठेवतांना दिसू लागली. या स्वप्नानी आणि शाळेत जायच्या इच्छेनी तिला पछाडून टाकलं होतं. शाळेत जायला खूप म्हणजे किती पैसे लागतात हे अजूनतरी मून्नीला कळत नव्हतं.
मुन्नीला पैशाची ओळख शाळेत गेली नसली तरी झाली होती कारण ती अशीक्षीत असली तरी झोपडपट्टीत राहत असल्याने फार लहान वयात तिला पैशाचा व्यवहार समजू लागला होता.
आपल्या कथेतील ही चिमुरडी सगळ्यांच्या घरात असलेल्या चिमुरडीच्या वयाची आहे. तिचेही डोळे आनंदाने चमकतात. तिच्याही डोळ्यात काहीतरी तिला हवं आहे असं दिसतं पण ती राहते ती झोपडपट्टी तिला अशी स्वप्नं बघायला परवानगीच देत नाही.या झोपडपट्टी तिच्या खांद्यावर लहानपणा पासून जबाबदारीचं ओझं दिलं आहे.
मुन्नीच्या भवतालचं जग निरक्षर असल्याने मुन्नीचे खांदे लहान वयात नको त्या ओझ्याने थकतात आहे हे त्यांच्या लक्षात येतंच नाही. येणार तरी कसं त्यांना त्यांचं एक मूल खाणारं एक तोंड असलं तरी काम करणारे दोन हात त्यांना मिळतात. हे झोपडपट्टीतलं कटू सत्य आहे.
मुन्नी ही प्रातिनिधिक मुलगी आहे. तिच्यासारख्या अनेक मुन्नी आपल्या डोळ्यात स्वप्नं बघायची विसरून जातात. जबाबदारीच्या ओझ्याची निरगाठ त्यांच्या मनाला बसते ती कायमची.
*****
सकाळी सकाळी कामावर जायच्या आधी रखमा आज्याला म्हणाली
" आज मुन्नीला यांच्या संगट पाठवत हाय." रखमा
" काऊन?" आज्या
" एका फेरीचे पैसे भेटतील. तीस रूपये भेटतील तर संध्याकाळी जेवन करायला भेटेल. तुम्ही आज पायजो लहान लेकरांकडे"रखमा
" पाह्यतो. जाय तू कामावर." आज्या
" मुन्नी बापूसंग जा अन् एका फेरीचे पैसे घेऊन ये जो." आज्या
" ए भयताड तिले काहून पाठवून राहिली माह्यासंग? मी रातच्याला घरी येणार हावो नं? तवा देईन पैसे" लख्या
" बापा लय उजेड पडला.घरी येताना किती पैसे राहतील तुह्याजवळ ? अर्धै पैसे दारूत घालते. माह्य पोरं काय उपाशी राहतीन?" रखमा
" बाप्पा लयच बोलते! माही पोरं नाय का ते ?" लख्या
" असती तर कवाच दारू सोडली असती."रखमा
" ए काहून सकाळी सकाळी भांडून राहले दोघं. मुन्नी लख्यासंगट जा अन् याद ठेऊन एका फेरीचे पैसे आन जो. " आज्या
आज्याच्या म्हणण्यावर मुन्नी नी हो म्हटलं पण मनातून तिला वाईट वाटलं. कारण ती लख्याबरोबर गेली असती तर तिला आज शाळेतून घरी नाचत बागडत जाणारी मुलं दिसली नसती.
मुन्नी कंटाळून लख्याबरोबर निघाली.
" मुन्नी ते चप्पल घाल.ऊन हाय. तशी नको जाऊ." रखमा
" माय तुह्ये पाय भाजतील.मले नको"मुन्नी
रखमाचं ऊर भरून आलं. तिने मुन्नी कुरवाळत म्हटलं
" पोरी तू लहान व्हय ग .तुह्ये पाय मऊ हाय त्येला ऊन नाय सहन व्हनार.तू जाय माही चप्पल घालून."
बरं म्हणून मुन्नी लख्यासोबत निघाली.....
अश्या वसाहतीमध्ये मुन्नी कशी आपल्या डोळ्यात स्वप्नं बघते. त्याच्या मागे कशी धावते. हे आपण मुन्नीचं रोजचं जगणं बघीतलं तरच कळेल.
आपण आपल्या कथेची नायिका मुन्नी हिचं भावविश्व प्रत्येक भागात जवळून बघू.
____________________________
क्रमशः ' ग…गणवेशाचा '
लेखिका…मीनाक्षी वैद्य.