आठवणीतली दिवाळी..
झाली पहाट गंधित उटण्याची..
केली रोषणाई लाख दिव्यांची..
सजली दारी तोरणे पानाफुलांची..
रेखिली अंगणी नक्षी रांगोळीची..
दरवळ फराळाचा पसरे घरोघरी
आकाशकंदील तो झुले दारी
घेऊन आकांक्षा अन नवस्वप्ने उरी
आली दिवाळी माझ्या घरी..
दिवाळी म्हटलं की आठवतो उत्सव दिव्यांचा.. सगळीकडे लख्ख प्रकाश.. सुगंधी उटण्याचा सुगंध.. घरोघरी पसरणारा सुग्रास फराळांचा तिखट गोड दरवळ.. नवीन खरेदी, भेटवस्तूंची रेलचेल.. प्रचंड उत्साह संचारलेला जाणवतो.. सर्वात मोठा सण.. साऱ्या भारतभर किंबहुना भारताच्या बाहेरही साजरा होणारा सण..
दिवाळी आठवली की, आजही आपसूक मन बालपणीच्या आठवणीत रमून जातं. मुंबईतल्या चाळीतल्या जुन्या आठवणी ताज्या होतात आणि ओठांवर किंचित हसू आणि डोळ्यांत पाणी दाटून येतं. आजही दिवाळी साजरी होते पण त्या चाळीतल्या दिवाळीची सर येत नाही. ती लहानपणी केलेली मौजमज्जा अजूनही आठवते.
अगदी दसरा संपला की, लगेच दिवाळीचे वेध लागायचे. आईची घरातली साफसफाई करण्यासाठी धांदल उडायची. रंगरांगोटी केली जायची. दिवाळीच्या फराळांसाठी सामानाची खरेदी केली जायची. कपड्यांच्या खरेदीचा बेत आखला जायचा. आमच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच. खरंतर सर्वसाधारणपणे सर्वांचीच सारखीच. वर्षभरापासून जास्तीत जास्त दोन ते तीन वेळा नवीन कपड्यांची खरेदी व्हायची. गणपतीत, वाढदिवसाच्या दिवशी आणि दिवाळीत. दिवाळीत तर हमखासच.. दिवाळीच्या सुट्या सुरू होण्याआधी शाळेत चाचणी परीक्षा असायची परीक्षेचा शेवटचा पेपर झाला की, दिवाळीचा अभ्यास दिला जायचा आणि सुट्ट्या जाहीर व्हायच्या. सारी बच्चेकंपनी खुश असायची. मग आम्ही बच्चेकंपनी चाळीतल्या मावशी, काकू, आईच्या सर्व मैत्रिणी मिळून खरेदीसाठी बाजारात जायचो. बाजार अगदी गजबजलेला असायचा. कपड्यांची, साड्यांची अगदी उधळण असायची. फटाक्यांचे स्टॉल लागलेले असायचे. जागोजागी रांगोळीची रंगबिरंगी रास रचलेली, तयार किल्ले, किल्ल्यावर सजवण्यासाठी अगदी शिवाजी महाराजांपासून ते सरदार, शिलेदार यांच्या छोट्या छोट्या मुर्त्या घेऊन विक्रेत्यांची छोटी छोटी दुकानं सजायची. मग भरपूर खरेदी करून आम्ही घरी परतायचो. बाबा ऑफिसवरून येताना आमच्यासाठी फटाके घेऊन यायचे. चाळीतल्या सर्व बायका एकमेकींना दिवाळीचा फराळ बनवण्यासाठी मदतीला यायच्या आम्हीही त्यांच्या जायचो. एकमेकांच्या सहकार्याने रात्रभर जागून दिवाळीचा फराळ बनवून दिवाळीच्या स्वागतास सज्ज व्हायचो.
आमची चार मजली इमारत..एका मजल्यावर आठ घरं प्रत्येकाच्या घरासमोर सारखेच आकाशकंदील दिसायचे. त्याचीही खरेदी एकत्र केलेली असायची. मग काय! बसूबारस पासून भाऊबीजेपर्यंत नुसता सगळीकडे आनंदी आनंद असायचा. अभ्यंगस्नानाने सुरुवात व्हायची तीही अगदी मुहूर्तावर. सर्वात आधी आई उठायची तयार व्हायची. दारासमोर सुंदर रांगोळी काढायची. मग आम्हा भावंडाना झोपेतून उठवायची. गंमत म्हणजे आम्हीही काही कुरबुर न करता एवढ्या कडाक्याच्या थंडीत लवकर उठायचो. आई तिळाचं तेल लावून,सुगंधी उटणं लावून अंघोळ घालायची मग दादाला ओवाळायला सांगायची. मग सर्वजण नवीन कपडे घालून तयार व्हायचो. मग बाबा आम्हा सर्वांना फटाके द्यायचे. फुलबाजा, भुईचक्र, पाऊस, लवंगी बॉम्ब, किती प्रकार ते.. मग सर्वत्र फटाक्यांचा धूमधडाका. खुप मज्जा! आई म्हणायची,
"फटाक्यांचा स्फोट होतो न तेंव्हा आतील स्फोट अस्ताव्यस्त होतो. मनातला अंधकार दूर होतो. अविवेकाच्या अंधारात विवेकाने केलेला स्फोट.."
किती खरं बोलली होती! मग फटाके फोडून झाल्यानंतर दिवाळीच्या फराळावर ताव मारायचा. संध्याकाळी गॅलरीत पणत्यांची रांग सजायची 'तमसो मा ज्योतिर्मय' अगदी तसंच प्रत्येक पणतीच्या दिव्यांची ज्योत जणू अज्ञानाचा अंधार मिटवत ज्ञानाचा तेजोमय प्रकाश सर्वत्र पसरवत दिपावली आनंदाची बरसात करत असायची. मग आई सर्वांकडे दिवाळीच्या फराळाची ताटं चाळीतल्या प्रत्येक घरात पाठवायची, त्यांच्याकडून रिकामं ताट न येता त्यांच्या घरातला फराळ यायचा. नातेवाईकांना फराळाचा डब्बा पाठवला जायचा. फराळ एकमेकांना वाटला जायचा. एकमेकांना मिठाई दिली जायची. भेटवस्तू दिल्या जायच्या. पाच दिवस नुसती धमाल असायची.
लहानपण सरलं.. घरं बदलली.. छोट्या घरातून मोठ्या घरात आलो. आजही दिवाळी खूप थाटामाटाने साजरी होते. सणांचं महत्व कमी झालंय असं नाही पण ती धमाल थोडी बदलली. तेंव्हा जे दिवाळी सणांचं अप्रुप वाटायचं ते थोडं कमी झालंय. पूर्वी फक्त दिवाळीत करण्यात येणारे दिवाळीचे पदार्थ आता वर्षभर घरात बनवले जातात. दर दोन तीन महिन्यांनी कपड्यांची खरेदी होते. सणासुदीला गोडधोड व्हायचं आता ते इतर दिवशीही होतात पण आजही त्या लहानपणी साजरी केलेल्या दिवाळीच्या आठवणींचा दरवळ कायम मनात पण आजही चाळीत साजरी केलेले प्रत्येक सण स्मरणात आहेत आणि मी कायम त्या आनंदी क्षणांच्या ऋणात..
खरंतर दीपावली हा प्रकाशाचा सण.. दीपोत्सव करण्याचा सण.. दिव्यांचा प्रकाश करून ज्ञान प्रकाश पसरवण्याचा सण.. भेटवस्तू, मिठाई गोड पदार्थांचे आदानप्रदान करून मनातली कटुता संपवून स्नेह पसरवण्याचा सण.. खरंतर या सणांमध्ये ईश्वराने आपल्याला जे आयुष्य दिलंय त्यासाठी आपण ईश्वराला कृतज्ञता व्यक्त करतो आणि आयुष्य उत्सव बनते आणि या उत्सवात आपली सद्सद्विवेकबुद्धी गमावू नये म्हणूनच की काय.!! आपल्या ऋषीमुनींनी प्रत्येक उत्सवासोबत पवित्रता आणि धार्मिक पूजा जोडल्या आहेत. जेणेकरून उत्सवामध्ये आपण आपला विवेक गमावणार नाही आणि दिवाळी सणांत सर्वत्र फक्त आनंद आणि ज्ञानाचा प्रकाश पसरला जाईल. चला तर मग! यंदाच्या दिवाळीत एकमेकांच्या आरोग्याची काळजी घेत, एकमेकांना जपत, गर्दीत वावरताना सोशल अंतर ठेवत, ज्ञानाचा प्रकाश पसरवत दिवाळी सण साजरा करूया.. सर्वाना दिपावलीच्या हार्दिक प्रकाशमय शुभेच्छा..ही दीपावली तुम्हा सर्वांना सुखाची समृद्धीची जावो हीच सदिच्छा..🙏🙏🌹🌹💐💐
©निशा थोरे (अनुप्रिया)