श्री संत एकनाथ महाराज
पाठ
१
हरीचिया दासा हरि दाही दिशा । भावें जैसा तैसा हरि एक ॥१॥
हरी मुखीं गातां हरपली चिंता । त्या नाहीं मागुता जन्म घेणें ॥२॥
जन्म घेणें लागे वासनेच्या संगे । तेचि झालीं अंगें हरिरूप ॥३॥
हरिरूप झालें जाणीव हरपले । मीतूंपणा गेलें हरीचे ठायीं ॥४॥
हरिरूप ध्यानीं हरिरूप मनीं । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
२
हरि बोला हरि बोला नातरी अबोला । व्यर्थ गलबला करूं नका ॥१॥
नको अभिमान नको नको मान । सोडीं मीतूंपण तोचि सुखी ॥२॥
सुखी त्याणें व्हावें जगा निववावें । अज्ञानी लावावे सन्मार्गासी ॥३॥
मार्ग जया कळे भावभक्तिबळें । जगाचिये मेळे न दिसती ॥४॥
जनीं वनीं प्रत्यक्ष लोचनीं । एका जनार्दनीं ओळखिलें ॥५॥
३
ओळखिला हरी धन्य तो संसारी । मोक्ष त्याचे घरीं सिद्धीसहित ॥१॥
सिद्धी लावी पिसें कोण तया पुसे । नेलें राजहंसें पाणी काय ॥२॥
काय तें करावें संदेहीं निर्गुण । ज्ञानानें सगुण ओस केलें ॥३॥
केलें कर्म झालें तेंचि भोगा आलें । उपजले मेले ऐसे किती ॥४॥
एका जनार्दनीं नाहीं यातायाती । सुखाची विश्रांती हरीसंगें ॥५॥
४
जें जें दृष्टी दिसे तें तें हरिरूप । पूजा ध्यान जप त्यासी नाहीं ॥१॥
वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्रीं देव । तयाविण ठाव रिता कोठें ॥२॥
वैष्णवांचें गुह्य मोक्षांचा एकांत । अनंतासी अंत पाहतां नाहीं ॥३॥
आदि मध्य अवघा हरि एक । एकाचे अनेक हरि करी ॥४॥
एकाकार झाले जीव दोन्ही तिन्ही । एका जनार्दनीं ऐसें केलें ॥५॥
५
नामाविण मुख सर्पाचें तें बीळ । जिव्हा काळसर्प आहे ॥१॥
वाचा नव्हे लांब जळो त्याचें जिणें । यातना भोगणें यमपुरीं ॥२॥
हरीविण कोणी नाहीं सोडविता । पुत्र बंधु कांता संपत्तिचे ॥३॥
अंतकाळीं कोणी नाहीं बा सांगाती । साधूचे संगतीं हरी जोडे ॥४॥
कोटि कुळें तारी हरि अक्षरें दोन्ही । एका जनार्दनीं पाठ केलीं ॥५॥
६
धन्य माय व्याली सुकृताचें फळ । फळ निर्फळ हरीविण ॥१॥
वेदांताचें बीज हरि हरि अक्षरें । पवित्र सोपारें हेंचि एक ॥२॥
योग याग व्रत नेम दानधर्म । नलगे साधन जपतां हरि ॥३॥
साधनाचें सार नाम मुखीं गातां । हरि हरि म्हणतां कार्यसिद्धी ॥४॥
नित्य मुक्त तोचि एक ब्रह्मज्ञानी । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
७
बहुतां सुकृतें नरदेह लाधला । भक्तीविण गेला अधोगती ॥१॥
पाप भाग्य कैसे न सरेचि कर्म । न कळेचि वर्म अरे मूढा ॥२॥
अनंत जन्मींचें सुकृत पदरीं । त्याचे मुखीं हरि पैठा होय ॥३॥
राव रंक हो कां उंच नीच याती । भक्तीविण माती मुखीं त्याच्या ॥४॥
एका जनार्दनीं हरि हरि म्हणतां । मुक्ती सायुज्यता पाठी लागे ॥५॥
८
हरिनामामृत सेवी सावकाश । मोक्ष त्याचे भूस दृष्टीपुढें ॥१॥
नित्य नामघोष जयाचे मंदिरीं । तेचि काशीपुरी तीर्थक्षेत्र ॥२॥
वाराणसी तीर्थक्षेत्रा नाश आहे । अविनाशासी पाहे नाश कैचा ॥३॥
एका तासामाजीं कोटि वेळा सृष्टी । होती जाती दृष्टि पाहें तोचि ॥४॥
एका जनार्दनीं ऐसें किती झालें । हरिनाम सेविलें तोचि एक ॥५॥
९
भक्तीविण पशु कशासी वाढला । सटवीने नेला कैसा नाहीं ॥१॥
काय माय गेली होती भूतापासीं । हरि न ये मुखासी अरे मूढा ॥२॥
पातकें करिता पुढें आहे पुसता । काय उत्तर देतां होशील तूं ॥३॥
अनेक यातना यम करवील । कोण सोडवील तेथें तुजला ॥४॥
एका जनार्दनीं सांगताहें तोंदें । आहा वाचा रडे बोलतांचि ॥५॥