निःसङगो मां भजेद्विद्वानप्रमत्तो जितेन्द्रिय ॥३४॥
रजस्तमश्चाभिजयेत्सत्त्वसंसेवया मुनिः । सत्त्वं चाभिजयेद्युक्तो नैरपेक्ष्येण शान्तधीः ॥३५॥
करुनि विषयांची विरक्ती । हृदयीं नापेक्षावी मुक्ती । ऐशी निरपेक्ष माझी भक्ती । वाढत्या प्रीतीं करावी ॥२६॥ तेणें अनिवार सत्वशुद्धी । सर्व भूतीं भगवद्बुद्धी । दृढ वाढे गा त्रिशुद्धी । हे भजनसिद्धी साधकां ॥२७॥ ऐसें करितां माझें भजन । विस्मरणासी ये मरण । सर्वेंद्रियीं सावधपण । सहजें जाण ठसावे ॥२८॥ तेव्हां रज तम दोनी गुण । निःशेष जाती हारपोन । शुद्धसत्वाचें स्फुरण । तेणें स्वानंद पूर्ण साधकां ॥२९॥ केवळ उरल्या सत्वगुण । साधका ऐसें स्फुरे स्फुरण । जगामाजीं एक पावन । धन्य धन्य मी होयें ॥४३०॥ मी पावलों शुद्ध बोध । मज प्रकटला परमानंद । ऐसा सुखाचा जो स्फुंद । तो सत्वबोध साधकां ॥३१॥ ऐसा उरला जो सत्वगुण । तो निवारावया साधन कोण । मी स्वयें सुखस्वरुप आपण । मज सुखाचें स्फुरण ते माया ॥३२॥ गूळ गुळा गोडपणें पांगे । कीं दुधा दूढ गोड लागे । तैसा सुखरुप मी सर्वांगें । वृथा सुखभोगें कां फुंजें ॥३३॥ ऐशी साधकीं स्फूर्ति स्फुरे । तंव सत्वगुण स्वरुपीं विरे । तेव्हां सुखाचाही फुंद सरे । निजसुख उरे निजशांती ॥३४॥ ऐसे निवारल्या तिनी गुण । केवळ उरे निर्गुण । तेचि अर्थींचें निरुपण । विशद श्रीकृष्ण सांगत ॥३५॥
एकनाथी भागवत - श्लोक ३६ वा
मयैंव ब्रह्मणा पूर्णो न बहिर्नान्तरश्चरेत् ॥३६॥
संपद्यते गुणैर्मुक्तो जीवो जीवं विहाय माम् । जीवो जीवविनिर्मुक्तो गुणैश्चाशयसम्भवैः ॥ वाढल्या सत्वगुणाचा हरिख । त्यातें निर्दळी शुद्ध सत्वविवेक । पाठी विवेकेंसीं सत्व देख । हारपे निःशेख निजात्मरुपीं ॥३६॥ ऐसे निमाल्या तिनी गुण । निमे कार्य कर्म कारण । लिंगदेह नाशे संपूर्ण । जीवासी जीवपण मिथ्या होय ॥३७॥ तेव्हां कार्य कर्म कर्ता । भोग्य भोग आणि भोक्ता । ज्ञान ज्ञेय मी एक ज्ञाता । याची वार्ता असेना ॥३८॥ ऐसें हारपल्या जीवपण । स्वयें सहजें निजनिर्गुण । होऊनि ठाके ब्रह्म पूर्ण । अहंसोहंपण सांडूनी ॥३९॥ यापरी मद्भक्त जाण । ब्रह्म होती परिपूर्ण । तेंचि जाहलेपणाचें लक्षण । श्लोकार्धें श्रीकृष्ण सांगत ॥४४०॥ प्रपंच एक पूर्वीं होता । हे समूळ मिथ्या वार्ता । पुढें होईल मागुता । हेंही सर्वथा असेना ॥४१॥ जैसे आंत बाहेरी भाग । नेणे साखरेचें अंग । तैसें सबाह्याभ्यंतर चांग । ब्रह्म निर्व्यंग निजानंदें ॥४२॥ ऐसें पावल्या ब्रह्म परिपूर्ण । साधकासी न ये मरण । प्रारब्धें देहीं उरल्या जाण । देहाभिमान बाधीना ॥४३॥ बाह्य न देखे दृश्यदर्शन । अंतरीं नाहीं विषयस्फुरण । देहींचें न देखे देहपण । जीवन्मुक्तलक्षण या नांव ॥४४॥ बाह्य देखे दृश्यप्रतीती । अंतरीं विषयांची आसक्ती । या नांव अज्ञानाची स्थिती । अविद्याशक्ती बाधक ॥४५॥ तें निरसावया अविद्याबंधन । अवश्य करावें माझें भजन । हें जाणोनी साधुसज्जन । भक्तीसी प्राण विकिला ॥४६॥ माझिये भक्तीपरती । आणिक नाहीं उत्तम गती । तेंही भजन अभेदयुक्तीं । तैं चारी मुक्ती कामार्या४ ॥४७॥ हृदयीं विषयाची विरक्ती । वरी अभेदभावें माझी भक्ती । तें भजन अनन्य प्रीतीं । त्याचा मी श्रीपती आज्ञाधार ॥४८॥ भक्तिनामाचा इत्यर्थ । माझे स्वरुपीं निजभावार्थ । येणेंचि लाभे परमार्थ । सुफळ शास्त्रार्थ या नांव ॥४९॥ माझिये भक्तीचेनि नांवें । पशु पक्षी उद्धरावे । मा मानवी भजनभावें । म्यां अवश्य न्यावे निजधामा ॥४५०॥ यालागीं सांडोनि व्युत्पत्ती । जाणतीं नेणतीं गा समस्तीं । भावें करावी भगवद्भक्ती । तैं निजात्मप्राप्ती अनायासें ॥५१॥ भावें करितां माझें भजन । स्वयें निर्दळती तिन्ही गुण । सहजें प्रकटे निजनिर्गुण । हें सत्य श्रीकृष्ण बोलिला ॥५२॥ जेथ उगवली गुणगुंती । तेथ प्रकटे निजशांती । हेंचि ये अध्यायीं श्रीपती । उद्धवाप्रती बोलिला ॥५३॥ यालागीं जेथ भगवद्भक्ती । तेथ गुणजयो लाभे वृत्ती । सहजें प्रकटे निजशांती । निजात्मप्राप्ती स्वतःसिद्ध ॥५४॥ ते निजभक्ति माझी जननी । ज्या पैठा केलों जनार्दनीं । एका जनार्दनचरणीं । मिळोनि मिळणीं भजतचि ॥५५॥ पुढिले अध्यायीं कथा गहन । ऐलउर्वशीउपाख्यान । ज्या अध्यायाचें करितां पठण । अगम्यागमनदोष हरती ॥५६॥ ज्या पुरुरव्याची विरक्ती । स्वमुखें वर्णील श्रीपती । वैराग्यें निजात्मप्राप्ती । सभाग्य पावती वैराग्य ॥५७॥ त्या वैराग्याचें निरुपण । अतिगोड निरुपी श्रीकृष्ण । श्रोतां कृपा करावी पूर्ण । द्यावें अवधान कथेसी