"बॅग पॅकिंग' या नावातचं आमच्यासाठी काहीतरी वेगळं होतं !!
आम्ही दोघांनी आतापर्यंत "महाराष्ट्र देशा" ग्रुप बरोबर गडकिल्ल्यांची भटकंती केली होती पण बॅग पॅक टूर केली नव्हती.. त्यामुळे पहिल्यांदा ही तीन दिवसाची टूर करायला आम्ही खूप उत्सुक होतो.
आता बघा ना, तीन चार दिवसाच्या फॅमिली ट्रीपला जायचं असेल तरीही, नाही नाही म्हणता दोनतीन बॅगा सहज पॅक होतात...बॅगपॅक टूरमध्ये मात्र प्रत्येकी एकच बॅग असावी आणि तीही शक्यतो पाठीवर अडकवता येईल अशी..
अशा टूर मध्ये आपलं जास्त लक्ष पॉइंट्स कव्हर करण्याकडे असतं. त्यामुळं वेळ प्रसंगी आपली बॅग आपल्याला बरोबर घेऊनही फिरावं लागतं.. म्हणून गरजेचं पण कमीत कमी सामान आणि कपडे = बॅग पॅक टूर
ठरल्याप्रमाणे गरजेपुरतं सामान घेऊन बॅगा भरल्या..
नाही म्हटलं तरी अनिलची बॅग माझ्या बॅगपेक्षा थोडी जडचं झाली होती ( माझे जास्तीचे कपडे मी त्याच्या बॅगमध्ये भरले ना 😁) ... आता बायको म्हटलं की इतना तो चलता हैं ना बॉस!! 😀😀
बरोबरीने रात्री ट्रेनमध्ये खाण्यासाठी आमची नेहमीचीच क्षुधा शमवणारी अन्नपूर्णा शुभांगी हिने पुरी भाजी, बिर्याणी, लोणचं.. (तोंडाला पाणी सुटलं ना 😋😋.. अजूनही ती चव जिभेवर रेंगाळतेय ) असं चविष्ट जेवण व्यवस्थित पॅक करून दिलं..
खूप दिवसांनी ट्रेन प्रवास करायचा होता आणि तोही कोकण रेल्वेने.. माझ्यासाठी हा योग म्हणजे 'चेरी ऑन केक"..
ठरलेल्या दिवशी सगळा ग्रुप ठाणे स्टेशनवर एकत्र भेटणार होता.. काहीजण पुण्याहूनही येणार होते..
सगळे अगदी वेळेवर आले.. काही ओळखीचे तर काही अनोळखी चेहरे..
पण हा फरक फक्त थोड्या वेळापुरताच .. पाचचं मिनिटात ओळखी होतात आणि आपण असं बोलायला सुरुवात करतो की किती जुने मित्र आहोत !! 😅
ट्रेन अगदी वेळेवर आली... आपापल्या जागेवर जाऊन आम्ही स्थानापन्न झालो... सगळे एकत्र नसले तरी पांच-पांच सहा-सहा जणांचा ग्रुप एकत्र होता त्यामुळं काही अडलं नाही..
मी मात्र थोडीशी नाराज झाले. एकही खालचा बर्थ आमच्यापैकी कोणाचाच नव्हता तर खिडकी कशी मिळणार??
अनिलच्या हे लक्षात आलं..
आता बायकोचा हसरा चेहरा बघण्यासाठी काहीतरी करायला हवं .. 🤔🤔
त्यानं इकडे तिकडे बघितलं तर बाजूच्या साईड लोअर बर्थवर एकच माणूस बसला होता..
आमचे साहेब गेले ना मग त्याला पटवायला..
वाटाघाटी सुरू झाल्या. मी माझ्या जागेवर बसून गंमत बघत होते.. तो माणूस काही आपली विंडो सीट देईल अशी आशा वाटत नव्हती..
अनिल त्याला "बॉटल "मध्ये उतरविण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता..
"जो हुकूम मेरे आका " असं म्हणून सहजा सहजी सीट सोडणारा साधा भोळा "जीन" नव्हता तो!!
शेवटी माझा अल्लाऊद्दिन कंटाळला आणि निराश होऊन परत आला..
तेवढ्यात मयुरेश आला..
"काय झालं ताई ?? झाली का सीट अरेंज??"
"अरे, नाही ना..'
"तो माणूस नाही देत विंडो सीट.."
थांब मी बघतो..
मग मयुरेश गेला..
'क्या भाईसाब , दे दो ना इन को सीट.. दोनों मिया बिवी बैठेंगे आराम से .."
"आप अकेलेही हो ना ..सो जाव उपर की सीट पे जाके..
"अरे, मुझे भी बाहर का आनंद लेने दो थोडा समय "
"टी .टी .(🤔) को आने दो.. फिर मैं बदलता हुं सीट.." ( याला टी. सी. म्हणायचं होतं बहुदा हे आमच्या उशिराने लक्षात आलं) ..त्या माणसाने आम्हाला कटवण्यासाठी शेवटी टी. सी. चा रामबाण उपाय काढला..
कधी तुझा टी. टी. येणार आणि कधी तू सीट देणार .. मी मनातल्या मनात त्याच्या नावानं बोटं मोडली..😀😀
मी मयुरेशला खुणेनेचं सांगितलं, "जाऊदे, नको त्याच्या नादाला लागू.."
आम्ही दोघांनी मग आहे तिथंच बसून घेतलं .. बाकीचा ग्रुप पण होताच की .. आमचा गप्पांचा फड रंगला ..
थोड्या वेळाने,बाजूच्याच सीटवर दुसऱ्या ग्रुपची काही मुलं होती ती गप्पा मारण्यासाठी त्यांच्या ग्रुपकडे गेली..
अनिलने हे बघितलं आणि लगेच मला सांगितलं,"स्वाती, जा बाजूची विंडो सीट रिकामी आहे.कोणी नाही तिथं.ती मुलंही आता लवकर नाही यायची.."
"जा सिमरन जा , जी ले अपनी जिंदगी "..😀
मी क्षणाचाही विलंब न करता विंडो सीट पकडली..
स्वर्ग दोन बोटं उरला माझ्यासाठी!!..
आता काय.. फक्त मी आणि खिडकीतून दिसणारा निसर्ग...
पनवेल स्टेशन गेले..
आता खऱ्या अर्थाने प्रवासाची सुरुवात झाली...
खिडकीतून दिसणारा तो हिरवागार निसर्ग मन मोहित करत होता!!
सारी सृष्टी जणू आमच्या स्वागतासाठीच हिरवागार शालू, हिरव्या बांगड्या, रानफुलांचा सुंदर गजरा घालून नटली होती..
तिचं ते हिरवंकंच रूप मनाला भुरळ घालत होतं..
भाताच्या शेतांनी तर हिरव्या रंगाच्या सगळ्या छटा परिधान केल्या होत्या.. मानसीचा चित्रकार तो.. त्यानं रेखाटलेलं सुंदर चित्रच जणू समोर जिवंत झालं असल्यासारखं भासत होतं..
दिमाखात उभ्या असलेल्या सह्याद्रीच्या रांगा संध्याकाळचे ऊन आपल्या अंगावर घेऊन निवांत पहुडल्या होत्या आणि त्यांच्या अंगावरून पावसाचे पांढरे शुभ्र पाणी मुक्तपणे वाहत होते..
ऊन पावसाचा खेळ सुरू असल्याने सप्तरंगी इंद्रधनुष्यानेही आमच्या डोळ्याचे पारणे फेडले.. आमच्या काही मित्रांनी ते दृष्य कॅमेरात कैद केले..
मध्येच एखादं गाव माणसाचं अस्तित्व दाखवत होतं.. कोकणातील विशिष्ट पद्धतीनं बांधलेली उतरत्या छपरांची कौलारू घरं छोट्या छोट्या समूहाने इतस्ततः विखुरली होती..
आता सूर्यदेव अस्ताला गेल्याने बऱ्यापैकी अंधार झाला होता..
दिवेलागणीची वेळ झाल्याने रस्त्यावर लागलेले पिवळे क्षीण दिवे लुकलुकत होते..
गाडीला मात्र याच्याशी काही देणं घेणं नसावं. ती भरधाव वेगाने धावत होती.
इंजिनाचा घुमदार आवाज कानाला गोड वाटत होता..
बाहेरचं काही दिसत नव्हते.. पण पवनदेव आपलं अस्तित्व मला दाखवत होते..गाडी वेगात मार्गक्रमण करत असल्याने खिडकीतून तोंडावर वाऱ्याचे सपकारे बसत होते..
तो बेभान वारा शक्य होईल तेवढा मी पिऊन घेत होते
त्यानं स्वतः बरोबर मलाही बेधुंद केलं..
बाहेरच्या निसर्गाशी मी एकदम तादात्म्य पावले.. तंद्रीच लागली.. सुख -दुःख, जग -दुनिया सगळ्यांचं अस्तित्वचं मी विसरून गेले..
अनिलने मध्येच येऊन हलवले तेंव्हा माझी समाधी भंग झाली..
तोही बाकीच्या मुलांबरोबर पत्ते खेळून एन्जॉय करून आला होता..
खुशीत होती स्वारी एकदम..
मग थोडा वेळ गप्पा मारत बसलो..हळूच हसत हसत कानाशी येऊन कुजबुजला,"एखादा बोगदा आला ना की या शेजारच्याला थोड बुकलावं असं वाटतंय.. सीट दिली नाही त्यानं आपल्याला "😁😁
हळू हळू रात्रराणीने आपला रंग अजून गडद केला... खिडकीबाहेर मिट्ट काळोख पसरला..
आता भूकही लागली होती.. जास्त वाट न पाहता सोबत आणलेल्या स्वादिष्ट जेवणावर आम्ही तुटून पडलो..
जेवून झाल्यावर जास्त टाईमपास न करता सरळ आपापल्या जागेवर जाऊन आडवे झालो.. पहाटे पाचच्या सुमारास "होनावर " स्टेशन येणार होतं..
उद्याचा दिवस बऱ्यापैकी धावपळीचा असल्याने आम्ही निद्रादेवीच्या अधीन झालो..