eldest in Marathi Mythological Stories by बाळकृष्ण सखाराम राणे books and stories PDF | जेष्ठ

Featured Books
Categories
Share

जेष्ठ

जेष्ठ

तो पांडवांचा अखेरचा प्रवास होता.सारी राजवस्त्रे.अलंकार ,सारी सुखे त्यागून ते स्वर्गाचा मार्ग आक्रमित होते.यापूर्वीही त्यांनी अनेकदा यापेक्षा खडतर प्रवास केला होता.अगदी बालपणापासून त्यांच्या नशिबी सतत संघर्ष करणे आले होते.प्रत्येक वेळा त्या पाच जणांची वज्रमूठ एक राहिली. प्रत्येक संकटाला तोंड देत त्यांनी यशस्वीपणे आपला जीवनप्रवास चालू ठेवला. खरच! जीवनाचा मार्ग कसा असतो तेच समजत नाहीत. असंख्य गुंतागुंतीच नाव म्हणजे जीवन!एखादी रेषा शांतपणे एकटीच सरळ चालली असता..अचाक असंख्य रेषा तिला छेद देत जातात.त्या आगंतुक रेषेचा परिणाम त्या रेषेवर होणे अपरिहार्य असते.मग त्या रेषेचा मार्ग बदलतो.वाट चुकल्यागत ती भिरभिरत राहते.
पांडवांच जीवन सतत अस्थिरतेच्या मार्गावरून फिरत राहिले. पदोपदी नियतीने त्यांची परीक्षा घेतली. अनेकवेळा---अचानकपणे अतर्क्य अशी संकटे त्यांच्यावर कोसळली.प्रत्येक वेळी मोठ्या हिंमतीने लडून ते त्यातून सुटले.आयुष्याच्या एका वळणावर कृष्ण त्यांचा सखा सोबती झाला.रणरणत्या ऊनात जणू सुखाची सावली मिळाली. अशाच एका भावरम्य क्षणी द्रौपदी त्यांच्या आयुष्यात आली.द्रौपदी म्हणजे धगधगती ज्वाला. तिच्यामुळे पांडवांच जीवन अघिक प्रवाही बनल.तिने सार्या पांडवांना सतत चेतवत ठेवल. त्यांच्या अस्मितेच---शौर्याचे यज्ञकुंड सतत पेटत ठेवले. सौंदर्याची मूर्तीमंत खाणं असलेली द्रौपदी अतिशय मनस्विनी---मानिनी होती. द्रौपदी म्हणजे पांडवांना एकत्र बांधून ठेवणार सूत्र होते.
आज या अखेरच्या प्रवासात पांडवांच्या मनात भूतकाळा बद्दल कोणतीच तक्रार नव्हती.राग,लोभ,मोह या सार्यांच्या पलीकडे निखळ सुखाचा,शांतीचा शोध घेण्यास ते निघाले होते.अठरा दिवसांच्या विनाशकारी युध्दानंतर हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच योद्धे शिल्लक राहिले होते.सार्या भारतवर्षाच अपरिमित नुकसान झाले होते.सखे-सोबती,वडिलधारी माणसे,आप्तेष्ट व वंदनीय गुरूवर्य सारेच या युध्दात मारले गेले होते. खरतर त्याच वेळी युधिष्ठीराच्या मनात वैराग्याचा विचार आला होता.युध्द जिंकून काय उपयोग?राज्य कुणासाठी करू?असे असंख्य प्रश्न त्याच्या मनी निर्माण झाले. पण कृष्णाच्या युक्तीवादाने त्याची विरक्ती ठळली.पांडवांनी प्रजेचा अभिमान वाटावा अस आदर्श राज्य निर्माण केल.कालांतराने एका व्याधाच्या बाणाने श्रीकृष्णाची अवतार समाप्ती झाली. शरिरातून प्राण निघून गेल्याप्रमाणे पांडवांच जीवन अर्थहीन व निरस झाल.अखेर व्यासांनी पांडवांना त्यांचे जीवनकार्य समाप्त झाल्याची जाणीव करून दिली. स्वर्ग प्राप्तीसाठी हिमालयाची वाट पकडावी असे सुचविले.
--------------
आणि मग तो स्वर्गाकडे जाणारा प्रवास सुरू झाला. आज पांडव विरक्त होते.त्यांच मन मोकळे होते.या अंतिम क्षणी त्यांना पुन्हा मागे वळून बघण्याची गरज नव्हती. काय चुकल-----काय बरोबर होत---धर्म---अधर्म,---निती-अनिती अशी कोणतीच द्वंद्वे त्यांच्या मनी नव्हती. सूर्यकिरणांनी चमचमणारी बर्फाळ हिमशिखरे,विविध रंगीत फुलांनी भरलेल्या दरडी,स्वच्छ पाण्याचे झरे,निळसर आभाळात झेप घेणारे पक्षी यापैकी काहीच त्याना आज खुणावत नव्हते. एखाद्या ठिकाणी क्षणभर थांबून दैवी निसर्गसौंदर्य न्याहाळाव असा विचारही त्यांच्या मनाला स्पर्श करत नव्हता. पण द्रौपदीच्या मनात आजही भूतकाळ रेंगाळत होता.वाटेतला निसर्ग तिला साद घालत होता.अगदी आताही मानससरोवराच निळसर पाणी,मंद लाटा,विविध रंगांची कमळे, जलक्रीडा करणारे हंस पाहून ती थबकली. तिची पावले रेंगाळली . सततच्या चालण्याने ती दमलेली होती.थोडा वेळ थांबाव---विसावा घ्यावा अस तिला वाटत होत.पण पांडव मात्र न थांबता चालत होते.
खरच!अंतिम क्षणी कोणच---कुणाच नसत हेच खर!
मानिनी---द्रौपदी थोडी दुखावल्यासारखी झाली.तेवढ्यात तो रांगडा---बलिष्ट भीम मागे वळला.द्रौपदीची अवस्था बघून तो तिच्याकडे आला.
"द्रौपदी---दमलीस---!त्रास होतोय?"भीमाने व्याकुळतेने विचारले.
द्रौपदी हसली.कमी बोलणारा---पण सर्वांची काळजी घेणारा भीम आजही तिच्यासाठी व्याकुळ झाला होता.भीमान द्रौपदीला हाताने आधार देवून खाली बसवले.
"थांबूया क्षणभर !आपला प्रवास कधी संपेल कुणास ठाऊक?" भीम उसासा टाकून म्हणाला.
"की हा प्रवास असाच चालू राहिल,कधिही न संपण्यासाठी--"द्रौपदी स्वतःशीच पुटपुटली.
"अं--अं काय म्हणालीस द्रौपदी?" भीमाने अस्वस्थ होत विचारले.
"काही नाही नाथ---चला पुढे जाऊया."
आता भीम द्रौपदी सोबत चालू लागला.द्रौपदीला वाटलं भीम सर्वांचीच किती काळजी घेतो. संपूर्ण आयुष्यभर भीमाने आपल्या भावांच्या रक्षणासाठी कितितरी संकटे झेलली. कितिएक सहासे केली.मोठ्या भावाच्या आज्ञेत राहूनही तो सतत वेगळ्या---स्वतंत्र व्यक्तीमत्वाने तळपत राहिला. द्रौपदी पांडवांची आयुष्यात येण्याअगोदर व आल्यावर सुध्दा भीम पांडवांच तारणहार बनून राहिला होता.
द्रौपदीच्या मनी सारा भूतकाळ चित्रासारखा ऊभा राहिला. तिच्या जीवनात पांडवांची प्रवेश झाला तो स्वयंवरावेळी. अर्जुनाने पाण्यातील प्रतिमा पाहून माश्याच्या डोळ्याचा वेध घेतला,त्यावेळी ब्राह्मणवेषातील गंधर्वासारख्या सुंदर दिसणार्या अर्जुनाला पाहून द्रौपदी सुखावली. मनोमन थरथरली.भविष्यातील सुखद स्वप्नांनी शहारली. सलज्ज नजरेने अर्जुनाने बघत तिने वरमाला त्याच्या गळ्यात घातली.पण नियतिच्या मनात वेगळच होत. त्या क्षणापर्यंत द्रौपदीच आयुष्य स्वच्छंदी फुलपाखरासारख होत.पण ज्या क्षणी ती पांडवांच्या आयुष्यात आली त्या क्षणी तिच आयुष्य धगधगत अग्नीकुंड बनले. याच अग्नीचा वसा घेत ती पांडवांना चेतवत राहिली.त्यांच्या पराक्रमाला उभारा देत राहिली.कुंतीच्या आज्ञेमुळे ती पाच पांडवांची पत्नी बनली. पांडवांच्या प्रवासात थी त्यांची सहचारीणी बनली. तिच मन अर्जुनावर होत,पण भीमाच्या सहवासात ती स्वतःला अधिक सुरक्षित समजायची.
बलिष्ट व रांगडा भीम तिच्यासाठी वाटेल ते करायला तयार असायचा. तिच्या अपमानाने तो पेटून उठायचा.ती जराही उदास दिसली तरी तो चिंतीत व्हायचा. द्रौपदीला अनेक प्रसंग आठवले.भरसभेत तिची लज्जास्पद विटंबना झाल्यावर कौरवांच्या विनाशाची भीमा ने केलेली प्रतिज्ञा---सारी सभा मान खाली घालून बसलेली असताना चवताळलेला भीम----सतत मोठ्या भावाच्या आज्ञेत राहणारा भीम------त्या दिवशी युधिष्ठीराचे हात उपटायला निघाला होता कारण त्या हाताने त्याने द्रौपदीला पणाला लावले होते. जटासुराने द्रौपदीचे हरण केल्यावर चवताळलेला भीम व त्याने जटासुराची केलेली दुर्गती तिला आठवली. कृष्ण व इतर पांडव कौरवांशी युध्द नको,संधी हवी यावर चर्चा करत होते,तेव्हा भीम व द्रौपदी मात्र अपमानाचा बदला युध्द करून व पराक्रमाने घ्यायचा असे सुचवत होते. विराटा घरी सैरंध्री बनलेल्या द्रौपदीच्या अब्रूवर घाल घालण्यास निघालेल्या किचक व अनुकिचकांची ज्या निर्दयपणे व कल्पकतेने भीमा ने वाट लावली ते आठवून ती या क्षणीही रोमांचित झाली.
भीमा ने तिच्यासाठी केलेल्या सर्व प्रतिज्ञा स्वतःच्या पराक्रमाने पूर्ण केल्या. तिला आठवला तो ---- परमावधिचा प्रसंग---जीवनाच सार्थक झाल अस वाटाण्याच्या तो प्रसंग---!दुःशासनाच्या रक्ताने मारलेल्या हाताने त्याने द्रौपदीची मोकळी वेणी बांधली तो क्षण! त्या मानिनीच्या आयुष्यातला तो साफल्याचा व तृप्तीचा क्षण होता तो!वेणी बांधून झाल्यावर ती हुंदके देत किती तरी वेळ रडत राहिली होती.आपल्या पतीच्या पराक्रमाने भारावली होती .खर म्हणजे मोठ्या भावाच्या-युधिष्ठीराच्या आज्ञेत राहिल्याने भीमाच्या पराक्रमाने मर्यादा आली होती.तिला वाटल भीम मोठा भाऊ असता तर! तर पांडवांच जीवन अधिक वेगळ्या मार्गाने गेल असत.अपमानाचे कटू प्रसंग फारसे आले नसते.खरच भीम मोठा-----जेष्ठ पांडव असता तर?
द्रौपदीला विचार करता-करता भोवळ आल्यासारख वाटल.पाय उचलेनासा झाला.शरीरातून काहितरी निघून गेल्यासारखं वाटल.पडता पडता भीमाचा हात पकडून ती पुटपुटली ----"पुढच्या जन्मी तुम्ही मोठे भाऊ व्हा---!
त्याच क्षणी ती खाली पडली. खाली पडलेल्या द्रौपदीला बघून भीमाच्या डोळ्यात अश्रू तरळले.
जणू त्याचे प्राणच त्याला सोडून गेलेत अस त्याला वाटल.