Jodidar - 7 in Marathi Short Stories by Madhavi Marathe books and stories PDF | हिरवे नाते - 7 - जोडीदार

Featured Books
Categories
Share

हिरवे नाते - 7 - जोडीदार

                                                                                             जोडीदार

 

  “ सिध्दाली आटोप लवकर.”

  “ मला नाही आटपायचय, सांगितलं ना एकदा.”

  “ अगं बाई पण त्याला ये म्हणून सांगून ठेवलय ना आता. मग आता सामोरं जायला नको का ?”

  “ मी सांगितलं का त्याला ये म्हणून ?”

  “ काही म्हण बाई, पण आजच्या दिवस तरी माझ्यासाठी तयार हो. मग तू म्हणशील त्याप्रमाणेच करेन. प्लीज उगीच त्रास देऊ नकोस. उठ ग माझी राणी.”

  सिध्दालीचं रागवून बसणं आणि आईनी तिची समजूत काढणं हे नेहमीचच झालं होतं. पण आजचा प्रसंग वेगळा होता. तिला पहायला एक मुलगा येणार होता. सिध्दालीचा लग्न यावर फारसा विश्वास नव्हता. मैत्रिणी जेव्हा या विषयावर गप्पा मारायच्या तेव्हा ती तिथून उठून जायची. वासनेने बरबटलेल्या चेहेऱ्यांमध्ये निखळ मैत्री शोधत राहायची. पण शेवटी तिच्या वाट्याला यायचं ते एकलेपणच. एरवी खळखळून हसणारी, बोलणारी सिध्दाली लग्न, प्रेम या विषयांवर गाडी आली की मिटून जायची. एक उदासिनता तिला घेरून रहायची.

   आज नीलेश येणार होता. आईसाठी का होईना पण तयार होणं भाग होतं. शेवटी चरफडत ती उठली आणि तयार होऊन बसली. चार वाजता नीलेश आला. औपचारिक गप्पा झाल्यावर नीलेशने तिच्याशी एकट्याने बोलायची इच्छा प्रगट केली. “ आपण बाहेर जाऊया का ? जरा मोकळं वाटेल आणि बोलताही येईल.”

 “ हो हो जाना .” आई म्हणाली. तसं तिच्याकडे रागाने पहात अनिच्छेनेच सिध्दाली उठली.

घरासमोरची वर्दळ सोडून दोघं टेकडीच्या दिशेने निघाले. शांत वातावरणात तिलाही बरं वाटलं. गार वाऱ्याच्या झुळुका अंगाला स्पर्श करून जात होत्या. उडणाऱ्या पाखरांवर उतरतं सोनेरी ऊन ओसंडून जात होतं. “ बोल ना.” म्हणत नीलेशनी तिला भानावर आणलं.

 “ तुम्हाला बोलायचं होतं ना तुम्हीच बोला.” त्याला तुसडया सारखं फटकारताना तिला एक आसुरी आनंद होत होता. आपल्या जीवनात ढवळाढवळ करायला आलेल्या या अनोळखीपणाचा त्यात रागही होता.

 “ बसूया .” म्हणत ते गुलमोहराच्या गर्द सावलीत विसावले. “ सिध्दाली तू माझ्या बाबतीत उदासिन आहेस हे मला जाणवतय, पण तरी तुझ्याशी खूप गप्पा मारावाश्या वाटत आहेत.” “ तुमच्या बद्दलचा प्रश्न नाही. मी लग्नं या प्रकाराबाबतच उदासिन आहे. त्यामुळे लग्न, या संदर्भात जो कोणी येईल त्याबद्दल माझा आविर्भाव असाच राहिल.” सिध्दाली म्हणाली

“ खरं सांगू सिध्दाली मी ही याबाबतीत उदासिन आहे. तुला पहिल्यांदा जेव्हा पहिलं तेव्हा तुझ्या डोळ्यात माझीच व्यथा डोकावून गेल्याचा भास झाला.”

 “ तुम्हाला हे कळाले होते तर मग परत कशाला भेटायचं होतं ?”

 “ सिध्दाली, मी एक आशावादी माणूस आहे. दोघांच्याही जीवनात अशा काही घटना घडल्या आहेत की ज्यामुळे याबाबत आपण उदासिन आहोत. कुठली तरी कारणं असल्याशिवाय माणूस सहज सुलभ नैसर्गिक प्रवृत्ती पासून दूर जाऊ शकत नाही. तू माझ्याजवळ मन मोकळं करशील का ? मी ही एका घटनेचा शिकार आहे. वाटल्यास मी पहिल्यांदा माझी व्यथा ऐकवतो.”

   सिध्दालीच्या डोळ्यात व्याकुळता उमटली. बेचैन शरमेने ती मान खाली घालून बसली. तिचा अजूनही नीलेशवर विश्वास बसला नव्हता. आई वडील, मित्रमैत्रिणी सगळ्यांनाच तिने आपल्या विचारापासून दूर ठेवले होते, आणि आता एकदम या अनोळखी तरुणावर विश्वास टाकायचा ? नीलेशने तिचे भाव ओळखले.

 “ हे बघ, मी तर माझी कहाणी सांगून टाकतो. मला जरा मोकळं वाटेल. मग तुला सांगविशी वाटली तरच तू सांग. जबरदस्ती नाही, आणि अनोळखीपण हे अचानक ओळखीत बदललं जातं. मी नऊ वर्षाचा होतो तेव्हा माझे वडील हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते. अक्सीडेंटमध्ये त्यांच्या डोक्याला मार बसला होता. परिस्थिती अत्यंत नाजुक होती. आई वडिलांच्या सुरक्षित छत्राखाली वाढताना वडिलांचे आजारपण एकदम भावनिक असुरक्षितता देऊन गेलं. त्यांना बरं वाटावं म्हणून मीही माझ्या परीने झटू लागलो. आई दिवसरात्र त्यांच्या उशाशी बसलेली असायची. एके दिवशी वडील आचके देऊ लागले. आई घाबरली. मी डॉक्टरांना आणायला पळालो. त्यांच्या रूममध्ये ते नव्हते. कुणीतरी सांगितलं वर असतील. वर गेलो तर एका खोलीचं दार अर्धवट उघडं होतं. तसाच आत घुसलो आणि बघतो तर डॉक्टर एका नर्सला जबरदस्ती आपल्या अंगाखाली ओढत होते. तिच्या नको नकोच्या घुसमटलेल्या किंकाळ्या त्यांच्या अंध मनाला जाणवत नव्हत्या की बाहेर कुणाला ऐकू येत नव्हत्या. डोकं सुन्न झालं. वडील मरणाच्या दारात होते आणि इकडे डॉक्टर एकीचा मानसिक जीव घेत होते. तशाच अवस्थेत मी त्यांना हाक मारली. माझ्याकडे बघताच ते दचकले. दुसऱ्या क्षणी त्यांच्या डोळ्यात अंगार फुलले. एका जोरदार थपडेने त्यांनी मला दरवाज्या बाहेर फेकले. अपमान, वडिलांचं दुःख, एका असहाय स्त्रीचं ओरडणं हे सगळं त्यावेळी फार काही शिकवून गेलं. वासनेचे रूप तेव्हा काही कळाले नाही. पण मोठं झाल्यावर त्याच्या हिंस्त्रपणाची चुणूक जगात वावरताना दिसून येऊ लागली. मन घृणेने भरून आलं. तो डॉक्टर पाच मिनिटे जरी आला असता तरी माझे वडील जिवंत राहिले असते कदाचित. .. जाऊ दे. पण एकूण आता कुठल्याही स्त्रीशी जवळीक करण्याची माझ्या मनाची आणि शरीराची तयारी नाही. पण स्त्री पुरुष हे नातं जीवन जगायला शिकवतं. आनंदाचे, दुःखाचे क्षण वाटायला शिकवतं. केवळ मैत्री करून क्षण नाही जगता येत. ते क्षण उपभोगायला स्वतःचं असं दुसरं अस्तित्व असायला हवं असतं आणि लग्न करत नाही म्हणून आपल्या कुटुंबावरही आपला भारच असतो. डॉक्टरांचं म्हणणं आहे केवळ स्त्री संपर्कानेच तुमच्या मनाची, शरीराची तयारी होईल. पण मला जीवनसाथी हवा तो तेव्ह्ढ्यासाठी नाही तर एक साथ देणारा, घरी परतताना आपली कुणी वाट बघतय ही ओढ लावणारा, एकमेकांशी गप्पा मारताना रात्र संपवून टाकणारा, पहाटेच्या धुक्यात फुलून येणाऱ्या आणि ओघळणाऱ्या परिजातकाचा आनंद लुटायला लावणारा, मन मानेल तेव्हा दोघेच उठून दूरवर भटकून येणारा, असे खूप काही हळुवार अर्थ प्राप्त असलेल्या आयुष्याचे क्षण उपभोगायला स्त्रीची साथ हवी आहे. मला कुणालाही फसवायचे नाहीये. ज्यासाठी लग्न करतात ते मी देऊ शकेन की नाही महित नाही. पण आयुष्यभराचं प्रेम, भावनिक सुरक्षितता, आपलेपणा हे मात्र भरभरून देईन. मला हे सगळं हवं आहे. अर्थात तशी मुलगी मिळाली तर.”

    नीलेश एकदम भानावर आला. सिधाली रडत होती. आजपर्यंत ती याच प्रेमाला आसुसली होती, आणि आज ते अचानक समोर आलं होतं. तिचं मन हलकं झालं.

  “ काय झालं ? माझं काही चुकलं का ?” नीलेशने चिंतातुर स्वरात विचारले.

 “ काही नाही तुम्ही अचानक खूप ओळखीचे निघालात त्यामुळे मन हलकं झालं. माझ्या बाबतीत कुठलीही घटना घडली नाही. पण स्त्रियांच्या बाबतीत रोज घडणारे अत्याचार, अपमानजनक वागणूक, लहानपणापासून तनाला आणि मनाला वेगवेगळ्या लोकांचे होणारे वेगवेगळे स्पर्श, हे सगळं बघून मन कमकुवत होत गेलं. पुरुषजाती बद्दल घृणा बसली. वासनामय जगापासून स्वतःला दूर ठेवावे वाटत होते. खरं सांगू ती ओढ मलाही अजिबात नाहीये. तुम्ही शारीरिक बंधनाची सक्ती ठेवणार नसाल तर मी ही आनंदाने लग्नाला तयार आहे. नंतर आपल्यात जवळीकता वाढून शरीराने एकत्र आलो तर हरकत नाही, पण तेव्ह्ढ्या साठी लग्न हा भाग नसेल तर मी ही लग्नाला तयार आहे. दोघांनी हसून एकमेकांच्या डोळ्यात बघितलं. खूप काही सापडलं होतं त्यात. जे फारच क्वचित लोकांना मिळतं.

                                                    .........................................................................................................