भाग १९.
गुंजनचा परफॉर्मन्स तर बेस्ट झाला होता आणि तिला वन्स मोअर मिळाल्याने तिने पुन्हा एकदा सगळयांना नाचून दाखवलं होत. आपला परफॉर्मन्स संपवून ती स्टेजच्या खाली उतरते. सगळे जण तिला चेंजिंग रुमपर्यंत जाईपर्यंत हात मिळवणी करून तिला अभिनंदन करत असतात. ती देखील हसूनच सगळयांना धन्यवाद म्हणत असते. सगळयांचे आभार मानून ती रूममध्ये पोहचते आणि हसूनच पटकन आपल्या मोबाईल वरून वेदला कॉल करते.
"अभिनंदन , मिसेस वेद. खूप छान डान्स होता तुमचा. ", वेद हसूनच कॉल उचलल्या उचलल्या तिला म्हणाला. त्याचा तो आवाज आणि कौतुक पाहून तिला भरून येत.
"थँक्यु, मिस्टर वेद. तुम्ही आज बिझी नाही का?",गुंजन आवाजावर कंट्रोल ठेवत विचारते.
"अस कस बिझी असेल ना मी?अरे, माझ्या बायकोचा परफॉर्मन्स होता ना? म्हणून मग मी वेळ काढून पाहत बसलो होतो. लाईव्ह परफॉर्मन्स पाहण्यात एक वेगळी मज्जा असते.",वेद प्रेमाने तिला म्हणाला.
"तुम्ही पण ना. असो, बट आय मिस यू लॉट ऑफ. ", गुंजन भरल्या डोळयांनी म्हणाली. तिचा असा आवाज ऐकून वेद शांत होतो.
"काय झालं गुंजन? आज परफॉर्मन्सच्या आधी अस का झाले होते? तू रडते का आहे?",वेद अस्वस्थ होत एकामागून एक प्रश्नांची भडीमार तिच्यावर करतो.
"वेद, आज मला भीती वाटली होती. पण अचानक काय झालं माहीत नाही. डोळे बंद करताच तुमचे विचार आठवले आणि मग स्वतःला खंबीर बनवून मी परफॉर्मन्स दिला.",गुंजन डोळे पुसत म्हणाली.
"गुंजन काही पण बोलते. तुझ्यात आधीपासूनच ते सगळं होत त्यामुळे आज ऑन द स्पॉट तू परफॉर्मन्स दिला. तू स्वतःच आहे या सगळ्याची हक्कदार!!",वेद तिला समजावत म्हणाला.
"माहीत नाही पण ते गाणं चेंज झालं कस काय ते कळलं नाही. पण आजच गाणं मात्र मस्त होत. मी पहिल्यांदा माझ्या कोषाच्या बाहेर जाऊन वेगळी पद्धतीने डान्स केला. मला त्याबद्दल जजेसने मार्क्स पण फुल्ल दिले. आता मी सेमी फायनलला जाईल का नाही माहीत नाही. पण आज काही तरी नवीन केलं याच तेवढं समाधान मला मिळेल.",गुंजन आता चेहऱ्यावर हसू ठेवतच वेद सोबत बोलते. कशी होती ना ती? एवढं सगळं करूनही समाधानी होत असायची. प्रत्येक वेळी कसलीही अपेक्षा न ठेवता आपलं बेस्ट देत असायची. म्हणूनच ती वेदला जास्त आवडत असायची.
"बेस्ट ऑफ लक गुंजन आणि काळजी करू नको. तू होशील सिलेक्ट!!",वेद तिला विशेस करत म्हणाला.
"बघू. आता मी जाते हा वेद. लव्ह यू आणि मिस यु.",गुंजन हसूनच म्हणाली. तसा वेद देखील तिला लव्ह यू म्हणून कॉल कट करतो.
इकडे गुंजनचे आतापर्यंतचे सर्व परफॉर्मन्स जजेस लोक पाहून तिला आतापर्यंतचे मार्क्स मिळवून देतात आणि एका त्यांच्यासमोर असलेल्या कागदाच्या बॉक्स मध्ये टाकतात. ऑनलाईन वोटिंग देखील कॉम्प्युटर डेअपार्टमेंट टीम काढून अँकर कडे पाठवतात. सर्व स्पर्धकांचे गुण यादी एकत्र करण्यासाठी ती लोक काही वेळाचा ब्रेक घेतात. तसे, टीव्ही वर काहीवेळातच जाहिराती चालू होतात. हे पाहून वेदच्या कपाळावर आठ्या पडतात.
"यांना पण ब्रेक आताच घ्यायचा होता. आता यांचे ब्रेक कधी संपणार काय माहीत.",वेद स्वतःशीच टिव्हीकडे पाहत म्हणाला. तो मग तसाच आपलं काम करत लॅपटॉपवर मग्न होऊन जातो. तो मग्न असताना एक प्रेमळ स्पर्श त्याच्या डोक्यावर होतो. तसा वेद त्या स्पर्शाने वर पाहतो.
"वेद, खूप थकला असशील ना? पण मी आता आली आहे कायमची तुमच्यासोबत राहायला.",एक मध्यम वयाची बाई त्याच्या केसांवर हात फिरवत म्हणाली. त्या बाईला पाहून मात्र वेद भलताच गोंधळतो.
"आईऽऽऽऽ , तुम्ही इथे? त्याही या वेळेस?तुम्ही उभ्या का बसा ना इथे.",वेद त्या बाईला पाहून म्हणाला. तो त्या बाईचा हात पकडून तिला बेडवर बसवतो. तशी ती बाई भरल्या डोळयांनी त्याला पाहते.
"वेदऽऽऽऽ आम्हाला माफ करा. आम्ही तुम्हाला ओळखण्यात चूक केली. बरं झालं तुम्ही त्या घरातून तुमच्या बायकोला काढलं. नाहीतर आज ती देखील आमच्यासारखी एक बनून राहिली असती."ती बाई डोळ्यात पाणी ठेवतच म्हणाली. ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून वेदची आई होती. त्यांना आलेलं पाहून वेदला आनंद झाला होता. पण त्यांची अवस्था पाहून त्याला वाईट वाटलं.
"वेद, मुलीला जन्म दिला म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजत होती. कारण माझी मुलगी एकदिवस गुंजन सारखी बनून माझं नाव मोठं करेल, असे मला वाटत असायचे. पण आज ती मुलगी एवढी खालच्या थराला गेली की तिला स्वतःची आई देखील कळली नाही.",वेदची आई अगदी शांत होत म्हणाल्या. त्यांचे असे बोलणे ऐकून वेद बेडवरून उठतो आणि आईच्या समोर जाऊन त्यांच्या पायाकडे बसतो.
"आई , मी तुमचा मुलगा आहे ना? मग मला सांगा सगळं काय झालं ते? मी तुम्हाला काहीच बोलणार नाही!!",वेद अस बोलून आईच्या मांडीवर स्वतःच डोकं ठेवतो. त्याच अस वागणं पाहून त्यांचे डोळे भरतात. एवढं सगळं घडून ही वेद इतका चांगला कसा असू शकतो? हे विचार मनात येताच त्या मनातूनच रडायला लागतात.
"वेद, आम्ही साथ नाही ना दिली त्यावेळी अस वाटत ना तुम्हाला?त्यात पहिल्या दिवशीच गुंजन आजारी पडल्यावर देखील तुम्हाला सुनावले होते. पण आज मला स्वतःच्या नजरेत स्वतःची लाज वाटते. एक सांगू, त्यावेळी जे झालं ते झालं. पण गुंजन सारखी मुलगी तुमच्या आयुष्यात आहे. हे पाहून मनाला समाधान मिळते. याहून चांगली मुलगी तुम्हाला आम्ही कधीच शोधू शकलो नसतो. ती मुलगी सगळं घडूनही त्यादिवशी शांत राहिली ",वेदची आई म्हणाली.
"आई , तिचा स्वभाव आहे तसा. तिच्या मनात तुमच्याबद्दल काही वाईट नाही आहे. ती वेगळी आहे. त्यामुळे जास्त विचार नका करू!!",वेद आईचा हात धरतच म्हणाला.
"अशी मुलगी आम्हाला मिळाली असती तर आम्ही भाग्यवान झालो असतो. मायराला जन्म देऊन आम्ही खूप मोठी चूक केली, असेच आम्हाला वाटते. ज्या मुलीला आपलं मानत होतो. त्या मुलीने आज आमच्यावर हात उगारला. ती तिच्या बापासारखी वाईट संगतीला गेली आहे वेद. आम्ही समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. पण तिने आमचं ऐकून न घेता आम्हाला मारले. ते अंमली पदार्थ सेवन करण्याची सवय तिला लागली आहे. आम्ही ती सवय तोडण्यासाठी म्हणून त्यांच्या रूममधील सगळं काही फेकून दिले होते. याचाच राग त्यांना आला आणि त्यांनी आम्हाला मारले वेद. तुमच्या बाबांनी देखील एका बाईला घरात आणले आहे. तिचा एक मुलगा आहे. जो रोज मायराच्या रूम मधून बाहेर पडत असतो. पण कोणी काहीच बोलत नाही. आम्ही नाही पाहू शकत हे सगळं वेद!! त्यामुळे सगळं सोडून तुमच्याकडे आलो आहोत.",वेदची आई भरल्या डोळयांनी सगळं सांगून मोकळ्या होतात आणि तश्याच चेहऱ्यावर हात घेऊन रडायला लागतात. त्यांचं रडणं पाहून वेदचे डोळे देखील पाणवतात. तो त्यांना काहीवेळ तसच रडायला देतो. कारण कितीतरी दिवसानंतर त्या अश्या मोकळ्या होत होत्या. हे त्याच्या लक्षात आल्याने तो शांत बसतो. टीव्ही वर गुंजनचा शो संपतो तरीही त्याचा लक्ष तिकडे न जाता त्याच्या आईवर राहतो.
"आई, बस्स झालं तुमचं रडणं. आतापासून तुम्ही आमच्यासोबत राहायचे. आम्ही तुम्हाला तिथे नाही पाठवू शकत. तुम्ही आधी जसे त्या घरात राहत होतात ना? तसेच इथं रहा आणि आमच्यावर भरभरून प्रेम करा",वेद उठून उभा राहत त्यांचे डोळे पुसत म्हणाला. वेदच अस बोलणं ऐकून त्याची आई त्याला पाहते.
"वेदऽऽऽऽ तुम्हीच आमचा आधार आहात. आम्हाला बाकी काही नको, तुम्ही फक्त हवे आहात. ",वेदची आई जड आवाजात म्हणाली.
"आई, आम्ही तुमच्यासोबत कायम आहोत. आता तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. तर तुम्ही इथंच झोपा. रात्र खूप झाली आहे. आम्ही इथंच थांबून तुम्हाला पाहत राहू. आमच्या आई खूप दिवसांनी आम्हाला पाहायला मिळत आहे. म्हणून आम्ही इथ बसून राहणार आहोत.",वेद आईला पाहून म्हणाला. तो आपल्या आसपास रूमच्या बाहेर असलेल्या बॉडीगार्डला बोलावून घेऊन स्वतःच्या आईसाठी डॉक्टरला कॉल करायला सांगतो. तसा तो बॉडीगार्ड डॉक्टरला कॉल करून बोलावून घेतो.आईची तब्येत त्याच्या जास्तच वाईट झालेली होती. तोंड सुजलेले होते आणि हातांवर , पायांवर लाल वळ दिसत होते. हे सगळं पाहूनच त्याला आईची काळजी लागते. त्यासाठी तो डॉक्टरांना बोलवायला सांगतो.
काहीवेळात डॉक्टर येऊन त्याच्या आईला चेक करून व्यवस्थित काळजी घ्यायला सांगून काही औषध लिहून देऊन निघून जातात. तसा वेद आईला रखुमाई आजीकडून खिचडी बनवून खाऊ घालून , औषध देतो आणि त्यांच्यासोबत बोलतच त्यांना झोपवून घालतो. त्याला आईची अवस्था पाहून सगळ्या जगाचा विसर पडला होता. आई त्याच्यासाठी किती महत्त्वाची होती? याची कल्पना कोणालाही येत नव्हती. गुंजनचे कितीतरी वेळा कॉल येऊन जातात त्याला पण त्याच्याकडून काहीच प्रतिसाद तिला मिळत नाही.
क्रमशः
©®भावना सावंत(भूवि)
------------------------