डिकीतला सस्पेन्स भाग ३
भाग २ वरून पुढे वाचा .........
सांगोळे काशीनाथला घेऊन आला.
“काशीनाथ तू हरीष ला ओळखतो. ?” – शेंडे.
“हो. साहेब.” – काशीनाथ.
“तो कुठे आहे ?” – शेंडे.
“काय झालं साहेब ? काय केल त्यांनी ?” – काशीनाथ.
“फालतू प्रश्न विचारू नकोस. तो कुठे आहे ते सांग.” शेंडे साहेबांनी कडक स्वरात विचारलं.
“गोंदियाला गेला आहे साहेब. त्याचं घर आहे गोंदियाला.” – काशीनाथ.
“कशाकरता गेला आहे ?” – शेंडे.
“त्याचं लग्न ठरलं आहे अस म्हणत होता साहेब.” काशीनाथ.
“कोणाशी ? आणि केंव्हा आहे लग्न ?” शेंडे.
“कोणाशी ते नाही सांगितलं. गुपित आहे म्हणत होता.” – काशीनाथ.
“म्हणजे ?” – शेंडे.
“मला एवढंच माहीत आहे.” – काशीनाथ.
“तू का नाही गेलास तुझ्या मित्राच्या लग्नाला ?” – शेंडे.
“त्यानी मना केलं. तू येऊ नको म्हणाला.” – काशीनाथ.
“त्याचे अजून कोण कोण मित्र आहेत ?” – शेंडे.
“नाही, अजून कोणी मित्र असा नाहीये.” – काशीनाथ.
“करपे, गोंदिया पोलिसांना फोन करा आणि काय परिस्थिति आहे त्यांची माहिती काढायला सांगा. हरीश ची फक्त माहिती काढा म्हणावं. त्याला हात लाऊ नका. त्याचं जर खरंच लग्न असेल तर त्यात बाधा नको. आणि ते रेड लाइट एरिया मधून काय सिग्नल येतो ते लवकर बघा.” – शेंडे.
दोन दिवस काही न घडता गेले. शेंडे अस्वस्थ झाले होते. कुठून काहीच मागमूस लागत नव्हता. पण थोड्याच वेळात गोंदिया पोलिसांकडून अपडेट आलं. हरीश च खरंच लग्न होतं. मांडव पडला होता. आणि लग्नाची धामधूम चालली होती. म्हणजे हरीश चा यात काही संबंध नव्हता. एखाद्या मुलीला लग्नाचं विचारणं हा काही गुन्हा नव्हता. मग आता काय ? रेड एरिया मधूनही काही बातमी नव्हती. करपे स्वत: जावून बरीच चौकशी करून आले पण हातात काही लागलं नाही. शेंडे, डेड एंड ला पोचले होते. ते पुन्हा मान्यांच्या कडे जाऊन अजून काही माहिती मिळते का ते बघून आले. पण प्रगती होण्यासारखं काही मिळालं नाही. माने कुटुंब सर्वच बाबतीत अनभिज्ञ होते. नीलाक्षी च्या मित्र, मैत्रिणी, कॉलेज सगळीकडे तपास करून झाला. काही संशयास्पद मिळालं नाही. नीलाक्षी एक सर्व साधारण नाकासमोर चालणारी मुलगी होती, या पलीकडे काही कळलं नाही. फाइल जवळ जवळ बंद झाली होती.
साधारण वर्ष उलटलं. कसलीच प्रगती झाली नव्हती. केस जवळ जवळ बंद झाली होती. एकदा सकाळी सकाळीच शेंडे, करपे एका केस च्या संदर्भात तपासासाठी जवळच्याच गावांमध्ये गेले होते. यायला संध्याकाळ झाली होती. दिवसभरात चहा प्यायला सुद्धा फुरसत मिळाली नव्हती. भूक पण लागली होती. करपे म्हणाले साहेब पाणीपुरी खाऊ चहा पिऊ तेवढ बरं वाटेल. समोरच्याच रामभरोसे पाणीपुरी च्या गाडीवर दोघेही थांबले. या दोघांना येतांना पाहून रामभरोसे दचकला. तरी चेहऱ्यावर उसन अवसान तो म्हणाला
“आइये सहाब, क्या बनावू आपके लीये ?” रामभरोसेनी विचारलं.
“पानी पुरी दो.” शेंडे म्हणाले. शेंडे साहेबांच्या नजरेतून त्याचं दचकणं सुटलं नाही. पूर्ण वेळ ते त्यांच्याकडे आपल्या भेदक नजरेने बघत होते. रामभरोसे त्यामुळे अस्वस्थ झालेला दिसला. वरतून साहेब म्हणाले की पानी पुरी इतनी बढ़िया थी की तुम्हारे साथ एक सेल्फ़ी हो जाए, आणि तो नको नको म्हणत असतांना सुद्धा सेल्फी काढली. चहा पिऊन झाल्यावर जीप मध्ये बसल्यावर शेंडे साहेब म्हणाले
“करपे तुम्ही बघितलं का तो रामभरोसे आपल्याला बघून जाम टरकला होता.”
“साहेब, पोलिस आपल्या कडेच येतांना बघितल्यावर सगळेच घाबरतात.”- करपे.
“पोलिस पानी पुरी खात नाहीत की काय ? साधारण गोष्ट आहे. साधारण पानी पुरिवाला दचकला नसता. हां, पोलिस पैसे देतील की नाही ही शंका त्यांच्या मनात येऊ शकते, पण ज्या प्रमाणे तो दचकला त्याचा अर्था काही वेगळाच असू शकतो. नाही, करपे हे नेहमीच घाबरणं वाटत नाहीये. काहीतरी गडबड आहे. मी पूर्ण वेळ त्याचं निरीक्षण करत होतो. नक्कीच दाल मे कुछ काला है.” शेंडे साहेबांनी त्यांना आलेला संशय बोलू दाखवला.
पोलिस स्टेशन वर आल्यावर शेंड्यानी गंगाधर ला बोलावलं. त्याच्या मोबाइल वर सेल्फी सेंड केली आणि म्हणाले की
“या फोटोत जो माणूस आहे त्यांच्यावर लक्ष ठेवा. 24 तास. हा रामभरोसे पणीपुरिवाला आहे. सिग्नल च्या चौकात बसतो. साध्या कपड्यात जा. काही वेगळं घडलं तर ताबडतोब कळवा.”
तो गेल्यावर करपे म्हणाले “साहेब असं काय घडलं की तुम्ही त्यांच्यावर नजर ठेवायला सांगितलं ?”
“पाणी पुरी खात असतांनाच माझं त्याच्याकडे बारीक लक्ष्य होतं त्याच्या हालचालीत सहज पणा नव्हता. आपल्याकडे बघत होता आणि अस्वस्थ होत होता. मी एक लॉन्ग शॉट मारतो आहे. नक्कीच कुठे तरी पाणी मुरतंय. काही गडबड असेल तर कळेलच. बघूया.” – शेंडे.
आठ वाजण्याच्या सुमारास गंगाधरचा फोन आला.
“साहेब, तुमच्या माणसाने गाडी बंद केली. आणि तो जायला निघाला आहे.”
“आता आठ वाजता ? पाणीपुरीच्या गाड्या साधारण अकरा वाजता बंद होतात. पहा, करपे मी तुम्हाला म्हंटलं होतं ना, कहानी शुरू होगयी है. गंगाधर, तुम्ही त्याच्या मागावर रहा आणि मला अपडेट देत रहा.” शेंडे म्हणाले.
साडे आठ ला गंगाधरचा पुन्हा फोन आला.
“रामभरोसे घरी आहे आणि त्याच्या कडे कोणीतरी गावावरून आलेला दिसतो आहे. हँड बॅग घेऊन आहे.”
“ठीक आहे तिथेच थांबा. नरेश तुम्हाला अकरा वाजता रीलीव करेल.” – शेंडे.
दहाच मिनिटांत पुन्हा गंगाधरचा फोन.
“साहेब, रामभरोसे पण बॅग घेऊन निघाला आहे आणि दोघेही जण एसटी स्टँडच्या दिशेने चालले आहेत.”
“ठीक आहे तुम्ही त्यांची पाठ सोडू नका. आम्ही पण स्टँडवर पोचतोच.” – शेंडे.
स्टँडवर पोचल्यावर रामभरोसेला शेड मध्ये उभी असलेली पोलिस पार्टी दिसली. तो त्याच्या दोस्ताला म्हणाला
“आत मध्ये पोलिस आहेत. आपण या समोरच्याच बस मध्ये चढू. तू बॅग अशी धर की चेहरा दिसला नाही पाहिजे.”
पण शेंड्यांच्या तीक्ष्ण नजरेने सर्व टिपलं होतं. त्यांनी खूण केली आणि पोलिस बस मध्ये शिरले. पोलिस स्टेशन मध्ये त्यांना आणल्यावर शेंडे साहेबांनी सूत्रे हातात घेतली.
अर्धा तास रामभरोसे आणि त्याचा दोस्त यांना तसंच बसवून ठेवलं. त्या लोकांची सारखी चुळबुळ चालली होती. सांगोळे अधून मधून त्यांच्याकडे कटाक्ष टाकत होते, सांगोळे त्यांच्याकडे लक्ष ठेवून होते. त्यांची प्रत्येक हालचाल टिपत होते. त्यामुळे रामभरोसेची अस्वस्थता आणखीनच वाढत होती. अगदी हलक्या स्वरात ते एकमेकांशी बोलत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव सांगोळे टिपत होता. अर्धा तास झाल्यावर रामभरोसेचा संयम सुटत आला होता. तो सांगोळेला म्हणाला “और कितनी देर हमे बिठाके रखेंगे ये तो बता दो. अरे साब हमने कुछ नहीं किया हैं. क्यूँ सता रहे हो ?”
“साब बिजी हैं, उनका काम खतम होने के बाद तुम्हें बुलाएंगे. तब तक चुप चाप बैठे रहो.” सांगोळेनी कडक शब्दांत समाज दिली.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
Dilip Bhide Pune
Mo :9284623729
dilipbhide@yahoo.com