डिकीतला सस्पेन्स भाग २
भाग १ वरून पुढे वाचा ..........
“गुड.” धनशेखर म्हणाले. मुलीची ओळख पटल्यामुळे त्यांना जरा समाधान वाटलं. आता शोध घेणं सोपं होणार होतं. “सर्विस प्रोवायडरला लोकेशन विचारा. बघूया कोणाजवळ आहे तिचा फोन.”
दुसऱ्या दिवशी सकाळी धनशेखरांनी साठे वकिलांना फोन लावला. आणि लगेच पोलिस स्टेशनला येऊ शकाल का म्हणून विचारणा केली.
साठे साहेब दुपारी आले. आल्यावर धनशेखरांनी विचारपूस सुरू केली.
“साहेब, तुम्ही दिनेश घारपुरे यांना ओळखता ?” – धनशेखर
“हो, माझा मित्र आहे, आणि तो लग्नाला येणार होता, पण बहुधा गाडीचा काही प्रॉब्लेम झाला असावा म्हणून येऊ शकला नाही, असं वाटतंय. पण तुम्ही हे का विचारता आहात ? काही बरं वाईट ?” – साठे वकील.
“नाही, तुम्ही समजता आहात तसं काही नाही. हा माणूस सध्या आमच्या कस्टडीत आहे.” – धनशेखर.
“अँ, का ?” – साठे आश्चर्याने म्हणाले.
“साहेबांच्या गाडीच्या डिकी मध्ये एका मुलीचा मृतदेह सापडला.” – धनशेखर गंभीरपणे म्हणाले.
“अहो, शक्यच नाही. तुमची काहीतरी चूक होते आहे.” – साठे.
“वेळेकर, दिनेशला घेऊन या.” धनशेखर साहेबांनी दिनेशला घेऊन यायला सांगितलं. आल्यावर, दिनेश नी वैशाखला सर्व सांगितलं. वैशाख जरा विचारात पडला. कोणी तरी दिनेशला अडकवलं हे त्यांच्या लक्षात आलं. दिनेशला वेळेकर घेऊन गेले. वैशाख धनशेखरांना म्हणाला
“साहेब माझा मित्र असा नाहीये. मी त्याला लहानपणापासून ओळखतो आहे. तो
कसा यात अडकला हे कळत नाही. पण हा नक्कीच गुन्हेगार नाही. त्याला डांबून ठेवून काहीच हातात लागणार नाही.” – साठे.
वेळेकर आत आले, त्यांनी माहिती दिली. “साहेब, पुसद पोलिसांकडून अपडेट आलंय. त्यांनी नीलाक्षी मानेच घर शोधून काढलय. घराला कुलूप होतं. घराभोवती फिरल्यावर त्यांना एका खोलीतून काही आवाज ऐकू आला म्हणून ते कुलूप तोडून आत शिरले. नीलाचे आई,वडिल हात पाय बांधलेल्या अवस्थेत होते. तोंडात बोळा कोंबला होता. त्यांनी सांगितलं की परवा रात्री चार माणसं घरात घुसली आणि नीलाला उचलून घेऊन गेले.”
“पहा, साहेब, ही परवा पुसदला घडलेली घटना आहे. माझा मित्र परवा लग्नघरी होता आणि तेही नागपूरला. तो उगाच यात फसला आहे.” वैशाख बोलला.
“मग काय त्याला सोडून देऊ ?” – धनशेखरांनी विचारलं. तसंही त्यांना दिनेशचा संशय नव्हता.
“मला तरी अस वाटतंय. मी त्यांची गॅरंटी घ्यायला तयार आहे.” – साठे.
“ठीक आहे, वेळेकर दिनेशला घेऊन या.” – धनशेखर.
“घारपुरे,” धनशेखर दिनेशला म्हणाले. “तुम्हाला साठे साहेबांच्या विनंतीवरून सोडतो आहे. पण जेंव्हा आम्हाला गरज लागेल तेंव्हा इथे हजर व्हायचं. आणि सध्यातरी पुणे सोडून बाहेर जाऊ नका.”
“ठीक आहे साहेब.” दिनेशनी खात्री दिली.
“ओके साठे साहेब, घेऊन जा यांना. पण तुम्ही गॅरंटी घेतली आहे हे लक्षात असू द्या.” – धनशेखर.
पुसद पोलिसांनी नीलांच्या आई,वडिलांना परिस्थितीची कल्पना दिली. त्यांच्या दु:खाला पारावार नव्हता. पोस्ट माऱ्टेम झाल्यावर बॉडी पुसदला पाठवण्यात आली. केस पुसदला ट्रान्सफर करण्यात आली. आता पुसद पोलिस तपास करणार होते. तसं दिनेशला कळवण्यात आलं. अन्त्य संस्कार आटपल्यावर दोन तीन दिवसांनी इंस्पेक्टर शेंडे मान्यांच्या घरी गेले.
“हे सगळं कसं घडलं ?” – इंस्पेक्टर शेंडे.
“चार माणसं घरात दरवाजा तोडून घुसली.” नीलाक्षीचे वडील सांगत होते. “आम्हाला काही कळायच्या आतच आम्हाला बांधलं आणि नीलाक्षीला उचलून निघून गेली ती माणसं, साहेब.”
“कसे दिसत होते ? म्हणजे ऊंची, रंग वगैरे ?” – शेंडे.
“चेहऱ्यावर गमछा गुंडाळला होता साहेब. पण हिंदीत बोलत होते.” - नीलाक्षीचे वडील
“पुसदचे लोक जशी हिन्दी बोलतात तशी, की वेगळी बोली बोलत होते ?”- शेंडे.
“वेगळी होती.” नीलाक्षीचे वडील म्हणाले “पण ते फारसे बोललेच नाही त्यामुळे नेमकं सांगता येणार नाही.”
“कोणी तुमच्या वाइटावर होतं का ? नीलाक्षी ने किंवा तुम्ही कोणाला दुखावलं होतं आणि म्हणून, कोणी सूड घेण्याचा प्रयत्न करू शकतो का ? नीलाचे कोणाशी प्रेमसंबंध होते का ?” – शेंडे।
“नाही साहेब, नीलाक्षी साधी सरळ मुलगी होती. पण एक जण तिच्या मागे लागला होता लग्न कर म्हणून.” - नीलाक्षीचे वडील
“मग ?” – शेंडे.
“नीलाक्षीनी त्याला स्पष्ट शब्दांत नाही म्हंटलं होतं. पण तो पिच्छा सोडत नव्हता. त्यामुळे आताशा ती फार अस्वस्थ झाली होती.” - नीलाक्षीचे वडील
“काय नाव त्याचं, कुठे राहतो ? काय करतो ?” – शेंडे.
“वायरमन आहे. हरीश नाव आहे. जवळच्याच इंदिरा नगर मध्ये राहतो.”
“इंदिरा नगर म्हणजे ते फुकट नगर ?” – शेंडे
“हो साहेब.” - नीलाक्षीचे वडील
“ठीक आहे. काही प्रगती झाली की तुम्हाला कळवुच.” अस म्हणून शेंडे तिथून निघाले.
पोलिस स्टेशनला आल्यावर शिपायानी सांगितलं की पुण्याहून पोस्ट माऱ्टेम चा रीपोर्ट आला आहे. शेंडे साहेबांनी रीपोर्ट वाचला. आपल्या असिस्टेंट कडे वळून म्हणाले
“करपे वाचा हा रीपोर्ट.”
“साहेब, रिपोर्ट तर भयंकर आहे. गॅंग रेप झालाय. आणि साहेब, रेप केल्यावर मुलीने तोंड उघडू नये म्हणून मग तिला मारून टाकलं.” – करपे म्हणाले.
“करपे, नीट वाचा. नुसता गॅंग रेप नाहीये, आधी खून आणि मग मृतदेहावर रेप. पोलिसांच्या आयुष्यात काय काय बघायला मिळतं बघा. भयंकर आहे हे सगळं. आता हे नीलाक्षी च्या आई वडिलांना कसं सांगायचं ? काय वाटेल त्यांना ? आपल्या पोरीची एवढी विटंबना त्यांना सहन होईल का ?” शेंडे साहेबांच्या स्वरात चीड जाणवत होती.
“साहेब, काय साधायचं असेल त्या बादमाशांना ?” – करपे.
“करपे मला अस वाटत की त्यांच्या प्लॅनिंग मध्ये खून नसावा.” शेंडे साहेब विचार करता करता बोलत होते. “खून चुकून झाला असावा आणि मग घाबरून मृतदेहाची विल्हेवाट लावली. हे लोक सराईत नसावेत. सराईत बादमाशांकडून अशी चूक होत नाही.”
“पण साहेब, माने कुटुंब काही श्रीमंत नाही की ज्यांच्या कडून मोठी रक्कम उकळता येईल. मग अपहरण कशा साठी ?” – करपे.
“नीलाक्षी गोरी, आणि दिसायला चांगलीच होती. कदाचित रेड लाइट एरिया मधून तर सुपारी दिली नसेल कोणी तरी ?” साहेब अजून विचारच करत होते. एक एक शक्यता पडताळून पहाट होते.
“हो साहेब, असच असेल. म्हणूनच खंडणीची मागणी झाली नाही. नाहीतर पळवल्यानंतर पांच सहा तासांतच मान्यांना फोन यायला हवा होता.” – करपे.
“आपल्याला त्या हरिशला ताब्यात घेतलं पाहिजे. कदाचित त्याचा हात असू शकेल. तुम्ही एक काम करा, त्या रेड एरिया मधून अशी काही सुपारी दिल्या गेली होती का याचा शोध घ्या. आपल खबरी नेटवर्क अॅक्टिवेट करा. आणि तुम्ही निघा आणि हरिशला घेऊन या. मी जाऊन माने कुटुंबाला अपडेट देतो.” शेंडे साहेब म्हणाले.
माने कुटुंबावर जणू काही आकाशच कोसळलं. दोघंही जरा शांत झाल्यावर शेंडे म्हणाले की
“नीलाक्षी चे पण हात पाय बांधले होते होते का ?” - शेंडे
“हो साहेब आणि तोंडात बोळा पण कोंबला होता.” - नीलाक्षीचे वडील
शेंडे पोलिस स्टेशन ला आले. करपे पण आले होते.
“हूं करपे काय अपडेट ?” साहेबांनी आल्या आल्या विचारलं.
“साहेब, हरीष एकटाच इथे राहात होता. तो खोलीवर नाहीये. आजूबाजूला चौकशी केली पण कोणालाच काही माहीत नव्हतं. पण एकानी सांगितलं की कोणी काशीनाथ, त्याचा जवळचा मित्र आहे त्याला माहीत असेल म्हणून. तो पण खोलीवर नव्हता. तिथे आपला सांगोळे बसला आहे. काशीनाथ आल्यावर त्याला सांगोळे इथे घेऊन येईल.” – करपे बोलले.
“ठीक आहे. सोलापूर पोलिसांना अपडेट द्या. आणि त्यांना या बाबतीत आणखी काही कळलं असेल तर विचारा.” – शेंडे.
क्रमश:..........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com