निर्णय भाग १४
निर्णय भाग १४
मागील भागावरून पुढे…
बघता बघता शुभांगीची पहिली मंगळागौर आली. इंदिरेला उत्साह आला. ती मंगळागौरीची तयारी करू लागली. शुभांगीसाठी सोन्याचा एखादा दागिना घ्यावा अशी तिची इच्छा होती.मंगेश याला राजी होणार नाही हे तिला माहीती होतं पण तरी तिने हा विषय मंगेश समोर काढला.
"अरे पूजा करा.ते सोन्याच्या दागिन्यांची काय गरज आहे? लग्नात दिले तेवढे दागीने पुरेसे नाही का?"
" सुनेला पहिल्या मंगळागौरीला सोन्याचा दागीना देण्याची पद्धत आहे."
" असेल पद्धत पण मला मान्य नाही."
" तुम्हाला मान्य आहे की नाही हे कुठे विचारते आहे. तुम्हाला सांगतेय की अशी पद्धत आहे तेव्हा मला पैसे द्या मी सोनाराकडे जाऊन आवडेल तो दागीना घेऊन येईन."
" माझ्या बापाने इस्टेट ठेवली आहे का? की मला सोन्याचा हंडा सापडला आहे? नसते खर्च मला सांगू नको.पैसे मिळणार नाही."
" मिहीर तुमचा मुलगा आहे हे मान्य आहे नं. शुभांगी ही त्याची बायको आहे म्हणजे आपली सून आहे त्यामुळे ही रीत आपल्याला पाळावीच लागणार. पैसे नसतील तुमच्या जवळ तर तुमचं कार्ड द्या."
" तुझं कार्ड आहे नं ते वापर."
" त्यात किती पैसे आहेत तुम्हाला माहिती आहे. त्यात सोन्याचा दागीना येणार नाही त्यामुळे तुमचं कार्ड मला द्या नाहीतर मला पैसे ट्रान्स्फर करा. सोन्याचा भाव बघून खर्च होणार आहे त्यामुळे तुमचं कार्डच द्या."
इंदिरेने मंगेशला ठणकावून सांगितलं. मंगेशचा नाईलाज झाला आणि त्याने त्याचं कार्ड दिलं.
इंदिरा मनातून प्रत्येक वेळी मंगेशकर कुरघोडी केल्यावर आनंदीत होत होती. आताही तिला आनंद झाला. हळूहळू मंगेशला असंच पडतं घेण्याची सवय ती लावत होती. कारण मुलांच्या सुखापुढे मंगेशच्या विचीत्र स्वभावाला भीक घालायची नाही हे तिने ठामपणे ठरवलं होतं.
हळूहळू मंगळागौरीची तयारी होत आली तसा इंदिरेचा उत्साह आणखी वाढला. पुजेसाठी ओळखीच्या मुलींना सांगीतलं होतं. गुरूजी ठरले होते. नातेवाईकांना आमंत्रण केलं होतं सगळ्यांना संध्याकाळी बोलावलं होतं.सकाळी फक्त पुजेच्या मुलीचं होत्या.
***
शुभांगीच्या येण्याची इंदिरा वाट बघत होती. मेघना आणि शुभांगी दोघीही बरोबरच येणार असल्याने इंदिरेला चिंता नव्हती.
***
मिहीरच्या लग्नापासून इंदिरेच्या आयुष्यात खरा आनंद दरवळू लागला.तिच्या स्वतःच्या लग्नानंतर असे आनंदाचे क्षण तिच्या आयुष्यात फार आलेच नाहीत. मंगेशनी आनंदाला आमच्या संसारात मज्जाव आहे असं निक्षून सांगीतल्यामुळे आनंद त्यांच्या संसारात फिरकलाच नाही. मिहीर आणि मेघनाच्या जन्म हा खूप मोठा आनंद होता पण तो इंदिरेपुरताच मर्यादित होता. ते इंदीरेलाही मान्य होतं. ती खूष होती.पण त्याहून वेगळ्या प्रकारचे आनंदक्षण जे तिच्या आजूबाजूच्या बायकांच्या आयुष्यात आलेले तिला दिसायचे ते हिच्या आयुष्यात कधी आले नाहीत.ते आता यायला सुरुवात झाली आहे असं तिला वाटू लागलं.
इंदिरा आतूरतेने शुभांगीची वाट बघू लागली. तिने घेतलेली साडी घालून आणि दागीना घालून शुभांगी किती सुंदर दिसेल याची स्वप्नात ती रंगून गेली.
_______
शुभांगी आणि मेघना ठरलेल्या दिवशी आल्या.शुभांगीचा फुललेला चेहरा इंदिरेला सगळं सांगून गेला.इंदिरा त्यामुळे खूष झाली.
घरात शिरताच हातपाय धुवून झाल्यावर तिने इंदिरेला नमस्कार केला.मग विचारलं
" बाबा कुठे आहेत?"
" ते असतील खोलीत."
शुभांगी मंगेशच्या खोलीत गेली.
" बाबा नमस्कार करते. पेपर मध्ये तोंड खुपसून बसलेल्या मंगेशनी ऊत्तर देण्याचे कष्ट घेतले नाही. शुभांगी नमस्कार करायला खाली वाकली तसे म़गेशने पाय मागे केले.शुभांगीला कळेना असं का करताहेत.तेवढ्यात तिच्या कानावर आवाज आला
" तुमचा मान नवीन सून देते आहे तो घ्या.कुणी प्रामाणिक पुणे आणि प्रेमाने काही देत असेल तर ते घ्यायला शिका.तुमचे पाय पुढे करा."
"नाही करणार.या घरात माझं स्थान काय आहे हे मला कळतंय.तोंडदेखलं केलेला नमस्कार मला नको.मी घरचा कर्ता पुरुष आहे तर तिने पहिले मला नमस्कार करायला हवा होता.तुला का केला?"
"कारण तुम्ही समोर नव्हताच. मी होते म्हणून तिने मला केला. तुम्हाला नंतर नमस्कार केल्याने घरामध्ये असलेल्या तुमच्या स्थानाला धक्का बसत नाही. हा नसता चहाटळपणा सोडा आणि पाय समोर घ्या."
इंदीरेने एवढं बोलूनही मंगेशी ना डोळ्यासमोरचा पेपर दूर केला ना आपले पाय समोर केले.हे बघून इंदिरेच्या मस्तकात तिडीक आली.
" शुभांगी राहू दे. तु तुझ्या परीने सास-यांना मान देण्याचा प्रयत्न केला. आता फार वाटू नको.आपल्या मनातली भावना जर समोरच्या व्यक्तीला कळत नसेल तर त्या व्यक्तीच्या पुढे फार वाटू नये. चल."
ईंदिरेचा हा कडक आवाज शुभांगी साठी नवीन होति.ती मुकाट्याने उठून उभी राहीली. मेघनाला आता हे अपेक्षीत होतं.कारण आपल्या आईमध्ये झालेला बदल तिला कळला होता त्यामुळे इंदिरेच्या आवाजातील कडकपणा तिला फार पोचला नाही.
तिघीही मेघनाच्या खोलीत आल्या.इंदिरा लगेच नाॅर्मल झाली.शुभांगीला इंदिरेतील हा बदल बघून आश्चर्य वाटलं. असा बदल आपणही आपल्यामध्ये करायला हवा असं शुभांगीला मनोमन वाटलं.
***
इंदिरेने शुभांगीच्या आईवडिलांना, काका काकूंना,आत्याआणि काकांना मंगळागौरीसाठी फोनवरून आमंत्रण दिले.
शुभांगी आणि मेघना आल्यामुळे इंदिरेवरचा कामाचा भार खुप कमी झाला. त्या दिवशी इंदिरेने स्वयंपाक करणा-या आचा-याला पुन्हा आठवण करून दिली.
***
मंगळागौरीच्या दिवस उजाडला. शुभांगी खूप छान तयार झाली.नथ तिच्या नाकात छान शोभत होती.मिहीर आदल्या दिवशी रात्री आला. शुभांगी तयार झाल्यावर, सगळ्या मुली येईपर्यंत गुरूजींनी सगळी तयारी करून ठेवली.
पुजेला सगळ्या मुली बसल्यावर पूर्ण पुजेचा मिहीर ने छान व्हिडीयो काढला.
इंदिरेचं मन हे सगळं बघून खूप आनंदीत झालं.तिच्या मनात लगेच विचार आला की पुढल्या वर्षी मेघनाचं लग्नं ऊरकावं.मेघनाचं लग्न झालं की आपण आपला निर्णय अंमलात आणण्यास मोकळं.
तिने खूप वर्षांपूर्वी एक निर्णय घेतला होता पण मुलांची लग्न होऊन सगळं स्थीरस्थावर होईपर्यंत त्याची वाच्यता ती कुठेच करणार नव्हती.
मंगळागौरीला सगळ्या मुलींचा किलबिलाट तिच्या मनाला सुखावून जात होता.या सगळ्या आनंदात मंगेश कुठेच नव्हता.
आता इंदिरेला,मिहीर आणि मेघनाला मंगेश शिवाय जगायला छान वाटायला लागलं.आनंदात मंगेशनी मीठाचा खडा टाकण्या पेक्षा तो आनंदात सहभागी नाही झाला तरच बरं असंच तिघांन वाटत होतं.
___________________________
क्रमशः पुढे काय झालं ते वाचा पुढील भागात
निर्णय
लेखिका…मीनाक्षी वैद्य.