पिल्लं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला!!
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला!!!
बहिणाबाईंची ही रचना जरी पक्षिणीसाठी असली तरी ती आजच्या पिढीतील नोकरदार आईला तंतोतंत लागू पडते..
खरचं , आपल्या लहान बाळाला पाळणाघरात किंवा स्वतःच्याच घरात दुसऱ्या व्यक्तीजवळ ठेऊन कामावर जाताना , त्या स्त्रीला काय वाटत असेल..
आजकाल ही वेळ बहुतांश स्त्रियांवर येते कारण सध्याची चौकोनी वा त्रिकोणी कुटुंब पद्धती आणि त्यातही संसाराचा आर्थिक गाडा नीट चालण्यासाठी स्त्रीला घराबाहेर पडणं अपरिहार्य असणं...
मागच्या पिढी मध्ये एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती, घरात माणसाची संख्या खुप होती, त्यामुळे त्या वेळच्या स्त्रियां जरी नोकरी करत असल्या तरी त्यांच्या मुलांची जबाबदारी त्यांचे संगोपन घरातील बाकीचे मंडळी करत असे.त्यामुळे जी महिला नोकरी करते तिला एवढा ताण आणि काळजी नसे, कारण तिला माहित होते, जरी मी घराबाहेर असले तरी तिच्या मुलाचं संगोपन आपल्याच घरातील लोक चांगल्या प्रकारे करू शकतील..
कालांतराने एकत्र कुटुंब पद्धती विभक्त झाली आणि त्या जागी "आम्ही दोन आणि आमची दोन" किंवा "आमचं एक" कुटुंबपद्धती आली.. त्यामुळे नोकरदार महिलांना काही ठराविक काळानंतर आपल्या लहान बाळाला कधी पाळणाघरात तर कधी घरीच असणाऱ्या आयाबाईकडे सोपवून कामावर रुजू व्हावचं लागतं..
आपल्या काळजाच्या तुकड्याला असं घरी सोडून काम करताना तिला काय वाटत हे मी स्वतः अनुभवलं आहे..
मी डॉक्टर असल्यामुळे डिलिवरी झाल्यावर दोन महिन्यानंतर लगेच क्लिनिक जॉइन केलं. पण मुलगी लहान असल्यामुळे तिला क्लिनिकच्या वातावरणात आणू शकतं नव्हते. मग माझ्याच चुलत बहिणीला मुलीचा सांभाळ करण्यासाठी गावावरून बोलवून घेतलं .. दोन महिन्यांची असल्याकारणाने तिला बाहेरच दूध देत नव्हते.. त्यामुळे क्लिनिकला येताना तिला दूध पाजून यायचे आणि बहिणीला सांगून यायचे की ती जर रडायला लागली तर लगेच फोन कर..मी दहा मिनिटात घरी येईन..( क्लिनिक घरापासून जवळचं असल्यामुळे हे शक्य होतं )अशी माझी तारेवरची कसरत मुलगी सहा महिन्यांची होईपर्यंत चालू होती..
एकदा मी तिला क्लिनिकमध्ये माझ्याबरोबर नेण्याचा निर्णय घेतला.. कारण मी घरी गेल्यावर तिचा रडवेला चेहरा मला बघवत नसायचा आणि मी क्लिनिक बंद करून घरी बसणं माझ्यासाठी शक्य नव्हतं..( कारण मी बाळंतपणासाठी अगोदरच खूप दिवस क्लिनिक बंद ठेवलं होतं..)
पण मुलीला क्लिनिक मध्ये घेऊन जाण्याचा माझा निर्णय माझ्याचं अंगाशी आला.. क्लिनिक मध्ये सतत पेशंट असल्यामुळे मी कितीही काळजी घेत होते तरी तिला एक दिवस इन्फेक्शन झालचं.. तिला खूप जुलाब उलट्या झाल्या.. त्यावेळी तिचे जे डॉक्टर ( Paediatrician) त्यांनी मला सांगितले की एकतर मी क्लिनिकला जावू नये किंवा तिला तरी तिथे घेवून जावू नये.. शेवटी आईचा जीव , मी परत थोडे दिवस क्लिनिक बंद ठेवले..
ती सहा महिन्यांची झाल्यावर मात्र घरातला पौष्टिक आहार हळू हळू चालू केला..ती घरात छान राहू लागली.. मग थोडा माझ्या जीवात जीव आला..मी नियमित क्लिनिकला जाऊ लागले..
आजही ते दिवस आठवले की डोळ्यात पाणी येतं..
माझ्यासारखी ही व्यथा किती तरी काम करणाऱ्या मातांची आहे.. आज मुंबई सारख्या शहरात महागाई एवढी वाढली आहे की कुटुंब फक्त एका माणसाच्या कमाईवर चालत नाही. अश्या वेळी लहान मुलांना सोडुन स्त्रीला घराबाहेर पडावचं लागतं.
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी नोकरीच्या ठिकाणी पाळणाघराची व्यवस्था असावी, असा नियम आहे. मात्र, या जिव्हाळ्याच्या विषयाकडे कुणी गांभीर्याने पाहताना दिसत नाही. महिलांना बाळंतपणासाठी जरी पगारी रजा मिळत असली तरी ती संपल्यानंतर नोकरीवर आलेल्या महिलेलाही आपल्या बाळाची काळजी ऑफिसमध्ये आल्यानंतर दिवस संपेपर्यंत घेता येत नाही. बाळाला खासगी पाळणाघरात ठेवले जाते. त्याला अंगावरचे दूध पाजण्यासाठी आईला संध्याकाळी जॉब सुटण्याची वाट पहावी लागते. बाळाचा सांभाळ करणारे घरी कुणीच नसलेल्या कुटुंबीयांतील महिलांची मात्र यामुळे चांगलीच कुचंबणा होत आहे. नोकरीवरून घरी जाईपर्यंत या बाळाच्या आईचा जीव टांगणीला लागलेला असतो.
खेड्यात राहणाऱ्या बायकांचीही थोड्याफार फरकाने स्थिती सारखीच आहे.. त्यांना पण शेतात काम करण्यासाठी जावचं लागतं. काही जणी आपल्या बाळाला बरोबर घेऊन शेतात कामासाठी जातात.. बाळाला तिथंच एखाद्या झाडाला झोळी बांधून त्यात ठेवायचं आणि कामाला लागायचे..
त्यातल्या त्यात , त्यांना येवढं तरी समाधान असतं की मुल नजरेसमोर असतं..ते रडायला लागल की काम थांबवून त्या त्याला दूध देऊ शकतात..पण ईथेही मुलाचे हाल होतातच की...
ऑफिस मध्येच पाळणाघराची सुविधा असणे .."भारतात काही मेट्रो सिटीमध्ये मोजक्या ठिकाणी अशी संकल्पना राबवली आहे ..म्हणजे स्त्रियांना ठराविक वेळेनंतर बाळाकडे लक्ष्य देता येते आणि बाळ नजरेसमोर असल्याने कामात सुध्दा त्यांच लक्ष लागतं.जर ही कल्पना प्रत्येक लहान मोठ्या कार्यालयाच्या ठिकाणी अंमलात आणली तर त्यात कंपनीचाही फायदाच आहे .. कारण स्त्री कितीही कामात असली तरी तीचा अर्धा जीव तर घरीच तिच्या लेकरामध्ये अडकलेला असतो. अशा मनःस्थितीत हातातील कामाला 100% न्याय देण तिला जमत असेल का ??
आजच्या पिढीतील बराच मोठ्या संख्येने स्त्रिया नोकरी व्यवसायात आहेत.. त्यामुळे बाळंतपणानंतर कामावर रुजू झाल्यावर प्रत्येक स्त्री आपापल्या परीने हा प्रश्न हाताळताना दिसत आहे..
कोणी घरीच आपल्या बाळाची सोय करते , कोणाला पाळणाघर योग्य वाटतं, काही महिलांच्या घरी त्यांच्याच घरातील एखादी व्यक्ती असल्याने त्यांचा पण प्रश्न सुटतोय...
एक आई म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की , स्त्री कितीही उच्चशिक्षित असो किंवा मोठ्या हुद्द्यावर कार्यरत असो , तिचा जीव नेहमी आपल्या लेकरामध्ये अडकलेला असतो.. मुलं किती ही मोठी झाली तरी ती आईसाठी लहानच असतात.
डॉ. स्वाती अनिल मोरे
कांदिवली पूर्व