Wakadewad - A thriller - 3 in Marathi Short Stories by Bhushan Patil books and stories PDF | वाकडेवड - एक रोमांच - 3

Featured Books
Categories
Share

वाकडेवड - एक रोमांच - 3

वाकडेवड एक रोमांच

भाग 3


गडबडीत फोन उचलला आणि टॉर्च पुन्हा शेताकडे पाडली. आणि पाहतो तर काय ! समोर एक पांढरं शुभ्र कुत्रं. असं कुत्रं मी जीवनात कधीच पाहिलं न्हवतं. अंगाने एकदम धिप्पाड, निळे डोळे, कंगव्याने केस विंचरले आहेत असे भासवणारे मुलायम केस. इंद्राचा शुभ्र ऐरावत जसा लख्ख उठून दिसला असता अगदी मला तसंच वाटत होतं. आपलं कसं असतं ना! एखाद्या गोष्टीचा अतिरेक जरी झाला तरी ती गोष्ट भयावह वाटू लागते. म्हणूनच एवढं देखणंपान कुत्रं पाहून देखील माझं अंग कापायला लागलं होतं. त्याची शेपूट कोल्ह्यासारखी फुगीर आणि लांबवली तर जमिनीला लोळेल एवढी मोठी होती. घोड्याचे मानेला जसे केस असतात तसे त्याचे केस एका बाजूला मानेवर पडले होते. त्याच्या नाकाचा शेंडापण लाल भडक होता.

मला काय करावं सुचत न्हवतं. मी बुजगावण्या सारखा न हलता उभा होतो. वाऱ्याची झुळूक आल्यावर फक्त माझा शर्ट हलकासा हालायचा, एवढे मी पाय जमिनीला खिळवले होते. मला माझ्या फोनची टॉर्चपण हालवता आली न्हवती. टॉर्च च्या प्रकाशाने त्या कुत्र्याचे डोळे विलक्षण चकाकत होते. तेपण माझ्याकडे एकटाक बघत होते. माझ्या मनात भीतीचं सावट पडलं होतं. मी थोडा जरी हललो तरी हे कुत्रं माझ्या अंगावर झडप घालून मला फाडणार! काय करावं मला समजत न्हवतं. कोणाला हाक द्यावी म्हणलं तर जवळपास कोणीच न्हवतं. मानसुद्धा इकडे तिकडे करण्याची मला मुभा न्हवती.

आमच्या घरी १५ वर्ष झाली कुत्री मांजरं आहेत. त्यामुळे त्यांच्या खोडी मला माहीती आहेत. कुत्र्याला चावायचे असेल तर ते गुरगुरायला लागते. हे कुत्रं मात्र शांतच उभा होतं. काही वेळानंतर ते शेपूट हालवायला लागलं. हळू हळू माझ्याकडे येऊ लागलं. मी तसाच उभा होतो. मी घाबरून पळायला लागलो असतो तर तेपण माझ्या सोबत पळत कदाचित अंगावर झेप घेऊन माझ्या खुब्यात दात घुसवले असते. थोडं पुढं आल्यावर ते शेपूट हालवायला लागलं. आता मला समजलं हे आपल्याला काही नाही करायचं. माझ्यासोबत फ्रेंडली होत आहे. कोणाचं तरी असेल, फिरत फिरत इकडं आलं असेल असं वाटलं. ते माझ्या पायाजवळ आलं. मला ते कंबरेपर्यंत लागत होतं. भीती बाजूला टाकून मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. हात फिरवताना ते मला करुणेने पाहू लागलं. मी पुन्हा विहिरीच्या कट्ट्यावर नितळ पाण्याकडे बघत बसलो. जीभ बाहेर काढून ते कुत्रंपण धापा टाकत माझ्या बाजूला बसलं. थोड्यावेळानंतर मी त्याला दुर्लक्ष केलं आणि माझ्या विचारात मग्न झालो. कुत्रंपण त्याच्याच तंद्रीत होतं. मी पाय खाली सोडून बसलो होतो. कुत्र्याचे पाय पण विहिरीच्या कट्ट्याच्या कोपऱ्यावर आले होते. मी बसलेलो तिथून विहिरीच्या पाण्याची पातळी साधारण १० फुटांवर होती. आकाश नितळ होतं. हवेचा झोत थांबला होता त्यामुळे पाणीपण शांत होतं. थोडा कीड-मासा जरी ऊळऊळला तरी पाण्यावरच्या उमटणाऱ्या छोट्या लहरी चंद्र प्रकाशात दिसत होत्या. ते अद्भुत दृश्य पाहण्यात मी रममाण झालो असताना थोड्यावेळानंतर सुगंध दरवळायला लागला. खूप प्रकारचे सुगंध येऊ लागले. बाजूला १०० अगरबत्त्या लावल्या आहेत कि काय! असं वाटू लागलं. सर्व सुगंधामध्ये पारिजातकाचा सुगंध जास्तच उग्र होता हे मी नक्की सांगू शकतो. माझ्या बाजूला बसलेल्या कुत्र्याचा रंगपण अजून शुभ्र व्हायला लागला. त्याचे समोरचे दोन्ही पाय रबरासारखे लांबट व्हायला लागले. ते इतके लांब झाले की, विहीरीतल्या पाण्यात गेले. म्हणजे १५ फूट तरी त्याचे पाय वाढले. हे पाहून माझ्या अंगावर काटा आला आणि दचकून बाजुला झालो. धडपडीत उठण्याच्या प्रयत्नात बाजूच्या झुडपात जाऊन पडलो. काय लागलंय राहिलंय न बघताच उठून पळायच्या पवित्र्यात होतो. मागे वळून नजर कुत्र्याकडे फिरवली! ते माझ्याकडेच पाहत होतं. त्याची शेपूटपण आता घोड्याच्या शेपटीएवढी झाली होती. उग्र वासामुळे मळमळायला चालू झालं. भीतीमुळे अजून पोटात गोळा आला. धडकी भरल्यामुळे मी जे पळत सुटलो ते माझी राहती खोली येईपर्यंत थांबलोच नाही. ते कुत्रं माझ्या मागे लागलंय की नाही हेपण नाही पाहिलं मी. पळत येताना फक्त एकच विचार मनात होता. लवकर खोलीवर पोहाचायच. माझे पाय कुठं पडत आहेत याचं मला भान न्हवतं. दोनच मिनिटांत मी खोलीवर पोहचलो. अंग माझं घामाने डबडबलं होतं. माझ्यासोबत आत्ता काय घडलंय! सगळं खरं आहे की भास होता. काहीच समजत न्हवतं. पहिल्यांदाच मला असला काहीतरी अनुभव आलेला. डोक्यामध्ये हेच विचार चक्र घुमत होते. म्हणून त्या रात्री मला २ वाजेपर्यंत झोप लागली न्हवती. पुन्हा केंव्हा झोप लागली मला समजलं देखील नाही. त्यात भरीत भर म्हणजे दुसऱ्या दिवशी त्या शेवंतीचा लागीराचा घडलेला प्रकार.

अरविंदला मी विचारलं, "गावात कोणाचा पांढरा कुत्रा आहे का रे ?". त्याने कपाळाला आठ्या पाडून माझ्याकडे बघितलं. मग ही सर्व हकीकत मी अरविंदला सांगितली. त्याला आश्चर्य अजिबात वाटलं नाही. तो म्हणाला, "तो पांढरा कुत्रा गावातल्या काही लोकांना दिसला आहे. तो इथला कोणाचा नाहीये. गेले काही दिवस तो दिसू लागला आहे. शिरपा तात्याच्या विहिरीच्या आजूबाजूलाच दिसतो तो. तुझ्या बोलण्यावरून वाटतंय कि हा भुताटकीचा प्रकार आहे. गावात कोणाचं तरी कुत्रं आलंय एवढीच चर्चा होती. भुताटकी बिताटकी आहे असं अजून कोणी म्हणत नाहीये. तुझ्यासारखा कोणाला अनुभव अजून आलेला दिसत नाही. तो कुत्रा दिवसा कोणाला गावात दिसला नाही. ज्याला त्याला रात्री शेतात पाणी पाजवायला गेल्यावर दिसला आहे तेपण शिरपा तात्याच्या विहिरीच्या काठाला बसलेला."

हा सर्व प्रकार काय चालू आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता मला लागली. माझी भीती बाजूला ठेऊन मी पुन्हा तिकडे जाण्याचा निश्चय केला. एकदा दिवसाउजडीच पाहून येऊ म्हणून गेलो. वाकडेवड हे गाव डोंगराच्या पायथ्या शेजारी असणारं गाव आहे. डोंगराच्या कुशीत आहे असं म्हणता येणार नाही. कारण वस्तीपासून १ कि. मी. अंतरावरून डोंगराचा चढाव चालू होत होता. तिथून पुढे १ कि. मी. नंतर खडा चढाव सुरू होतो. तालुक्यातलं हे शेवटचं गाव. त्यानंतर जंगल क्षेत्र चालू होतं. गावाच्या या जंगलाच्या बाजूच्या सीमेवर मोठी चर मारली होती व त्या चरीच्या पलीकडे स्टील च्या तारेचं आणि सिमेंटच्या खांबांचं कुंपण होतं. जेणेकरून हत्ती, रेडे, डुक्कर, भेकर व इतर जंगली प्राणी येऊ नयेत तसेच लोकानापण पलीकडे जाता येऊ नये. त्या कुंपणाच्या पलीकडे जंगल सुरू होई. तिथे कोणालाच प्रवेश नसे. त्याच जंगलामध्ये "कोब्रा कमांडो स्कूल" आहे. जिथे भारतीय जवानांना कंबॅट ट्रेनिंग दिलं जातं. कोब्रा कमांडो स्कूलला सरकार ने ४०० एकर जागा दिली आहे. परत त्यांचे ट्रेनिंग क्षेत्राला कुंपण आहे. या क्षेत्रात कोणालाच प्रवेश नसतो. तिथंच मोठ्या मोठ्या मोहिमांसाठी जवान तयार केले जातात. ज्याला आपण स्पेसीयल फोर्स म्हणतो. जवान ४०० एकर सोडून जंगलात जात नाहीत. ट्रेनिंग क्षेत्र सोडून बाकीचं जंगल वन विभागाच्या ताब्यात आहे. त्यामुळे तिथं माणूस फिरकण्याचं कामच नाही. जुनी लोकं लाकडं तोडायला जंगलात जायची पण आता वन विभागाने सगळं वर्ज केलं आहे.

अरविंद बोलताना म्हणाला होता, "बऱ्याच लोकांनी त्या कुत्र्याला कुंपणाच्या पलीकडे जाताना पहिलं आहे." मी मग तिकडं धाडस करून जायचं ठरवलं. मला ना एकदा एका गोष्टीचा शोध घ्यायचा ध्यास लागला की लागला, मी काहीही होऊदे थांबत नाही. माझ्या नावडीच्या गोष्टीपण करायला लागल्या तरी मी तयार असे. यावेळेस मला माझ्या भीतीला मागे टाकून ही गोष्ट करून पहायची होती. सुरुवातीला दिवसा बघून यायचं, वाटा वगैरे बघून ठेवायच्या. म्हणजे जर रात्रीचं पळायला लागलं तर वाट चुकायला नको. प्रथमच निर्मनुष्य जंगलात जायला मिळेल आणि कदाचित नवीन एखादी वनस्पती भेटली तर बरंच, मला असायनमेंटला मदत होईल असापण माझा एक उद्देश होता.

एक दिवस जायला निघालो. विहीरीपर्यंत गेलो पण पाऊल पुढे टाकवेना. आहे तसा मागे फिरलो. दुसऱ्या दिवशी जायचं म्हणून विहीरीपर्यंत जातोय तोवर समोरून एक बाई किंचाळत, छातीला हात बडवत पळत येत होती. मी एकटाच जात असताना माझ्या समोर हे दृश्य. खूप कर्कश आवाजाने ती किंचाळ्या फोडत माझ्याकडे धावत येऊ लागली. तिला बोलताच येत न्हवतं. तिची दातखीळी बसली होती. माझ्या जवळ आली आणि विहीरीकडे बोट दाखवू लागली. सारखा तिकडे बघून हात झटकू लागली. त्या बाईचा भरडा आवाज, तिचं जीवाच्या आकांताने पळत येणं, हे सगळं पाहून माझ्या डोळ्यासमोर हे काय घडतंय मला समजत न्हवतं. जोर जोरात पळत आल्यामुळे ती बाई फार दमली होती. माझ्या जवळ आल्यावर ती रस्त्यावर धाड करून बसलीच! मी लांबूनच विचारलं ताई काय होतंय? काय झालंय? अशा पळत का आलात? पुन्हा ती विहिरीकडे बोट करून हात झटकत होती. तीला बोलायला शब्द फुटेना. मला म्हणजे समजेच ना! बाई माणूस असं करतंय. मी एकटाच इथे. मी काय कराव? फक्त, "शांत व्हा, शांत व्हा!" एवढंच मी म्हणू शकलो. ५ मिनिटानंतर तिचे हुंदके कमी झाले. बाजूला मी तसाच उभा होतो. याचवेळी बाजूच्या शेतात "टिप्प्या" परसाकडला बसलेला. त्याने हे सगळं पाहिलं असणार. त्याचं काम उरकल्यावर हा जो अशा वेगात शेतातून बाहेर पळत सुटला की एकच मिनिटात माझ्या नजरेआड झाला. तो जातो न जातो तेवढ्या त्या ताई चा नवरा पळत येताना दिसला. तो काळजी, भीतीने ओरडत येत होता. "कमले! कमले! काय झालंय तुला? काय झालं?"
त्याच्या मागोमाग बाकीची बरीच मंडळी पळत येत होती. बघता बघता बाया- बापड्या, पोरी-टारी सगळी बघ्यांची जत्रा जमा झाली. तेवढ्या गर्दीत मी कुठे दिसेनासा झालो. चार बायकांनी कमल ताई ला घरी नेलं. बाकीचा जमलेला जमाव त्या शिरपा तात्याच्या विहिरीकडे सरकायला लागला. सगळीकडे फक्त गोंगाट चालू होता. मी त्या गर्दीमध्ये कुठेतरी होतो. विहिरी जवळ गेल्यावर सर्वांचे डोळे विसफारले. त्या गोल विहिरीला सर्वांनी वेढा दिला. कुस्ती मैदान कसं असतं तसं वाटू लागलं. लहान मुलं कशी त्या वेढ्यातून आत डोकी खुपसून घुसायचा प्रयत्न करतात अगदी तसाच मी विहिरीच्या काटापर्यंत पोहचलो. बाकीची लहान पोरं ज्यांना आत घुसता आलं नाही ती तशीच त्या वेढ्याभोवती घिरट्या घालत होती. माझं गर्दीतून डोकं बाहेर निघालं आणि मी विहिरीत डोकावून पाहिलं! बघतो तर काय!!.....





(तुमची उत्सुकता अशीच आबाधित राहूदे पुढचा भाग येईपर्यंत.)

©®2022भूषण पाटील.All rights reserved.