THIS CALLED JEEIWAN - PART 3 in Marathi Love Stories by Dilip Bhide books and stories PDF | ह्याला जीवन ऐसे नाव - भाग ३

Featured Books
Categories
Share

ह्याला जीवन ऐसे नाव - भाग ३

भाग 3

 

भाग 2 वरून पुढे  वाचा ............

 

रात्री मॅडम जेवणाचं ताट घेऊन आल्या. “घे. जेवून घे.” म्हणाल्या. त्याच दिवशी रात्री अडीच तीन च्या सुमारास ४-५ लोक घरात घुसले. चाहूल लागून पंडित उठला. त्याला घेरून ४ लोक उभे होते. हातात लाठ्या होत्या. चांगलेच सराईत चोर वाटत होते. त्यांनी पंडितला काठीनेच दाबून धरलं होतं.

“आवाज करेगा तो जान गँवाएगा” अस म्हणून एकाने भला मोठा सुरा काढला. पाचवा दार उघडण्याची खटपट करत होता. त्याच्याजवळ लोखंडी पहार होती. पंडितनी जरी चाळीशी ओलांडलेली असली तरी लेचापेचा नव्हता. तरुणपणी व्यायाम केलेलं शरीर होतं. त्यानी अंदाज घेतला आणि लाथ मारून सुरा घेतलेल्या चोराला पाडलं आणि स्प्रिंग सारखा उठून उभा राहिला. विद्युत वेगाने हालचाल करत दुसऱ्या चोराच्या हातातली काठी हिसकली आणि त्याच्याच तोंडावर जबर तडाखा हाणला. तसंच वळून जो दूसरा चोर ज्याच्या हातात सुरा होता तो उठत असतांनाच त्यांच्या पोटात लाथ घातली. दोन डाऊन. आता बाकीच्या तिघांच त्यांच्याकडे लक्ष्य गेलं आणि त्यांनी त्यांच्याकडे मोर्चा वळवला.

पंडितने व्हरांड्यातून खाली आंगणात उडी मारली आणि पवित्रा घेऊन तो उभा राहिला. बाकीच्या तिघांनी पण अंगणात उडी मारली. समोरा समोर. एकमेकांचा अंदाज घेत. चोरांनी अशा प्रतिकाराची अपेक्षाच केली नव्हती. पण आता पडलेले दोघे जण पण खाली उतरले. आता सामना फारच विषम झाला होता. पांच विरुद्ध एक.

पंडितला आठवलं तरुण असतांना संघात प्रहार आणि क्रमिका शिकल्या होत्या, त्याची मनातल्या मनात उजळणी करत त्याने हातातली लाठी फिरवायला सुरवात केली आणि त्याच बरोबर मोठ्याने चोर चोर असा ओरडायला लागला. त्याच्या लाठीच्या माऱ्यात एक जण आला आणि खाली पडला. पंडित ने त्याच्या छाती वर पाय ठेवला आणि त्यांच्या गुढ्ग्या वर लाठीने जोरदार प्रहार केला. तो कळवळून किंचाळला. आणि तसंच पडून राहिला. पंडित आता त्यांच्या छातीवर उभा राहून काठी फिरवत होता. दोन चार फटके त्याला पण खावे लागले. पण आता आजू बाजूच्या घरातून माणसं बाहेर येत होती. तेवढ्यात सायरन ऐकू आला. पोलिसांची गस्त गाडी गल्लीत शिरली होती. ते पाहून चोरट्यांनी काढता पाय घ्यायला सुरवात केली. जो खाली पडला होता, त्याला बरोबर घेण्यासाठी एकाने पंडित वर चाकू हल्ला केला. पंडित ने तो चुकवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी उजव्या दंडावर चांगली सहा इंची जखम झाली होती.

पण पोलिस तो पर्यन्त पोचले होते, आणि त्यांनी एकाला पकडलं होतं. दूसरा अजूनही खाली विव्हळत पडला होता, त्याला ताब्यात घेतला. पंडितला त्यांनी बसवलं आणि विचारपूस करायला सुरवात केली. पोलिस आणि आजूबाजूचे लोक आले आहेत हे कळल्यावर मॅडम पण बाहेर आल्या. त्यांनी आणि शेजाऱ्यांनी पण पंडित बद्दल पोलिसांना सांगितलं. थोड्या वेळाने पोलिस व्हॅन आली आणि गुंडांना गाडीत घातलं. पंडितला पण हॉस्पिटल मध्ये नेण्यासाठी बरोबर घेतलं. दुपारी उशिरा पंडित परत आला. आणि मॅडम ची वाट बघत बसला. संध्याकाळी मॅडम घरी आल्या तेंव्हा पंडित व्हरांड्यातच होता. मॅडमची वाट बघत.

“अरे अजून तू इथेच ? मला भीती वाटत होती की मला न भेटताच निघून जातोस की काय ?” – मॅडम.

“नाही मॅडम तुम्हाला भेटल्याशिवाय कसा जाईन ? आणि परत हे दोन तीन कपडे आहेत ते कोणाचे हे कळत नाहीये.” – पंडित म्हणाला.

“ते लोक येतील रे आठवण झाल्यावर. तू कशाला काळजी करतोस? बरं मला सांग, आता तुझी जखम कशी आहे? आता काय करणार आहेस?” – मॅडमनी काळजीने विचारलं.  

पंडित काहीच बोलला नाही आता जखम त्रास देत होती. Painkiller चा परिणाम हळू हळू ओसरत होता.

“तुझं धोबी काम तर संपलं. मग आता?” – मॅडम.

“माहीत नाही. बघूया. काहीतरी शोधावं लागेल.” – पंडित थकलेल्या स्वरात बोलला.

“माझ्याकडे वाचमन ची नोकरी करतोस ? चार हजार देईन वर दोन्ही वेळेस जेवण. वर राहायला आउट हाऊस मध्ये जागा. बघ जमेल का ?” मॅडमनी ऑफर दिली.

“जमेल न मॅडम. बडी मेहरबानी.” – पंडित.

पंडितची आता चौकीदारी सुरू झाली. त्याला मोठी मौज वाटली. जीवन, अनुभव समृद्ध होत होतं. हळू हळू आजूबाजूच्या लोकांनाही त्याची सवय झाली. गप्पा गोष्टी व्हायला लागल्या. लोक त्याला ओळखायला लागले. लोकांना कळायला लागलं की हा माणूस वॉचमन असला तरी सर्व विषयांची याला जाण आहे आणि मग लोक त्याच्या बोलण्यात रस घेऊ लागले. पंडित एंजॉय करत होता. मॅडम तर आजकाल त्याच्याशी गप्पा मारायला उत्सुक असायच्या. एक दिवस मॅडमच्या  स्वयंपाक करणारीचा निरोप आला की ती आता येणार नाही कारण तिचं लग्न ठरलं आहे आणि ती गावी गेली.  मॅडम प्रॉब्लेम मध्ये. संध्याकाळी ती पंडितला म्हणाली की “पंडित मी आता डबा लावणार आहे. तेंव्हा डब्यात जस असेल तसं खावं लागणार आहे.”

“का मॅडम काय झालं ?” पंडितनी विचारलं.

“अरे स्वयंपाक करणारीच लग्न ठरलं आहे आणि ती तिच्या गावी गेली. आता दुसरी मिळे पर्यन्त डबाच  लावावा लागणार.” – मॅडम.  

“मॅडम मै बनावू ?” – पंडित.

“तुला येतो करता ?” – मॅडमनी आश्चर्याने  विचारलं.

पंडितला काहीच प्रॉब्लेम नव्हता. इतकी वर्ष तो घरीच सर्व करत होता. सगळाच स्वयंपाक त्याला येत होता पण तरी तो म्हणाला की “खूप काही येत नाही पण तुम्ही उपाशी राहणार नाही एवढ पक्क. दाल, रोटी, सबजी चावल तो कर लुंगा चिंता की कोई बात नही.”

“अरे वा हे छान जमलं. जा मग हात पाय धू आणि किचन मध्ये जा. काय पाहिजे ते शोधून घे अडचण आली तर मला विचार.” – मॅडम  

त्या दिवसांनंतर चौकीदारी बरोबरच पंडित कुक पण झाला. त्यानी केलेला स्वयंपाक फक्त मॅडमलाच नाही तर त्यांच्या ऑफिस मधल्या मैत्रिणींना पण आवडला.

विशेषत: भरली वांगी खूपच आवडली सगळ्यांना.

 

“पंडित,” एक दिवस संध्याकाळी मॅडम म्हणाल्या, “मला अस वाटतं की नवीन बाई कशाला शोधू ? तूच कर न स्वयंपाक नेहमी साठी. छानच करतोस तू. तिला जेवढा पगार मी देते, तो तुला पण देईन. चौकादारीचा पगार अलग देईन, करशील का ?”

मॅडम नी कुक म्हणून काम करशील का  हा प्रश्न विचारला  आणि पंडित गोंधळून गेला. आता काय करावं, हो म्हणावं की नाही या विचारात पडला. शेवटी जो होगा देखा जायएगा असा विचार करून तो म्हणाला “तुम्हाला मी केलेलं आवडलं असेल तर माझी काहीच हरकत नाही.”

“पण सगळं सामान सुमान, काय संपलं, काय हवंय, आणि भाजी वगैरे तुलाच आणाव लागणार. जमेल ? मला वेळ नाही होणार.” मॅडमनी आपली अडचण सांगितली.  

“मॅडम माझ्या जवळ वाहन नाही तेंव्हा रिक्शा चा खर्च होईल.” – पंडित.

“अरे ठीक आहे. मी तुझ्याजवळ १००० रुपये देवून ठेवते संपले की हिशोब देत जा म्हणजे झालं.” – मॅडम.  

“ठीक आहे.” – पंडित.  

An executive officer turned into Full-fledged cook and watchman.

आता पंडितला कळेना की आपलं आयुष्य कुठलं वळण घेतय ते. असं किती दिवस करायचं, ज्याच्या करता नोकरी सोडली, ती भटकंती तर राहिलीच बाजूला. त्याला विचार पडला. रात्रीचं जेवण खाण आटोपल्यावर, आपल्या खोलीत म्हणजे आउट हाऊस मध्ये गेल्यावर त्यांनी पुरोहितला फोन लावला. सर्व परिस्थिति अगदी अथ पासून इति पर्यन्त सांगून झाल्यावर त्यानी विचारलं की तो गोंधळला आहे आणि इथे राहायचं की निघून जायचं ते कळत नाही म्हणून तुमचा सल्ला हवाय.

“हे बघ पंडित, जरा विचार कर, ईश्वरी प्रेरणेनेच नोकरी सोडून, तू जगाचा अनुभव घ्यायला निघाला होतास, तसंच नर्मदा परिक्रमा पण त्याच प्रेरणेनेच झाली. आता तुला अनुभव मिळतो आहे तेंव्हा तू तो घे. जे विधिलिखित असेल तेच होतेय. नाही तर तू कानपूरला कशाला उतरला असतास? आज तू दिल्लीला असायला हवा होतास. तेंव्हा त्रयस्थ नजरेने जे जे घडतंय ते पहा आणि होऊ दे. जर बदल घडायचाच असेल तर तुला आपोआपच प्रेरणा होईल. तूर्तास तरी लाइफ एंजॉय कर. चिंता करू नको सर्व ठीक होईल.” – पुरोहितने त्याला काय वाटतं ते सांगितलं.  

पुरोहितशी बोलल्यावर त्याला जरा बर वाटलं. आणि मग त्याला शांत झोप लागली. असेच काही दिवस गेलेत. पंडित आता रुळला होता. वेळेचं गणित पण छान जमलं होतं. मॅडम नी सांगितलं की रात्री जागायची आवश्यकता नाही. त्याचं इथे असणच पुरेसं आहे. त्यामुळे रात्रीची जागरणं पण टळली होती. मॅडम जेवणामद्धे रोज नवी नवी फर्माईश करायच्या आणि पंडित त्या पूर्ण करायचा कसोशीने प्रयत्न करायचा. आणि मॅडमला त्या डीशेस आवडायच्या पण. एक दिवस मॅडम नी सांगितलं की “उद्या शनिवारी, संध्याकाळी माझ्या दोन सहकारी मैत्रिणी आणि त्यांचे पती असे चार जण जेवायला येणार आहेत. काय करशील ? त्यांना पूर्ण महाराष्ट्रीय पद्धतीचे जेवण जेवायचं आहे. तुला पुरणपोळी येते का ?”

“हो. पुरणपोळी, कटाची आमटी, मसाले भात आणि बटाट्याची सुकी भाजी आणि चटणी कोशिंबीर, टोमॅटोच सार. सूप नाही. चालेल ? भजी पण करू.” पंडितने मेनू सांगितला.  

“अरे वा मस्त बेत आहे. कर.” – मॅडम  

पाहुण्यांनी जेवणाची भरभरून तारीफ केली. मॅडमच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. पंडितला पण बर वाटलं.

 

क्रमश:.........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.