Wakadewad - A thriller - 1 in Marathi Short Stories by Bhushan Patil books and stories PDF | वाकडेवड - एक रोमांच - 1

Featured Books
Categories
Share

वाकडेवड - एक रोमांच - 1

वाकडेवड - एक रोमांच
भाग 1

(या कथेद्वारे अंधश्रद्धा पसरवण्याचा लेखकाचा मुळीच उद्देश नाही. कथेतील घटना निव्वळ कल्पित आहेत.)

आठ वाजले तरी माझी झोप उघडली न्हवती. रात्री खिडकीचा दरवाजा लावायला विसरलो होतो. सकाळी वाऱ्याच्या झुळूकीने खिडकी उघडली होती. सकाळची कोमल किरणे माझ्या चेहऱ्यावर पडली होती. सूर्य जसा वर येईल तसा त्या मंद तेजावणाऱ्या किराणांमुळे माझे डोळे उघडले. अचानक खडबडून जागा झाल्यासारखा ठणकरून उठून बसलो. सकाळ झाल्याच्या आनंदामुळे अचानक भरलेली धडकी कमी झाली. उठून आवरावर करून अंघोळ करून घराबाहेर पडलो. आज देसाई मामांच्या शेतावर जाऊन मातीचे सॅम्पल्स घ्यायचे होते. देसाई मामांच्या घरी गेलो. मामांनी नी बळजबरी नाष्टा करायला लावलं. आणि दोघे तसेच शेताला निघालो. तस शेत जरा लांब होतं. सकाळ सकाळी लवकर जाऊन उन्हा अगोदरच मातीचे, तणाचे सॅम्पल्स घेऊन यायचं असं ठरवलं होतं पण रात्री अशा घटना घडल्या की झोप उडाली होती. नंतर कशी बशी झोप लागलेली मलाच माहित नाहीये. सकाळी निघायला 9 वाजले. देसाई मामा तार तार चापा टाकीत पुढे सरकत होते. मलापण त्यांच्यासोबत जाणं भागच होतं. मी वाकडेवड मध्ये आल्यापासून गावाच्या या भागात पहिल्यांदाच चाललो होतो. लय भकास भाग वाटत होता. वस्तीपासून 3 की. मी. लांब.
आजूबाजूला कोणाचच रान नाही. थोड्या अंतरावर गेल्यावर मध्येच एक पारिजातकाचं झाड लागलं. ते झाड फारच भव्य होतं. खूप मोठा सडा पडला होता. एवढा भरगच्च सडा अजून पर्यंत पाहिला न्हवता. प्रचंड मोठं झाड होतं. सड्याकडे बघत आणि तो सुगंध घेत आम्ही दोघे पुढे सरकत गेलो. पुढे गेल्यावर एक खोप (झोपडी ) दिसायला लागली. देसाई मामांनी एक बारकी गवताची आणि धाटांची खोप बांधली होती. खोपीच्या मागच्या बाजूने एक ओढा गेला होता. ओढ्याच्या काठावर आणि खोपीच्या मध्ये करवंदाची छोटी जाळी होती. बाजूलाच एक पडकं रान होतं. त्या रानाच्या मालकाचच एक पडकं दगडाचं घर होतं. ते सगळं दृश्य आणि निर्मनुष्य वातावरण, भयाण रखरखीत ऊन, आणि झाडावरील किड्यांचे कानठळ्या बसणारे आवाज ऐकून कसतरीच वाटत होतं. त्यात रात्री घडलेला तो प्रसंग अजून डोळ्यासमोरून जात न्हवता. इथं थांबु नये असं वाटत होतं. मामांच्या बोलण्यामुळे माझं लक्ष विचलित झालं. मी पटापट सॅम्पल्स घेतले. माझ्याकडे एक मशीन होतं ज्याने मला हे समजत होतं की एखाद्या छोट्या रोपट्याच्या एक फूट घनते मध्ये किती प्राणवायू आहे. तसें मला दिवसा आणि रात्रीचे असे दोन सॅम्पल घ्यायचे होते. ते मशीन रोपावर ठेऊन अर्धा तास वेट करावा लागे. रात्री परत इथं सॅम्पल घ्यायला यायला लागणार म्हणल्यावर थोडं जड वाटायला लागलं. मामांनी पण मोटारीचा खटका ओढला. पाणी एका सरीला लावून दिलं. आम्ही मग मागे परतलो.

माझं आणि देसाई मामांच खूप पटत होतं. वयाने खूप मोठे असले तरी माझ्यासोबत लय भारी जमायचं त्यांचं. मी बीएससी ऍग्री च्या सातव्या सत्रात शिकत होतो. या सत्रात असं असतं की एखाद्या बाहेर अनोळख्या गावी 5 महिने रहावे लागते व शेतीविषयक परीक्षण करावे लागते. शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा होईल ते पहावं लागे. याच कारणाने मी गेले 3 महिने "वाकडेवड"मध्ये रहायला आलेलो होतो. मातीचं परीक्षण, किटकांची माहिती, त्यापासून होणारी पिकांची हाणी, तणांचं संशोधन, ते हटवण्याचे उपाय. अशा बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करावा लागे. संध्याकाळच्या वेळेला मी केलेल्या संशोधनाबद्दल शेतकऱ्यांना सांगत असे. सुरुवातीला देसाई मामांनीच मला राहण्यासाठी त्यांचे शेजारी जे मुंबई ला असतात त्यांच्या घरी भाड्याने रहायला सांगितलं. व रोजच्या जेवणासाठी एका बाईला, सखु मावशीला तयार करून दिलं. तस शेती वाडी फिरून आल्यावर मला जास्त काही काम नसायचं. असायनमेंट एक दोन तास मग काय मी रिकामाच. रिकाम्या वेळी गावातल्या लोकांच्या ओळखी करून त्यांच्याशी गप्पा मारत असायचो. एक महिन्यातच मी त्याच गावचा झालो होतो.

देसाई मामांबद्दल बोलायचं झालं तर निधड्या छातीचा गडी, उंची मध्यमच, अंगानेपण मध्यम, अंगात एवढी तरतरी भरलेली असायची की एखाद्या तरुण पोरालापण ऐकणार नाहीत. गोरे पान, घारे डोळे, काळे पांढरे केस, पायात कोल्हापुरी आणि अंगात नेहमी एक पांढरे धोतर, डोक्याला भगवा पटका, मोठ्या मिशा. रुबाब बघूनच इंप्रेशन पडणार असं व्यक्तिमत्व. बोलण्यातून पण तीच छाप पडत असे. पंचकृषित त्यांना देवरशी मामा म्हणून ओळखलं जायचं.

गावात एक जट्टूबाई च मंदिर होतं. जरा वस्तीच्या बाहेर 5 वड होते. माध्यभागी असणाऱ्या वडाच्या खोडातच हळद, कुंकू, गुलाल लावला होता.तिथे मूर्ती न्हवती. तिथंच खोडाची पूजा केली जायची. जट्टूबाईची पूजा अर्चा देवरशी मामा करायचे. तसा पूजा अर्चा करायचा मान तिघा गुरवांकडे चालत आलेला. त्यातले मुख्य गुरव देसाई मामा. सगळ्या गोष्टी त्यांना विचारून केल्या जात होत्या. देवीची यात्रा वर्षातून एकदा व्हायची. खाऱ्या (मटणाची ) जेवणाची यात्रा असे. यात्रेला चारशे पाचशे बकरी पडायची. रक्ताचा पाट लागायचा. मी संशोधनासाठी वाकडेवडला होतो त्या दरम्यानच यात्रा होती त्यामुळे मला सर्व अनुभव घेता आला. यात्रेत पहिलं मानाचं बकर कापताना देसाई मामा त्याच्या मानगुटीवर गुलाल टाकायचे. यात्रेमध्ये सगळे पाहुणे आणि गावकरी मंडळी फारच आनंदी असायचे, कारण पाहिजे तेवढा मटणावर आणि रश्यावर ताव मारायला मिळायचा. देवरशी मामांना गावात लय मान होता. सगळे त्यांना दचकून रहायचे कारण देवरशी मामा अजून एक काम करायचे. लोकांचं लागीर (झापटलेलं) काढायचे.

असंच एकदा मी जट्टूबाईच्या मंदिरा समोरच्या पार कट्ट्यावर बसलो असताना. अचानक गोंधळ सूरु झाला. लांबून एक बाई किंचाळत येत असलेली दिसली. वयाने पसतीशीतली असावी. तिच्या दंडाला दोघांनी धरलं होतं. तरीपण त्यांना ती ऐकत न्हवती. कशीबशी तिला ओढत आणली देवळात. आणि देवीच्या खांबासमोर बसवलं. कोणीतरी एका बारक्या पोरग्याला उद्देशून म्हणाला, "टिप्प्या! देवरशी मा ला बलवून आण लवकर! बाहेर गावचं लागीर आलय म्हणून सांग." टिप्प्या पळत गेला आणि मामा ला घेऊन आला. मामा देवी समोर जाऊन उभा राहिला आणि हात जोडले. देवीच्या बाजूला असलेली व्यताची काठी घेतली. देवीच्या पायावरचा गुलाल उचलला. चिमटभर देवीच्या अंगावर फुंकला आणि चिमटभर देवीच्या समोर जो खांब होता त्यावर फुंकला. ते फुंकताच त्या बाई च्या किंचाळ्या अजून वाढल्या. लहान मुले आणि गावकरी सगळे बाजूला जमले होते. सगळ्यांनी गर्दी केली होती. चिडीचूप शांतता होती. सगळ्यांची नजर त्या बाई वर आणि मामांवर. ते काय करतात बघण्यासाठी टकामका नजरा खिळल्या . मामा अजून जरा पुढं आले आणि ती व्यताची काठी जोरात आदळली त्या बाई समोर. ती किंकाळ्या फोडू लागली. आक्रोश करू लागली. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. पहिल्यांदा ती बाई काही केल्या बोलायला तयार होईना. अजून छप्पीच्या काट्या वाजवल्या जमिनीवर. मग ती बाई कणायला चालू केली. आणि वेळूखे पिळूखे देऊ लागली. तिचे डोळे बंदच होते. तिच्या शेजारी एक बाई बसली होती. कदाचित ती तिची सासू असावी. त्या बाधित बाईच्या हालचाली मुळे तिचा पदर सारखा पडायचा मग सासू पदर सावरायची. हे बघून माझ्या लक्षात आले हा वेगळाच प्रकार आहे. ती बाई फक्त हं हं करायला लागली. मामा चिडून ओरडले. "बोल लवकर कोण हायीस तू. सांग नाहीतर चमडी गोळा करतो". तरीपण ती हं हं करायला लागली. मामानी मग अंगाऱ्याची मूठ आवळून डोळे झाकून काहीतर तोंडातल्या तोंडात पूटपुटले. आणि अंगारा तिच्या अंगावर टाकला. मग ती नको नको म्हणून ओरडू लागली. तिला असह्य वेदना होत आहेत असं वाटू लागलं ते बघून. तिचं विव्हळनं बघून मला घाबरायला होत होतं. खरंतर मी न घाबरणारा माणूस. असला सगळा प्रकार पहिल्यांदाच बघत होतो. ती बाई एवढं ओरडत आहे, रडत आहे. आणि सगळी माणसं तिच्याकडे उत्सुकतेच्या नजरेने बघत काशीकाय आहेत? कोणी वासनेच्या डोळ्यांनीपण बघत असावीत. तिच्या विळूख्या पिळूख्यांनी सुद्धा देसाई मामा काठी आपटायचे थांबत न्हवते. ती बाई एक शब्द पण काढत न्हवती. फक्त हं हं हं...... मधेच किंचाळ्या फोडायची. 10 मीनीट हाच प्रकार चालू होता. शेवटी देसाई मामा चिडले आणि ती व्यताची छप्पी जोरात त्या बाईच्या पाठीत घातली. आतामात्र बाजूला उभारलेल्या लोकांना एकच धक्का बसल्यासारखं झालं. ती बाई पण जमिनीवर हात पसरून झोपली. तिचे सगळे केस विस्कटले. तिची सासू तीला उठवून बसवायला पुढे सरकली तर मामांनी तीला अडवलं आणि पुन्हा त्या बाईसमोर एक जोरात काठी आपटली आणि म्हणाले. "आता बोलणार हायीस की अजून मार पायजे ?"

हे आधी मी सगळं मी ऐकून होतो. हा अंगात भूत येण्याचा प्रकार. माझा यावर विश्वास बसत न्हवता. माझ्या समोर सगळं चाललं होतं. खूप प्रश्न माझ्या मनात नाचू लागले. हे सगळं खरं तर आहे ना? की नाटक चालू आहे? देसाई ममांना मी तर ओळखतो. ते का बरं असं एखाद्या बाई ला उगाच मारतील? मारले तर मारले, पण आजूबाजूला उभी असणारी जाणता हे का बरं साक्षीदार म्हणून बघेल? ठीकय! त्यांनी बघितलं तरी. ती बाई आपली लाज का बरं वेशीवर टांगेल? शिवाय सासू आणि तिचा नवरा पण सोबत आहे. हे खोटं असतं तर तिच्याच नवऱ्याने तीला मारत घरी नेलं असतं. असे, माझे अनेक तर्हेचे विचार थांबवून मी काय घडतयं ते पुन्हा पाहू लागलो.....

(पुढे ट्विस्ट येणार आहे. उलगडा होण्यासाठी पुढं वाचत रहा. )

©®All rights reserved by Bhushan Patil