निर्णय भाग ७
मागील भागावरून पुढे
मेघना जेमतेम आठ दिवस रहीली. तो वेळ अगदी कापरा सारखा उडून गेला. इंदीरा मनातून खूप खूष होती. दोन्ही मुलांना हवं तसं करायला मिळतंय म्हणून. तिला वाटलं आपण जर खमकेपणानी मिहीर आणि मेघनाला बंगलोरला पाठवायला हिम्मत केली नसती तर दोघांचं शिक्षण, नोकरी माहिती नाही कोणत्या दिशेने गेली असती.
मेघनाचं बंगोलर बरोबर दिल्लीला पण सिलेक्शन झालं होतं. मिहीर बंगलोरला असल्यामुळे मेघनानीपण विचार करून बंगलोर निवडलं.
आता या वर्षांनंतर मेघनालापण नोकरी मिळेल. मगआपल्या जीवाला स्वस्थता येईल असं इंदीरेला वाटलं.
आज मिहीरचा फोन आला की तो शुभांगीशी काय बोलला विचारायला हवं.
विचारांच्या नादात इंदीरेचं बागेतली काम खूप लवकर संपलं. ऊद्या झाडांची पिकली पानं काढून खत करायला तयार केलेल्या खड्ड्यात टाकायला हवी असं तिच्या मनात आलं.
तिला झाडांची गंम्मत वाटली कारण माणसासारखी बुद्धी नसून जीवंत असेपर्यंत ते सगळ्या जगाला आपलं आयुष्य समर्पित करतात.त्याच्यातली वृद्ध झालेले पिवळी पानं झाडाच्या बुंध्याशी गळून पडतात आणि मातीत मिसळून स्वतःचं रूपांतर खतामध्ये करतात.
आहे तोपर्यंत ते माणसाच्या कामात येतातच पण मृत्युनंतर सुद्धा स्वतःला दान करतात. बुद्धी असून माणूस कुठे आपल्या अवयवांचं दान करतो.या सृष्टीपुढे माणूस खूप खुजा आहे.
फोनच्या रिंगमुळे इंदीरेच्या विचारांची तंद्री भंगली. ती घरात शिरली तर मंगेश तिचा फोन हातात घेऊन त्याकडे टक लावून बघत होता.
"कोणाचा फोन आहे?" खोलीत शिरता शिरता इंदीरेनी विचारलं.
मंगेशनी काही उत्तर न देता फोन दाणकन टेबलावर आपटला आणि निघून गेला. इंदीरेनी मान हलवून फोन कोणाचा होता हे बघण्यासाठी फोन हातात घेतला.
****
परवा मिहीरचा फोन आला तेव्हा आठवणींनी इंदीरेनी विचारलं
" अरे शुभांगीशी बोललासका?"
" हो.बोललो."
" काय सांगीतलं तू?"
" तू जसं म्हणालीस तसंच सांगितलं."
" मग ती काय म्हणाली?"
" म्हणाली काही काही लोकांचा स्वभाव असतो असा."
" तुझ्या बाबांच्या स्वभावामुळे तिला काही अडचण आहे का?"
" तसं काही बोलली नाही."
" पुन्हा एकदा तिला विचारशील."
"आई सारखं तिच्या मागे लागल्या सारखं होईल का?"
" तसं तुला वाटतंय का? मग जाऊ दे थोडे दिवस. ती तुला भेटल्यावर कशी वागते ते बघ. तिने आपणहून बाबांचा विषय काढला तर बोल."
" ठीक आहे तसंच करतो."
" नेहमी तुमची भेट होत नाही का?"
" रोज होते असं नाही. कधीकधी तिच्या प्रोजेक्ट ची मिटींग लांबली तर लंचटाईम मध्ये भेट नाही होतं. त्यामुळे ऑफीस सुटल्यावर होईलच असं नाही."
" ठीक आहे या गोष्टी वर फार विचार करू नकोस.ती समजूतदार असेल तर तिला या गोष्टी खूप मोठ्या वाटणार नाहीत.कळतय नं मी काय म्हणतेय?"
"हो. आई तू आहेस म्हणून मी आणि मेघना खूप रिलॅक्स असतो. कुठलाही प्राॅब्लेम असो तुझ्याशी बोलायला भीती वाटत नाही.तू शांतपणे उपाय सांगशील याची खात्री असते."
" हं. झालं का तुझं सुरू. कौतुकाचे पूल बांधणं."
" तू आहेसच तशी.तू हे डिझर्व करतेस."
" चल ठेवते फोन."
फोन ठेऊन इंदीरा वळते.मागे नेहमीप्रमाणे मंगेश उभा असतो.
" वाटलच मला तुम्ही मागे उभा असशील म्हणून."
" काय गुन्हा आहे का?"
" गुन्हा पाठीमागे उभं राहण्यात नाही. कोणाचं बोलणं चोरून ऐकण्यासाठी पाठीमागे उभं राहणं गुन्हा आहे."
" हो करतो मी हा गुन्हाच."
" मुलांचे फोन आले की हे असं का वागता तुम्ही? पुढच्यावेळपासून मी फोन स्पीकर वर ठेवत जाईन. मग आमचं बोलणं ऐका." एवढं बोलून
इंदीरा खोलीबाहेर गेलीसुद्धा पण रागानी मंगेशच्या तोंडून शब्दच फुटला नाही.आज त्याने इंदीरेला खूप बोलायचं ठरवलं होतं. पण शक्य झालं नाही.मंगेश रागातच धुमसत बसला.
***
इंदिरा दिवसेंदिवस मंगेश कडे दुर्लक्ष करत होती. इतकी वर्ष ती गप्प होती. त्याची मंगेशला सवय होती. फुटाण्यासारखी सतत फुटणारी इंदीरा त्याला नवीन होती. काय केलं म्हणजे ती पुर्वी सारखी आपल्या कह्यात राहील हे मंगेशला समजत नव्हतं.
विचार करून करून त्याचं डोकं फुटायची वेळ आली.
****
बघता बघता मिहीरचं लग्नं जमेपर्यंत गोष्टी आल्या.शुभांगी आणि तिचे आईवडील आणि तिचा लहान भाऊ येत्या रवीवारी इंदीरेच्या घरी येणार आहेत. इंदीरेनं त्यांना जेवायला बोलावलं.
मंगेशला हे पटलं नाही पण इंदीरेनं त्याकडे लक्ष दिलं नाही.
" शुभांगी कडची मंडळी आपल्या घरी येतील तेव्हा नीट वागा बोला."
" हे पण शिकावं लागेल का आता मला? कळत नाही का?"
" तुम्हाला कळत असतं तर मला बोलावं लागलं नसतं. ही बैठक नाॅमीनल आहे. शुभांगी मिहीरची बायको आणि आपली सून म्हणून या घरात येणार आहे. तेव्हा नीट जबाबदारीनी वागा.
बघीन. मला जमेल तसं वागीन" बेफिकीर पणे मंगेश म्हणाला.
"तुम्हाला जमेल तसं तुम्ही नाही वागायचं. त्यादिवशी मुलाचे वडील म्हणून जसं तुम्ही वागायला हवं तसं वागायचं. हे लक्षात ठेवा."
" हे माझं घर आहे. मी इथे कसं वागायचं हे मला कुणी सांगायचं नाही.कळलं.?"
" मी सांगणार. शंभर वेळेला सांगणार कारण हे घर माझं सुद्धा आहे."
" तुझं नाव नाही या घराच्या कागदपत्रांमध्ये."
" तुमच्याशी लग्न झालं याचा तर पुरावा आहे. अॅफीडेवीट आहे. मग तुमची बायको म्हणून माझा या घरावर हक्क आहे. तुम्हाला कळलं ?"
" मला दूर ठेऊन मिहीरचं लग्नं जमवते का? बघतोच कशी करते लग्नं?"
" वा! काय पण तुमचे विचार आहेत. मुलाचं लग्नं जमविण्यात तुमचा अहंकार दुखावल्या गेल्या का? मुलीकडच्यांसमोर वेडंवाकडं वागलात तर मी काय करेन मला माहिती नाही. त्या लोकांसमोर तुमचा अपमान झाला तर त्याला तुम्ही जबाबदार रहाल हे वागताना लक्षात ठेवा."
मंगेशला धास्ती वाटली.कारण इंदीरा आता वाट्टेल ते करू शकते याची त्याला खात्री पटली होती.
***
तो दिवस बरा गेला.नंतरचाही दिवस ठीक गेला.इंदिरेला येणा-या दिवसाची काळजी वाटत होती. मंगेश कसा भूक धरून बसणारा आहे हे एवढ्या वर्षात इंदिरेला चांगलंच कळलं होतं.
मिहीरच़ लग्नं व्यवस्थित पार पडू दे एवढीच तिची देवाजवळ प्रार्थना आहे.
मिहीरच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्याच्या लग्नात मंगेशी जरी मोडता घालायचा प्रयत्न केला तरी आपण तो मोडून काढायचा हे इंदिरेनी मनाशी पक्कं ठरवलं.
____________________________
क्रमशः पुढे काय झालं ते वाचा पुढील भागात.
निर्णय
लेखिका…मीनाक्षी वैद्य.