रमले मी संसारी, परि इच्छा होती एक उरी , पंढरीच्या दारी, पुण्य लाभले जन्मजन्मांतरी !!
बरेचदा मनात असलेली तीव्र इच्छा पूर्ण होण्याचे भाग्य सगळ्यांना लाभते का ? अजिबात नाही ; काही थोडेच असे भाग्यवान असतात. पण मला सांगायला आनंद होतो, की अशा थोड्याच भाग्यवानांपैकी मी एक आहे. पंढरपूरची वारी, ज्ञानेश्वरमहाराज आणि तुकाराममहाराज यांच्या पालख्या, वारक-यांच्या दिंड्या, त्यांचे अनुक्रमे आळंदी आणि देहू या गावांमधून निघून ऊन-वारा-पाऊस यांची तमा न बाळगता सतत २१ दिवस पंढरपूरला पायी जाणे हे शब्द कानावर पडत होते. असे वाटायचे की आपणही कधी तरी या वारीत सामील होऊन हा अद्वितीय अनुभव घेऊ शकू का ? माझे आवडते समाजकार्य चालूच होते. पण दरवर्षी जुलै महिना उजाडला की पंढरपूरच्या वारीचा विचार मनात यायचा आणि तो तसाच जायचाही ! म्हणता म्हणता २०२२ साल उजाडले आणि का कोणास ठाऊक पण या वर्षी काय वाटेल ते झाले तरी 'वारी' करायचीच असा मी मनाशी पक्का निग्रह केला ! बहुतेक विठ्ठल-रुक्माई यांनाही त्यांच्या या वेड्या भक्ताने पंढरपूरला यावे असे वाटले असणार म्हणून माऊलीनेच तो योग जुळवून आणला.
१८ जुनला माझे सहकारी नायकलभाऊंना मी म्हटले, की यंदा मला वारीला यायचे आहे. योगायोग असा, की मी त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा ते नावनोंदणीसाठीच निघत होते. त्यांना माझा निरोप वेळेवर गेला आणि लगेचच नावनोंदणी झाली. नोंदणीकृत दिंडी म्हणजे ७-८ वर्षे सतत वारी करीत असताना त्यांची पाहणी संस्थेचे काही लोक साध्या वेषात करतात. वारीत वारीचे मुख्य चालक-मालक कश्या पद्धतीने वारी हाताळतात, वारीत भांडण होते का, वारकऱ्यांची सोय कशी केली जाते याची नोंद होते आणि मगच योग्य असलेल्या दिंडीला नोंदणी क्रमांक दिला जातो. वारीतील प्रत्येक दिंडी स्वत:चे सर्व साहित्य स्वत: आणते. सर्व साहित्य नेण्यासाठी व वारकऱ्यांचे सामान ठेवण्यासाठी दोन–तीन ट्रक व पाण्याचा एक टँकर असतो. माझ्या दिंडीचा क्रमांक १३४ होता. नावनोंदणी तर झाली आता प्रश्न होता तो घरच्यांची यावर काय प्रतिक्रिया असेल याचा ! घरातील मंडळी मला जाऊ देण्यास काळजीपोटी संमती देणार नाहीत, असे मला मनोमन वाटत होते. म्हणून मी निघण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे २० जूनला सगळ्यांना सांगितले, की मी उद्या वारीसाठी बाहेर पडत आहे. ती पूर्ण करून बावीस दिवसांनी घरी परतेन. पण लगेच घरच्यांनी वारीचे तपशील समजावून घेऊन प्रवासाची तयारी करून दिली. वारकरी सोबत काय साहित्य घेतात हे नायकलभाऊंशी बोलून समजावून घेतले. वारीतील लोक पावसासाठी प्लास्टिकचा कागद वापरतात म्हणून मीही तसा घेत होते पण मुलांनी त्याला विरोध केला आणि त्यांनी प्रवासासाठी सुकर व वजनाला हलका असा रेनकोट त्वरित आणून दिला.
नायकलभाऊ खेडहून (तालुका चिपळूण) आणि मी बोइसरहून निघून पुण्याला भेटून सोबतीने आळंदीला जाणार होतो. त्यासाठी मी बोइसरहून दोन बसगाड्या बदलून पुण्याला जाणार होते. एकटीने बॅगा घेऊन दोन गाड्या बदलून जाण्याऐवजी मुलीने २० जूनला सकाळी सहा वाजता मला ‘बोइसर--कोल्हापूर‘ बसमधे बसवून दिले. मला बसावयास चांगली जागा मिळाली. दरम्यान नायकलभाऊंची पुणे बस चुकली होती ; पण त्यांनी आमचे वाकडचे दुसरे सहकारी भोसलेभाऊ यांना फोन करून सांगितले, की माझी बस चुकली आहे. नाईक मॅडमना तुम्ही घेऊन आळंदीला पोहोचा.
त्याप्रमाणे भोसले यांनी मला वाकडला उतरण्यास सांगितले व मला नेण्यासाठी मुलाला पाठविले. भोसले यांच्या घरचा पाहुणचार घेऊन थोडा आराम करून त्यांच्या मुलाने आम्हा दोघांना पुणे महामार्गावर सोडले. तेथे लगेच आम्हाला थेट आळंदीला जाणारी बस मिळाली. बस आळंदीचीच असल्याने ती पूर्ण भरली होती. आम्ही बसमधे कसेबसे चढलो पण थोड्याच वेळाने आम्हाला बसायला जागा मिळाली. येथूनच माझ्या वारीच्या प्रवासाची सुरुवात चांगली झाली असे म्हणण्यास हरकत नाही. माऊली सोबत आहे याची प्रचिती येऊ लागली होती.
संध्याकाळी साडेपाच वाजता वडमुखवाडीला आलो. वारकरी संप्रदाय कसा असतो हे येथे पोहोचल्यावर दिसले. आमच्या दिंडीतले सर्व (१५०) वारकरी नेहमी वारी करणारे होते आणि त्यांच्यांत मी पहिल्यांदाच वारीला जाणारी होते. सर्व वारकऱ्यांची ओळख करून घेतली. हे सगळे माझ्यासाठी खूप वेगळेच होते. त्या दिवसाची सोय एका सोसायटीच्या वाहनतळात (पार्किंग) होती. सगळ्यांसारखा मीही बरोबर घेतलेला प्लास्टिकचा पेपर अंथरून त्यावर पातळ चादर घालून झोपले. २१ जूनला पहाटे तीन वाजताच उठलो. आंघोळीसाठी महिला व पुरुष यांची काही वेगळी सोय नव्हती. सर्व वारकरी उघड्यावर पाण्याच्या टँकरखाली आंघोळ करतात. समोरचे ते दृश्य पाहून मी विचारात पडले. अशी उघड्यावर आजुबाजूला पुरुष असताना आपण आंघोळ कशी करायची ? माझी विवंचना एका वारकरी महिलेच्या लक्षात आली व तिने मला लहान मुलांसारखी स्वतः टँकरखाली नेऊन आंघोळ घातली आणि त्या दिवसापासून माझ्या मनाची तयारी झाली. त्या दिवशी तिथे मुक्कामी होतो. अशी प्रथा आहे की त्या दिवशी माऊलीची पालखी आळंदीजवळच असलेल्या मामाच्या गावाला वस्तीत राहायला जाते. आळंदी म्हणजे आत्मानंद. लाखोंचा जनसमुदाय एकत्रित श्रींचा होणारा ‘ज्ञानबा-तुकाराम’ हा गजर केवळ एक सांप्रदायिक नामजप नसून त्यास सोऽहं साधनेचे अधिष्ठान आहे. एक श्वास तर दुसरा उच्छ्श्वास आहे आणि एक उच्छ्श्वास आहे तर दुसरा श्वास आहे. त्यावेळी मी पाहात असलेली आळंदी म्हणजे आकाशात जसे शुभ्र चांदणे असते तसे त्या संपूर्ण परिसरात पांढरा झब्बा पायजमा, डोक्यावर टोपी, हातात झेंडे यांनी व्यापलेला असतो. पालखीचा प्रारंभ आत्मनंदातून होतो.
दुस-या दिवशी (२२ जून) पुरुष मंडळी उठायच्या आधी उठून आंघोळ करून तयार झाले. गरमगरम बिनदुधाचा (काळा) चहा, नाष्टा घेऊन आळंदीहून पायी भोसरीफाटा येथे माऊलीची पालखी येण्याची वाट बघत होतो.
आदल्या दिवशी मामाच्या घरी वस्ती असलेली पालखी मंदिरात येते. प्रथेनुसार पालखी सोहळ्यात सर्वांत पुढे चालणारे श्रीमाऊलींचे अश्व हे ‘श्री श्रीमंत शितोळे सरकार‘ यांचे अंकलीहून (बेळगाव) श्रीक्षेत्र आळंदीस परंपरेनुसार पायीच आणले जातात. विशेष हे की या अश्वावर कोणीही मनुष्य स्वार झालेला नसतो. हे अश्व ज्येष्ठ शु॥११ ला अंकलीवरून प्रस्थान करतात आणि जेष्ठ वद्य ७ ला (पूर्ण ११ दिवस) आळंदीत प्रवेश करतात. आळंदीला इंद्रायणी नदीच्या पुलाजवळ अश्व आले की श्रीमंतांचे प्रतिनिधी तसा निरोप मंदिरात सोहळ्याचे मालक व चोपदार यांना देतात. त्यानंतर श्रीहैबतबाबांची दिंडी अश्वांना सामोरी जाते. अश्वांची पूजा केली जाते. त्यानंतर वाजतगाजत अश्वांना मंदिरात आणले जाते. अश्वांच्या स्वागतासाठी मंदिरात पायघड्या घातलेल्या असतात. अश्वाला आळंदीला पायी आणण्यामागे केवळ परंपराच नाही तर एक श्रद्धाही जोडलेली आहे. हा अश्व अंकलीहून (जिल्हा: बेळगाव) आळंदीला येताना ज्या ज्या गावी जातो तेथील जनसमुदाय त्याचे दर्शन घेतो ; कारण त्याला केलेला नमस्कार श्रीमाऊलीकडे आणि त्याच्याकरवी श्रीपंढरीच्या विठुरायाकडे पोहोचतो अशी दृढ श्रद्धा असते. हेच मानाचे अश्व मंदिरात असलेल्या माऊलीच्या पालखीस प्रदक्षिणा घालून नमस्कार करतात. अशी ख्याती आहे की मंदिराचा कळस हलला की पालखी निघायचा संकेत मिळतो आणि पालखी आळंदीहून निघते.
पालखीच्या पुढे मानाच्या बैलगाडीत मानाचा नगारा, नंतर हातात पताका घेतलेला घोडेस्वार, त्यानंतर माऊलीचा सुटा घोडा, नंतर हातात क्रमांकाची पाटी घेतलेला वारकरी, त्यानंतर पाच वारकरी हातात पताका घेऊन असतात. त्यांच्यामागे टाळ व ढोल वाजविणारे वारकरी असतात. त्यांच्यामागे एक महिला डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन तर दुसरी डोक्यावर तुळस घेऊन आणि एक वीणाधारी असे तिघे एका रांगेत असतात. पालखीच्या पुढे फक्त २५ दिंड्या असतात आणि पालखीमागे बाकी सर्व हजारांनी दिंड्या. या वर्षी सुमारे २५०० दिंड्या होत्या. पालखी ज्या गावांवरून पंढरपूरला जाते त्या गावांची नावेही अत्यंत अर्थपूर्ण आहेत. मी पुढे त्या त्या गावाच्या अर्थाचा उल्लेख केला आहे.
दोन तासांनी भोसरीफाटा येथे पालखी आली व १३४ दिंडी क्रमांक आल्यावर आम्ही त्यात सहभागी झालो. संगमवाडी (पुणे) येथे जेवण व विसावा घेतला. पुणे म्हणजे पालखीबरोबर निघालो की जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होऊन 'पुण्य' प्राप्त होते. (पुण्यातील भवानी पेठ बुरडाच्या पुलाकडील पालखी विठोबा मंदिर या ठिकाणी पालखीचा दोन दिवस मुक्काम असतो) रात्री गणेश मार्केट येथे पोहोचलो. इथे एका सोसायटीच्या वाहनतळात आमची जेवणाची व झोपायची सोय केली होती. जेवणाच्या आधी वारकऱ्यांनी हरिपाठ, गुरुपरंपरेचे अभंग म्हटले. सोसायटीतले राहिवासीही त्यात उत्साहाने सहभागी झाले.
२३ जूनला ठरविल्याप्रमाणे पहाटे उठून आवरले. जवळच गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतले. बाजूच्या दुसऱ्या सोसायटीतर्फे चहा, नाष्टा झाला. अचानक माझी दाढ खूप दुखू लागली. योगायोगाने त्याच सोसायटीमधे दातांचे डॉक्टर होते. त्यांना दाखविले. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे दाढ काढावी लागणार होती. पण मनात भीती होती की आत्ता तर वारीची सुरुवात झाली आहे. मला आणखी इतका प्रवास करायचा आहे. दाढ काढली आणि पुढे रस्त्यात काही त्रास झाला तर ? पण माऊलीचे नाव घेऊन दाढ काढली. वारकरी म्हणून डॉक्टरांनी एक रुपयाही घेतला नाही. त्या गणेश मार्केट परिसरात वारक-यांकडून केस कापणे, दाढी करणे याचे पैसे घेत नाहीत. अनेक दुकानदार वारकऱ्यांची अशी मनोभावे सेवा करतात. त्या दिवशी आमचा मुक्काम येथेच होता. २४ जूनला पहाटे उठून आवरून पुढच्या प्रवासासाठी सज्ज झाले. पहाटे उठून आवरण्यामागचे कारण म्हणजे आपले धुतलेले कपडे, अंथरूण-पांघरूण व इतर सामान आपल्या दिंडीसोबत असलेल्या ट्रकमधे ठेवायचे असते. तेच ट्रक पुढे ठरलेल्या विश्रांतीच्या ठिकाणी जाऊन जेवणाची तयारी करतात. प्रत्येक दिंडीचे ट्रक असतात म्हणून लवकरात लवकर आवरून ट्रक पुढे मार्गस्थ करावे लागतात. त्या दिवशी आषाढी एकादशी असल्याने सर्वांचे उपवास होते. उरळी देवाची येथे आम्हाला उपवासाचे जेवण दिले. पुढे साधारण ४ किमीचा दिवे घाट चढायचा होता. दिवे घाट म्हणजे "यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी* या अष्टांगयोगाच्या आचार *दिव्यातून* जावे लागते”. दिवे घाटातून संपूर्ण वारीचे अखंड दर्शन घडते. ते दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. एक चढ संपला की दुसरा. पुढे बघावे तर पांढरे कपडे घातलेले लाखो वारकरी मागे बघावे तर तितकेच वारकरी. घाटाच्या शेवटी विठू माऊलीची एक १५-२० फूट उंचीची भव्य मूर्ती आहे. दिवेघाट पार करून पुढे सासवडला शितोळे यांच्या बंगल्यात आम्ही रात्री १० वाजता पोहोचलो. त्या दिवशी एकूण ४० किमी चालले होते. सासवड म्हणजे "सप्तचक्र. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा व शून्यचक्र* या सप्तचक्रांची जागृती ही जीवनाची गरज आहे व ती जागृती प्राणायामाने होते. प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण, श्वासावर ताबा म्हणजे *सासवडचा* मुक्काम व परमार्थाचा मार्ग सोपान होऊन *सोपानदेवांच्या* समाधीचे दर्शन घ्यावे. येथेही सोसायटीच्या वाहनतळात आमची सोय झाली होती. एक दिवस तेथेच मुक्काम होता.
२३ जूनला पहाटे सासवडहून निघालो. प्रत्येक वेळी सकाळी दिंडीत सहभागी होताना सगळे वारकरी रस्त्याला हात लावून नमस्कार करतात व रात्री दिंडी सोडण्याआधी हरिपाठ, प्रार्थना करून मगच आपल्या मुक्काम ठरलेल्या ठिकाणी जायला निघतात. जिथे मुक्काम असतो तिथे पोहोचल्यावर तुसळ घेतलेली, वीणाधरी आणि पाण्याचा हंडा घेतलेली आरती करून सर्व नमस्कार करतात आणि मगच चहा नाष्टा जेवण वगैरे करतात. संध्याकाळी जेजुरीच्या विठ्ठल मंदिरात पोहोचलो. जेजुरी म्हणजे ज = जितेंद्र, जोरी = जास्त त्रास न घेणे. म्हणजेच जो जास्त त्रास न घेता इंद्रियांना जिंकतो तो आनंदी होतो. येथेही आमची राहायची व जेवणाची सोय ग्रामस्थांनी केली होती. त्या दिवशी माझ्या सोबतच्या एका वारकरी महिलेला ताप आला होता. तेथील एका भक्ताने त्या महिलेला वाऱ्यावर झोपू नको, आमच्या घरात राहा असे सांगितले. सोबत म्हणून मी गेले. रात्री उशिरा डॉक्टर मिळाले नाहीत म्हणून मी तिला थंड पाण्याने आंघोळ करायला सांगितले. तिने केली. थोड्या वेळाने तिचा ताप उतरला.
२७ जूनला पहाटे ४ वाजता उठून आम्ही तिघे मी, भोसलेभाऊ व एक माऊली, तीन-साडेतीन किमी चालत जाऊन जेजुरी गड चढून श्रीखंडेरायाचे दर्शन घेतले. पाऊस चालू असूनही गडावर गर्दी होती. सर्वत्र उधळलेला भंडारा पावसामुळे निसरडा झाला होता. दर्शन घेऊन ७ वाजता मुक्काम स्थळी येऊन चहा नाष्टा घेतला व दिंडीत सामील झालो. आम्ही पुढे चालत दुपारी जेवणासाठी दौंडज व वाल्हे रेल्वे गेटजवळ पोहोचलो. वाल्हे म्हणजे, भर तारुण्यात माणसाने वाल्हे = कोमल, प्रेमळ, जिव्हाळासंपन्न* झाले पाहिजे. वाल्ह्यात वाल्मिकी ऋषींच्या समाधीचे दर्शन घेतले व मुक्कामी थांबलो. येथून तंबूतला मुक्काम सुरू झाला. तंबूला पाल म्हणतात. आमचे मुक्कामाचे स्थान मुख्य रस्त्यापासून ४-५ किमी दूर असायचे. दर वेळी मुख्य रस्ता सोडून रात्री जावे लागायचे व सकाळी परत यावे लागायचे.
२८ जूनला सकाळी निघालो व नीरा येथे दुपारचे जेवण झाले. नीरा नदीवर माऊलीला स्नान घातले जाते. ज्ञानेश्वर माऊलींच्या वास्तव्याचे ठिकाण २-३ किमीवर होते. आळंदीपासून ते लोणंदपर्यंत रस्त्यात ठिकठिकाणी अनेक ग्रामस्थ , सेवाभावी संस्था, भक्त, स्वयंसेवक वारकऱ्यांना चहा, नाष्टा, जेवण, फळे, पाण्याच्या बाटल्या, इतर खायचे जिन्नस वाटतात. नोंदणीकृत दिंडीतले वारकरी सोडून इतर स्वतंत्र जाणारेही हजारो वारकरी असतात. त्या वारकऱ्याची या लोकांमुळे खाण्या- पिण्याची सोय होत असते. परंतु रस्त्यात चालत असताना कागद, पुडे, रिकाम्या बाटल्या, केळीच्या साली, चहाचे कागदी कप इत्यादी कचरा संपूर्ण रस्ताभर असतो. चालताना हा कचरा सतत पायात येतो. दिंडीत चालताना अनेक वारकऱ्यांच्या चपला तुटतात, पायातून निसटतात. हातातली एकखादी वस्तू पडते ती खाली वाकून उचलून घेत नाहीत. त्या वस्तू तशाच मागे सोडून वारकरी पुढे जातात. शासनातर्फे आरोग्य, पाणी, वीज, रस्ता व सुरक्षा केली जाते.
२९ जूनला पहाटे उठून मी व नायकलभाऊ माऊलीचे दर्शन घ्यायला गेलो. तेथे आम्हाला पहाटेची काकड आरती मिळाली. ती घेऊन तीर्थप्रसाद घेऊन परत लोण॔दला आलो. लोणंदला विसावा घेतला. लोणंद म्हणजे लो = देणे, आनंद = परमसुख. श्रीविठ्ठलभक्तीसाठी घरदार सोडून आलेला वारकरी भक्तिरसाने परमानंदी होतो व तो आनंद इतरांना देतो. वारीत सहभागी होणारा प्रत्येक वारकरी-मग तो वयाने छोटा असो किंवा मोठा-एकमेकाला ‘माऊली’ म्हणूनच संबोधतो.
३० जूनला लोणंदहून सकाळी निघालो. पुढे पहिले उभे रिंगण होते. वारी सोहळ्यातील सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे ‘रिंगण’. त्याचे दोन प्रकार आहेत : १) उभे आणि २) गोल. वारीसोहळ्यात तीन उभी आणि चार गोल रिंगणे होतात. त्यातील दोन रस्त्याच्या उजव्या तर दोन रस्त्याच्या डाव्या बाजूला होतात. त्यातही दोन रिंगणे जेवणापूर्वी आणि दोन रिंगणे जेवणानंतर होतात. या रिंगण सोहळ्यानंतरचा ‘उडीचा कार्यक्रम’ खूपच सुंदर आणि अवर्णनीय असतो. उभे रिंगण म्हणजे माऊली रस्त्यात उभी राहते व तिच्या उजव्या व डाव्या बाजूना सगळे वारकरी उभे राहून आरती, भजन करतात. पालखी सोहळ्यात यंदा चांदोबाचा लिंब, बाजीराव विहीर व इसबावी येथे उभे रिंगण तर पुरंदावडे (सदाशिवनगर), पानीव पाटी, ठाकुरबुवा व बाजीराव विहीर येथे अश्वांचे गोल रिंगण होते. त्याचवेळेस एका बाजूला सगळ्या प्रकारचे--म्हणजेच झिम्मा फुगडी, बस फुगडी, कोंबडा, गाठोडं आदी--खेळ झाले. त्यात मीही भाग घेतला. तरडगावला रात्री पोहोचलो. तरडगाव म्हणजे जर तू ब्रह्मानंदाचा आनंद घेतला नाहीस तर तुला जीवनात रडावे लागेल या सिद्धांताचे चिंतन करण्यासाठी पालखी - तर + रड = तरडगावला येते. येथे दिंडीतल्या वारकऱ्यांच्या घरचे व इतर नातेवाईक जेवण, नाष्टा पाण्याची सेवा करायला येतात. येथून काहीजण पुढच्या प्रवासाला आमच्यासोबत पंढरपूरपर्यंत येतात.
१ जुलैला आम्ही तरडगावाहून फलटणला पोहोचलो. फलटण म्हणजे ब्रम्हसत्यं जगन्मिथ्या। म्हणजे ब्रम्ह हे पूर्ण सत्य आहे बाकी सारे जग फोलपटासारखे मिथ्या म्हणजे टाकाऊ आहे. हा अनुभव वारकऱ्यांना फलटणला आल्यावर येतो. हे जीवनाचे सत्य समजते. फलटणला बुधोजी महाविद्यालयाच्या पटांगणात मुक्कामाची सोय केली होती. येथे मुबलक पाण्याची सोय दिसल्यावर लगेच आम्ही सर्वांना आपले कपडे स्वछ धुता आले ; कारण आतापर्यंत जिथे राहायची सोय झाली होती तिथे मुबलक पाणी मिळाले नाही म्हणून रोजचे कपडे नुसते पाण्यातून काढून वाळत टाकत होतो. येथे एक दिवस मुक्काम झाला.
३ जुलैला सकाळी निघून पिंपद्रला मुक्कामी पोहोचलो. लाखांनी वारकरी रस्त्याने चालत असले तरी ते शिस्तीत, धक्काबुक्की न करता चालत असतात. सर्व वारकऱ्यांचे लक्ष माऊलीपर्यंत पोहोचण्याकडेच असते. रस्त्यांवर कोठेही पोलिस तैनात नसतात. फक्त जिथे गावातून वारी जात असते तिथे वाहनांची कोंडी होऊ नये व माऊलीच्या रस्त्यात अडथळा येऊ नये म्हणून पोलिस उभे असतात. वारकरी स्वतःहून शिस्तीचे पालन करतात हे खरेच कौतुकास्पद आहे. सकाळी निघून आम्ही बरडगावला पोहोचलो. बरड म्हणजे संसारातील सुखदुःखादी द्वंद्वापासून मुक्त होतो. त्याचे जीवनरूपी क्षेत्र वासनेचे तृणांकुर न फुटणारे *बरड* जमिनीसारखे होते.
४ जुलैला बरडला साधू बुआचा ओढा येथे नाष्टा केला व पुढे निघालो. नंतर जेवायला थांबलो. येथे मी कधीही विसरणार नाही अशी एक घटना घडली. आम्ही एका भक्ताच्या घरी जेवत होतो. अचानक माझ्याकडून भाजीतील मसाल्याचा गोळा खाल्ला गेला व त्यामुळे माझी जीभ भगभगायला लागली. मला काही सुचेचना. पण तेथील यजमानांच्या ते लक्षात आले आणि त्यांनी लगेच मला साजूक तूप वाढले. थोड्याच वेळात माझ्या जिभेची भगभग थांबली. परत आम्ही मार्गस्थ होऊन नातेपुते गावी पोहोचलो. नातेपुते म्हणजे नातेपुते या गावी इतर नात्याचा मोहातून मुक्त होऊन तो फक्त *श्रीविठ्ठलाचा* होतो. वारीत चालत असताना म्हणायच्या अभंगांचा क्रम आणि नियम ठरलेला असतो. रूपाचे, भूपाळीचे, वासुदेव, आंधळे, पांगळे, गौळणी इत्यादी अभंग सकाळच्या वेळी, दुपारच्या जेवणानंतर हरिपाठ, गुरुपरंपरेचे अभंग, नाटाचे अभंग वारकरी म्हणतात. ठराविक वारांचे अभंग त्या त्या दिवशी म्हटले जातात. सर्व दिंड्या एकच अभंग एकदम म्हणत नाहीत. प्रत्येक दिंडीत मात्र एका वेळी एकच अभंग ऐकू येतो. दुपारी जेवणानंतर ज्ञानोबारायांचा ‘हरिपाठ’ म्हटला जातो. हरिपाठाच्या शेवटच्या अभंगामधील शेवटचे चरण ‘ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान | समाधी संजीवन हरिपाठ॥ म्हटले जाते त्यावेळी दिंडी थांबते. त्याबरोबर पालखीही थांबते आणि दिंडीतील लोक उभे राहून ते चरण म्हणतात. तेथूनच भूमीला स्पर्श करून श्रीमाऊलीला वंदन करतात.
५ जुलैला सकाळी सगळे आवरून चहा घेतला. इतके दिवस कडक ऊन होते. कधी तरी मधे थोडासा पाऊस लागला. सतत उन्हात चालण्याने अंगकांती पूर्ण काळी झाली होती. पंढरपूरची वारी, ज्ञानेश्वरमहाराज आणि तुकाराममहाराज यांच्या पालख्या, वारक-यांच्य मनात इतकेच असते ; ते ऊन-वारा-पाऊस यांची तमा बाळगत नाहीत. मांडवी ओढा येथे जेवण घेतले. तेथे एक दुःखद घटनाही घडली. एका वारकरी महिलेचे निधन झाले. सगळ्यांची अशी भावना झाली की तिला विठ्ठलाच्या दारी मरण आले. शिंगणापूरफाटा सोडून माळशिरसला पोहोचलो. महाराष्ट्राच्याच नव्हे तर विविध ठिकाणच्या संस्थानांच्या, विविध फडांच्या पालख्या असतात. यातील मुख्य पालख्या म्हणजे शेगावहून येणारी पूर्णब्रह्म अधिकारी श्रीसंत गजानन महाराजांची, आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची, देहूहून संत तुकारामांची, त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्तीनाथांची, पैठणहून संत एकनाथांची तर उत्तर भारतातून संत कबिराची पालखी येते.
६ जुलैला माळशिरस. म्हणजे माळ = साखळी + शिरस = ज्ञान = माळशिरस. पायी चालल्याने *शारीरिक* मुखाने नामस्मरण केल्याने *वाचिक* विठ्ठलध्यासाने *मानसिक* तपाबरोबर कीर्तन-प्रवचनाच्या *श्रवणाने* ज्ञानाची साखळी त्याला विठ्ठलरूप करते." येथे सकाळी ‘गोल रिंगण’ होते. गोल रिंगण म्हणजे मोठ्या पटांगणात पालखी उभी असते व तिच्याभोवती पहिले टाळकरी मग तुळसवाल्या मग वीणाधारी मग झेंडेधारी आणि मग इतर वारकरी असे गोल उभे राहतात. वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात. यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो. याला आदराने ‘माऊलीचा अश्व’ असे म्हणतात. या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात अशी वारकरी संप्रदायात धारणा आहे. पाऊस असूनही सर्व वारकरी बेभान होऊन फुगड्या, भजन, टाळ वाजविणे इत्यादी सोपस्कार करतच होते. इतर वेळी पाऊस-चिखल आपल्याला नको वाटतात पण तेव्हा हा विचार मनाला जराही शिवत नाही ही माऊलींचीच कृपा. नंतर मार्गस्थ होऊन २ वाजता वांझोरीला जेवण घेतले. पुढे कडूसला आल्यावर दुसरे गोल रिंगण होते.
७ जुलैला आम्ही वेळापूर, ठाकुरबुआची समाधीला पोहोचलो. वेळापूर म्हणजे, क्षणभरही वेळ वाया न घालविता विठ्ठलभजन केले पाहिजे हे ज्ञान होते. येथे ३ रिंगण होते. रिंगणात माऊलीच्या पालखीच्या पुढे असलेल्या पहिल्या २५ दिंड्यातल्या वारकऱ्यांचा मान असतो. माऊलीचे अश्व रिंगणाची सुरुवात करतात. दोन्ही अश्व (एक मोकळा, एक स्वर असलेला) रिंगणात पालखीच्या ५ प्रदक्षिणा घालतात. पालखीच्या बाजूला टाळकरी अनेक रचना करून उभे राहतात, पाठीवर झोपतात, कुशीवर झोपतात, पोटावर झोपतात असे ना ना पद्धतींनी वेगवेगळ्या तालात टाळ वाजवत असतात. ढोलधारी त्यांचे वेगळे ताल वाजवत असतात. तुळस आणि विना धारी पालखीला प्रदक्षिणा घालत असतात. माऊलीच्या आरत्या, अभंग म्हणतात आणि मग इतर वारकऱ्यांना माऊलीचे दर्शन घेता येते. येथेच नंतर श्रीमाऊलींचे धाकटे बंधू श्रीसोपानकाकांची पालखी वेळापूरसमोरील भंडीशेगाव मुक्कामापूर्वी ‘टप्पा’ येथे येऊन श्रीमाऊलीना भेटते. यालाच ‘बंधुभेट’ म्हणतात. हा अतिशय भावुक प्रसंग असतो. यावेळी दोन्ही भावंडांचे रथ एकमेकांना भेटतात व मानकरी आणि विश्वस्त दर्शन घेऊन श्रीफलांचे आदान-प्रदान करतात. मंदिरापर्यंत जाण्यासाठी पाच किलोमीटर चालावे लागले. पाऊस चालूच होता.
८ जुलैला भेंडीशेगावला सुमारे ५ किलोमीटर चालत जाऊन 'तुकाधाव' या ठिकाणी उतरलो. तुकाधाव येथे मोठी उतरण आहे. असे सांगितले जाते की पंढरपूरपासून थोड्याच अंतरावर असलेल्या वेळापूर येथील टेकडीवरून तुकाराम महाराजांना विठ्ठलाच्या मंदिराच्या कळसाचे दर्शन झाल्याने तुकाराम महाराज त्या ठिकाणाहून पंढरपूरपर्यंत धावत गेले म्हणून त्या उतरणीला तुकाधाव असे म्हणतात. तिथे वारकरी मुक्कामी असतात. येथील शेतकरी आपल्या शेतातील पाण्याचे पंप, विहिरीवरील पंप चालूच ठेवतात जेणेकरून वारकऱ्याना पाण्याची कमतरता भासणार नाही. असे ठिकाण आले की मी मात्र आपले कपडे स्वच्छ साबण लावून धूत होते. मागचे २-३ दिवस सतत पाऊस आणि इतके दिवस सतत चालत होते तरी वारकऱ्यांच्या उत्साहात कोठेही कमतरता जाणवत नव्हती. पाऊस असल्याने चिखलही होता. त्याच चिखलात ट्रकसोबत पुढे गेलेले वारकरी पालाची (तंबू) व्यवस्था करतात. अक्षरशः काही ठिकाणी तर कडक जमीन येईपर्यंत फावड्याने चिखल बाजूला करावा लागत होता. सोबत चालणारे वारकरीही येथे गेल्यावर मदतीला येत होते. इतके चालून आलो म्हणून आराम नाही करत बसत.
९ जुलैला आम्ही वाखरीला (पंढरपूर) पोहोचलो. वाखरी म्हणजे "वाखरीच्या मुक्कामी त्याची वाणी ‘प्रासादिक व वाचासिद्ध होऊन’. रस्त्याला लागूनच चहाच्या टपरीवर आम्ही चहा आणि थोडी विश्रांती घेण्यासाठी थांबलो. चहा घेऊन निघालो आणि साधारण २-२.५ किमी आल्यावर जोरात पाऊस आला म्हणून मी रेनकोट घायला माझ्या पिशवीत हात घातला तर रेनकोट त्यात नव्हता ! पाऊस जोरात होता. येथे रस्त्यात ट्रक उभे होते. आम्ही सगळे ट्रकखाली आडोश्याला बसलो. मी माझ्यासोबत असलेल्या वारकऱ्याना म्हणाले, की मी रेनकोट त्या चहाच्या टपरीवर विसरलेआहे. मला जाऊन तो घेऊन यावा लागेल. तेव्हा सगळ्यांनीच मला जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी म्हटले, की कशाला इतक्या दूर परत जाताय ? पावसासाठी हा कागद घ्या. पण माझे मन तसे करायला तयार नव्हते ; कारण तो रेनकोट मला माझ्या मुलांनी माझ्या काळजीपोटी आणून दिला होता. मी त्यांना म्हणाले, तुम्ही पुढे व्हा, मी जाऊन येते. भोसलेभाऊ मला म्हणाले की ते रिंगण चालू होण्याच्या आधी थांबतो. तुम्ही या ; कारण पुढे रिंगणात चुकामूक होण्याची शक्यता होती. शिवाय तिथून आमचे विश्रांतीचे ठिकाण रस्ता सोडून ५ किमी आत गावात होते. चालून चालून पायांना फोड आले होते. बुटांचे सोल फाटले होते म्हणून मी स्लिपर घातले होते. पण स्लिपरने मला पटापट चालता येत नव्हते म्हणून मी स्लिपर पिशवीत ठेवले व अनवाणी चालू लागले. २-२.५ किमी चालल्यावर ती चहाची टपरी दिसली. त्या मालकांना विचारले की माझा रेनकोट येथे विसरले होते तो आहे का? त्यांनी बाजूला ठेवलेला रेनकोट मला लगेच दिला. मी तडक परतीची वाट धरली आणि ठरल्या प्रमाणे रिंगणाच्या आधी भोसलेभाऊची भेट झाली. येथे उभे रिंगण झाले. असा दिवसभरच्या पावसात भिजत प्रवास करून आम्ही वाखरीला रात्री ९.३० वाजता पोहोचलो. आमच्या मुक्कामाचे ठिकाण मुख्य मंदिरापासून (माऊलीची पालखी) दोन-अडीच किमीवर होते. येथेही खूप चिखल होता. चिखलात चप्पलही रुतत होती. त्या काळोखात, पावसात आमच्या दिंडीच्या स्वयंसेवकांनी (जे स्वतःही आमच्यासोबत चालत होते) सर्व वारकऱ्यांना सांगितले, की तुम्ही कोणी आपल्या पालातून बाहेर येऊ नका. आम्ही तुम्हाला चहा-जेवण सगळे पालातच आणून देतो. आम्हाला जेवण हातात आणून दिले.
१० जुलैला पंढरपूरमधे प्रवेश ! माऊलींची पालखी आदल्या दिवशीच मंदिरात आलेली असते. आज आषाढी एकादशी ! पंढरपुरात लाखोंचा जनसागर लोटलेला होता. एकादशीच्या पहाटे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सपत्नीक श्रीविठ्ठल-रुक्मिणीची महापूजा करतात. याला शासकीय पूजेचा दर्जा दिलेला आहे. त्यांच्याबरोबरच वारकरी समुदायातील एका दांपत्याला प्रतिवर्षी पूजेचा मान मिळतो. असा मान मिळणे वारकरी संप्रदायात आदराचे मानले जाते. विठुरायाच्या दर्शनाला अनेक भाविक आले असतात. मागचे १८,२० दिवस माऊली वारकऱ्यांच्या सोबतच असते म्हणून दिंडीतले वारकरी मुख्य मंदिरात जात नाहीत, कळसाचे दर्शन घेतात. पहाटे उठून आम्ही चंद्रभागा नदी मध्ये स्नानाला गेलो. नंतर भागिरथी नदीवर जाऊन स्नान केले. तेथे स्नानासाठी तुकोबाची पालखी आली होती. मी डोक्यावर तुळस घेऊन पालखीला प्रदक्षिणा घातली व पादुकांवर डोकं ठेवून सोवल्याने नमस्कार करता आला. तिथेच एक मंदिर आaहे ज्या ठिकणी विठोबा येऊन ताक प्यायला यायचे त्या ठिकाणचे दर्शन घेतले. तसेच तेथे असलेल्या रुक्मिणी, कृष्ण, शंकर आदी सर्व मंदिरांत जाऊन दर्शन घेतले. लाखोंची गर्दी असली तरी प्रत्यक दिंडीतले लोक आपल्या दिंडीतल्या वारकऱ्यांची काळजी घेत होते व कुठेही धक्काबुक्की होणार नाही याची संपूर्ण दक्षता घेत होते. इथेच भागीरथीच्या तीरावर वारकऱ्यांचे वेगवेगळे खेळ चालू असतात. त्यात एक मजेशीर खेळ म्हणजे, एका बाजूला ८,१० वारकरी उभे असतात आणि मध्ये थोडे अंतर ठेवून समोर ८,१० उभे राहतात. एका बाजूचे वारकरी कधी उड्या मारत, उठाबशा काढत, सूर्यनमस्कार घालत, साष्टांग नमस्कार करत समोरच्यांपर्यंत जातात. तिथे त्यांना नाम ओढतात आणि तसेच उड्या मारत परत आपल्या जागी येऊन उभे राहतात. त्याला प्रतिउत्तर म्हणून समोरचे वारकरी ही त्याच पद्धतीने त्यांच्यापर्यंत जातात. ते सर्व दृश्य म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारेच असते. त्याचे वर्णन शब्दात करता येणे खूप कठीण आहे; आपण ते केवळ अनुभवूच शकतो.
आमच्या दिंडीत एक वृद्ध अंध वारकरी होते. ते गेली अनेक वर्षे वारी करत होते. ते उत्कृष्ट ढोलवादकही होते. एका रिंगणाच्या ठिकाणी त्यांना एका दुसऱ्या ढोलवादकाच्या खांद्यावर उभे केले. त्यांना वर कसलाही आधार नव्हता तरी त्यांनी तिथे उभे राहून उत्कृष्ट ढोलवादन केले. तिसरीतील एक लहान मुलगा आपल्या वडिलांनासोबत आला होता. तो आमच्यासोबत इतके दिवस चालतच पंढरपूरपर्यंत आला पण एकही दिवस त्याने तक्रार केली नाही. मला चालायचे नाही की मी दमलोय, मला भूक लागली आहे असे म्हणाला नाही. आम्ही जिथे जसे जात होतो, जेव्हा जेवत होतो, विश्रांती घेत होतो तसाच तोही तेव्हा थांबायचा. विशेष म्हणजे दिंडीतल्या सर्व खेळांमधे तो उत्साहाने भाग घेत होता. एक ९२ वर्षाचे वृद्ध वारकरी संपूर्ण दिंडी चालले. आमचे दिंडीप्रमुख, श्री. अण्णा (वय ७५ वर्षे) यांचे आभार मानून आणि आवर्जून कौतुक करावे असे आहे. कुटुंब प्रमुखाप्रमाणे ते सर्व घरातल्यांनी काळजी घेत होते. दिंडीतले सगळे वारकरी जेवले की नाही, चहा- नाष्टा केला की नाही याची जातीने चौकशी करत होते आणि सर्व वारकऱ्यांचे जेवण झाले की मगच जेवण करत होते. दिंडीत असताना महिला वारकरी एकमेकींना डोक्यावर तुळस, पाण्याचा हंडा घेण्यास देतात. या वारकरी महिलांचेही कौतुक केले पाहिजे. दिवसभर पायी चालूनही मुक्कामी पोहोचल्यावर थोडी विश्रांती घेऊन लगेच स्वयंपाकाला लागायच्या. २०० ते २५० वारकऱ्यांच्या कधी चपात्या तर कधी भाकऱ्या करत असत.
दिवसभर आजुबाजूच्या मंदिरांत जाऊन दर्शन घेतले व संध्याकाळी बाजारपेठेत जाऊन थोडी खरेदी केली. घरी देण्यासाठी प्रसाद घेतला व रात्री माझ्या पालात येऊन झोपले. ही रात्र माझ्या दिंडी वारीतील शेवटची रात्र होती. आता झोपताना मात्र सकाळी परत कसे जायचे याचा विचार होता ; कारण पंढरपूरला इतकी गर्दी होती की ज्यादा बसगाड्याही भरभरून जात होत्या. त्यात पंढरपूर दर्शन हे आयुष्यात पहिल्यांदाच करीत असल्याने तिथल्या दळणवळणाच्या साधनांची माहिती नव्हती. असे सगळे विचार करतच झोपले.
११ जुलैला सकाळी उठलो. चहा झाला. आदल्या दिवशीचा उपवास सोडून परतीच्या प्रवासासाठी विचारणा सुरू झाली. त्यावेळी माझ्या दिंडीतल्या वीणाधारी माऊलीने मला विचारले, तुमचा रेनकोट मला वीणाला बांधायला द्याल का? परत जाताना पावसात भिजेल, रेनकोटमधे बांधून नेली तर सुरक्षित राहील. मी एक क्षण विचार केला कारण मुलांनी मला रेनकोट प्रेमाने दिला होता आणि दुसऱ्या क्षणी विचार आला की टपरीवर चुकून सोडून आलेला रेनकोट बहुतेक वीणा सुरक्षित नेण्यासाठी लागणार होता म्हणूनच माउलींनी मला परत पाठवून तो मिळवून दिला. 'तूच दिलेस, तुलाच अर्पण’ म्हणून मी तो रेनकोट वीणाधारीच्या स्वाधीन केला आणि माझ्याकडून ही सेवा करून घेतली म्हणून मनोमन माऊलीचे आभार मानले. भोसलेभाऊ व दिंडीतले तातोबा यशवंत दवणे (वय ९२) मला बसमधे बसवून देण्यासाठी आले. आम्ही साधारणपणे ३ किमी चालत आलो आणि दीड-दोन तास बसस्थानकात फिरून मला जाण्यायोग्य बस शोधत होतो. शेवटी मला १०.३० वाजण्याच्या सुमारास 'पंढरपूर-अर्नाळा' बस मिळाली. बसायला जागाही मिळाली. भोसलेभाऊ आणि तात्या मला सुखरूप बसमधे बसवून परत ३ किमी चालत दिंडी मुक्कामी गेले. ते व दिंडीतले काही इतर वारकरी दुसऱ्या दिवशी (१२ जुलै) परतीच्या प्रवासाला परत पायी (पंढरपूर ते आळंदी) निघणार होते. वारी पंढरपूरला जात असताना जागोजागी पावलापावलांवर दानशूर लोक सोई उपलब्ध करून देतात. मात्र ‘परतवारी’च्या वेळी अतिशय कष्टप्रद प्रवास करावा लागतो. वारीला प्रसिद्धीचे वलय (ग्लॅमर) आहे, तर ' परतवारी'ला लाट ओसरून गेल्यानंतरचे वातावरण !
गर्दी असल्याने बसला स्थानकातून निघायला साधारण दोन तास लागले आणि सुमारे बारा–सव्वा बारा वाजता बस मार्गस्थ झाली. हुश्श ! माझा जीव भांड्यात पडला. घरी मुलांना बस मिळाल्याचे कळविले. मुलांनी सांगितले, की ठीक आहे आम्ही तुला घ्यायला येऊ ; काही काळजी करू नकोस. दोघेही थोड्या थोड्या वेळाने मी कोठवर आले आहे हे बघत होते. पुण्यापर्यंत आल्यावर मी त्यांना म्हटले, की आता मी ठाण्याला आले की कळवेन. रात्री बारा-साडे बाराला ठाण्याला पोहोचल्याचे मुलांना कळविले. मुलाने मला विरारफाट्यावर उतरायला सांगितले. तिथे आम्ही येऊ. ठाणे ते विरारफाटा साधारण दोन-अडीच तास लागणार होते. माझी दोन्ही मुले वेळेच्या आधीच (२.५० वाजता) येऊन विरारफाट्यावर उभी होती. मी बाहेर काही खाणार नाही हे ठाऊक असल्याने आणि पाऊसही बराच असल्याने मुलीने माझ्यासाठी थर्मासमधे गरमगरम दूध (हळद घालून) व बिस्कीट आणले होते. मला बसमधे थंडी वाजेल म्हणून सोबत स्वेटर, पायमोजे आणि पांघरूण आणले होते. पहाटे ५ वाजता आम्ही घरी पोहोचलो. घरी आल्यावर यजमानांनी आंघोळीसाठी पाणी गरम करून दिले व गरमागरम चहा दिला. मी जवळपास २०-२२ दिवसांनी मनसोक्त आंघोळ केली. चहा घेतला आणि थोडा वेळ झोपले. सकाळी ९ वाजता उठले आणि एरवी घरी असताना जशी कामे करायचे तशी कामाला लागले. मला जराही थकवा जाणवला नाही. ही सगळी माऊलीचीच कृपा ! त्यानेच मला इतकी शक्ती दिली की मी ही वारी (चालत, स्वतः आजारी न पडता) पूर्ण करू शकले.
दिंडीत होते तरी माझ्यातील समाजसेविका मागे राहणारी नव्हती. प्रवासात कोणाला चक्कर आली, कोणाचा पाय मुरगळला, डोके दुखले त्यांना मी 'अँक्युप्रेशर’ दिले. कोणाला सर्दी, खोकला होता त्यांना ओव्याने शेकून दिले. त्यांना त्यांच्या आजीची आठवण झाली असे सांगत. माझ्या सोबतच्या वारकरी महिलेला खूप सर्दी-खोकला होऊन ताप आला होता. त्या परिस्थितीत मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले. सध्याच्या परिस्थितीत 'कोरोना'ची भीती होती तरीही मी त्या गोष्टीची पर्वा केली नाही आणि माझ्याकडून जितकी सेवा होऊ शकते तितकी केली.
ज्ञानोबा माऊलीच्या जे मनात असते ते ती करते. वारीला जायच्या विचारापासून ते वारीहून येईपर्यंत याचा मला चांगलाच अनुभव आला तो मी माझ्या शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. २२ दिवसांचे दिंडी-वर्णन जेवढे सविस्तर सांगता येईल तेवढे केले आहे.
वारीचा प्रवास करत असताना मी रोज ठिकाण, वेळ आदीचे थोडक्यात वर्णन माझ्या मोठ्या बहिणीला (सौ. मंगला तोरणे) सांगत असे. हे दिंडी-वर्णन तिच्यामुळे व माझे भाऊजी (अनिल तोरणे) यांच्या मार्गदर्शनाखाली लिहिले. माझ्या आई-वडिलांचे आशीर्वाद, माझ्या नातेवाईकांकडून मिळालेले प्रोत्साहन व कौतुक, कुटुंबीयांचा भक्कम पाठिंबा मला बहुमूल्य वाटतात. दिंडीतल्या सर्व वारकऱ्यांचे प्रामुख्याने नायकलभाऊ आणि भोसलेभाऊ यांनी तर मला त्यांच्या लहान बहिणीसारखे सांभाळून सुखरूप आणले व माझी वारी पूर्ण केली, त्या सर्वांचे मनापासून आभार मानते. "जय हरी विठ्ठल" अशीच देवाची कृपा मी आणि माझ्या कुटुंबावर तसेच मित्रपरिवारावर असू दे.
"ज्ञानबा-तुकाराम’ हे भजन म्हणजे मध्यम पदलोपी समास आहे. या दोन नामांत माऊलींपूर्वीचे आणि तुकोबारायांनंतरचे व या दोहोंच्या दरम्यानचे संप्रदायातील सर्व संत सामावलेले आहेत. असा हा वारीचा नयनरम्य सोहळा डोळ्यात साठवून ठेवावा असाच असतो. म्हणून जीवनात प्रत्येकाने एकदा तरी वारी अनुभवावी असे सांगितले जाते. म्हणूनच महाराष्ट्रातील पंढरपूरची वारी आता अनेकांच्या संशोधनाचा, शिस्तीचा आणि डॉक्टरेट (पीएच.डी.) विषय बनली आहे. ही एक अभिमानाची गोष्ट आहे. म्हणूनच वारीला महाराष्ट्रातील एक प्रमुख सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळे महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा स्पष्टपणे अधोरेखित होते.