आम्ही मंदिरातून बाहेर पडलो आणि रिमझिम पाऊस सुरू झाला...
अनिल छत्री उघडणार इतक्यात,
"आरं , भिजं की मर्दा थोडं
एवढं भिजल्यानं तुज्या अंगाला मोड नाय येणार !!"😄😄
राजेंद्रने जी कोपरखळी मारली त्याने मलाही हसू आलं..
गाडीशी पोहचेपर्यंत मस्त कोल्हापूरचा पाऊस एन्जॉय केला..
आता वेध लागले होते , जोतिबाच्या दर्शनाचे!!
ऐन जून महिन्यात आम्ही देवाच्या भेटीला चाललो होतो.. त्यामुळं कधी पावसाची रिपरिप तर कधी मध्येच मुसळधार.....
त्याच्या मनाला येईल तसा तो बरसत होता आणि त्याच्या सोबतीला दाट धुकं !!
जोतिबाचा घाट ऐन पावसाळ्यात चढताना थोडी काळजी घ्यावी... वाकडी तिकडी वळणे आणि अचानक समोरून येणारी वाहनं , नवखा माणूस नक्कीच भांबावून जाईल...
घाटमाथ्यावर सुरक्षित ठिकाणी गाडी थांबवून , तिथून दिसणारे कोल्हापूर शहर , पन्हाळा , पंचगंगा आणि आजूबाजूच्या परिसराचा दिसणारा सुंदर नजारा आपल्या डोळ्याचं पारणं फेडतो..
कोल्हापूर शहराच्या वायव्य दिशेस जेमतेम १५ किलोमीटर अंतरावर ज्योतिबाच्या डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे. ज्योतिबाला" केदारेश्वर-केदारलिंग" या नावानेही ओळखतात. पसरट भूभागावर एक हजार फूट उंचीवर, शंखाकृती, हत्तीच्या सोंडे सारख्या दिसणाऱ्या या डोंगराला 'वाडी रत्नागिरी" म्हणतात.
वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) इथले जोतिबाचे हेमाडपंथी मंदिर काळ्या दगडात असून इथे केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंग या तीन मंदिरांचा समूह आहे. जोतिबाला घातले जाणारे खेटे( माघ महिन्यातील पाच रविवारी जोतिबा डोंगरावर भरणाऱ्या यात्रेस जोतिबाचे खेटे म्हणतात. भाविक शक्यतो अनवाणी चालत येतात.) हे या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे. यात्रेवेळच्या उंच उंच सासनकाठ्या( मुक्तीचे प्रतीक) प्रसिद्ध आहेत . जवळ जवळ ९६ प्रकारच्या सासनकाठ्या या देवस्थानात आहेत आणि प्रत्येक काठीचे ठरलेले मानकरी आपापली सासनकाठी जोतिबा यात्रेच्या वेळी भान हरपून नाचवतात...
मंदिराच्या आवारात बारा ज्योतिर्लिंगाच्या मुर्त्या आहेत. जवळच यमाई मंदिरही आहे....
डोंगरावर गाडीने पोहचलो की रितसर पार्किंग मध्ये गाडी पार्क करून पायीच देवाच्या दर्शनासाठी जावे लागते..
आम्ही गेलो तेव्हा शनिवार असल्याने जास्त गर्दी नव्हती..
रविवार आणि पौर्णिमेला भक्तांची अलोट गर्दी असते..
रांगेत उभं असताना काही हौशी भक्तगण "जोतिबाच्या नावानं चांगभलं " चा गजर करत होते.. तो आवाज, तो नाद मंदिराच्या गाभाऱ्यात घुमत होता आणि आम्हीही "जोतिबाच्या नावानं चांगभलं" च्या त्या दैवी वातावरणात तल्लीन होऊन गेलो..
तान्ह्या लेकरांपासून ते म्हातारे कोतारे देवाच्या पायाशी लीन होत होते.. देवाच्या पायावर आपलं लेकरू घातल्यावर आणि त्याच्या कपाळी पुजाऱ्याने देवाचा गुलाल लावल्यावर , प्रत्येक मातेच्या मुखावर तिच्या लेकरासाठी जणू कवच कुंडलं मिळाल्याचं समाधान दिसत होतं..
आपल्या देवावर असणारी भोळी -भाबडी श्रद्धा !!
भाळी गुलाल लेऊन आम्ही जोतिबाचे भाविक त्याच्या चरणी नतमस्तक झालो ..
त्या विश्वव्यापी पित्याचा आशीर्वाद घेऊन मंदिराच्या बाहेर पडलो...🙏🙏
चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं,
माया ममता गुलाल उधळू, भावभक्तीची फुलं रं ,
चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं !!
तुझ्या नामाचा रं डंका, बारा ज्योतिर्लिंगा मधी रं ,
तुझ्या चरणाचं तीर्थ,माय पंचगंगा नदी रं ,
दर्शन घ्याया तुझं,मन हे येडं खुळं रं ,
चांगभलं रं चांगभल, भैरवनाथा चांगभलं !!
ह्या दक्षिण काशीला रं, राजा राहिला डोंगरी रं,
घाट जरी वळणाचा, चढू मोक्षाची पायरी रं ,
भगवंताच्या देवपणाला, हात आमुचा जुळं रं ,
चांगभलं रं चांगभलं, देवा केदारा चांगभलं!!
बारा गावाचं भगतं, तुझी वाहती पालखी रं
नऊ खंडाचा तू स्वामी, सा-या जगाची मालकी रं
जत्र मंदी पुण्याईची, सासण काठी डुलं रं ,
चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं!!🙏🙏🙏
लहानपणापासून हे गाणं ऐकत आलीये आणि आजही हे गाणं ऐकलं की माझी "ब्रम्हानंदी टाळी" लागते..
ऐतिहासिक गड-कोटांनी आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी सुजलाम झालेल्या कोल्हापूरचे पर्यटन विश्व विलक्षण आहे. दुर्ग, थंड हवेची ठिकाणं, अभयारण्य, हेरिटेज वास्तू, धरणं जंगल सफारीची ठिकाणं , गगनबावडा मठ इत्यादी धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळ, आकर्षणं असं वैविध्य कोल्हापूरच्या दीडशे किलोमीटरच्या परिसरात आहे.
वस्तूत: साडेतीन पीठांपैकी एक शक्तिपीठ श्री अंबाबाई मंदिर, दख्खनचा राजा जोतिबा मंदिर, नृसिंहवाडी, शिलाहार राजांच्या कालखंडातील प्राचीन खिद्रापूर मंदिरासह अन्य पर्यटनस्थळे म्हणजे धार्मिक पर्यटनाचा गोफच.
छत्रपती राजर्षी शाहूंची नगरी, मराठी चित्रपटसृष्टीचे माहेरघर, कुस्तीपंढरी, गुळाची आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ, जगप्रसिद्ध कोल्हापूरी चपला, रंकाळा तलाव, आणि तांबडा-पांढरा रस्सा चाखायचा असेल तर कोल्हापुरला पर्यटकांनी नक्की भेट द्यायलाच हवी...