नियती
ग्रॅज्युएट झालो आणि नोकरी मिळवण्याची धडपड चालू झाली. खूप मोठी स्वप्न उराशी होती. खूप पैसे कमवायचे होते. त्यासाठी वाट्टेल ते करायची तयारीही होती. आईला हे सगळे बोलून दाखवताना एकप्रकारचा अहंभाव तिला जाणवत होता. ती बोलूनही दाखवायची पण माझ्या तारुण्यातल्या धुमाऱ्यां पर्यन्त तिचे शब्द पोहोचत नव्हते. बाबा हे तारुण्याचे वारे जाणून होते. भिरभिरुन हे वारे नंतर शांत होते हे त्यांना स्वानुभवाने महित होतं. नोकरी मिळवायची, चरितार्थाला लागायचं इथपर्यंतच सगळ्यांच्या अपेक्षा होत्या. पण मी मात्र स्वतःच्या टुमदार बंगलीतल्या, चंदनी पाटावर बसून चांदीच्या ताटात पंचपक्वान्नांच्या भोजनाची स्वप्न पहात होतो.
मोठमोठ्या कंपन्यांमध्ये अर्ज टाकून इन्टरव्हूची वाट पहात बसलो. आपल्याला तर अशी नोकरी मिळेल, या सुख स्वप्नात दंग असताना एक एक दिवस सरू लागला. हळूहळू मन भानावर येऊ लागलं. अजून कुठून एकही कॉल आला नव्हता. मग बाबांच्या ओळखीच्यांकडे चकरा मारून नोकरीसाठी चपला झिजवू लागलो. स्वतःच्या केविलवाण्या स्थितीचा संताप येऊ लागला. पैशांच्या राशींचे स्वप्न एका वळणावर येऊन थांबल्या सारखं झालं. आई बाबा धीर देत होते.
शेवटी बाबांच्या ओळखीने पुण्याला एका कंपनीमध्ये नोकरी मिळाली. कंपनीही चांगली होती, व पगारही चांगला दिला होता. मनासारखं सगळं झाल्यावर परत अहमभाव उभरू लागला. आईने हातावर दही घालून सांभाळून रहा म्हणत निरोप दिला. बाबा मात्र पुण्यापर्यंत येणार होते.
हळूहळू रुटीन सुरू झालं. नवीन जागा, नवीन ओळखी. शिक्षण आणि प्रत्यक्ष नोकरी मधलं काम, यातल्या तफावतींशी जुळवून घेत दिवस सुरू झाले. यंत्राचा खटका दाबून सुरू होणारा दिवस धाग्यांच्या उलगडणाऱ्या लडींप्रमाणे आपसूक चालत राही. टेक्स्टाइल कंपनी होती ती. सुरवातीला सगळ्या डिपार्टमेंटमधून एक आठवडा माहिती घ्यायची होती. सुरवात अगदी वॉचमन केबिन पासून झाली, कारण क्वचित कुठला प्रसंग आला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित पाहिजे. स्टोअर्स मधून साठवलेले धाग्यांचे अनेक प्रकारचे नमुने, रंग ,कच्चा माल, यंत्राचे पार्ट्स, वेगवेगळे केमिकल्स, उपकरणे, स्टेशनरी या सगळ्यांची नोंद, सप्लायर्स कडून मागणी, पुरवठा. अश्या सर्व कामाची माहिती बघून, तिथल्या स्टाफ बरोबर ओळख करून देण्यात आली. असेच QA, QC, पॅकिंग, hr डिपार्टमेंट करत प्रोडक्शनला आलो. तिथे निर्मिती सोहळा चालला होता. खटके दाबतच सुरू होणारं बारीक रंगकामाचं डिझाईन, कपड्याच्या ताग्यांच्या गुंडाळ्या, त्या बॉक्स मध्ये पॅक करण्याची प्रक्रिया सगळच खूप गतिमान होतं. काम करायला झिंग वाटू लागली. हळूहळू सगळ्या गोष्टी लक्षात येऊ लागल्या. काही महिन्यातच त्यातले उपव्यवसाय कळू लागले. नोकरी करून फावल्या वेळात करता येतील ती छोटी छोटी कामं मी करू लागलो. पगार तर चांगलाच होता पण आता या उद्योग धंद्यातूनही बरी कमाई होऊ लागली. माझ्या आकांक्षांचे धुमारे अजून अंकुरू लागले. गावाकडे जाण्याचे प्रमाण कमी झाले. आई बाबांच्या फोनकडे दुर्लक्ष होऊ लागले.
लवकरच आई बाबांचा लग्नासाठी धोशा सुरू झाला. पण मला इतक्यात लग्न करायचे नव्हते. पैसा माझं सर्वस्व बनत चालला होता. त्यात इतक्यात कुणी वाटेकरी यावा आणि आपल्या कामात अडथळा यावा. हे पटतच नव्हते. माझ्या बँक बॅलेन्स बरोबर माझं वयही वाढू लागलं. पोराचं पैशाचं वेड पहात आई बाबांचं आयुष्यमान कमी होऊ लागलं. बाबांनाही आता जरा काळजी वाटू लागली. माझा अहंभाव पराकोटीला पोहचू लागला होता. कंपनीमध्ये वर चढत चांगल्या अधिकाराच्या पोस्टवर आलो होतो, पण माणसांना सांभाळून घ्यायची कला नव्हती. अधिकारशाही, हुकुमशाही, धाकधपटशा या मार्गांनी कामं करून घेण्याची पद्धत सगळ्यांनाच जाचक होत होती.
एक दिवस कंपनीच्या मालकांचे बोलावणे आले. काही कामाच्या संदर्भात असेल अशा खुशीतच मी केबिन मध्ये शिरलो. कंपन्यांच्या समारंभाशिवाय त्यांच्याशी वैयक्तिक बोलायचा कधी संबधच आला नव्हता. केबिन मध्ये प्रवेश केला. समोर गोरेपान, धीरगंभीर व्यक्तिमत्व असलेले सर बसलेले होते. आलिशान एसीरूममध्ये एका लक्ष्मीपुत्राची झलक भासत होती. सरांनी बसण्याचा इशारा केला. आपल्या लाघवी, नम्र आवाजात माझ्या कामाची तारीफ केली आणि उद्या जेवण्यासाठी घरी या असे म्हणाले. सरांनी घरी जेवायला बोलवलय यावर माझा विश्वासच बसेना. जुजबी बोलून सरांनी निरोप दिला.
दुसऱ्या दिवशी सकाळी १२ वाजता त्यांच्या आलिशान बंगल्यावर पोहोचलो. जसा माझ्या स्वप्नात होता तसाच बंगला पाहून मी अगदी खुश झालो. बंगल्याभोवती हिरव्यागार भूमीवर रंगीबेरंगी फुलांनी सजवलेला परिसर मन मुग्ध करत होता. त्यांच्या बागेतल्या झोपाळ्यावर सगळी सुखं झुलत आहे असं वाटून गेलं. वॉचमननी नाव विचारून आतमधे सोडले. शांत निवांत आवारातून चालत दर्शनी भागाची बेल वाजवली. नोकराने दार उघडून आत बसवले. भव्य दिवाणखान्यातील कलाकुसरीचे फर्निचर, पेंटिंग्ज पाहून थक्क झालो. आतल्या रूमही तशाच सजवलेल्या असतील. अशा मनाशी कल्पना करत असतानाच सर बाहेर आले. अगत्यापूर्वक त्यांनी माझी विचारपूस केली. तेव्ह्ढ्यात वेलकम ड्रिंक घेऊन, नोकराबरोबर त्यांच्या सुंदर पत्नीही बाहेर आल्या. अत्यंत विनयपूर्वक दोघे बोलत होते. कुठेही श्रीमंतीचा गर्व, त्यांच्या देहबोली किवा संभाषणातून जाणवत नव्हता. कुठेतरी मला लाजल्यासारखे झाले. एव्हढ्या मोठ्या कंपनीचा मालक आणि इतक्या अगत्यानी बोलत आहेत.
“चल मी तुला घर दाखवतो.” भारावून कळसूत्री बाहुलीप्रमाणे मी त्यांच्या मागे चालत राहिलो. पहिली रूम दाखवली ती त्यांच्या आई वडिलांची होती. आई वडिलांशिवाय घर नसते.
सगळ्या सोईंनीयुक्त त्या खोलीत प्रेमाच्या आपलेपणाच्या भावनेने ओथंबलेले ते दोन वृद्ध ममतेने माझ्याकडे पाहून हसले. सरांनी आईला कुशीत घेऊन त्या दोघांची ओळख करून दिली. मी ही त्यांच्या पाया पडून आशिर्वाद घेतला. मला हळूहळू जाणवू लागले, माझ्या स्वप्नांच्या दुनियेत फक्त पंचपक्वान्नांचे जेवण होते, पण ते जेवण तयार करणारी बायको, तिला त्यात स्थान नव्हते. मुलांचे कोवळे बोल त्यात गुंजत नव्हते. नोकरांशी प्रेमाने बोलणारे सर पाहून माझ्यात माणुसकीलाही स्थान नाही हे ही लक्षात आले. बाकी बंगला दाखवत शेवटी त्यांनी एका खोलीत नेले. तिथले दृश्य पाहून मनाचा थरकाप उडाला. साधारण २४ वर्षांचा मुलगा दुर्धर आजाराशी झुंज देत असलेला दिसला. सरांनी त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हटले “ हा माझा मुलगा स्वप्नील. त्यानेही डोळ्यातून हसत माझी दखल घेतली. थोडावेळ त्याच्याशी गप्पागोष्टी करून मग त्याचा निरोप घेतला. तेव्हढ्यात जेवण तयार असल्याचा निरोप आला. डाइनिंग टेबलवर नाना प्रकारचे पक्वान्न वाढले होते. रंग, रस, स्वाद यांनी युक्त असे रुचकर जेवण सरांच्या पत्नी आग्रहाने वाढत होत्या. जेवताना विविध विषयांवर त्या आमच्याशी सहजतेने गप्पा मारत होत्या. हात धुवून आम्ही हॉलमध्ये आलो.
सोफ्यावर बसल्यावर सर म्हणाले “ मि. समीर, तुम्हाला दुखवण्याचा माझा हेतु नाही. पण तुमची एकूणच कंपनीतील लोकांशी वागण्याची पध्दत, ताठा, पैशाची लालसा, आईवडिलांना भेटायला न जाणं, लग्नाला उशिर या सगळ्या बाबींकडे माझे लक्ष गेले होते. यासाठीच तुम्हाला माझ्याकडे जेवायला बोलावले. जीवनातली सत्यता, फोलता तुमच्या लक्षात यावी म्हणून मुलाला भेटवलं. आई वडिलांच्या चेहेऱ्यावरचे हसू, प्रेम पाहून जीवनाला किती उभारी येते. बळ मिळते. यासाठी माझ्या आई वडिलांना भेटवले. माझ्या दाराशी सगळं वैभव लोळतंय, पण मुलाचं कणाकणानी मरणाचं दुःखं आम्ही सतत पहात आहोत. मुलाने ते दुःखं सोसायला स्वतः बळ दिले आहे. त्याचा जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोण आणि जीवनाच्या क्षणभंगुर ज्ञानाच्या आकलनाने आम्ही सगळेच प्रभावित झालो. त्याला हसून निरोप देण्याचं आम्ही ठरवलं आहे. तुम्ही माणसांशी खूपच फटकून वागता. पण कोण माणूस कधी तुमच्या कामी येईल आणि कोण तुमच्या नाशाला कारणीभूत ठरेल हे तुम्हालाच कळणार नाही. त्यामुळे कमीत कमी माणसांना दुखवा. फक्त पैसा हेच धन नाही तर धनाचे अनेक प्रकार आहेत. सगळे एकमेकांवाचून अर्थहीन आहेत. नुसत्या पैशाने तुम्ही बाजारची सुखं विकत घेऊ शकाल पण पत्नीचे प्रेमळ हास्य, छोट्या बाळाची किलकारी आई वडिलांचा आशिर्वाद, प्रसंगी त्यांची जीवनानुभवाची वाक्य तुम्ही पैशानी विकत घेऊ शकत नाही.”
माझा जीवनावरचा एकेक नशा सर उतरवत होते. ज्याला मी शाश्वत मानत होतो. ते अशाश्वत आहे हे कळू लागलं आणि अशाश्वततले शाश्वत लक्षात आलं. भरल्या डोळ्यांनी आणि भरल्या गळयानी मी सरांच्या पाया पडलो. “ अरे, असे काय करतो ? कंपनीतले प्रत्येकजण मला मुलासारखे आहेत. तु ही मुलासारखा आहे. बापाने मुलाला जीवनाची जाणिव करून द्यावी हे त्याचे कर्तव्य आहे.” मायेने त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला. स्वतःला सुधारण्याचे वचन देऊन मी सरांचा निरोप घेतला.
घरी पोहोचताच आई वडीलांना फोन करून मी घरी येतोय आणि लग्नाला तयार असल्याचे सांगितले. कंपनीत आठ दिवसांची रजा टाकली. माझी रजा पाहून सर खुष झाले असतील हे चित्र मनात येऊन खूप छान वाटलं. लवकरच सर्वार्थाने चांगली मुलगी पसंत करून लग्नाची तारीख ठरवली. कंपनीत जेव्हा सरांच्या केबिनपाशी गेलो तेव्हा तिथल्या वॉचमनने सांगितले की काल रात्रीच त्यांचा मुलगा गेला.
शाश्वत अशाश्वताचे नियतीचे खेळ बघायची सरांनी जी जाणिव करून दिली होती त्या जाणिवेला स्मरून त्यांच्या मुलाच्या शांतीसाठी मनातल्या मनात प्रार्थना केली आणि नियतीच्या कालचक्राकडे बघत सरांना भेटायला निघालो.
.............................................................