प्रकरण- ५
स्मिता रुपेशची अगदी जवळची मैत्रीण होती. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. स्मिता सोडून गेल्यावर रुपेश एकदम तुटून गेला होता. खूप दुःखी झाला होता. स्मिताला विसरण्याचा प्रयत्न करूनही तो तिला शेवटपर्यंत विसरू शकला नव्हता. त्याचे मन त्याला आतून खात होते कि मी उगाचच वैशालीच्या जागी स्मिताला स्पर्धेत भाग घ्यायला लावले. स्मिता नको नको म्हणत असताना सुद्धा मी तिला जबरदस्ती केली होती. मी माझ्या स्वार्थासाठी विनाकारण तिचा बळी घेतल्यासारखे झाले. रूपाची हार करण्यासाठी मी स्मिताचा वापर केला. मी स्मिताला मारले आहे---या विचाराने रुपेशची मानसिक स्थिती फार बिघडत चालली होती. शेवटी रुपेशलाही मानसिक उपचाराची मदत घ्यायला लागली. त्याला या स्मिताच्या विरहाच्या धक्क्यातून बाहेर यायला सहा महिने लागले असतील. कॉलेजचा प्रत्येक विद्यार्थी या रक्तकांड घटनेने एकदम हादरून गेला होता. मला सुद्धा रुपाला बघायला जायची खूप भीती वाटत असे.
रूपा हॉस्पिटलमध्ये मनोसोपचारची ट्रीटमेंट घेत होती. हळू हळू तिच्या तब्येतीत सुधार होत होता. तरीसुद्धा तिला अधून मधून मानसिक विकृतीचे झटके येत होते. त्यावेळी ती नर्स-डॉक्टरांना सुद्धा मारायला अंगावर धावून यायची. रूपाची आई रूपाच्या काळजीने आजारी पडली होती. त्यावेळी रूपाची मावशी रूपाच्या आईची काळजी घेत होती. सात-आठ महिन्यांनी रूपा बरी झाल्यावर रूपाच्या केसची सुनावणी सुरु झाली. त्या केसमध्ये रूपाचे बालवाय आणि मानसिक विकृतीचा झटका या गोष्टी लक्षांत घेऊन तिला तुरुंगवास मिळाला. तुरुंगात सुद्धा तिला अधून मधून मानसिक विकृतीचे झटके येत असत.त्यावेळी मी रुपाला अधून मधून भेटायला जात असे. आम्ही मैत्र-मैत्रिणी तिला भेटायला जात असत तेव्हा ती झालेल्या घटना विषयी पश्चाताप करत असे. "माझ्या हातून कसे असे घडले म्हणून रडत असे. मला आई आणि तुम्ही सांगत असताना सुद्धा मी नको त्या सिरियल्स बघत होते. त्यातून माझ्या मानसिकतेवर एवढा परिणाम होईल असे वाटले नव्हते. शिवाय रुपेश वरचा राग सुद्धा माझ्या मनात आतल्या आत धुमसत होता. त्यात मला माझ्या सौंदर्याचा असलेला अहंकार, गर्व या सर्वांचा परिणाम होऊन मी एक हैवानासारखी वागले. स्मिताचा माझ्या हातून मृत्यू झाला. किती अघोरी कृत्य माझ्याकडून घडले. " असे म्हणून रूपा आमच्या जवळ अक्षरशः ओकसा बोकसी रडत असे. रडता रडता तिची नजर बदली होऊन जात असे आणि आम्हाला ती मारायला धावून येत असे. तिची हि स्थिती आम्हाला बघवत नसे. तिच्या हातून तर अक्षम्य गुन्हा घडला होता. त्याला आम्ही काहीच करू शकत नव्हतो. तिला एक मानसिक समाधान मिळावे म्हणून आम्ही सर्व तिला बघायला जात होतो. एकंदरीत रूपाची स्थिती खूपच दयनीय झालेली होती. आपण नेहमी सुंदर दिसण्यासाठी आपल्या अहंकारात तिने आपले जीवन मातीमोल केले होते. आपल्याच हाताने तिने आपल्या पायावर कुर्हाड मारली होती.
दिवसा मागून दिवस आणि वर्षा मागून वर्ष गेली. मी रुपेशला सावरत सावरत आम्ही दोघांनी वकिलाची डिग्री प्राप्त करून एक नामांकित वकील म्हणून यशस्वी जीवन जगत होतो.
" आणि आणि आज मी ऐकते कि नामांकित वकील रुपेश यांनी तुरुंगात आपल्या डाव्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हे वाचताच मी शाळा-कॉलेजच्या आठवणीतून भानावर आले. परंतु त्या आठवणीने माझे अंग घामाने पूर्णपणे भिजून गेले होते. कपाळावरील घाम पुसून मी त्याच थरथरत्या हाताने वर्तमानपत्र नीट पकडून पुढील मजकूर वाचू लागले.
नामांकित वकील रुपेश यांनी काही दिवसापूर्वी वकील या नात्याने आरोपी रूपा यांच्याशी चौकशी या संदर्भात तिच्या तुरुंगात जाऊन तिच्या चेहऱ्यावर खिडकीच्या तावदानाच्या काचेने वार करून तिला जखमी केले. असा रुपेश यांच्यावर आरोप करण्यात आला होता. त्या आरोपा खाली त्यांना तुरुंगात ठेवले गेले होते.त्यावेळी त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याने त्यांनी आपली नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रखवालदार पोलीस यांनी आपल्या सावधतेने लगेच पोलीस अधिकारी यांना बोलावून रुपेश यांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले गेले. त्यांच्यावर उपचार चालू आहेत तरीसुद्धा त्यांची तब्येत चिंताजनक आहे.
वर्तमानपत्रातील मजकूर वाचून माझे मन विषण्ण झाले. मी लगेच ताडकन उठून रुपेशला बघायला हॉस्पिटल मध्ये गेले. एक एक मी काय ऐकते---? रूपा हॉस्पिटल मध्ये पुन्हा ऍडमिट झाली होती आणि आता रुपेश हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे. माझे पाय थरथर कापत होते. मी चौकशी करून रुपेशच्या वॊर्डमध्ये गेले. रुपेशला ग्लुकोज लावले होते. हाताला बँडेज बांधलेले होते. रुपेश शांतपणे डोळे बंद करून पडून राहिला होता. मी जाताच रुपेशने डोळे उघडले आणि माझ्या कडे बघून काहीसे हसल्यासारखे केले.
" रुपेश, हे तू काय केलेस---? तुझ्याकडून हि अपेक्षा नव्हती. तू तुझी केस माझ्या हातात दिली होती नं---? मग हा विचार कसा काय तुझ्या मनात आला---? "
" स्मिता, मी रुपाला मारले नाही---मी तिला भेटायला गेलो होतो हे खरं आहे. कारण म्हणजे मी आज दहा वर्ष झाली तरी स्मिताला विसरू शकत नव्हतो. तिच्या आठवणीने आतून माझे मन पोखरून जात होते. वरून मी कितीही चांगला दिसत असलो तर आतून मी अजूनही सावरलो गेलो नाही. शिवाय माझा शाळेत रूपाने मुख्याध्यापकडून माझ्या थोबाडीत मारून माझा केलेला अपमान हा हि मी विसरू शकत नव्हतो. विसरण्याचा प्रयत्न करूनही माझे मन बेचैन होत असे. मला माझा रुपावरील सूड घेण्याची संधीच मिळत नव्हती. शेवटी विचार करून मी रूपाच्या तुरुंगात जाऊन तिला मी सर्व ऐकवून माझे मन शांत करण्याचा प्रयत्न करत होतो.तिला मी चांगलेच ऐकवले कि " रूपा, तू माझ्या स्मिताला का मारलेस---? तुला नेहमी सुंदर दिसावं म्हणून सर्व सुंदर मुलींना घायाळ केलेस---आणि माझ्या स्मिताला तर यमसदनाला पोचवलेस----किती तू क्रूर आहेस---? सुंदर मुलींचे चेहरे विद्रुप करून तू शेवटी काय मिळवलेस---? स्मिता आणि माझ्या मध्ये तू काटा बनून आलीस---आज मी स्मिताच्या आठवणीत तडफडत आहे. मी तुला सुद्धा शांतीने जगू देणार नाही---तुझे लहान वय म्हणून तुझी जन्मठेपेची शिक्षा कमी झाली असली तरी तू जेव्हा सुटून जाशील तरी आता तू सुंदर होणार नाही. तुझ्या तोंडावर आता खुनाचा मोठा डाग लागला आहे. तो डाग घेऊन तुला आता जगायचे आहे. तुझ्या कर्माची फळं आता तुला एकटीला भोगायची आहेत. भोग भोग आणि एक दिवस तडफडून तडफडून मारून जा---तुला जगण्याचा काहीही हक्क नाही---" रूपा चुपचाप पणे माझे बोलणं ऐकत होती .तिच्या चेहऱ्यावरील भावही हेच सांगत होते कि तिला जगण्याचा कोणताही हक्क नाही. मी खुनी आहे. नेहमी सुंदर दिसण्यासाठी मी अनेकांची हत्या केली. त्यांना विद्रुप केले. इथून सुटल्यावर मी कुठे जाऊ---? कोणत्या तोंडाने लोकांच्या समोर जाऊ---? माझी आई तरी माझा स्वीकार करेल कां---? आज तिने सुद्धा मला तोंड दाखवले नाही. तर रुपेश जे बोलतं आहे ते काय चुकीचे आहे---? आणि अचानक ती उठली आणि तुरंगाच्या खिडकीची काच काढून आपल्या चेहऱ्यावर सपासप वार करू लागली. हे बघून मला एक प्रकारचा आनंद होत होता. तिचा तो रक्ताळलेला विद्रुप चेहरा बघून मला स्मिताचा चेहरा आठवला. स्मिताला रूपाने अशा पद्धतीनेच मारले होते. त्या गोष्टीचा सूड घेतल्याचा मला आनंद आणि शांती मिळत होती. परंतु मी रुपाला मारले नव्हते. तर रूपानेच नेहमी सुंदर दिसण्यासाठी अनेकांची हत्या केली होती आणि शेवटी काय---? स्वतःच्या हाताने स्वतःचा बळी घेतला. स्वतःच्या हाताने स्वतःची हत्या केली. रक्ताच्या चिळकांड्या तुरंगाच्या भिंतीवर रंगल्या होत्या. रूपाचे हात पुन्हा रक्तकांड प्रमाणे रक्ताने रंगले गेले होते. तिचा तो चेहरा पुन्हा एखाद्या हैवाना प्रमाणे झाला होता. त्याच रूपात ती हसत होती, रडत होती. शेवटी थोड्या वेळात ती बेशुद्ध पडली. परंतु मी तिला जखमी केले या आरोपाखाली मला पोलिसांनी अटक केली. परंतु रूपाची हत्या करण्याचे पाप मी माझ्या हाताला करू दिले नाही. त्यावेळी मी शपथ घेतली होती कि स्मिताला जिने मारले तिला मी सोडणार नाही. त्याचा मी बदला जरूर घेईन---परंतु माझी स्मिता माझ्या पाठीशी आहे. तिनेच हे पाप कृत्य मला करू दिले नाही. परंतु तिच्या विना मी अधुरा आहे वंदना---पोलिसांनी मला अटक केली या गोष्टीची मला खंत वाटत नाही वंदना---परंतु आता मी जगून तरी काय करू---? माझी स्मिता मला सोडून गेली. त्यावेळी जर वैशालीच्या जागी स्मिताचे नाव मी दिले नसते तर आज माझी स्मिता माझ्या जवळ असती. असे वाटते कि तिच्या मृत्यूला मी जबाबदार आहे. या गोष्टीचीच मला खंत वाटते. आज मी मेलो तर पुढच्या जन्मी तरी मला स्मिता मिळू शकेल. " वंदना, तू मला खूप मानसिक आधार दिला---म्हणून मी आजवर टिकून राहिलो. तुझे मी धन्यवाद करतो. तुझा मी ऋणी आहे वंदना---" परंतु आता हे विरहाचे ओझं उचलू शकत नाही. आता डॉक्टरांनी मला कितीही प्रयास करून बरे केले तरी मी काही दिवसांचा सोबती आहे. कारण मी मनाने कधीच मरून गेलो आहे. आहे ते फक्त एक चालतं बोलतं निर्जीव शरीर आहे---" रुपेश उदासपणे आपलं मन माझ्याकडे मोकळं करत होता. परंतु मला काय बोलावं काहीच समजत नव्हते. एवढ्या वेळ रुपेश नुसता बोलतं होता आणि मी ऐकत होते.
रुपेशने नस कापून घेतल्या मुळे बराच रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे तो खूपच अशक्त झाला होता. अचानक बोलता बोलता रुपेशला धाप लागायला लागली. मी लगेच सिस्टरला बोलावले. सिस्टरने डॉक्टरना फोन केला. डॉक्टर आले आणि रुपेशला एक इंजेक्शन दिले. हळू हळू रुपेशची श्वासाची गती शांत होऊ लागली होती. बघता बघता रुपेशने जोरात श्वास घेऊन माझ्याकडे बघत मान टाकली.
तिथून मी रुपेशच्या घरी जाण्यासाठी निघाले. लिफ्ट मधून बाहेर निघाले तोच एक शव स्टेचरवरून पांढऱ्या कपड्याने झाकलेले घेऊन जाताना दिसले. त्याच्याबरोबर एक बाई होती. मी जवळ जाताच बघते तर ती रूपाची आई होती. रूपाच्या काळजीने मनाने ती पूर्णपणे कोलमडली होती. शरीराने सुद्धा अगदी कृश झालेली होती. तिला मी ओळखलेच नव्हते. जेव्हा तिने मला बघितले तेव्हा मला मिठी मारून रडू लागली होती. " वंदना, एकुलती एक माझ्या रूपाची काय अवस्था झाली बघ---आपल्या सौंदर्याच्या अहंकारात स्वतःला एकटे करून घेतले.आज मानसिक विकृतीने तिने स्वतःला संपवून टाकले. आज तिच्या प्रेताला सुद्धा कोणी आले नाही---" असे म्हणून ती रूपाच्या प्रेताबरोबर स्ट्रेचरला हात पकडून चालू लागली. मला सुद्धा राहवले नाही. कशीही असली तरी ती माझी मैत्रीण होती. मुनिसिपाल्टीच्या लोकांनी तिचे शव दहन केले. रूपाच्या आत्माला शांती मिळो---अशी प्रार्थना करून मी घरी आले.
मी घरी येऊन आंघोळ केली आणि बराच थकवा आल्याने मी सोफ्यावर बसून राहिले. मनातील चाललेले दंदव शांत झाले होते. रुपेशने जेव्हा आपली केस माझ्या हातात दिली होती तेव्हा मी खूपच संभ्रमात पडले होते. परंतु आता सर्वकाही संपले होते.त्या रक्तकांड घटनेचा शेवट दहा वर्षांनी झाला होता. अहंकार आणि सूड या दोन्ही गोष्टी माणसाच्या मानसिक विकृतीला जन्म देतात आणि त्याचा शेवट कोणत्या थराला जाईल हे समजणे त्या व्यक्तीला कठीण होऊन जाते. त्याची बुद्धी एकदम भ्रमिष्ट होऊन जाते. त्यातूनच त्याला एका भयानक सत्याला सामोरी जाण्याची वेळ येते---" मी निश्वास सोडून टेबलवरची रुपेशच्या केसची फाईल बंद करून ठेवून दिली. खरंच, त्या दहा वर्षांपूर्वीच्या " रक्तकांड " चा शेवट आज झाला होता. रूपाच्या सौंदर्याच्या अहंकाराचा आणि रुपेशच्या सूडभावनेचा अंत असा होऊन दोघेही या थराला जातील या गोष्टीची मी कल्पनाच करू शकत नव्हते. आजही आठवते ते " रक्तकांडचे " भयानक सत्य----आणि मनाचा थरकाप होऊ लागतो----"