Bayko majhi premachi - 3 - last part in Marathi Love Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | बायको माझी प्रेमाची! - 3 - अंतिम भाग

Featured Books
Categories
Share

बायको माझी प्रेमाची! - 3 - अंतिम भाग

३)

आपुले मरण आपणच पहावे याप्रमाणे मी जणू निर्जिवास्थेत स्वयंपाकघरात पोहचलो, भाजी आहे का नाही हे पहावे म्हणून फ्रीज उघडले आणि पाहतो तर काय फ्रीजमध्ये सारा स्वयंपाक जणू माझीच वाट पाहत होता. मी एक-एक भांडे बाहेर काढून उघडत गेलो, संपूर्ण स्वयंपाक तयार होता, अगदी स्पेशल स्वीट डिश तीही माझ्या आवडीची...बासुंदी! मला आश्चर्याचा धक्का बसला. हा काय प्रकार? देव पावला काय? शीलाच्या भक्तीचा तर हा प्रसाद नव्हे? मी देवाकडे पाहात हात जोडले आणि त्याच हाताने का कोण जाणे मोबाईल उचलला. पुन्हा शीलाचा नंबर डायल केला.

"अहो, हे काय? एक दिवस तर सुखाने झोपू द्या."

"म्हणजे तू चक्क झोपलीस?"

"मग? अहो, तुम्हाला काय सांगू? सुधीरची बेडरूम एवढी प्रशस्त, मोकळी, हवेशीर, एकांत आणि सुंदर..."

"म-म-त-त-तू सुधीरच्या बेडरूममध्ये..."

"हो. सुधीरच्या बेडरूममध्ये आणि-आणि....."

"अ-अ-आणि काय?"

"सुधीरच्याच बेडवर झोपलीय. व्वा! काय मज्जा येतेय म्हण सांगू....झोपायची ...स्वर्गसुखच हो.."

"आणि सुधीर.. "

"तो...तो... आहे ना इथेच... म्हणजे आमची जेवणे झाली आणि सुधीर म्हणाला..."

"काय ? काय?..."

"बेडवर जावून झोप..."

"अग पण सुधीर कुठाय?"

"तो आहे ना इथेच... म्हणजे तो आता जेवण झाल्यावर सगळी भांडी आवरणार, खरकटे सावरणार, उरलेल्या अन्नाची विल्हेवाट लावणार गॅसचा ओटा धुऊन भांडी घासणार, भांडी घरात आणून आवरून ठेवणार..."

"काऽय? एवढी कामे सुधीर करतोय?" .

"हो, रोजच करतो. तो सरोजच्या कस्टडीमध्ये आहे म्हटलं. सकाळपासून राबराब राबतो हो बिच्चारा. सरी खरेच भाग्यवान हो. अहो, सकाळी अंगण झाडणे, सडा टाकणे, रांगोळी काढणे, खोल्या आवरून झाडणे, अंथरूण काढून पाणी भरणे... घरातील एकूण एक कामे सुधीरच करतो. शिवाय  'हे कर. ते असे कर..' असे सांगण्याची सरीला गरजही पडत नाही. सारे कसे जिथल्या तिथे शिवाय व्यवस्थित, आटोपशीर, आवाज न करता, न कुरकुरता शांतपणे करीत राहतो. खरच असा सद्गुणी, कामसू....."

"कामसू ?"

"अहो, काय हा सवत्यामत्सर, सतत कामे करणारा या अर्थाने कामसू नवरा मिळण्यास भाग्य लागते हो. सरोजला इकडचा तांब्या तिकडे ठेवायची गरज नाही की सवय नाही. तिला सगळं कसं 'दे रे सुधीर, हातावरी नि पलंगावर' असं मिळते बघा मला की नाही वाटते..."

"क-क-काय....."

"सुधीरसारखा पती सात जन्म मिळावा. का रे या वर्षी वटसावित्री पौर्णिमा कधी आहे रे ?"

"का ग?"

"अरे, यावर्षी पुजेला पुढल्या सातोजन्मी सुधीरच पती मिळावा अशी प्रार्थना आणि व्रत करावे म्हणते. बरे, तू फोन का केलास? झालं का जेवण?स्वयंपाक तुलाच करावा लागला असेल? चू-चू-चू! काय तुझ्यावर वेळ आलीय. पाणी पिलेला प्याला कधी जाग्यावर आणून ठेवला नाहीस की कधी प्याल्यातले उरलेले पाणी बसल्या जागेवरून खिडकी बाहेर टाकले नाहीस आणि तुझ्यावर अशी घरातली सारी कामे करण्याची वेळ यावी?"

"ते जाऊ दे ग. अजून स्वयंपाकाला सुरवात नाही. त्या सरोजदेवी स्नानाला गेल्या आहेत. त्या येईपर्यंत स्वयंपाक करायचा आहे."

"एवढ्या फास्ट तू स्वयंपाक करणार ? द्रौपदीची थाळी मिळवलीस की काय?"

"थाळी नाही ग पण कदाचित त्या थाळीत द्रौपदी आणि अन्नपूर्णेच्या रुपातील माझ्या शीलाने..."

"अग आई, त्या स्वयंपाकावर तुझी नजर गेली तर?'"

"म्हणजे माझा अंदाज खरा ठरला. तो स्वयंपाक तू करून ठेवलास ना?"

"मग काय त्या सरोज नावाच्या भुतणीने केलाय? अरे, ती एक दिवसाची बायको असेल पण मला तुझ्याबरोबर अख्खा जन्म काढायचा आहे. मला माहिती नाही का, तुला आजच काय पण या जन्मातही स्वयंपाक जमणार नाही ते. म्हणून रात्री दोन वाजताच उठून स्वयंपाक करूनच मग प्रस्थान केलेय..." ती सांगत असतानाच सरोजचा आवाज आला,

"ये...अरे, ऐ...झाला का स्वयंपाक? पोटात भुकेने कावळा नाही. अरे, हत्ती ओरडतोय..." मोबाईल चालू असल्यामुळे ते वाक्य तिकडे शीलानेही ऐकले तशी ती म्हणाली,

"अरे, खरे आहे रे तिचे. ती स्वतः हत्तीण असल्यामुळे हत्तीशिवाय तिच्या पोटात जाऊन ओरडायची दुसरी कुणाची हिंमत असणार? जा बघ बाबा, तिचे पोट..."

"काय म्हणालीस? तिचे पोट बघू? वा! गुड...."

"ये-ये-अहो-अहो...." तिकडून ती आवाज देत असताना मी मोबाईल बंद केला. झटपट ताट तयार केले. बैठकीत घेऊन आलो. सुस्नान सरोजकडे मी भान हरपून पाहात राहिलो. सकाळपासून... अगदी बेडवर हाताच्या अंतरावर असलेले सरोजचे सौंदर्य न्याहाळण्याची संधी मिळूनही माझी हिंमत झाली नव्हती. सरोजचे शरीर थोडेसे सुटले असले तरी त्यामुळे त्या सौंदर्याला वेगळीच झळाळी प्राप्त झाली होती. मला स्वतःकडे असे निरखून बघताना सरोज लाजून म्हणाली,

"हे रे काय? नको ना गडे! तू असं पाहतोस ना शरीरात कसनुस होतेय रे. सुध्याची नजर अशी लालसेने भरलेली वाटतच नाही. सदैव त्याच्या डोळ्यामध्ये भीतीच रे. आम्हा बायकांना की नाही अशी नजर...परपुरूषाची का असेना मनापासून आवडते आणि तू तर माझा आजच्या दिवसाचा नवराच आहेस. ए, असं नको रे पाहू. नसता घोळ होईल रे. ये-ये-ना."

"काय?" मी आश्चर्याने विचारले.  जणू रती-रंभाच्या तोडीसतोड सौंदर्याचा खजाना सापडल्यागत हर्षोनंदात मी तिच्या दिशेने निघालो.

"उगाच सूत पकडून स्वर्गात शिरण्याचा प्रयत्न करू नका. स्वर्ग फार दूर आहे. एवढ्या सहजासहजी तो कुणालाच प्राप्त होत नाही. ठेव ते ताट तिथे. मेली पुरूषाची जात वाईटच. जरा कुठे संधी मिळण्याची अंधुकशीही आशा दिसली ना, की तुमची लाळ टपकणारच..." ती तशी कडाडत असताना मुकाटपणे ताट ठेवून पाणी आणायला आत गेलो.

काही क्षणात तांब्या-प्याला घेवून मी बाहेर येवून पाहतो तर सरोज अन्नावर तुटून पडली होती. हे खाऊ का ते खाऊ अशी तिची बकासुरासम अवस्था झाली होती. ती अक्षरशः सिनेमात दाखवितात त्याप्रमाणे तोंडामध्ये घासामागे घास कोंबत होती. तशा राक्षसी प्रकारामुळे तिला नक्कीच ठसका लागेल या भीतीने मी पटकन तांब्या-प्याला तिच्यासमोर ठेवला. त्या स्थितीमध्ये ठसका लागण्याची पुरेपुर शक्यता असतानाही सरोज म्हणाली,

"व्वा! मज्जा आली! लै भारी! आमच्या त्या गधड्या सुध्यास सांगावेच लागेल तुझ्या हातचा नंबर वन स्वयंपाक! सुधीरचा स्वयंपाक म्हणजे कधी सपकसार, कधी अळणी आणि सदा शरीरातल्या कणा कणातून पाणी निघेल असा तिखट आग. कधी कधी अर्धवट शिजलेले, कधी कडक... अरे बाप रे ! विचारूच नको स्वयंपाकाचे प्रकार ! शिवाय वर शेखी मिरवायला मोकळा, की मी किती सुंदर, चविष्ट, स्वयंपाक करतो म्हणून! त्याला एकदा तुझा स्वयंपाक खाऊ घालावाच लागेल, नाही तर असं करू या का हे एकदिवसीय नाते, जन्मोजन्मीच्या नात्यामध्ये ट्रान्सफर करू या का? नाही तरी त्या शीलामध्ये आहे काय? रस काढलेला ऊस म्हणजे ते चिपाड तरी हिच्यापेक्षा अधिक रसरशीत दिसते. मी बघ बरे...व्वा! व्वा! ये...अरे, अजून आहे का रे शिल्लक. आण ना रे..." ती म्हणाली तसा मी सुधीरच्या आज्ञाधारक वृत्तीप्रमाणे आत जाऊन एक-एक भांडे आणून तिच्या ताटामध्ये रिचवीत गेलो. ते ती सारे फस्त करीत गेली. आनंदाने, मिटक्या मारीत , ताट-वाटी-चमचे, पण रिकामी भांडीसुध्दा घासूनपुसून चक्क करताना ती बोटे ही चाटत होती. एवढेच काय पण माझे लक्ष नाही असे समजून सोफ्याच्या चादरीवर पडलेले कण, बासुंदीचे थेंबही बोटाने तोंडात घेत होती. शेवटी एक आसुरी ढेकर देत, ताटातच हात धुऊन दंडावरच्या ब्लाऊजने चेहरा साफ करीत सोफ्यावर आडवी होत म्हणाली,

"व्वा! झकास! भन्नाट! जन्मात असे जेवण पहिल्यांदाच मिळाले. खुश रहो। सलामत रहो। मी जरा इथेच पडते. तू एवढे मस्त जेऊ घातलेस ना, की उठून बेडवर जाणे शक्यच नाही. शिवाय बेडवर जाईपर्यंत झोप निघून जाईल. तुला म्हटले तर तू आनंदाने, एका पायावर मला उचलून तिथे न्यायला तयार होशील. तू तर अशा गोल्डन संधीची आणि माझ्या इशाऱ्याचीच वाट पाहत असशील. पण माझा हा सुंदर, सुकोमल, नाजूक देह तुला सांभाळता आला नाही आणि झोक जाऊन आपण पडलो तर... त्यातही मी खाली... तू वर अशा परिस्थितीत आपण पडलो तर तुला स्वर्गात शिरण्याची किल्लीच मिळेल किंवा उगीच हातपाय मोडला तर त्यापेक्षा इथेच ताणून देते आणि हो लक्षात मला बरोबर चारच्या ठोक्याला चहा लागतो..."

"एवढे भरपेट जेवूनही.."

"हो. लागतो.घोरून घोरून भूक लागते. तेव्हा चहा सोबत बिस्किट तयार ठेवून बरोबर चार वाजता मला ऊठव. दोन-चार-दहा आवाज दे नाही तर एका आवाजात ऊठले नाही म्हणून लगेच अंगचटीला येशील. ऊठवायचे नाटक करून इथे-तिथे-नको तिथे हात लावशील. तेंव्हा आता तू जेवून घे. सगळं आवर. मोलकरीण नाहीच म्हणून सारे स्वच्छ करून, भांडी धुऊन, आवरून ठेव. माझ्या सुध्याचा या कामात हातखंडा आहे. वाटल्यास तू त्याच्याकडून शिकून घे... " म्हणत सरोजने डोळे लावले आणि दुसऱ्याच क्षणी ती चक्क घोरू लागली. मी तिथेच खुर्चीवर टेकलो. बऱ्याच दिवसांनी पोटात असलेल्या कावळ्यांना संधी मिळाली होती ते त्याचा पुरेपुर वापर करीत असताना माझे डोके जडावले. खुर्चीच्या काठावर डोके टेकवून डोळे  मिटले...

सरोजच्या घोरण्याने मी जागा झालो. भुकेपोटी गाढ झोप लागली होती. डोळे चोळत इकडे तिकडे पाहत असताना सोफ्यावर अस्ताव्यस्त घोरत पडलेल्या सरोजचे मुर्तीमंत सौंदर्य न्याहाळताना घडयाळाने पाच ठोके दिले आणि माझ्या हृदयाचे ठोके चुकले. बाप रे! चारचा चहा मिळाला नाही म्हणून हे सौंदर्य कायमचे गळ्यात पडले तर! दुसऱ्याच क्षणी एक विचार मनात शिरला. एका तिरमिरीत मी उठलो आणि शेजारच्या स्टुलावर चढून भिंतीवरील घड्याळ काढले. त्यात पावणेचार वाजविले. लगोलग स्वयंपाकघरात गेलो. चहा केला कपबशी, पाणी घेवून दिवणाखान्यात गेलो. तिथे सरोजच्या घोरण्याने कहर केला होता. हातातला ट्रे टी-पॉयवर ठेवून हलकेच सरोजजवळ गेलो. काही क्षण त्या सौंदर्याचे रसपान करीत असताना देहभान विसरलो. पण घड्याळात पुन्हा चार ठोके पडले. विजयी उन्मादात मी सरोजजवळ जाऊन कानाजवळ हलकेच आवाज दिला. तो ऐकून सरोजची झोप चाळवली. ती झोपेत म्हणाली,

"हे सुध्या....ये सुध्धू हे रे काय? झोपू दे ना थोडे. ए, असे कर न ये ना तू ही..."

"अहो, अग.....सरोज...." म्हणत मी तिच्या चेहऱ्याजवळ चेहरा नेऊन तिच्या खांद्यावर हात ठेवताच ती ओरडली,

"हे-हे हेच पाहावयाचे होते मला, तुझ्यातली हिंमत. जरा त्या सुध्याचे नाव घेवून लाडे लाडे बोलण्याचे नाटक केले तर लगेच पाघळलास! मेणबत्तीसारखा विरघळून निघालास पुढचं पाऊल टाकायला? तुला काय वाटले रे, मी कुणाही, ऐऱ्यागैऱ्याच्या गळ्यात पडेल? लाज नाही वाटली तुला स्पर्श करताना? म्हणे एक दिवसाचा नवरा. माझ्या लेखी तो फक्त नोकरच! नवऱ्याला यापेक्षा अधिक किंमत नाही देवू शकत मी. तुझी- कपाळावर तुझी टिकली लावणारी, गळ्यात तुझ्या नावाने मंगळसुत्र घालणारी... ती तुझी परमनंट बायकोचा जॉब करणारी शीला तुझ्या चारित्र्याचे, संयमाचे आणि एक पत्नीत्वाचे केवढे गोडवे गात होती. हाच तुझ्यावरचा तिचा विश्वास? सारे पुरूष एकाच माळेचे मणी! आण ते पाणी आणि तो चहा."

मी दिलेले पाणी-चहा पिऊन सरोजने माझ्या समोरच असा काही उन्मादक आळस दिला की मला तर विजेचा महत्तम झटका बसल्यागत झाले. मी आत जाऊन माझा चहाचा कप उचलणार तितक्यात पुन्हा बायकोचा फोन आला.

मी तो ऑन करताच तिकडून पुरूषी आवाज आला,

"हॅलो, कसं चाललय? अरे, मी सुधीर बोलतोय, तुझा आजच्या दिवसापुरता असलेला सवत्या, का रे तुझ्या त्या टेंपररी बायकोने...सरोजने तुला जास्त थकविले नाही ना? कशाबद्दल म्हणजे काय? अरे, स्त्री- पुरूष थकतात कशामुळे? कसे आहे, दिवसभर खाणे-पिणे-झोपणे यामुळे तिची भूक प्रचंड आहे. पण तू मात्रभारी लक्की आहेस हं. शीला म्हणजे ना एकदम... शब्दच नाहीत रे. जबरदस्त रिस्पॉन्स देतेय. काहीही म्हटलं, की एका सेकंदात रेडी! 'नाही' हा शब्द तिच्या डिक्शनरीतच नाही. शीला कुठाय म्हणतोस? अरे, ती ना बेडरूममध्ये आहे. मी आत्ताच बैठकीत आलोय. ती चेंज करतीय. आली बघ बाहेर. ए, तुला सांगतो, येताना किती सुंदर दिसतेय. बोल तिच्याशी..." म्हणत मला चकार शब्द न काढू देता त्याने मोबाईल शीलाजवळ देताच ती म्हणाली.

"काय मग? झाला का चहा? "

"हा काय आत्ता घेतोय."

"साडेपाच वाजता? अरे, तिला तर चारलाच चहा लागतो मग एवढा तिला दम निघालाच कसा?"

"ती की नाही गम्मतच झाली बघ..."

"का? काय झाले?" विचारताना फोनवरील तिचा कंपायमान आणि शंकाग्रस्त झालेला आवाज मी ओळखला.

"आम्ही नाही सांगणार जा?"

"असे लाडेलाडे करू नका. असे काय केले त्या भवानीने? आणि ती कुठाय?"

"ती ना फ्रेश होतेय."

"चार वाजल्यापासून एवढा वेळ काय केले? चहाला उशीर का झाला?" शीलाने विचारले.

"अग, आम्ही की नाही... आम्ही ना..."

"चेष्टा पुरे झाली. काय घडले ते स्पष्ट सांगा..'

"आ...आम्ही झोपलो होतो..."

"काय? कोण-कोण ?" विचारणाऱ्या शीलाचा रडवेला आवाज ऐकून मज्जा आली.

"कोण म्हणजे? आणखी कोण?"

"लाज नाही वाटत? लग्नाची बायको असताना..."

"काय करणार जानेमन? प्रत्यक्ष सात फेरे घेतलेली बायको स्वतः होऊन एखाद्या सौंदर्यसम्राज्ञीला माझ्या बेडरूममध्ये पाठवत असेल आणि..."

"आणि काय?"

"आपण स्वतः परक्याच्या बेडरूममधील पलंगावर झोपत असेल तर?"

"अहो..अहो..."

"पण तू दिलेले गिफ्ट जबरदस्त हं. मज्जा आली. बऱ्याच वर्षापासून 'असा'  चेंज व्हावा अशी जबरदस्त इच्छा होती पण स्वप्नातही वाटले नव्हते की, बायकोच्या पुढाकारातून पूर्ण..."

"असे काय ? कुठाय ती सटवी ?"

"कोण? सरोज ? तिला सटवी का म्हणतेस ? लवली."

"असे काय ? कुठे आहे ती ? तिला फोन तर दे. आमच्यामध्ये झालेला करार तिने  मोडला काय? फक्त सोबत राहणे एवढेच ठरले होते, तशी प्रतिज्ञा केली होती."

"तिला फोन देतो. जरा थांब. ती चेंज करतेय. अग...अग...सरोज, ए सरे..." मी उगीच हलक्या आवाजात केवळ शीलालाच ऐकू जाईल अशा स्वरात म्हणालो. तसा लगेच तिचा आवाज आला, "अहो, ती कपडे बदलतेय ना? मग तुम्ही तिकडे निघालात?"

"मग काय झाले? आता काय हरकत आहे? ती कपडे बदलत असेल तर काय झाले?"

"असे म्हणायला लाज नाही वाटत ?" शीला बोलत असताना मी हलकेच बैठकीत आलो. तसं मला पाहताच सरोज म्हणाली.

"येते बरे. दिवस मजेत गेला. तुझा सहवास खरेच छान होता. काळजी नको. मी काही जन्मोजन्मीसाठी तुला वरणार नाही. अरे, अशा गोष्टी अधूनमधून ठीक असतात...जस्ट चेंज म्हणून! त्यामुळे जीवनात एक चैतन्य येते. उत्साह कायम टिकून राहतो. ठीक आहे. पुन्हा असेच भेटू... लवकर. मला निघावेच लागेल..."

"का ग ?"

"अरे, आमचा सुध्या ना, दिसतो बावळट पण आहे, महाचालू! बाई हा खास वीक पॉईंट! काही घोळ घालू नये त्याने. आजकालच्या बायकाही... त्यात तुझी बायको दिसते भोळी. पण...अच्छा...बाय!" असे म्हणत निघून गेली. तशी तिकडून शीला मोबाईलवरच कडाडली,

"असे आहे का? ती टवळी स्वतः मजा मारून निघालीय आणि माझ्यावरच संशय घेते काय? तू...तू...तुम्ही तिला थांबव. मी लगेच घरी येवून तिला चांगलाच इंगा दाखवते..."

"अग...अग...थांब...माझे ऐक..." असे म्हणत मी पलंगावरून धाडकन खाली पडलो. कोमल हातांनी मला सावरून कुणी तरी पलंगावर बसवले. ते हात माझ्या सुस्नान, कर्तव्यदक्ष पत्नीचे... नाही हो. एक दिवसीय नाही तर साता-जन्माच्या पत्नीचे... शीलाचे होते ते पाहून मी हलकेच म्हणालो,

'बायको माझी प्रेमाची!'

००००

नागेश सू. शेवाळकर,

११०, वर्धमान वाटिका, फेज ०१

क्रांतिवीरनगर लेन ०२,

जयमल्हार हॉटेल परिसर,

थेरगाव, पुणे ४११०३३

(९४२३१३९०७१)