२)
'चला एक युध्द तर जिंकले. फराळाची व्यवस्था झाली.' असे मी मनाशीच बोलत असताना माझ्या एक दिवसीय बायकोचे म्हणजे सरोजचे आगमन झाले. तिला पाहताच मला एकदम शिसारीच आल्यागत झाले. कारण ती ब्रश करीत आली होती. तिच्या ओठांच्या दोन्ही कडांमधून पेस्टचा फेस पाण्यासारख्या वाहत होता. शीला केव्हा ब्रश करायची, स्नान करायची हे मला कधी समजलेच नाही कारण त्यावेळी मी कुंभकर्णी झोपेत असे. शीलाला स्नान करतानाच्या किंवा ओलेत्या अवस्थेत पाहण्याची इच्छा मनात असूनही तो योग कधीच आला नाही. इकडे सरोज त्याच अवस्थेत फतकल मारून सोफ्यावर बसून विचारत होती,
"ये-ये-च-च-हा--फ-रा-ल....." तितक्यात तिच्या तोंडातली खूपशी घाण गाऊनवर पडली. हाताने ती घाण साफ करीत ती बाथरूमकडे गेली आणि इकडे दारावरील घंटी वाजली. मी दार उघडले. दार उघडताच वेटर म्हणाला,
"साहेब, हा नाश्ता. दुपारी जेवण लागेल का?"
"काय प्रकार आहे? हॉटेलचा नाश्ता मुळीच चालणार नाही. ए, पोरा घेवून जा ते." सरोज कडाडली. तिचा तो अवतार पाहून पोरगा निघून जाताच सरोज म्हणाली,
"हा काय भिकारडेपणा. मला सकाळी सकाळी नवऱ्याच्या हातचा फराळ लागतो. असे कर, आधी चहा कर, मग कांद्याची भजी करा."
"काय? कांद्याची भजी? बापजन्मात केली नाहीत."
"मग आता कर ना. आणि ओरडू नकोस हं.चेंज हवाय ना? घ्या आता चेंज! बायको बदलली म्हणजे सारेच बदलणार, तिच्या आवडी निवडीसह! तुम्हा नवऱ्यांना बायको कम मोलकरीन हवी असते त्यातही मोलकरनीचा रोल जास्त हवासा वाटतो. नाही का? पहात काय बसलात? चहा आणा..." सरोज म्हणाली तसे मी आज्ञाधारकपणे स्वयंपाकघर गाठले. मी अर्धवट घेतलेला चहाच पुन्हा गरम करून सरोजपुढे आणून ठेवला. मनात भीती होती की तो तसा चहा घेऊन सरोज काय गोंधळ घालेल? तिच्या गोंधळाचे प्रकार मला कुठे माहिती होते. ते माहिती असते तर कदाचित प्रतिकाराची तयारी करता आली असती. हे सारे त्या सुधीरला माहिती असणार.
"पाणी कोण आणणार?" सरोज कडाडत असताना मी स्वयंपाकघर गाठले. पाण्याचा ग्लास घेऊन आलो. त्यातला एकच घोट घेऊन तिने प्याला बाजूला ठेवला. पाण्याच्या केवळ एका घोटासाठी हिने अशी बायकोगिरी करावी? माझ्यासारख्या तात्पुरत्या नवऱ्यावर ही असा हल्ला करते तर त्या बिचाऱ्या कायमच्या म्हणजे लग्नाच्या नवऱ्याची काय अवस्था असेल? या कल्पनेनेच माझ्या पोटामध्ये भीतीचा गोळा उठला. मी माझ्या लग्नाच्या बायकोला त्या क्षणापर्यंत कधी पाण्याचा ग्लास तर सोडा पण घोटभर पाणी दिले नव्हते. त्या साध्वीनेही माझ्याकडून कधी तशी अपेक्षा केली नव्हती. सरोजने चहाचा कप उचलल्याचे पाहून माझ्या हातापायात कापरे भरले. चहाचा 'सुर्रकन' घोट तिने घेतला. लगेच माझ्याकडे पाहिले. मी नजरानजर टाळली. काय होणार? कसे होणार? काय घडणार? चहा तर बिघडलाच आहे त्यामुळे या बयेचा मूड बिघडून ही काय आकांडतांडव करणार? असे विचार माझ्या मनात घोळत असताना सरोजचा मंजूळ स्वर कानात शिरला. त्या आवाजाने गुदगुदल्या होत असताना ती म्हणाली,
"वा! चांगला केलास चहा. आमच्या सुध्याला...सुधीरला सांगावे लागेल. नाही तर त्याला तुझ्याकडे चहाच्या प्रशिक्षणासाठीच पाठवते. व्वा! मस्त रे मस्त! सकाळी-सकाळी असा फक्कड चहा मिळाला न मग दिवसभर चहाची गरजच भासत नाही. अरे, असा पाहत काय राहिलास? जा. फराळाचे बघ."
"फराळ ?"
"काय झालं? एकदम उसळलास का?फराळ तू नाही तर कोण तुझी सख्खी बायको शीला करणार? त्या अवदसेने तुला बरेच लाडावून ठेवलेय रे. एका दिवसाची बायको असली तरी मी खपवून घेणार नाही. सुधीरप्रमाणे सारे व्यवस्थित, वेळेवर केले तर ठीक नाही तर तुला सुतासारखा सरळ करण्यासाठी मला ह्या टेंपररी लायसन्सची मुदत वाढवावी लागेल. बघेन मग तू सारी कामे अगदी स्वयंपाकपाणी, धुणी भांडी, झाडझूड अशी सारी कामे कसा करीत नाहीस ते."
"क-क-काय? मुक्काम वाढणार?"
"अर्थातच. माझ्याशी आजच घटस्फोट हवा असेल तर मग आत जावून नाष्ट्याचे बघ." सरोज म्हणाली तसा मी स्वयंपाकघराकडे वळणार तितक्यात ती पुढे म्हणाली,
"सुरवातीला तो सुधीरही असाच नखरे करायचा पण लग्नाच्या नवलाईचे नऊ दिवस संपताच त्याला एक-एक धडा शिकवत सारी कामे करायला भाग पाडले 'उठता बुक्की बसता लाथा' या उक्तीचा खराखुरा प्रयोग मी सुधीरवर केला आणि त्याची कधी शेळी होवून तो कसा निमूटपणे एकूणएक कामे करू लागला हे दोघांनाही समजले नाही. सुरवातीला त्याने 'कामवाली बाई लावू' अशी टूम लावली पण त्या मागणीने उग्र रूप धारण करण्यापूर्वीच मी ती मुळापासून उखडून टाकली. म्हणून म्हणते सुधीर नंबर दोन व्हायचे नसेल तर मुकाट कामाला लाग." तिने दिलेला दम मी पडत्या फळाची आज्ञा मानून स्वयंपाकघरात आलो. समोर असलेले प्रशस्त देवघर का कोण जाणे उदासवाणे भासले. देवघरातील देव जणू मला विचारत होते,
'आज सकाळी-सकाळी तू कसा? कुठे आहे आमची भक्तीण? गावाला गेलीय का? कधी येणार? अरे, तिच्या हातून स्नान झाल्याशिवाय शरीरात उत्साह, स्फूर्ती, तरतरी येत नाही रे. तिच्या हातचा तो चविष्ट नैवेद्य म्हणजे आमचा जीव की प्राण? शिवाय सकाळी-सकाळी तिच्या मुखातील भक्तीगीतं,मंत्र,जप,स्तोत्रं ऐकणे हे आमचे भाग्यच आम्ही समजतो. अरे, केवढा नशिबवान आहेस तू. अशी सुगरण आणि गृहकृत्यदक्ष भार्या मिळायला भाग्य लागते. त्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतात. काय चव आहे रे तिच्या हाताला. बिचारी सारखं राबराबताना तुझ्याजवळ तर सोड पण आमच्याजवळही कधी तक्रार करीत नाही. एवढी सारी घरातली कामे करून येणारा-जाणारांचे, पै-पाहुण्यांचे जिथल्या तिथे करताना आमची भक्ती तेवढ्याच आनंदाने,समाधानाने करते. अरे, तिच्या रूपाने आम्हाला जणू पुन्हा मीराबाई, मुक्ताई, राधा, द्रोपदी इत्यादी साऱ्या साऱ्या भक्तीणी भेटल्याचा आनंद होतो. अर्थात ते तुला कसं कळणार? ते रूप तुला कसं दिसणार कारण त्यावेळी तू जागा कुठे असतो? खरोखर असे भक्त मिळायलाही पुण्य लागते. नवरा म्हणून तू भाग्यवान आहेसच पण आम्हीसुध्दा नशिबवान आहोत. अरे, आजकाल असे निःस्वार्थ भक्त दिसत नाहीत रे. आजची भक्तीसुध्दा तोंडदेखली आणि स्वतःचा उदोउदो करवून घेण्यासाठी केली जाते. आजकाल देव, दानधर्म हा देखील एक शो, फॅशन आणि तुम्ही काय म्हणता तो इव्हेंट झालाय. भक्तीचा खराखुरा मळा फुलवणारे भक्त म्हणजे तुझ्या बायकोसारखे भक्त विरळाच. जिथे कुठे असे भक्त आहेत त्या घरातून, देवघरातून निघावेसे वाटत नाही...'
"अरे,ए शुंभा......?" बैठकीतून गब्बरसिंहीनीचा आवाज आला तसा मी दचकलो आणि मी गॅसच्या ओट्याकडे धावलो. विद्यालयीन जीवनात हातांनी करून खाण्याचा असलेला अनुभव पणाला लावत असताना खिशातला भ्रमणध्वनी खणाणला. मी माझ्या कामामध्ये एवढा तल्लीन झालो, की त्या रिंगटोनच्या आवाजाने प्रचंड घाबरलो पण क्षणात सावरून मोबाईल काढला. त्यावर माझ्या जन्मोजन्मीच्या बायकोचे नाव पहाताच मी आनंदलो. भ्रमणध्वनी ऑन करताच आवाज आला,
"हॅलो, काय करताय? फराळाचं? इतक्या उशिरा? बरोबर आहे म्हणा. तात्पुरते का होईना पण दोघेही नवरा-बायको उशिरा उठल्यावर दुसरे काय दिवे लागणार? काय म्हणता? मी काय चाटते?अहो, हा काय फाजीलपणा? असं का विचारता? मी काय चाटणार? बोटे माझीच हो. मग दुसरी कुणाची? अहो, तुमचा अजून फराळ व्हायचाय पण माझे जेवण झालय. सरोजच्या सॉरी, माझ्या एकदिवसीय नवऱ्याने... सुधीरने खीर केली होती... शेवयाची! काय सुंदर केली म्हणता? खरेच सरोज फार भाग्यवान बाई. भजी काय, कोशींबीर आणि पापड-कुरूड्याही! खरे सांगू, मी एवढी सुगरण ना पण मलाही लाजवेल असाच स्वयंपाक होता हो अगदी चारीठाव! काय टेस्ट आहे म्हणता सुधीरच्या हाताला, की विचारूच नका. शिवाय सगळं कसं गरमागरम, वाफाळलेले. अहो, स्वतः केलेल्या अन्नाच्या वाफा निघताना पाहणे आणि ते अन्न ग्रहण करणे हे अनुभव मी कधीच घेतले नव्हते हो. आजन्म ते थंडगार अन्न. शिवाय तुम्हाला वाढून, तुमचे पोट भरल्यावर उरलंसुरलं तेवढेच खायचे. कमी वाटले म्हणून पुन्हा स्वतःसाठी कधीच स्वयंपाक केला नाही. कधी म्हणून तो स्वतःकडून स्वतःसाठी तृप्तीचा, समाधानाचा ढेकर अनुभवलाच नाही. आग्रह करवून घेतांना जेवणाची चव प्रथमच चाखतेय हो..."
तितक्यात तिथे सरोजचे आगमन झालेले पाहून मी भ्रमणध्वनी बंद केल्याचे पाहून ती म्हणाली, "कुणाचा होता? माझ्या वन डे सवतीचा? काय म्हणत होती? तू असा बोलत का राहिलास? अरे, तिकडे माझा सुध्या तुझ्या बायकोच्या तोंडात एका मागून एक कोंबत असेल... जेवणाचे पदार्थ रे!
आणि तू अजून मला फराळाचे दिले नाहीस? ते काही नाही, तुझा हा असा कामचुकारपणा, वेळकाढूपणा मी खपवून घेणार नाही. तू कितीही वेळ लावलास तरी गॅसपुढे ही सरोज ऊभी राहणार नाही, स्वयंपाक तुलाच करावा लागेल नाही तर मी माझा मुक्काम वाढवणार..."
"अग.....अग बघ. पोहे तयार आहेत." म्हणत मी पोह्याने भरलेली बशी तिच्यासमोर धरली. पोह्याला मिळालेल्या लालभडक रंगाप्रमाणे थोड्यावेळातच आपलाही गाल रंगणार या विचारात तिच्यासाठी वाटीमध्ये साखर आणि पाणी घेवून मी बैठकीत आलो. तिथले दृश्य पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. सरोज ते तिखट आग पोहे मिटक्या मारीत खात होती. तिला ना तिखट लागत होते, ना नाका- तोंडातून, ना डोळ्यातून पाणी येत होते. कानातून मुंग्या निघाल्याचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. मला पाहताच सरोज म्हणाली,
"अरे व्वा! सुरेख! सुंदर! अप्रतिम! फंटॅस्टीक! मार्वलस! काय वेंधळी आहे रे ती शीली. तू एवढे चहा-पोहे चविष्ट, खमंग करीत असताना ती स्वतः का करते? अरे, अशी चव हाताला असणारा नवरा म्हणजे दुग्धशर्करा योग! पण हा योगायोग 'कॅश' करायलाही अक्कल लागते. त्या निर्बुध्द शीलाला कुठे जमणार? का रे, एकाच नवऱ्याच्या दोन बायकांना सवत म्हणतात त्याप्रमाणे एकाच बाईच्या दोन मिस्टरांना काय म्हणतात रे? म्हणजे तुझे आणि सुधीरचे एक दिवसीय संबंधाचे नाते काय असणार? तशा आम्ही दोघी वन डे सवती आहोतच. बरे, ते जाऊ दे. पण सुधीरला मात्र तुझ्याकडे ट्रेनिंगला पाठवावेच म्हणते. वा! वा! पोहे असावेत तर असे! गुड ! अरे, अजून पोहे आहेत का रे?" तिने विचारले तसा तिच्या स्तुतीने हुरळलेला मी क्षणात म्हणाला,
"हो, हो आहेत ना. आणतो आणतो." लगेच मी स्वयंपाकघराकडे निघालो.
"थांब, लगेच आणू नकोस. एवढे पत्नीदाक्षिणात्य दाखवायची गरज नाही. तू खाऊन घे...उरलेले! नाही तर भुकेल्या पोटी स्वयंपाक करशील आणि मग सारा स्वयंपाक बिघडवून टाकशील." तिचे ते वाक्य गरमागरम तेलाप्रमाणे माझ्या कानात शिरल्याप्रमाणे मी किंचाळलो,
"काय? स्वयंपाक आणि मी?"
"मग कोण तुझा सवत्या...हां...हां...बघ कसा अवचित शब्द सापडला. सवत...सवत्या हा पुलिंगी शब्द सापडला... तर स्वयंपाक काय तुझा तो तो सवत्या सुधीर करणार! रोज-रोज तोच करतो रे. आजही त्यानेच स्वयंपाक करून तुझ्या बायकोच्या थोबाडात घातला असेल रे. वेळेच्या बाबतीत त्याचा हात कुणी धरू शकणार नाही. एकदम परफेक्ट! त्याच्या कामाच्या वेळेवर कुणी स्वतःचे घड्याळ लावले ना तरी वेळ चुकणार नाही. पुन्हा सारी कामे जिथल्या तिथे, स्वच्छता, टापटीप याबाबतीत तुझी ती सुगरण बायको शीलाही त्याचा हात धरू शकणार नाही. आता एक दिवसासाठी मी त्याच्याशी घटस्फोट घेत तुझ्याशी संसार थाटला ही गोष्ट निराळी पण सुधीर म्हणजे सुधीरच! ही इज ऑल टाईम ग्रेट सर्वंट... बरे, ते पुराण जावू दे. मी स्नानाला जातेय. आल्याबरोबर जेवणाचे ताट तयार पाहिजे. जेवण काय करायचे हे तू ठरव. नवऱ्याने काहीही केले, कसेही केले तरी आम्ही बायका मिटक्या मारीत खातो. तुम्हा नवरे मंडळीप्रमाणे नावे ठेवीत नाहीत, आकांडतांडव करीत नाही. पण याचा अर्थ आम्हास चव, टेस्ट कळत नाही असा मुळीच होत नाही. ती एक अॅडजेस्टमेंट असते जा. पळ..." शीला म्हणाली आणि मी स्वयंपाक घराकडे प्रयाण केले...
००००