Raktkand - 1 in Marathi Thriller by Shobhana N. Karanth books and stories PDF | रक्तकांड - 1

Featured Books
Categories
Share

रक्तकांड - 1

1

आजही तो कॉलेजचा 10 जानेवारी २०१०चा काळा दिवस म्हणजे " रक्तकांड " दिवस आठवतो. तेव्हा हातापायाचा थरकाप होतो. त्या घटनेला आज दहा वर्ष झाली. तरी ती घटना काल झाल्यासारखी वाटते. मी वंदना आणि रुपेश जोडीने वकील झालो. आज आम्ही दोघेही नामांकित वकील आहोत. परंतु हा कसाकाय योगायोग आहे कि दोन दिवसांपूर्वी रूपाने आपल्याच हाताने आपल्या चेहऱ्यावर काचेच्या तुकड्याने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोप आला रुपेश वर. आज रुपेश तुरुंगात आहे. रुपेशने मला वकिल करून त्याची केस माझ्या हातात सोपवली आहे. मला रुपेशच्या बाजूने केस जिंकायची आहे. रुपेशला न्याय मिळवून द्यायचा आहे. परंतु आज माझ्यापुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे कि मी काय करू---? रूपा याविषयी काहीच बोलायला तयार नाही. मी रुपेशला न्याय देऊ कि रूपाचा हत्यारा रुपेश म्हणून रुपाला न्याय देऊ---? "----दोघेही माझे कॉलेज दोस्त आहेत. रुपेशकडून सत्य परिस्थिती समजून घेत नाही तोपर्यंत काहीच निर्णय घेता येत नाही. रूपा सुद्धा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. मी रुपाकडून झालेल्या " रक्त कांड " घटनेच्या वेळी गावी गेले होते. म्हणून त्यावेळी रूपाच्या हातून वाचले गेले. नाहीतर आज मी सुद्धा कदाचित स्मिता सारखी या जगात जिवंत राहिले नसते-----कारण म्हणजे रूपाने आपल्या झालेल्या पराभवामुळे अहंकाराच्या अधीन जाऊन जी मुलगी दिसेल तिच्यावर काचेच्या तुकड्याने त्यांच्या चेहऱ्यावर सपासप असे वार करून त्यांना घायाळ केले होते. सर्व मुली रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध झाल्या होत्या, त्यांच्यावर उपचार होऊन त्या बऱ्या होण्यास एक वर्ष लागले होते. त्यांच्या त्या जखमा शारीरिक तर होत्याच परंतु मानसिक जखमा फार खोलवर गेल्या होत्या. त्यांच्यात एक प्रकारचे भय निर्माण झाले होते. काहींच्यातर त्या घटनेचा मनावर विपरीत परिणाम झाला होता. मात्र यामध्ये माझी मैत्रीण स्मिता वाचू शकली नव्हती. केलेल्या उपचारानंतरही ती थोड्याच दिवसात आम्हाला सोडून गेली. जशी ती आमची मैत्रीण होती तशीच ती रुपेशची खास मैत्रीण होती. ते दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करू लागले होते. त्यावेळी स्मिताची बातमी ऐकून रुपेश तर मनाने एकदम तुटून गेला होता.

आज रूपाने काय मिळवले---? आपल्या सौंदर्याच्या अहंकाराने मानसिक विकृतीत जाऊन संतापाने आपल्या विचारांचा ताबा सोडून समोर दिसणाऱ्या मुलींवर सपासप वर केले आणि आज एक हत्यारी बनून तुरंगात शिक्षा भोगत आहे. हि घटना मला वैशालीने सांगितली तेव्हा मला विश्वासच बसत नव्हता कि माणसाचा अहंकार त्याच्या विचारांना एक पिशाच्चचे स्वरूप देऊन मनाचा समतोलपणा पूर्णपणे घालवून टाकतो. अस्तित्वात राहतो तो फक्त आणि फक्त एक हैवान----"

तेवढ्यात दारावरची बेल वाजली आणि मी भानावर आले. त्या सकाळच्यावेळी कोण असणार---? या विचारातच मी थरथरत्या हाताने दार उघडले. समोर दाराच्या बॉक्समध्ये वर्तमानपत्र टाकून पेपरबॉय बेल वाजवून गेला होता.

बॉक्समधून वर्तमानपत्र काढून मी आत आले आणि सोफ्यावर बसले. पहिल्याच पानावर ठळक अक्षरातली बातमी बघून मला धक्काच बसला. हे कसं शक्य आहे----? रुपेशने मला वकील करून त्याची केस माझ्या हातात आली होती आणि आज मी वाचते कि नामांकित वकील रुपेश यांनी तुरुंगात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. माझा या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. वर्तमानपत्रातील रुपेशच्या फोटोकडे शून्य नजरेने बघतच राहिले आणि त्या शाळा-कॉलेजच्या एक एक आठवणी डोळ्यासमोर दिसू लागल्या.

रूपा ही शालेय वार्षिक संमेलनमध्ये अनेक नाटकांमधून उर्वशी, मेनका या सारख्या अप्सरांच्या भूमिका करून आपले अप्रतिम नृत्य सादर करत होती. तसेच त्याबरोबर अनेक बक्षीस हि मिळवत होती. तिच्या सौंदर्याने तिने आपले स्थान मिळवले होते. अभिनयातही तिने आपले कौशल्य दाखवून दिले होते. शाळेत तिला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. नृत्य, अभिनय या कलागुणांनी ती सर्वांचा चर्चेचा विषय बनली होती. शाळेतील प्रत्येक मुलाची नजर तिच्या उभरत्या यौवनावर खिळत होती. रूपा वयाने लहान असूनही तिचा बांधा वाढत्या वयाबरोबर यवनाने बहरून येत होता. तिला कोणाचीही दृष्ट लागावी असे तिचे रूप होते. त्यामुळे रूपाच्या आईलाही तिची फार काळजी वाटत असे. कारण म्हणजे रूपा एकुलती एक लाडकी मुलगी होती. तसेच दोन वर्षांपूर्वीच रूपाच्या बाबांचे हृदयविकाराने निधन झाले होते. तरीसुद्धा रूपाचे बाबा एक बिझनेसमन असल्याने रूपा श्रीमंतीत लहानाची मोठी झालेली होती. रुपाला पैशाची काही कमी नव्हती. त्यामुळेच ती आपल्या श्रीमंतीवर आणि आपल्या सौंदर्यावर अभिमान दाखवत होती. शाळेतील मित्र-मैत्रीणींबरोबरचे मोकळे वागणे हे रूपाच्या आईला योग्य वाटत नव्हते. परंतु रुपासुद्धा कोणाचे ऐकण्यातली नव्हती. स्वतःचेच खरे करणारी होती. तसे तिला आपल्या सौंदर्याचा गर्वही होता. जेवढी आमच्यात मिसळत होती तेवढीच ती घमंडीही होती. तिच्या बोलण्या बोलण्यातून तिचा अहंकार दिसत असे.

तो आमचा शालेय जीवनातला शेवटचा दिवस होता. निरोप समारंभ मध्ये सुद्धा रूपाने एक सुंदर नृत्य सादर केले होते. कार्यक्रम आटोपून सर्वजण एकमेकांचा निरोप घेत होते. परंतु त्या सर्व मुलांमध्ये एक मुलगा म्हणजे सर्व खेळात निपुण असलेला तरी मुलींची खोड काढणारा असा रुपेश हा रूपाचा हात मिळवण्यास पुढे आला नव्हता. बाकी सर्व मुलींना त्याने हात मिळवला होता. त्यामुळे त्या दिवशी रुपाला रुपेशचे वागणे अपमानास्पद वाटले होते. सर्व मुले माझ्याशी बोलायला किती उतावीळ असतात आणि हा रुपेश जुना राग मनात ठेवून माझ्याशी हात मिळवत नाही---? आपल्याला काहीच भाव देत नसल्याचे रुपाला वाटत होते. एक सौंदर्याचा गर्व असलेल्या रुपाला हा अपमान सहन झाला नाही. हि रुख रुख रुपाला मात्र कायमची मनात बसून राहिली.

रुपेशला रूपा पासून दूर राहण्याचे कारणही तसेच होते. सात-आठ महिन्यापूर्वी शाळा सुटल्यावर रूपा आणि रूपाच्या सहा-सात मैत्रिणी घरी जात असताना रस्त्यात रुपेशने आय लव्ह यु लिहून कागदाचा बाण करून तो स्मितावर फेकला होता. परंतु स्मिताकडे न जाता तो बाण रूपाच्या केसात अडकला. रूपाने लगेच पाठी वळून बघितले तेव्हा दुसरा बाण रुपेशच्या हातात होता.हे बघून रूपाने रुपेश वर शिव्यांचा भडीमार केला आणि काहीही विचारपूस न करता तो बाण केसातून काढून त्यावरील " आय लव्ह यु " हि अक्षरे वाचून तसाच तो बाण आपल्या बॅगेत ठेवून दिला.

दुसऱ्या दिवशी शाळेत आल्यावर मुख्याध्यापक सरांनी रुपेशला आणि त्याच्या बाकी मित्रांना क्लासमधून बोलावण्यात आले. सर त्या सगळ्यांकडे रागातच बघत होते. आपला नाकावर उतरलेला चष्मा वर करत रुपेशला विचारले " रूपाच्या अंगावर हा बाण कोणी मारला---? नुसता बाण नसून त्यावर हे काय लिहिले आहे---? हे कोणाचे काम आहे---? " सरांचा राग बघून सर्व मुले खाली मान घालून तटस्थपणे चुपचाप उभी होती. कोणीच काही बोलत नव्हते. हे बघून सरांनी प्रत्येक मुलाच्या थोबाडीत मारून त्यांना क्लास बाहेर उभे करून शाळेत सर्व मुलांच्या समोर लज्जित केले होते.

रुपेश मुळे सर्वांना शिक्षा भोगावी लागली होती. त्यामुळे रुपेशचे मित्र रुपेशपासून दूर झाले होते. रुपेश मात्र रुपाकडून झालेला अपमान सहन करू शकत नव्हता. त्यामुळे रुपेशच्या मनात रूपाविषयी एक प्रकारचा खुन्नस निर्माण झाला होता. " रूपा स्वतःला काय समजते----? दुनियामध्ये हिच्याशिवाय दुसरी कोणी मुलगी सुंदर नाहीच आहे का----माझ्या मते तर स्मिता हिच्या पेक्षा सुंदर आहे. म्हणूनच तर मी बाण स्मिताला मारून तिला आय लव्ह यु बोलणार होतो. परंतु माझा नेम चुकला आणि तो बाण स्मिताकडे न जाता तो रूपाच्या केसात अडकला. यामध्ये माझी काय चूक----? या गोष्टीचा मी वचपा घेतल्याशिवाय राहणार नाही---- तिला तिचा सौंदर्याचा अहंकार उतरवून दाखवीन----" रुपेशचा मनांतल्या मनात जळफळाट होत होता. रुपेशने रुपाला अद्दल घडविण्याची जणू सुपारीचा घेतली होती.परंतु रुपेश बाहेरून काहीच दाखवत नव्हता. तरीसुद्धा रुपेश रूपापासून चार हात दूरच रहात होता आणि या निरोप समारंभाच्या दिवशी रुपेश स्मिता आणि बाकी मुलींना हात मिळवून निरोप देत होता.हीच गोष्ट रुपाला खटकली होती. रुपेश तिच्या जवळ आला तरी तिला खटकत होते आणि रुपेश दुसऱ्या मुलींकडे गेला तरी तिचा सौंदर्याचा अंहकार तिला डिवचत होता.

थोड्याच दिवसात दहावीची परीक्षा होऊन सर्व मित्र-मैत्रिणी वेगवेगळे होऊन गेले. तरी रूपाचा ग्रुप एकत्र येऊन पिकनिक, पिक्चर, हिंडणं-फिरणं ,हॉटेलमध्ये डीनर पार्टी करणं अशा प्रकारे त्यांचा दिनक्रम सुरु झाला होता. आमच्या ग्रुप मध्ये मी वंदना, रुपेश, स्मिता, साधना, रूपा, विशाल असे होतो. मी ,विशाल, आणि साधना आम्ही जरा कमीच ग्रुपमध्ये रहात होतो. मी तर एकदम रिझर्वड नेचरची होते. त्यामुळे माझं ग्रुपमध्ये येणं-जाणं खूपच कमी असे.यामध्ये रुपेश आणि स्मिता फारच एकमेकांजवळ येऊ लागले होते. त्या दोघांचे गळ्यात गळा घालणे, हसणे,खिदळणे,बघून रुपाला मात्र तळपायाची आग मस्तकाला जात होती. एकीकडे रुपेश विषयी होणारा संताप आणि दुसरीकडे रुपेश विषयी मत्सर हे मनाचे दंदव रुपाला समजू शकत नव्हते. रुपेश विषयी निश्चित कोणते मत आहे याचा रुपाला अंदाज येत नव्हता. जस जशी रुपेश आणि स्मिताची मैत्रीची जवळीकता दाट होत होती तस तसे रूपाच्या अहंकाराचा उद्रेक वाढत होता. त्या उद्रेकाने हळू हळू आपल्या ग्रुप पासून रूपा दूर होऊ लागली होती. तिच्या वागण्यात एक वेगळेपणा येऊ लागला होता. हा वेगळेपणा रूपाच्या आईच्या लक्षात येऊ लागला होता. रूपाचा खोडकरपणा, चेहऱ्यावरचे हास्य, सतत करणारी बडबड थोडीफार मावळून गेली होती. रूपाच्या या वागण्यातील वेगळेपणाने रूपाच्या आईला संशय येऊ लागला होता कि रूपा बाहेर कुठल्या मुलाच्या प्रेमात तर पडली नसेल-----? या विचाराने तिने रुपाला विश्वासात घेऊन तिला विचारायचे ठरविले.

रविवार असल्याने रूपा नेहमीपेक्षा जरा उशिराच उठली होती. फ्रेश होऊन मोबाईल घेऊन बसली. तेवढ्यात तिच्या आईने रुपाला आवाज दिला, " रूपा, अगं आज कॉलेजला सुट्टी आहे तर निदान मला कामात मदत तरी कर----दिवसभर त्या मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेली असते----"

"आई तुला कितीतरी वेळा सांगितले कि हि घरातील कामं मला सांगत जाऊ नकोस म्हणून----मला हि कामं करायला आवडत नाही----आज पर्यंत मी हि कामं केली आहेत का----? आणि आता कामं करायला सांगतेस----? बाबा होते तेव्हा सगळ्या कामाला बाई ठेवली होतीस आणि आता सगळ्या बायांना काढून टाकलेस----" रूपा रागातच बोलत होती.

रूपा त्या वेळची परिस्थिती वेगळी होती. जरा समजून घेशील कि नाही----? " रूपाची आई जरा खालच्याच आवाजात बोलत होती.

"आई, तुला माहित आहे न कि मी माझ्या फिगरची किती काळजी घेते ती----उद्या मी कॉलेजला जाईन तेव्हा कॉलेज ब्युटीक्वीन म्हणून मला स्पर्धे मध्ये भाग घ्यायचा आहे----" रूपा आपल्या नखांना शेप देत बोलत होती.

"रूपा , तू कॉलेजमध्ये शिकायला जाणार आहेस कि ब्युटीक्वीन म्हणून मिरवायला जाणार आहेस---?"

"आई, देवाने मला एवढे सुंदर रूप दिले आहे ते कशासाठी----? त्याचा मी उपयोग तर करून घेईन----मला मॉडेलिंग करायला आवडतं----आणि तू मला हे चूल न मूल करायला सांगतेस----? आई तू कधी सुधारणार आहेस----? आता जग कुठे चालले आहे----त्या जगाबरोबर जगायला शिक----" रूपा हसत हसत बोलत होती.

"बेटा, ती लाईन आपल्या सारख्यांना चांगली नाही----डॉक्टर वगैरे बनण्याची स्वप्नं बघायची कि हे मॉडेलिंग बनण्याची---? आज तू तरुण आहेस म्हणून मॉडेलिंग करशील परंतु उद्या वयस्कर झाल्यावर काय करशील----? हे तुझं रूप तसंच राहणार आहे का----? "

"आई, तू किती पुढचा विचार करतेस गं----?"

"रूपा, नेहमी वर्तमानमध्येच विचार करून आपले भविष्य घडवायचे असते----"

"आई, मी नेहमी सुंदर दिसण्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. या दुनियेत माझ्याशी स्पर्धा करण्यासाठी अजून दुसरी कुठली मुलगी जन्माला आली नसेल किंवा पुढेही जन्म घेणार नाही----" रूपा आपल्याच तोऱ्यात ताठर मानेने बोलत होती.

"रूपा, मान्य आहे कि तू दिसायला सुंदर आहेस. परंतु आपल्या रूपावर एवढा अहंकार चांगला नाही. एक रूप आणि धन कधी हातातून निसटून जाईल हे सांगता येत नाही. त्यामुळे हा अहंकार चांगला नाही.----" रूपाची आई रुपाला समजावून सांगत होती.

"आई, तुझं हे पुराण मला सांगू नकोस. तुझी मुलगी आत्ता जरी ब्यटीक्वीनच्या स्पर्धेत उभी राहिली तर प्रथम पारितोषिकाने सर्वत्र गाजली जाईल---शाळेत मी उगाच नाही एवढी बक्षिसे मिळवली----अप्सरेच्या भूमिका करायला टीचर मलाच पुढे करत होत्या नं----? " रूपा आपल्या आईकडे माघार घ्यायला तयार नव्हती, "रूपा या तुझ्या स्वभावामुळेच आज तू तुझ्या ग्रुप मध्ये पहिल्यासारखी मिसळत नाही. जस जशी मोठी होत चालली आहेस तस तशी तुझी वागणूक बदलत चालली आहे----सुंदर रूप म्हणजे सर्व काही नाही. तर त्याबरोबर गुण-स्वभावहि तितकाच सुंदर असायला हवा. रूपा या स्वभावाने तू एक दिवस एकटी पडून जाशील----आज काल मला तुझी चिन्ह बरोबर दिसत नाही. कोणाच्या प्रेमात तर पडली नाही नं----कि कोणावर रागामध्ये आहे----? हल्ली तू घटकेला चीड चीड करत असते तर कधी दुसऱ्या घटकेला एकदम गंभीर होऊन जातेस----आताचे हे दिवस तुझे अभ्यासाकडे लक्ष द्यायचे आहेत. हे अभ्यास करण्याचे दिवस आहेत. बाकी दुसऱ्या गोष्टींना महत्व देऊ नकोस----आता दहावीचा रिझल्ट आल्यावर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घे आणि चांगल्या मित्र-मैत्रिणीची संगत पकड. कॉलेजमध्ये गेल्यावर मूल-मुली वाईट मार्गाला जातात. तेव्हा सांभाळून राहा----नाहीतर पुढे पश्चाताप करण्याची वेळ येईल----परंतु तेव्हा वेळ निघून गेलेली असेल----" रूपाची आई रुपाला काळजी पोटी बोलत होती. परंतु रूपा एक कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देत असे.