खोकलीमाय
एक गाव.....त्याला नव्हत नाव.....डोंगराच्या कुशीत वसलेल....नदीकाठी विसावलेले. हिरवी शेती त्यात भिरभिरणारे पोपटी रावे..ठायीठायी डोलणारी रानफुले... फुलांवर बागडणारी इवलीशी फुलपाखरे. शेतात राबणारे शेतकरी...कष्टकरी...सारे सुखी समाधानी होते. गावात धन-धान्याचा मुबलक साठा होता.सणासुदीला गावात आनंदाला उधाण यायच.भजन पूजन यात लोक दंग व्हायचे.मुल खेळात रंगलेली असायची.
पण काळ फिरला.चोरपावलांनी खोकला गावात शिरला.घराघरात खोकण्याचा आवाज ऐकू येवू लागला. शिरपा ....सदा...रखमा...शांती..सारेच खोकू लागले.बघता-बघता सारा गाव खोकल्याने बेजार झाला.वैदू,मांत्रिक,तांत्रिक...नवस...सारे उपाय करून झाले पण खोकला थांबायचे नाव घेईना.खोकून ..खोकून..छाती सपाट झाली.हाड वाजू लागली.
रात्री तर खोकल्याची जोराची उबळ यायची.झोप नाही...जीवाला थार नाही. डोळे जागरणाने लालेलाल झालेले.तोंडाची चव गेली..गंध गेला.
घश्याखाली अन्न उतरेना.कूणी कुणाला मदत करायची? सारेच खोकल्याच्या प्रभावाखाली.सगे- सोयरे गावात येईना झाले.बघता-बघता महिना झाला.लोकांना वाटलं .. खोकला कायमचा आपला झाला. आता असच खोकत- खोकत जगायचं...अन कधीतरी खोकत खोकत मरायचं.
अन एक दिवशी एक म्हातारी वाट चुकून गावात आली. पांढर्या केसांची...पिचलेल्या डोळ्यांची..सुरकुतलेल्या कायेची... थकलेली...तहानलेली...भुकेलेली.पोटात कावळे ओरडताहेत...घसा कोरडा पडलाय...कुणी घोटभर पाणी देईल...कुणी एक घास..भाकर देईल..या आशेने तिने वाटेत पहिलं दार वाजवल.
" दादा..घोटभर पाणी...अन चतकोर भाकर मिळेल का?"
आतून फक्त खोकण्यांचे आवाज. कुणी दरवाजा उघडेना.
म्हातारी दरवाजा वाजवून थकली.पुढच्या दारी गेली.पुन्हा तेच..खोकण्यांचे आवाज...जणू खोकण्याची शर्यत लागली.मुलांचे आवाज..बायांचे आवाज...बाप्यांचे आवाज...म्हातार्यांचे आवाज..सारेच खोकताहेत! अबब हे गाव आहे की खोकल्याच जंगल? काही समजेना काही उमजेना.कुणी दरवाजा बी उघडना .चिमूटभर साखर बी देईना.म्हातारी पार गावाच्या दुसर्या टोकाला पोहचली.पोटात आग पेटलेली....आता तर ती वैतागली...भुकेने ग्लानी आलेली इथ कोसळते की तिथे अशी अवस्था.अगदी शेवटच्या घरी पोहचली...इथ तरी काही मिळेल या आशेने तिचे डोळे लकाकले.कशीबशी दरवाज्यावर पोहचली.दरवाजा वाजवू लागली.
"माय म्हातारीला खायला दे."
आतून कोणतच उत्तर आले नाही.खोकल्याची एक ढास व त्या पाठोपाठ आणखी काही ढास....
" दादा...थोड पाणी तरी द्या.." म्हातारीने अंत्यत क्षीण आवाजात म्हणाली.
आतून कडी वाजली.म्हातारीच्या जीवात जीव आला.एक तरूण स्त्री बाहेर आली.तोंडावर हात...डोळे व गाल आत गेलेले.खोकत..खोकत..खेकसली..
"म्हातारे.....ह्या गावात खोकल्याबिगर द्यायला काय नाय?"
" चाललं...चाललं.. खोकला बी चाललं सार्या गावचा खोकला घेते पर घोटभर पाणी हातावर सोड की बाय."
म्हातारी पसा पसरत गयावया करू लागली.
घरवाली खोकत खोकत आत गेली.गढूतून पाणी आणलं.
म्हातारीच्या ओंजळीत पाणी ओतत वैतागून म्हणाली..
" घे...सोबत गावचा खोकला बी घे..यातून गाव कधी सुटल कुणास ठाऊक. "
पाणी पिऊन म्हातारीचा जीव शांत झाला.ओलसर तळहात डोक्यावरून फिरवत ती म्हणाली..
"घेतला ग बाई गावचा खोकला." म्हातारी जाण्यासाठी वळली. त्याच क्षणी खोकल्याची एक जोरदार उबळ तिला आली. वाद्ळात हलणार्या झाडासारखी म्हातारी गदगदा हलू लागली.दार बंद करत असलेली घरवाली दचकली.
तिच्या लक्षात आल....आपला खोकला थांबला घशातील खवखव थांबली.
पण म्हातारी मागे वळली.क्षणाचाही उसंत न घेता ती सतत खोकत होती.कशीबशी ती पाय ओडत परतीचा..मार्ग चालत होती.ती..ती ज्या.ज्या घराकडून खोकत जात होती...त्या.त्या घरातला खोकला थांबत.होता. बघता बघता म्हातारी गावच्या वेशीवर आली.आता चालणही तिच्यासाठी कठीण झाल होत.छातीतून घरघर आवाज येत होता.वेशीवरच्या चिंचेच्या झाडाखाली तिने अंग झोकून दिल.डोईखाली जवळच गाठोड घेतल.इकडे गावातला खोकला पळाला...खोकण्याचा आवाज थांबला.बंद दारे फटाफट उघडली..हे अचानक कस घडल?....सारे बाहेर पडले...शेवटच्या घरातल्या बाईने म्हातारीबद्दल सांगितलं.सार्या गावाने वेशीवर धाव घेतली. चिंचेच्या झाडाखाली म्हातारी निपचित पडली होती.तिची प्राणज्योत मालवली होती. संपूर्ण गावाचा खोकला आपल्यावर घेऊन ती अंनताच्या प्रवासाला खोकत खोकत गेली होती.
सारा गाव हळहळला. सगळे रडू लागले. गावान एका दिवसात चिंचेच्या झाडाखाली म्हातारीच देऊळ उभ केल.देवळात म्हातारीची मूर्ती बसवली.' खोकलीमाय'म्हणून त्या मूर्तीला लोक ओळखू लागले. दरवर्षी या दिवशी तिथ जत्रा भरते.आजही कुणाला खोकला-सर्दी झाली की लोक 'खोकलीमाय' कडे सांगण देतात.ती खोकला आपल्यावर घेते.खोकला थांबतो.
कधीतरी दुपारी किंवा रात्री त्या परीसरातून खोकल्याचा आवाज येतो.सगळे ' खोकलीमायला' हात जोडतात.
( बहिणाबाईंच्या लहानपणी अशी एक घटना गावात घडल्याचा उल्लेख आहे.त्यावर ही लघुकथा लिहिलीय.)
बाळकृष्ण सखाराम राणे .
.....