Aga je dhadlechi aahe - 3 in Marathi Thriller by Nitin More books and stories PDF | अगा जे घडलेचि आहे! - 3

Featured Books
Categories
Share

अगा जे घडलेचि आहे! - 3

३.

मध्ये पंधरा एक दिवस गेले असावेत. मी आता ते सारे विसरून गेलो. म्हणजे तसे ठरवून टाकले मी की मी ते विसरलोय. खरेतर सहानींकडून फोन येणार होताच. मेंदूतही अडगळीचा कप्पा असावा त्यात सारे टाकून मी त्या अनामिक सुकन्येस विसरायचे ठरवून टाकले.

आणि एके दिवशी सकाळ सकाळी सहानींकडून फोन आला. तिला विसरण्याचा निश्चय आनंदाने मोडत मोठ्या उत्साहाने फोन उचलला मी. पण त्या मंजूळ ध्वनी ऐवजी पलिकडून एका सहानींचा भसाडा आवाज..

"क्या हुवा पुत्तर.. आए नहीं तुम. ओ पापाजीके पेपर थे.."

"अच्छा तो आप आ गए वापस जी?"

"वापीस? हम कहां जाएंगे? हम तो इधरही है.. आज तो आ जाओ.. कितने दिनोंसे राह देख रहे हैं.."

"जी हां.. आपकी लडकी बोली थी.. आनेके बाद फोन करेंगे. मैं आ जाता हूं आज.."

"ओए.. कौनसी लडकी.. कहां से आएंगे.. हमारा तो जीना यहां.. मरना यहां.."

मी मनात म्हटले.. और इन्शुरन्स पॉलिसीभी यहाँ!

"वो सब छड्ड.. चल्ल.. तू आ जा आज.. पूरा करना है पेपर्स.."

"आता हूं.. चारपांच बजेतक जी!"

मी फोन ठेवला.

पंजाबी लोक थोडे क्रॅक असतात का? उगाच त्यांना क्रॅक म्हणावे आणि ती आपलीवाली अनामिका त्याच घरातली असावी.. म्हणून मी तो विचार झटकून टाकला. पण हा सहानी कुठे गेलाच नाही का म्हणतो नि परत कौनसी लडकी विचारतोय? जाऊ दे. खाल्ल्या मिठास जागले पाहिजे. नुसता चहा प्यालो असतो तर ठीक होते. पण बटाटेवडे म्हणजे मीठ आलेच त्यात. त्याला जागलेच पाहिजे.

संध्याकाळी पाच वाजता मी परत पोहोचलो. अनामिकेबद्दलची अनामिक हुरहूर होती मनात. तर बिल्डींगखालीच मोठे सहानी भेटले..

"आजा पुत्तर.. बडी देर कर दी.. चल्ल.."

मी त्या सहानी बरोबर तिसरा माळा चढून गेलो. सहानींनी चावीने दार उघडले. म्हणजे ती घरात नसणार? इतक्यात ते घर पाहिले आणि माझ्या डोक्यात ट्यूब झटकन पेटली. मागील वेळेस सहानी समजून मी दुसऱ्याच कुण्या घरी जाऊन पाहुणाचार घेऊन आलेलो! सहानी आत गेले. त्यांच्या दरवाजावर नंबर होता इंग्रजी तीनशे नऊ! त्या अनामिकेच्या दरवाजावर? त्यावर ही तोच नंबर असावा?

इतक्यात सहानी ते पेपर घेऊन आले. माझी घामाघूम अवस्था पाहून परत  आतून थंड पाणी घेऊन आले. त्यांच्या बडे पापांचे घबाड हाती यायला पेपरवर्कचीच कमी होती आता! मग ते लाखांचे धनी.

पुढे अर्धा एक तास त्या पेपराच्या लावण्यात नि भरण्यात गेले.

"आप चिंता मत करना.. मैं पूरा काम करवा देता हूं.. अपना पेपर क्लियर है तो कुछ चिंता नहीं.."

मी तोंड भरून आश्वासन दिले. आमच्या ट्रेनिंगचा हा भाग. जिंदगी के बाद भी आम्ही साथ असताना हे सहानी तर अजून जिंदा आहेत. त्यामुळे त्यांना साथ देणे आले. तेवढ्या एक तासात मी तो झालेला गोंधळ पार विसरलो. पण जालीम जमाना विसरू देईल तर ना.

निघता निघता सहानी म्हणाले, "पुत्तर शादी हुई है तुम्हारी?"

"नहीं जी.."

"तो कर लो.. किस लडकी की गल्ल कर रहे थे फोनपर पुत्तर? सपने में छोरी आ रही है तुम्हारी.. बना लो शादी.. नहीं तो तुम्हारे पितासे बात करूं.."

"नहीं.. नहीं.. सहानी अंकल मैं चलता हूँ."

मी तिथून पळ काढला.

आता मला आधी काय झाले असावे याचा विचार करण्याची उसंत मिळाली. मी हळूच 'त्या' घराजवळ गेलो. दरवाजा बंदच होता. ते अनामिकेचे घर.. नंबर तीनशे नऊ! बारकाईने पाहिले तर तो इंग्रजी सहाचा आकडा उलटून नऊ दिसत होता. मागे कुठल्याशा हिंदी सिनेमात हे घडलेले दाखवलेय ते आठवले. म्हटले ना.. सिनेमात दाखवतात ते सारेच अशक्य म्हणून सोडून देऊ नये. आता माझी ट्यूबलाइट पेटली. म्हणजे ती जी कोणी होती ती सहानी नव्हतीच! तिच्या दरवाजावर नेमप्लेट ही नव्हती. कुणी शुद्ध मराठी कुटुंब असावे ते. आणि ते बटाटेवडे? ते कुणासाठी बनवले असतील? एकूण दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम! त्या सुंदरीने मला कोण समजून खाऊ पिऊ घातले होते कुणास ठाऊक!

मी झटकन तिथून निघालो. खाली नावांची मोठी पाटी होती. त्यात तीनशे सहा वर होते 'अनंत राजाराम सुर्वे!' थोडक्यात मी सुर्वेंचे मीठ खाल्लेले त्यादिवशी. आणि ती सुर्वेकन्या होती तर! एखाद्या हिंदी सिनेमात दाखवतात तशी गडबड झाली होती खरी. ती सुर्वे असली तरी आता तिच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग नाही माझ्याकडे. की काही तिकडमबाजी करून पोहोचेन मी तिच्यापर्यंत?

सकाळपासूनचे धक्के कमी होते म्हणून की काय.. मी निघालो.. विचार करता करता निघालो नि रस्ता चुकलो नि मागच्या बाजूला पोहोचलो..  आणि त्या बिल्डिंगच्या मागे कोण दिसावे मला? त्यांना पाहून धक्का बसला मला. बिल्डिंगच्या मागे प्रेमीजनांच्या सोयीसाठीच की काय कुणास ठाऊक एक बाकडे होते. हिरव्यागार झाडाखाली. आणि त्यावर ती दोघे बसलेली.. एक त्यापैकी होती ती तीच सुंदरी .. सुर्वेकन्या आणि दुसरा.. अवि!

थोडक्यात आता वहिनींच्या हातचे बटाटेवडे खायला लागतील असे दिसू लागले मला चित्र. बेट्या अविचे सूत साऱ्या जणी सोडून याच कन्येशी जुळावे? आणि केव्हा ना केव्हा तिला भेटेनच मी तेव्हा तिला काय वाटेल? कुणाच्याही घरात शिरून बटाटेवडे खातो मी? अवि आणि ती बसून गप्पा मारत होते. आणि ज्या रीतीने ते बसलेले ते पाहून अवि ने आजवर सांगितले त्याहून जास्त मजल मारलेली दिसत होती. मला परत ते दोस्त आणि दोस्तीवरचे सिनेमे आठवले. या अविसाठी मी माझे प्रेम कुर्बान करायचे ठरवले! नाहीतर तो उगाच गात फिरेल.. दोस्त दोस्त ना रहा.. आणि खरेतर तसेही मला विचारणार कोण होते? त्यातल्या त्यात हे कुर्बानीचे पुण्य पाडून घ्यावे पदरात म्हणून मोठ्या मनाने मी मनातल्या मनात अविला पास दिला. म्हटले, बी हॅपी फ्रेंड. माझे काय.. वडे खायला येईन तेव्हा नाही म्हणू नकोस म्हणजे झाले!

खरे सांगू तर ते दोघे काय बोलताहेत ते ऐकायचा खूप मोह झाला मला. एकतर त्या सुर्वेकन्यकेचे नाव कळले असते आणि त्यांचे बोलणे पुढे मागे मला उपयोगी पडले असते.. माझी पाळी येईल तेव्हा. पण मी तो मोह टाळला. तिने पाहिले तर काय वाटेल तिला. चहापाण्यापर्यंत ठीक होते.. आणि बटाटेवडे खाणे पण एकवेळ क्षम्य.. पण हे असे चोरून ऐकणे.. तेही दोन प्रेमी जिवांचे.. पुढेमागे मिळणारे बटाटेवडे.. कमीत कमी त्यांचा तरी विचार कर.. मी स्वतःस समजावले आणि दबकत दबकत मागे फिरलो. मागे वळून पाहिले तेव्हा दोघे आपल्या धुंदीत होते.

मी तिकडून निघालो आणि मुख्य गेटमधून बाहेर आलो. थोडे अंतर गेलो असेन तर समोरून 'ती' येताना दिसली. मोठ्या साळसूदपणे ती त्या पाठच्या भागातून बाहेर पडून मुख्य गेटकडे येत होती. प्रेम असा चोरटेपणा शिकवते हे ऐकून होतो.. आता प्रत्यक्ष पाहिले. ती जाईतोवर मी झाडामागे लपून होतो. फक्त एकच.. ती इतक्या झटकन इथवर पोहोचलीच कशी? आणि अवि? तो कुठे नाहीसा झाला?

मी अविला फोन लावला. म्हटले, बघू हा किती चोरटेपणा शिकलाय. पण तो फोन उचलेल तर ना. परत एकदा लावला फोन. यावेळी उचलला.

"काय अवि.. कुठे आहेस?"

"का? कुठे खादडायला बोलावतोयस?"

"नाही.. सहज.. काय करतोयस?"

"बिझी आहे.. ऑफिसमध्ये.."

"ठीक.. मग नंतर भेटू."

तो बोलायचा बंद झाला.. म्हणजे माझ्याशी. त्याचा फोन ऑन होता. अगदी स्पष्ट नाही पण ऐकू येत होते..

"माझा फास्ट फ्रेंड.. अनिकेत खादाड. नाही.. ते आडनाव नाही.. विशेषण आहे. तुला भेटवेन एकदा.. चांगला आहे पण खादाड आहे.. हो ना.. खूप वेळ झाला नाही? जावेसे वाटत नाही.."

पुढे काही लक्षात येऊन फोन बंद केला असावा त्याने.

कुणाशी बोलतोय हा?

अनामिका सुर्वे तर आताच गेली माझ्या समोरून. आणि बोलतोय असा म्हणजे नक्कीच तिच्याशीच. म्हणजे? ती बाकड्यावरची ती.. ती नव्हतीच? ते शक्य नाही. म्हणजे समोरून येणारी ती.. ती नव्हतीच? शक्य आहे. ध्यानीमनी तिचा विचार केला की भास होणारच. होणाऱ्या वहिनीबद्दल विचार करणे आता टाळायला हवे. अवि.. खोटारड्या.. हे तुझे ऑफिस? बिल्डिंगच्या मागच्या बाकड्यावर.. एकांतात. किमान माझ्याशी तरी खोटे बोलू नकोस.. कुठे फेडशील हे पाप?

सगळे सोडून मी घरी जायला निघालो. एका दिवसात काय काय घडावे? अविच्या प्रेमपात्रास पाहिले आजच आणि माझ्या त्या न सुरू झालेल्या प्रेमकथेचा अंत.. तो ही याचि देही याचि डोळा पाहिला आजच. आणि गंमत म्हणजे त्यात सामायिक घटक असावी.. तीच.. अनामिका! अनामिका सुर्वे!

अवि आणि त्याची ती जीएफ.. गर्लफ्रेंड. वर माझ्याशी बोलतोय खोटे! मला खरेतर त्याचा राग यायला पाहिजे होता. पण नाही. तो माझा खरा दोस्त होता. त्यामुळे मला आनंद झाला. पण मी त्याला असाच सोडणार नव्हतो. माझ्याशी खोटे? पण नंतर विचार केला मी, बाकड्यावर दोघेच ते. तिच्याबाजूला हा. त्यात माझा आगाऊपणे केलेला फोन. तिच्यासमोर तो मला काय सांगणार होता? नक्की काय करतोय तो.. किंवा कुणाबरोबर आहे तो.. किंवा कुठे आहे तो.. या प्रश्नांची उत्तरे तिच्यासमोर देणे टाळण्यास उपाय एकच.. ऑफिसात बिझी असल्याचे सांगणे! तसा बिझी तो होताच.. त्यामुळे त्याने सांगितले ते अर्धसत्य तरी होतेच.. त्यामुळे तो ऑफिसात बिझी आहे सांगण्याशिवाय दुसरे काय करू शकणार होता? आणि तेच तर त्याने केले होते. त्याच्या जागी मी असतो तर? मी ही तेच केले असते!

तेच!

म्हणजे तिला पटवण्यापासून त्या बाकड्यावर.. जाऊ देत डिटेल्स.. ते कुणी अशावेळी फोन केला तर बिझी असल्याचे सांगण्यापर्यंत.. सारे असेच घडले असते.

दोन दिवसांनी, म्हणजे रविवारी भेटला मला अवि. नेहमीच्या उडप्याकडे. मजेत होता.

"काय मग.. देवदासत्व नाहीसे झालेले दिसतेय? खूश दिसतेय स्वारी!"

"देवदासत्व! काय पण. पण आवडला शब्द मला. हाय..! होतो काही दिवस देवदास.. पण एक नजर क्या उसकी पडी.."

"की तू टुणकन मारली उडी?"

"तसेच समज! तसेच समजावयास हरकत नाही आणि त्यास माझा प्रत्यवाय नाही. हाय क्या जुल्म ढाए कातिल ने.."

"ओहो.. कातिल! म्हणजे तिच्या गालावर का तीळ आहे?"

"वा! काय ज्योक! धन्य झालो.. तू काही पण समज.. माझी नाही हरकत!"

"कशी असणार.. तुझ्या त्या बिल्डिंगच्या पाशी.. येतो मी गडे जरासा .." मी त्याच्या स्टायलीत बोलण्याचा प्रयत्न करीत म्हणालो.

"जमत नाही तर सोडून दे. तिकडे पाहिजे जातीचे. समजले ना?"

"खा. डोसा थंड होतोय.. पण यू आर राइट! जातीचे तिकडेच दिसतात हल्ली! पण मी ऐकले ते खरे आहे का?"

"काय? म्हणजे तू काय ऐकलेस.. मला काय ठाऊक?"

"तसे खूप काही ऐकून आहे. पण तुझे ऑफिस शिफ्ट झाल्याचे आधी कधी बोलला नव्हतास.." मी त्याची उलटतपासणी करण्यासाठी उलटून प्रश्न विचारायचे ठरवलेले.

"म्हणजे? कोणी सांगितले?"

"कोणी काय? दस्तुरखुद्द अवि महाराजच म्हणाले त्या दिवशी!"

"मी?"

"नाहीतर काय मी?"

"मी? कधी? तुला स्वप्न पडले असणार."

"हे खरेच! स्वप्नच ते! शालिनीनिवासाच्या मागील बाकड्यावर ऑफिस असते असे ऐकून आहे मी! आणि सांगितले ते खुद्द तूच मला! त्या दिवशी फोनवर! आणि यास स्वप्न म्हणतात? मला बघायला काय दुसरी कुठली स्वप्ने नाहीत काय? स्वप्नात तुला आणि तुझे ऑफिस पाहिन मी?"

"नालायका.. असली हेरगिरी बरी नव्हे!"

"मग कसली बरी असते सांग.. ती करतो!"

"स्टुपिड.. पण एक गोष्ट. तुझ्यापुढे सपशेल शरणागती! फक्त कसे काय आणि काय काय झाले ते सांगितलेस तर बरे!"

"तू तर लढण्याआधीच तलवार टाकलीस खाली! मला वाटले होते.. आढेवेढे घेशील.."

"छट.. तुझ्यापुढे काय? तर आहे हे असे आहे!"

"कळले ते कसे आहे! अगदी चक्षुर्वैसत्यम का असे काय म्हणतात तसे. मी आलेलो त्याच बिल्डिंगीत.. आणि बघतो काय.. शिव शिव.. अब्रह्मण्यम.. शोभत नाही तुला."

"नाटक नको.. पुढे बोल!"

"अरे.. ती बटाटेवडेवाली होती ना.. त्याच बिल्डिंगीत आलेलो.."

"वा! म्हणजे उनसे मुलाकात हुई? बादमें जाने क्या हुआ?"

"मुलाकात हुई.. क्या बात हुई.. मत पूछ यार! वो बेवफा किसी और की हो गयी!"

"म्हणजे?"

"म्हणजे वाघाचे पंजे! अरे मी तिला पाहिले.. ती तिच्या बीएफ बरोबर होती!"

"अस्से.. मग?"

"आणि तो कोण असावा?"

"कोण?"

"ओळख! अरे तू ओळखतोस त्याला!"

"मी? नाही बुवा!"

"म्हणजे? यू डोन्ट नो युवरसेल्फ?"

"म्हणजे? डोन्ट टेल मी! मी?"

"येस्स.."

"आणि बटाटेवडेवाली ती?"

"यस्स.."

"दुनिया किती छोटी आहे रे. म्हणजे त्या दिवशी वडे.. पण त्यांच्याकडे कसली इन्शुरन्स पॉलिसी?"

"ते सोड.. ती माझी एक चूक.."

"म्हणजे?"

"म्हणजे एवढेच.. ना ती पॉलिसी त्यांची.. ना ते घर त्यांचे.. अरे.. रॉंग नंबर! त्या घरी गेलो ती एक चूक.."

"आणि बटाटेवडे खाऊन आलास ती दुसरी!"

"नाही.. चूक नाही! नाहीतरी मेरा नाम है अनिकेत.. अनिकेत खादाड! खादाड हे आडनाव नाही विशेषण! असे कुणीतरी बोलताना ऐकल्यासारखे वाटतेय!"

"सॉरी! शरणागती! सपशेल!"