Aga je dhadlechi aahe - 1 in Marathi Thriller by Nitin More books and stories PDF | अगा जे घडलेचि आहे! - 1

Featured Books
Categories
Share

अगा जे घडलेचि आहे! - 1

आमच्या घरच्या हॉलमधला टीव्ही.. त्याच्यावर एक हिंदी सिनेमा सुरू. माझी छोटी माझ्या मांडीवर बसून पाहतेय.. एकाएकी म्हणाली, "बाबा, हे हिंदी सिनेमावाले काय पण दाखवतात. असे कधी होते काय? मी मोठी झालीय आता.. मला म्हायती सगळे खोटेखोटे आहे ते!"

मुलीचे वय वर्ष पाच! घरातलेच कुणी मागे म्हणालेले ती परत पोपटपंची केल्यासारखे बोलतेय!

पण खरे सांगतो हिंदी सिनेमा नाहक बदनाम झालाय! असे कधी होते का? असे म्हणजे कसे? कसे ही असो.. होते! म्हणजे होऊ शकते! नाही विश्वास बसत? मग वाचा हे.. खरेतर 'खरीखुरी' सत्यकथा!

कोण म्हणतो सिनेमातल्या गोष्टी सत्यात येत नाहीत म्हणून? खरेतर प्रत्यक्ष आयुष्यात सिनेमाहूनही गंमतीदार गोष्टी घडतात.. घडू शकतात. सत्य कल्पनेहूनही जास्त रोचक असू शकते. एका तामिळ का कुठल्याश्या दाक्षिणात्य सिनेमात कुणाचे ह्रदय एकाएकी उडत दुसऱ्या कुणा पेशंटच्या छातीत जाऊन बसते असे काही पाहिलेले आठवते. आपल्या देदीप्यमान कर्तृत्वाच्या ऐतिहासिक पूर्वजांच्या काळी हे घडलेच नसेल असे छातीठोक कुणी सांगू शकेल? म्हणजे पुराणातली वांगी पुराणात ठेवून त्यांचे निरूत्साहाच्या भरात भरीत करणारे भारतीय आम्ही! त्या वारशाचा अभिमान बाळगत हे असले काही घडू शकते एवढेच काही सांगायचे इकडे. त्यामुळे आता मूळ मुद्द्यावर यावयास हरकत नाही!

म्हणजे झाले असे.. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही..

***

त्यादिवशी माझी पार्ल्याच्या 'शालिनी निवासा'तल्या तिसऱ्या मजल्यावरच्या तीनशे नऊ नंबरच्या सहानींकडे अपॉइंटमेंट होती. अपॉइंटमेंट म्हणजे नेहमीचेच. एक इन्शुरन्स एजंट दुसरे काय करणार? माणसाला 'मरणात खरोखर जग जगते' समजावून आणि पटवून देणारी जमात आमची. 'जिंदगी के साथ' आणि त्यानंतर 'जिंदगी के बाद भी' भुताटकी सारखी पाठ न सोडणारी. खरेतर जिंदगीके बाद आम्हाला मिळवायचे काही नसते. त्यातून काही फायदा मिळणार नसतो. पण मोठ्या उसूलवाला माणूस मी. त्यामुळे मोठे सहानी गेल्यावर त्यांच्या पॉलिसीचे पैसे छोट्या सहानींना मिळवून द्यायसाठी मदत करायला आलेलो मी. मिसेस सहानी कधीच वर जाऊन नवऱ्याची वाट पाहात बसलेल्या. त्यांच्यावेळीही मी अशीच मदत केलेली. आणि आता ही परत तेच. काही असो. निरपेक्ष काम कसे फळ देते हे माझ्या उदाहरणातून पटेल कुणासही. त्यासाठीच हा कथा प्रपंच.

कसा कोण जाणे.. पण तीनशे नऊ नंबर चुकला माझा. म्हणजे चुकण्यासाठी खरेतर काहीच कारण नव्हते. त्या सहानींकडे मी कमीतकमी सहा वेळा तरी येऊन गेलेलो यापूर्वी. पण व्हायचे ते होऊन जाते. तेच काही विपरीत घडले तर त्यास विधीलिखित म्हणतात. इथे घडले ते विपरीत नव्हते. आणि मुद्दाम घडवून आणल्यासारखेही नव्हते. तरी ते घडले. तेव्हा देव आणि दैवाची लीला अगाध आहे एवढे खरे!

एवढ्या प्रास्ताविकानंतर काय घडले ते ऐकायला आतुर असणार तुमचे कान. खरेतर वाचावयास डोळे आतुर म्हणायला हवे पण तशी पद्धत नाही. नयन दर्शनासाठी आतुरतात! वाचण्यासाठी नाहीत! त्यामुळे कर्णेंद्रिये आतुर झाली म्हणावयास हरकत नसावी. आता तुम्ही म्हणाल एवढे सारे सांगण्याऐवजी मुद्द्याला का घालत नाही मी हात? तर त्याला कारण माझा व्यवसाय. कुणी प्रॉस्पेक्टीव क्लायंट दिसला समजा.. तर मी त्याला काय सांगणार.. उदाहरणार्थ.. डायरेक्ट मुद्द्याला हात घालून..

"श्रीयुत अमुकअमुक.. नमस्कार. तुमच्या मृत्यूचा नि त्यानंतर तुमच्या पश्चात बायकापोरांचा काय विचार केलाय? तुम्ही नाही करणार.. पण मी केलाय.. समजा उद्या तुम्ही मेलात! उद्या काय.. आजही मरू शकता तुम्ही.. म्हणजे या आयुष्यात काहीही घडू शकते.. तर मेलात तुम्ही.. तर तुमच्या बायको आणि मुलीची काळजी वाटून आलोय.. इन्शुरन्स पॉलिसी विकायला.. घेऊन टाका.. आयुष्य क्षणभंगुर आहे.. आयुष्य म्हणजे बुडबुडा.. आयुष्य म्हणजे हवा भरलेला फुगा.. आयुष्य म्हणजे पणतीची वात.. आयुष्य म्हणजे घड्याळात वाजले सात.. आयुष्य म्हणजे तव्यावर तट्ट फुगलेली पोळी.. किंवा गॅसवर उतू जाणारे दूध.. कधीही त्यातली वाफ बाहेर पडेल.. तेव्हा घ्या ही पॉलिसी आणि जिंदगीके बादभी.. नो टेन्शन! कितीची देऊ.. साहेब.. तुमची पोझिशन पाहता.. पन्नास लाखांची देऊन टाकतो.. नाही.. इथे नाही एकावर एक फ्री!"

अशी रोखठोक विकली तर चालेल का पॉलिसी? तेथे पाहिजे जातीचे! हळूहळू उलगडून क्लायंटच्या मनात शिरावे लागते. तेव्हा तो तयार होतो पॉलिसी घ्यायला. तर असे नमनाला घडाभर तेल घालावेच लागते. त्यामुळे मूळ गोष्ट कशाबद्दल आहे हे सांगण्यापूर्वी एवढे प्रास्ताविक करणे आलेच!

तर श्री. सहानींच्या घरावरची बेल वाजवली मी. कुणी दार उघडले. ती घरातली नोकर असावी. "बसा हां.." म्हणून आत बघत म्हणाली , "दीदी, कोणीतरी आलेय."

"बसायला सांग.. येतेच.."

आतून आवाज आला. सहानींच्या घरी शुद्ध मराठी? मला कौतुक वाटले. कुठल्याशा राजकीय पक्षाच्या ॲजेंड्याने इतका फरक पडावा की सहानींच्या घरून माझी मराठी कवतुके बोलली जावी? मी बसलो खाली तोवर तो आवाज ज्या गळ्यातून आला त्या गळ्याची मालकीण.. त्या गळ्यासकट बाहेर आली.. तशीच, जशी बॉबीत डिंपल येते बाहेर. हातात बेसनाचे पीठ..

"कोण? तुम्ही..?"

हे बोलता बोलता केसांना लागलेच ते पीठ!

प्रसंग इतकाच. कोण म्हणेल सिनेमावाले काल्पनिक काही दाखवतात?

आता पुढची गोष्ट. ती.. म्हणजे बेसनात बुडालेल्या हाताची मालकीण.. वयाने कॉलेजकन्यका होती.. सुंदर आणि गोड गोल चेहऱ्याची. कामात होती किचन मध्ये. भजी करत असेल की बटाटेवडा? की ब्रेडपकोडा? काही असो. सुंदर होती. माझी बेल चुकून वाजलेली. त्याबद्दल खेद न वाटता आनंदच व्हावा अशी होती ती! अर्थात माझी चूक झाल्याचे मला खूप नंतर कळले! तोवर मी तिला सहानी आणि सहानी परिवारातलीच समजत होतो!

"आलेच हां एक मिनिटात.."

ती परत कपाळावरच्या केसात तोच हात फिरवत आणि गोड हसत म्हणाली. मी त्या दोन्ही गोष्टीकडे पाहात म्हणालो.. "थांबतो की मी!"

ती आत गेली. आता ती केसांची भजी करेल की भजीत पडतील तिचे केस?

माझ्या आठवणीत ते सहानींचे घर वेगळेच होते. अर्थात मी आलेलो ते पाच वर्षांपूर्वी. त्यात कितीतरी बदल होऊ शकतात. सहानींच्या घरी एक एक जण भव्य दिव्य अवाढव्य. त्यात ही? खुद्द गेलेले सहानी शंभर किलो वजनी गटातील. त्यांना चार काय आठ जण लागले असणार द्यायला खांदे. नाहीतर उचलणाऱ्याचेच रामनाम सत्य व्हायचे! घर ही बदलल्यासारखे वाटत होते. आणि मी बसलो तो झोपाळा.. तो तर नक्कीच नव्हता आधी. बाकी काही असो.. सहानी परिवारातली ती.. हा बदल सुंदरच होता. मी हळूच पेपर्स काढून पाहिले. पॉलिसीत कुठल्याच मुलीचे नाव नव्हते. नसू ही शकते. आणि ही शुद्ध मराठी बोलणारी सहानीकन्यका कुठून आली? असेल कुणी म्हणत मी त्या सुकांत चंद्राननेची वाट पाहू लागलो.

थोड्याच वेळात हात पुसत ती बाहेर आली. आरशातही पाहिले असावे तिने कारण केसांवरचे बेसनाचे आवरणही निघून गेलेले.

"बोला.. शंभर वर्षे आयुष्य तुम्हाला.."

ती हसत म्हणाली. तिचे पांढरे शुभ्र दात सुंदर होते.. मोत्यांसारखे. ते पाहून घेतले मी तितक्यात. माझ्यासारख्याला एलआयसीवाल्याला शंभर वर्षे आयुष्य म्हणणे म्हणजे.. इथे मी "मौत के फायदे' समजावून सांगत असतो आणि ही बाला मला शतायुषी बनवू इच्छिते! चालेल.. पॉलिसी माझी थोडीच आहे!

"हे पेपर्स आणलेले."

"तुम्ही स्वतः कशाला तसदी घेतलीत.. फोन केला असतात तर मीच आले असते.."

"खरेय.. पण मी म्हटले मदत करावी कुणाला तर हातचे राखून कशाला. मी तुम्हाला गाइड करतो. सह्या कुठे कुठे करून घ्यायच्या त्या."

"तशी कल्पना आहे मला. अहो हेच तर करते मी काम. कॉलेज सांभाळून."

"काय सांगता काय? काका गेले त्यांचे पेपर्स माझ्याकडे आहेत.."

"काका गेले.. हां.. ते तर कधीच गेले. पण तुम्हाला पेपर दिले त्यांनी?"

"नाही हो.. ते कसे देतील?"

मेलेला माणूस तो. संत सांगून गेले.. खाली हाथ आया है.. वैसाहिच जाएगा.. मग काका काय पॉलिसी घेऊन जाणार? तरी काकांनी नव्वदी गाठलेली. सहानी काका म्हणजे वजनदार पण मजबूत हड्डी. पण तरी पॉलिसी वर जाता जाता वाट वाकडी करून आपल्या एजंटकडे ड्रॉप करण्याइतका काही कर्तव्यनिष्ठ नसणार नव्वदीतला तो म्हातारा.

"त्यांनी नाही दिले.. मग तुम्हाला कुठून मिळाले पेपर्स?"

"कुठून मिळणार? माझ्याकडे असतो सारा रेकॉर्ड!"

मी म्हणालो तर ती सुबक कन्या थोडी विचारात पडली.

असतील कुठले तरी पेपर्स असा चेहरा झाला तिचा. मी पेपर काढणार आतून इतक्यात "येतेच हां" म्हणत ती रम्य बाला आत गेली.

सहानींकडे आधी होते सहा जण. त्यातले मोठे दोन म्हणजे मि.अँड मिसेस सीनियर सहानी गेले. बाकी चार भाऊ. त्यातले तिघे लग्न झालेले. चौथा तसा तरूण. त्याची तर ही नाही ना घरवाली.. असा विचार करता करता वाटले.. नाही, ही तर कॉलेजात जाणारी कन्या. तीच तिच्या मृदू आवाजात सांगून गेलीय तसे. कितीही संतूर चोपडला दररोज तरी त्वचा से उम्र का पता तो लगता ही है! मी बसलो होतो तोवर त्या दरवाजा उघडणाऱ्या बाईने कोकम सरबत आणून दिले.

कुण्या विमा एजंटच्या स्वागताची ही पहिलीच वेळ असावी. बाकी कुठलीतरी पॉलिसी मारेल हा गळ्यात म्हणून लोक टाळतात आम्हाला. आणि अशा रीतीने म्हणजे सहानी काकांच्या देवाघरी जाण्यासारखे काही कारण मिळाले की मगच स्वागत होते आमचे! कोकम सरबत छानच होते. आजकालच्या तरूण पोरी जेवण कसल्या बनवतायत .. स्वयंपाक खोलीत शिरत देखील नाहीत. त्यात ही तरूण कन्यका स्वहस्ते भज्या तळते काय नि सरबत पाजते काय!

ही वेळ तिच्याबद्दल विचार करण्याची नव्हती खरेतर. पण होतीच ती तशी. आणि कुठल्या क्लाएंटच्या घरी जाऊन तिथल्याच कुणाशी सूत जमवणे.. तसे अगदीच विमा एजंटच्या एथिक्स बाहेर नव्हते. तरी पाच सात मिनिटांच्या संपर्कात असला विचार माझ्या अविचारी आणि अचपळ मनाने करावा? तसा मी उपवर झालेलो. एलिजिबल बॅचलर म्हणून आमच्या जवळील कुटुंबात प्रसिद्ध होतो मी. घरी तशा हालचाली सुरू होत्या. मीच 'यंदा कर्तव्य नाही'चा बोर्ड लावून बसलेलो. कारण एकच.. अशा  जमवून केलेल्या विवाहांवर माझा विश्वास नाही. मुलगी बघण्याच्या त्या पाच दहा मिनिटांत काय कळणार मला.. किंवा तिला ही? हे माझेच मत आणि आता पाच मिनिटे काय झाली या कन्यकेस पाहून, तर माझे अचपळ मन नावरे आवरीता? सहानींच्या तरूणीमुळे मी असा विचार करीत असतानाच माझ्यापुढे बटाटेवडे आणि चटणी ठेवली गेली. गरमागरम वडे आणि खास दह्यातली चटणी! म्हणजे हा सारा सरंजाम म्हणा किंवा खटाटोप म्हणा माझ्या स्वागतासाठी होता तर. मागे सहानी आजी गेली तेव्हा एक ग्लास पाणी.. तेही मागितले मी तेव्हा मिळालेले मला. तिची पॉलिसी तशी दोन लाखांचीच होती आणि हे भक्कम सहानी काका मरणोत्तर पन्नास लाखांचे धनी. स्वागतात फरक तर असायचाच. वडे मस्त होते. कन्येच्या हातात खरेच जादू होती.

"अजून घ्या बरं का.."

आतून तोच मंजूळ आवाज आला. मी कशाला नाही म्हणतोय. 'माझ्या मना हाण रगड.. हा वडा फुकट आहे' .. मी मागे वाचलेली एक विडंबन कविता आठवली आणि अजून एक वडा उचलला! पाठोपाठ चहा आला. तो ही वेलची-आले घातलेला. सहानी मंडळी खूश होती... माझ्यावर की काका सहानी गेल्यामुळे? काही असो खायला तर छान मिळाले पोटभर. सुगरण दिसतेय कन्यका! सुंदर.. सुशील.. सुगरण.. गृहकृत्यदक्ष.. मला विशेषणे सुचली तिच्यासाठी आणि कुठल्याही वधू पाहिजेच्या ॲड मध्ये याहून वेगळे काय असते? सहानी काका गेल्याबद्दल मलाही आनंद व्हायला हवा का? फक्त ही कन्यका आणि माझी भाषा जुळत नसल्यास घरून परवानगी मिळेल काय? जणू बाकी सारे जुळत असावे अशा रीतीने मी विचार करत होतो वड्याच्या घासाबरोबर आणि चहाच्या घोटाबरोबर! तृप्त होऊन मी ढेकर देणार होतो.

तेवढ्यात तीच आली बाहेर..

"तुम्ही काही घेतलेच नाहीत."

तिच्या मंजूळ आवाजात ती म्हणाली. मी अजून वडा उचललाही असता पण पोटात अजिबात जागा नव्हती.

"तुम्ही असे करा.. बाबा आता नाहीत.. तर उद्या येऊ शकाल?"

"उद्या.. दुपारी? की संध्याकाळी येऊ?"

येताना पोट रिकामे ठेवून यायला हवे.. मी तितक्यात हा विचारही केला!

"संध्याकाळी जमेल ना तुम्हाला?"

"हो.. येतो. पेपर देऊन जाऊ?"

"चालेल.. नाहीतर उद्या घेऊन याल?"

"नाही.. वाचून ठेवा. मग उद्या डिस्कस करू.."

"चालेल."

तिच्या हाती फाईल सोपवली मी. तिने ती बाजूला ठेऊन दिली. आणि मी परत निघालो. उद्याचा मेनू काय असेल याचा विचार करत!

बटाटेवड्यांची रेंगाळणारी जिभेवरची चव घेऊन मी जिना उतरलो. खरेतर त्या कन्यकेस मनात साठवूनही निघालो. उद्या परत मिलने का वादा है.. फाईल सोडलीय तर सहानींकडे उद्या जावेच लागेल. आणि काय वाढून ठेवतील पुढ्यात ते खावेच लागेल! धुनकीत मी निघालो. वडे पचतील अशा स्पीडने चालत!