On the occasion of Friendship Day in Marathi Biography by Dr.Swati More books and stories PDF | मैत्री दिनानिमित्त

Featured Books
Categories
Share

मैत्री दिनानिमित्त




"मम्मी उद्या आहे फ्रेंडशिप डे ,
आणि क्लासहून मी परस्पर जाणार आहे मैत्रिणीकडे..."

माझ्या मुलीने माझं लिखाण वाचून वाचून जुळवलेलं यमक 😅😅

"अरेच्चा, आपल्या कसं आलं नाही हे ध्यानी...
माझे काय प्लॅन आहेत बरं मैत्रीदिनी.."🤔🤔

आता प्लॅन करायचं म्हटलं तर एकच मैत्र नाही ना मला.. वेगवेगळ्या टप्यावर , वाटेवर भेटलेले ढिगाने आहेत..

माझ्या लेकीचं बरं आहे... तिला सध्या तरी एकच बेस्ट फ्रेंड आहे..

असू शकतं ना असं..

एकच मैत्र जो सर्वार्थाने परिपूर्ण...

की....

आपल्या वेगवेगळ्या भावना आणि वेगवेगळ्या आवडींसाठी ,त्या जपण्यासाठी वेगवेगळे मित्र वा मैत्रिणी ??

विचार करण्यासारखी गोष्ट आहे ....

असू शकतं किंवा नाहीही....

बघा ना... आपले खूप सारे मित्र असतात आणि त्यांचं असं प्रत्येकाचं काहीतरी खास!!
व्यक्ती तितक्या प्रकृती ....
अर्थात त्या प्रकृतीही हव्या हव्याशा वाटणाऱ्या..

एखादा मित्र जणू आपला आरसाच असतो... जो आपल्या चुका परखडपणे दाखवत त्या सुधारण्यास फक्त उद्युक्तच नाही तर भाग पाडतो....

एखाद्यासोबत स्पेशल म्युजिकल नातं....गाण्यात ,कवितेत रममाण करणारं...

एखाद्यासोबत केवळ फक्कड चहा-कॉफी पिण्यापुरतंच आणि नको त्या उठाठेवी करता येणारं नातं....
😄😄

एखादं बौद्धिक नातं, ज्याच्याशी पुस्तकी चर्चा करता येतात...

बाहेर ट्रेकिंग, फिरायला किंवा शॉपिंगला जाताना एखादी खासच मैत्रीण ....

अशी खूप सारे मित्र....

ज्याचं त्याचं आयुष्य किंवा ज्याचा त्याचा चॉईस....

कोणाला एकाच व्यक्तीमध्ये सगळं मिळत तर कोणाकडे अशी मित्र मैत्रिणींची फौज असते...

दोन्हीही छान आहे...

मनात आलेल्या वेगवेगळ्या भावना, चांगले वाईट विचार यांचा निचरा होऊ द्यावं असा ज्यांच्या आयुष्यात माणूस नसेल त्यांची काय घालमेल होत असेल?

अपि संपूर्णतायुक्तैः कर्तव्या: सुहृद: बुधै ।

नदिश: परिपूर्णोsपि चंद्रोदयम अपेक्षते ।।

हे सुभाषित मित्र का जोडावे हे सांगते. जरी कोणी सर्वार्थाने परिपूर्ण असला, तरी शहाण्या माणसाने मित्र जोडावे. समुद्र जरी पाण्याने परिपूर्ण असला, तरी त्या पाण्याला उधाण येण्यासाठी त्याला त्याचा मित्र चंद्राची वाट पहावी लागते.

असेच आपल्या आयुष्यातही मैत्र गरजेचे आहेत...

आजच्या या व्यस्त जगात संवाद साधणं किती गरजेचं झालं आहे ना !

आपण कधीकधी हृदयात असलेले शब्द ओठापर्यंत आणत नाही,त्या आधीच गिळून टाकतो.. संताप, असहायता, दुःख आणि क्वचित आनंदही शब्दात व्यक्त करणं जमत नाही.
बरेचदा आपल्याला वाटतं की , 'मला नक्की काय होतंय, काय वाटतंय, काय सांगायचय' हे नाहीच कळणार समोरच्याला, मग बोलून काय उपयोग!

मग सुरू होते एक विचित्र घुसमट. हे असचं चालू राहिलं तर एका टप्प्यानंतर येते नैराश्यता. यातून बाहेर पडण्यासाठी काहीजण मग नको त्या वाम मार्गालाही लागतात किंवा डॉक्टरच्या फेऱ्या सुरू होतात...

मित्रांनो कसंही, कुठंही, कोणाकडेही, पण व्यक्त होत राहणं गरजेचं..
मानसशास्त्र सांगतं कि आपल्या भावना आणि विचार व्यक्त न करण्याचे मन:स्वास्थ्यावर फार दूरगामी परिणाम होऊ शकतात, प्रारंभी किरकोळ वाटणारे हे बदल अगदी गंभीर स्वरूप घेऊ शकतात...मन मोकळं केलं तर कदाचित मोकळा श्वास घेता येतो, तो आपण घेऊया..

कारण , नुसतं आपलं ऐकून घेतल्यानंतरही किंवा कोणाच्या तरी निव्वळ सोबतीनेही आपण किती मोकळे होतो. भाव-भावनांचा निचरा झाल्यासारखं वाटतं. "Emotional perging" किंवा "Emotional Detox" ही टर्म आपण प्रत्यक्ष अनुभवतो.

थोडक्यात मित्र किंवा मैत्री म्हणजे काय तर...

काहीही न बोलता डोळ्यातले भाव वाचते ती " मैत्री"

"मी ठीक आहे" असं फोन वर बोलत असताना आपल्या मनातली वादळे ओळखते ती " मैत्री"

संकटे येतात तेंव्हा खंबीरपणे पाठीशी उभी राहते ती "मैत्री"
स्वतःच्या डोळ्यातल्या अश्रूंना थांबवून समोरच्याचे डोळे पुसते ती " मैत्री"

दुःखात एकटेपणात ज्या आठवणींनींनी ओठांवर हसू फुलते ती " मैत्री".

आपली फालतू बडबड कंटाळा न करता ऐकून घेते तीही "मैत्री"...

मी रागात असताना स्वतः शांत राहून माझ्या चार शिव्या खाते तीही "मैत्री" 😄😄..

माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्पयावर मला भेटलेल्या सगळ्या मित्र मैत्रिणींना ...

खूप वर्ष लांब राहूनही मला अजिबात न विसरणाऱ्या , माझ्या चुका , माझी बडबड सगळीकडे दुर्लक्ष करून मला एक चांगली मैत्रीण बनवणाऱ्या माझ्या सगळ्या मित्र मैत्रिणींना मैत्री दिनाच्या शुभेच्छा. 💐💐💐💞💞