अन्वयार्थ
माधवने उशीवरचा कागद उचलला. अक्षर कल्याणीचे होते.त्याने वाचायला सुरुवात केली:
प्रिय,
हे लिखाण हातात असेल तेव्हा-
मी तुमच्याजवळ नसेन.
हे सारे वाचल्यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल?
हे बघण्याची किंवा ऐकण्याच धाडस माझ्यात नाही.
गेल्या कित्येक वर्षात ह्रदयात दडवून ठेवलेलं एक काळं सत्य.
त्यामुळे झालेली घुसमट---आलेला ताण असह्य झालाय.
खर म्हणजे हे मी पूर्वीच सांगायला हवं होत.
अगदी आपल्या लग्नापूर्वी---!
पण मला ते धैर्य झाल नाही---- किंवा मला ते करू दिल गेल नाही.
गेली पंचवीस वर्षे हा गुंता असाच घेवून मी जगत राहिले.
आयुष्य म्हणजे एक गुंतावळच आहे .नाही का?
एखादी गाठ सोडवायला जावं आणि आणखी चार गाठी बसाव्या तसच---!
पण शब्द बाहेर पडले नाहीत.
ही गुंतावळ अजून वाढवायची नव्हती मला.
कारण त्यामुळे अनेकांच आयुष्य पणाला लागल असत.
पण आज हे सांगून मी तुमच्या जीवनात बदल तर निर्माण करणार नाही ना?
काही वेळा अज्ञान फायद्याच ठरतें.
पण मी तडफडत राहिला असते.
तुमचा शांत व हसरा चेहरा बघून माझ्या ह्रदयात कालवाकालव व्हायची.
मी तुमची फसवणूक करतेय या जाणिवेने मी कुढत राहिले.
पण अखेर आज हातात पेन घेतलय---स्वतःला मोकळ करण्यासाठी--------
मी त्यावेळी एकोणीस वर्षाची अल्लड मुलगी होते.
सतत हसणारी----खोड्या करणारी ---दुनियेच्या भल्या-बुर्यापासून अलिप्त-अस्पर्श.
ताईच चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते.
घरी पप्पा मम्मीसोबत मी एकटीच होते.सार्यांची लाडकी होते मी!
फुलपाखरासारख माझ आयुष्य होत .
पण अचानक एक वादळ घोंघावत माझ्या दिशेने आल.
पार उध्वस्त करून गेल मला.
ताईच्या लग्नाला चार वर्ष होऊनही मूलबाळ नव्हते.
उपास-तपास,व्रत,देवाला नवस सारे प्रयत्न फोल ठरले होते.
सासरच्यांना वंशाचा दिवा पाहिजे होता.
अखेर सार्या चाचण्या पार पडल्या.
आणि कळाल की ताई कधीच आई बनणार नव्हती.
आम्हा सर्वांवर हा आघात होता.
मूल नाही तर ताईचा संसार वाचणे अशक्य होते.
सार्यांची डोकी बधीर झाली होती.सारे हताश झाले होते.
मलाही खूप वाईट वाटलं. पण नियती पुढे कोणाचही चालत नाही.
पप्पा -मम्मी उदास राहू लागले.आपल्या लेकिचा संसार आपल्या डोळ्यासमोर उध्वस्त होतोय हे बघून ते पार कोलमडले .
ताईला जीवन निरर्थक वाटू लागले.भावोजीं सतत येता-जाता चिडचिड करू लागले.
अशातच काही दिवस गेले.
एके दिवशी भावोजी आपल्या डाॅक्टर मित्रासोबत आमच्या घरी आले.
मी काॅलेजचा अभ्यास करत बसले होते.पप्पा-मम्मी,भावोजी व डाॅक्टर हे पप्पांच्या खोलीत तासभर चर्चा करत होते.
भावोजी निघून गेल्यावर आईने मला बोलावून घेतले.
तिने मला जे सांगितले-ते ऐकल्यावर माझ सार शरीर थिजून गेल.
डोक गरगरायला लागल----हरवलेल्या नजरेने मी फक्त समोर बघत राहिले. आई म्हणत होती:
"रेवती ,ताईचा संसार वाचविणे आता तुझ्या हाती आहे. आई बनण्याचं सुख तिला कधिही लाभणार नाही---तुझ्या ताईत दोष आहे हे कळल्यावर तिची सासरची मंडळी तिला घटस्फ़ोट द्यायला भावोजींनी प्रवृत्त करतील.आता सायन्स पुढे गेलय---सार्या गोष्टींवर उपाय आहेत.पुरूषांचे शुक्राणू---सक्षम स्रीच्या अंडाशयात सोडून गर्भधारणा करता येते.परदेशात यासाठी योग्य स्रीच गर्भाशय पैसे देवून वापरलं जात.तिने मुलाला जन्म दिल्यावर तिच काम संपत. पण त्रयस्थ स्रीमुळे पुढे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात.म्हणून--- म्हणूनच ताईचा संसार वाचविण्यासाठी तू---तू हे काम कर!"
बस्स, हे ऐकल्यावर माझ सार भान हरपले.
अवघी एकोणीस वर्षाची होते मी.
लग्न,मूल या गोष्टींचा अर्थही मला कळत नव्हता.
आणि माझी आई मला माझ्या गर्भाशयात भावोजींनी अंश वाढवायला सांगत होती.त्यामुळे म्हणे माझ्या कौमार्याला धक्का लागणार नव्हता.शरीराच पावित्र्य अबाधित राहणार होत.पप्पां-मम्मी,ताई-भावोजीं व मी या व्यतिरिक्त हे कुणालाही कळणार नव्हते-याची खात्री आई देत होती.
माझ्या मनावर असंख्य आघात होत होते.
हे सारं एवड सोपं होत त्यांच्यासाठी.
पण ---पण माझ्या मनाचं काय---माझ्या मनाचं पावित्र्य अबाधित राहणार होत काय? मनाच्या जखमा कधी भरणार होत्या काय?नऊ महिने उदरात वाढविलेल्या बाळाशी शरीराने---मनाने व भावनिक दृष्टीने मी जुळणार नव्हते काय?
मी दोन दिवस स्वःताला खोलीत कोंडून घेतले.
पण माझे कोण ऐकणार होत?पप्पा-मम्मींनी स्वतःला संपविण्याचा धमकी दिली. एका मुलीचा संसार वाचविण्यासाठी ते दुसर्या मुलीला पणाला लावत होते.
महाभारत काळापूर्वी कुण्या माधवी नामक मुलीनं पित्याचा यज्ञ पूर्ण व्हावा म्हणून चार वेळा चार राजांना पुत्रप्राप्तीसाठी स्वतःच शरीर वापरू दिल होत.तरी म्हणे ती अक्षयकुमारीका होती.याच माधवीच स्वयंवर पित्याने ठेवले.त्यावेळी तिने उपस्थित पुरूषांना खडसावले.स्रीच्या शरीराशी, मनाशी खेळणार्या---तिची घोर विटंबना करणार्या पुरूषांचा धिक्कार करत भर स्वंयवरातून---सर्वस्वाचात्याग करून ती वनात निघून गेली होती.
पण मी अगतिक होते.
एक अबोध मुलगी काय करणार होती?
अखेर मी हार पत्करली.
अनेक भयावह चाचण्या पार करून माझ्या अंडाशयात भावोजींचे शुक्राणू सोडण्यात आले आणि मला माझ्या शरीरातील बदलाची जाणीव झाली.
मातृत्व म्हणजे निसर्गाने स्रीला दिलेली अमूल्य देणगी.
नवजात बालकाच्या नुसत्या दर्शनाने तिच्या आयुष्याचं सार्थक होत.
पण माझ्यासाठी तो प्रसंग भयावह होता.
माझ्या शरीरात दिवसेंदिवस ते बालक आकार घेत होत.
आई आणि ताई माझी काळजी घेत होत्या.
पप्पां अप्पर जिल्हाधिकारी,तर आई तहसीलदार होती.त्यामुळे कोणतीही योजना नियोजनबध्द रीतीने पार पाडण्यात त्यांचा हातखंडा होता.
या कानाची खबर त्या कानाला लागू न देता त्यांनी अत्यंत हुशारीने सारे पार पाडले.
मी फक्त बाहुली होते.मन व भावना नसलेली.
कुणी नाचवेल तशी नाचणारी.
अखेर एका दिवशी मी एका बालकाला- जो सुदैवाने मुलगा होता--- जन्म दिला.
मी कुमार माता---नव्हे कौमार्यभंग न पावलेली माता होते.
सार्यांना आनंद झाला. ताईच्या संसार वाचला.
पण माझ भावविश्व भकास झाल.
आणखी दोन महिने मी ताई सोबत होते.बाळाला पाजण्यासाठी---त्यानंतर बाळाला माझ्यापासून दूर करण्यात आल. माझ्या ह्रदयात कालवाकालव झाली.
मी स्वतःला हरवून बसले. अबोल झाले.
मी स्वतःला एका कोषात कोंबून घेतल.
माझ्या बलिदान बक्षीस म्हणून पप्पांनी आपली सारी संपत्ती माझ्या नावे करायचे ठरवलं.
पण मी ठाम नकार दिला.
मला आता कशातच रस नव्हता.
मन कशातच रमत नव्हत. कधी कधी ते गोजीर मुख आठवायच.----मन तडफडायच.
पण मी निश्चयाने मन आवरल.
मी आयुष्यभर एकटी-एकाकी राहयच ठरवलं.
पण पुन्हा मी घरच्यांच्या आग्रहाला बळी पडले.
कुणितरी तुमच स्थळ आणल---मी गप्प राहिले---त्यालाच होकार समजल गेलं.
तुमच्या गळ्यात वरमाळ घालून मी तुमची अर्धांगिनी झाले.
मनावर प्रचंड दडपण होत.मी तुम्हाला फसवतेय याची सतत जाणीव होत होती मला.
मी सतत चिडचिड करत राहिले. पण तुम्ही सगळं शांतपणे घेतलं.
कधी कधी मी झोपेतून दचकून जागी व्हायचे.
मग तुम्हीही कासावीस होत होता.खूपदा वाटल सार सांगून टाकाव---मोकळं व्हावं.
मग पप्पां-मम्मी,ताई-भावोजीं आणि तो गोंडस चेहरा आठवायचा. मी गप्प व्हायचे.बघता-बघता आपल्या संसार वेलीवर दोन फुल फुलली.
खरं तर मी कुठं गुंतायच नाही अस ठरवलं होत.
पण नकळत मी तुमच्यात गुंतत चालले होते. खर्या प्रेमाची जाणीव मला झाली.पण एकीकडे मी ते सतत नाकारत राहिले.मी माहेराला जाणे टाकले.ताईच्या सावलीपासूनही मी दूर राहिले.
प्रणव व प्रणिता आजी- आजोबा, मावशीबद्दल विचारायचे पण मी कठोरपणे त्यांना फटकारत राहिले.तुम्हीही मला माझ्या या अजब वागण्याबद्दल कधिही विचारल नाही. तो तुमचा समंजसपणाच होता.
मला गुंता वाढवायचा नव्हता. त्या कटू आठवणी टाळायच्या होत्या.
पण नियतीने मला पुन्हा त्याच मार्गावर आणलं.
जग छोटं आहे याची जाणीव झाली.
काल मी सिटी हाॅस्पिटलमध्ये ज्या डाॅक्टरकडे गेले होते,त्याने मला बघितल्याबरोबर सांगितले,"तुम्ही हुबेहूब माझ्या आईसारख्या दिसता."
मी दचकले. पाटीवरच नाव बघितल आणि सारे विश्व माझ्याभोवती गरागरा फिरतेय अस वाटल.तिथून पळून जावंस वाटल.
होय,तो माझाच---माझ्या उदरात वाढलेला मुलगा होता.
वात्सल्य व अनामिक भिती एकाचवेळी मनात निर्माण झाली.
मी जे टाळत होते तेच घडल होतं.दैवाने पुन्हा फासे उलटे टाकले होते.
.मी उघडपणे काहीच बोलू शकत नव्हते.
तो याच शहरात होता.सतत समोर येत राहणार होता.
मी ठरवल---की मला तुम्हाला सार सांगायचय---
जे समोर सांगायच धाडस नव्हते --- ते लिहून ठेवले.
प्रणव व प्रणिताला यातला काहिच सांगू नका.ती दोघं कोलमडतील.माझा तिरस्कार करतील.मी आत्महत्या करणार नाही. ---पण त्या माधवीसारख सगळं सोडून मी दूर कुठेतरी निघून जाईन. मला क्षमा करा!
------माधव विषण्ण झाला.त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले.आपल्या पत्नीने गेली तेवीस वर्षे किती दडपणाखाली आपल्या संसारात आपल्याला साथ दिली.ज्यात तिचा दोष नाही त्या घटनांसाठी ती जळत राहिली---कुढत राहिली.याची जाणीव त्याला झाली.त्याला वाटल, आज कल्याणी आपल्याला सर्वाथाने कळली.माधवने मनात काही निश्चय केला.कल्याणी कुठे असेल---याचा त्याला अंदाज आला.आणि गाडीची चावी घेवून तो बाहेर पडला.त्याची गाडी लोणावळ्याच्या मनःशांती केंद्राचा दिशेने पळू लागली.