Black Tea in Marathi Short Stories by suhas v kolekar सुविकोळेकर books and stories PDF | काळा चहा ...

Featured Books
Categories
Share

काळा चहा ...


काळा चहा. . .
जनार्दन आज लवकरच उठला .तारीख होती आज कोर्टाची . सरिता त्याची बायको. माहेरच्या संपत्तीची जमिनीच्या तुकड्याची कायदेशीरपणे वाटणी व्हावी यासाठी तिच्यात भावात वाद सुरु होता.सकाळची गुरांना वैरणपाणी करुन ११ ला कोर्टात हजर होण्यासाठीच त्याची लगबग.सरितान सुद्धा लहानग्या मुलीच्या प्रगतीच्या शाळेचा खाडा करुन तिला तालुक्याला फिरायला जायचंय म्हणुन तेल पावडर करुन चहा बटर खायला घालुन तयार केली भाबडी पोर ती.तिला काय माहित आपले आई बाबा तारखेला चाललेत.
जनार्दनने आपली सी.डी १०० होंडा काढली मुलगीला मधे बसवुन सरितासह तो उमरखेड तालुक्याला निघाला.
सरिता अधुनमधुन " सावकाश घ्या" म्हणुन सांगायची.
तिच्याकडे दुर्लक्ष करत तो खड्डा येताच "आवळुन धरा" म्हणत गाडी रेमटायचा.

जनार्दनला आधीपासुनच कोर्ट कचेरीच्या खाचाखोचा माहित असलेने तो सराईतपणे वागत होता.
कोर्टाच्या लोकांनी गजबजलेल्या वातावरणात छोटी प्रगती मात्र गांगरुन गेली.अक्षरशः रडकुंडीला आली.
पण तिच्या कडे पहायला वेळ कोणालाच नव्हता.
जनार्दन वकिलांच्या सोबत चर्चा करत होता.
अशातच एक आगळीक घडली.तिला कुठुनसा मामा येताना दिसला."मामा" म्हणुन तिने हाक मारली. तिचा मामा उत्तमसुध्दा तारखेला आला होता.
क्षणभर मामासुध्दा ओळखीच्या आवाजाने कावराबावरा झाला.प्रगतीला मामाकडे जायचे होते.मामाला तर भाचीला जाऊन घ्यावे असे मनापासून वाटत होते..पण सरिता त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत होती. बराच वेळ झाला होता,
इतक्यात "ओ . . . . श्री वाढवे वकील " असा आवाज झाला .सगळेजण कोर्टात गेले. कोर्टासमोर वकिलांनी मामाला काही प्रश्न विचारले. कोर्टाने पुढची तारीख दिली.
एव्हाना दुपारचा दीड वाजला होता. प्रगती मात्र पेंगुऴली होती.तिला मात्र मामांकडे कुणीच नेले नाही.
इकडे उत्तम एकटाच तालुक्याला आला होता.त्याच्याकडे गाडी वगैरे काहीच नव्हतं .म्हणुन तो वडापकडे(खाजगी वाहतुक)चालु लागला.जनार्दन व सरिता चहा घेऊन घरच्या वाटेला लागले.दोघांनी उत्तम ला "वडाप"च्या ठिकाणी पाहिले पण ओळख न दाखवता पुढे जाणार एवढ्यात पुन्हा प्रगती ओरडली "मामा" .उत्तम मामाही थोडासा गाडीमागुन धावला पण तोही थांबला.आतामात्र इवल्या प्रगतीला कळुन चुकले.आपलं कुणी ऐकणार नाही ती धावत्या गाडीवरच झोपी गेली.सरिताची दोन्हीं कडुन कोंडी झाली होती.पण ती नवर्‍याची बाजू घेत होती.इश्टेटीतील कमी ज्यादा तिल कळत नव्हत.पण इलाज नव्हता.जनार्दन मात्र नेहमीच्या वेगात गाडी चालवत मनातच मांडे खात भविष्यातील स्वप्नरंजन करत होता.रस्ता अरुंद होता समोरुन येणाऱा ऊसाचा ट्रक व त्याला पार करुन येणारी महिंद्रा जीप यात थांबावे कुठे की बाजुला जावे हे जनार्दनला कळंले नाही.त्याची दुचाकी जाऊन जीपला धडकली.अन प्रगतीसह सरिता बाजुला फेकली गेली. जनार्दन गाडीसोबत फरपटत गेला.
गर्दी झाली कोण कुठला काय सगळे लोक चोैकशी करु लागले.इकडे उत्तम सुध्दा तिथपर्यंत वडापने पोचला होता.पण अपघातग्रस्तात आपलेच लोक आहेत हे त्याच्या मनाला शिवलेही नाही.तरीही कुतुहलापोटी तो गाडीतून उतरला अन पाहतोय तर हे तिघे रक्ताळलेल्या शरिराने पडलेले दिसले.नुकतंच कोर्टात दावा लढवलेले त्याचे मन हेलावले जीवाच्या आकांतान "आरं माझी माणसं हायतं ही,आरं पुरगीला उचला किरं मामा हाय मी तिजा , ही माझी भन हाय, दाजी ऊठा कि वं "असं बरळत गयावया करु लागला. . . .. .
वडापवाल्याच्या हातापाया पडुन तिघांना त्याच्या गाडीतुन
पुन्हा तालुक्याला दवाखान्यात नेले.तिथं कसं बसं दाखल करुन घेतलं.आैषधोपचार सुरु झाल.जनार्दनच्या पायात सळी टाकावी लागेल म्हणुन सांगितले.प्रगतीच्या फक्त डोक्याला जखम होती.सरिताच्या खांदा दुखावला होता व चेहरा सुजला होता..पाव्हणेरावळे बघायला दवाखान्यात गर्दी करु लागले.बघुन फळे बिस्कीटे ठेवुन जाऊ निघुन जाऊ लागली.
दवाखान्याचे बिल दिवसेंदिवस वाढत होते.डॉक्टर फाटक्या उत्तम ला तशी कल्पना देत होते.तोही तुमचा एक रुपयाही ठेवणार नाही म्हणत होता.
सात दिवस झाले त्या दोघींना घरी सोडायचे होते.डॉक्टर बिल सांगुन गेले.आणि उत्तम सकाळीच गायब झाला.
सरिताला वाटले बिल भरायला लागेल म्हणुन तो गायब झाला.जनार्दन ची बिकट अवस्था होती अशा परिस्थितींत तो काहीच करु शकत नव्हता.सायंकाळ झाली अन् सरिताला हुंदका आला बिल भरा व डिस्चार्ज घ्या म्हणुन
नर्स पाठीमागे लागल्या होत्या.बाजुचे पेशंट विचित्र नजरेने पहात होते.
एवढयात पुन्हा 'मामा'म्हणुन प्रगतीने हाक मारली.समोरुन उत्तम हातात दोरी घेऊन आला होता.हातातील दोरी पाहुन सरिता रागाने बोलणार तोच प्रगतीला उचलत उत्तम म्हणाला" चला घरी जायचं ."
सरिता काही न बोलता तयार झाली जनार्दन चे अॉपरेशन बाकी होते त्याला अजुन एक आठवडा थांबावेच लागणार होते.यांना सोडुन माघारी येतो म्हणुन उत्तम निघाला.
जनार्दन" बिल? "असं विचारताच "भरलं" एवढंच उत्तम म्हणाला.सरिताला तिच्या घरी सोडुन हा पुन्हा दवाखान्यात आला.मेहुणा दाजी दोघेच होते.पण बोलत काहीच नव्हते.
यथावकाश जनार्दनला वॉकरसह डिस्चार्ज मिळाला. बिल साहजिकच उत्तम भागवत होता . सरिता व जनार्दनला आश्चर्यमिश्रित शंका वाटली.पण बोलले नाही कुणीच.न्यायला सगळेच आले प्रगती , सरिता, उत्तम व त्याची बायको उषा.
दवाखान्यातुन निघणारच तोवर उषा म्हणाली "ताई दोन दिवस सगळीच चला आमच्याकडे,नंतर जावा घराकडे"
नाय नको करत उभ्या उभ्याउभ्या माहेरी जावं असं वाटलंच सरिताला.
सगळे उत्तमच्या घरी गेले.लगबगीने उषाने सर्वांना चहा टाकला पण तिच्या लक्षात आले नाही की दूध नाही.
अाता पाहुण्यांदेखत बाहेर कसं जाणार म्हणुन कोरा/काळा चहाच तिने सर्वांना दिला.सगळयांनी वेळ मारुन तसाच पिला.पण सरिताने बिनदूधाचा चहा का ? हे हळुच विचारले तर
उषाने सांगितलंच कि दवाखान्याचे बिल भरायचे म्हणुन गोठ्यातल्या तिन्ही म्हैंशी उत्तम ने पडत्या किमतीने विकुन टाकल्या होत्या.
सरिताने सदर गोष्ट जनार्दन ला सांगताच.त्याला आपल्या क्रुत्याचा खूप पश्चात्ताप झाला.कठिण प्रसंगातही कटुता न दाखवणार्या उत्तमचे त्याने पाय धरलें ."उत्तमराव जमिनीचा दावा आमच्याकडुन संपला" म्हणत तो स्फुंदु लागला.
सरितापण रडु लागली.उत्तमला काहीच बोलता आले नाही. पण कोर्टाच्या फेर्‍या आता संपणार याचा त्याला आनंदच झाला.. . .
गंभीर प्रसंगी माणसाने कसे वागावे याचा 'उत्तम 'पाठच त्याने दाखवून दिला. . .

सुहास वि.कोळेकर.
मारुल हवेली ता.पाटण
जि.सातारा ४१५२१२
भ्र. ८६००७७‍१०१०