मार्च महिना सुरू झाला. प्रचंड उकाडा आणि घामाच्या धारा, घरातून बाहेर पडणंही नको नकोसं वाटत होतं..
माझं मन मात्र दुसऱ्याच गोष्टीमुळे अस्वस्थ झालं होतं. "महाराष्ट्र देशा" ग्रुपवरती नेहमी प्रमाणे ट्रेकच्या जाहिराती येत होत्या..त्यातील काही ट्रेक तर आम्हा दोघांचे ड्रीम ट्रेक होते.. पण माझ्या मनाने आणि शरीराने वाढत्या उन्हाळ्यापुढे हार मानली होती .. ते ट्रेकसाठी तयारचं होत नव्हतं.. अनिलची जायची खूप इच्छा होती परंतु बायको नाही येत म्हटल्यावर त्यानेही बायकोच्या प्रेमाखातर म्हणा किंवा खूप समजूतदार नवरा म्हणा .. ( आपण एकटे हिला सोडून ट्रेकला गेलो तर त्याचे काय दुष्परिणाम होतील हे त्याने एवढ्या वर्षाच्या संसारात बरोबर ओळखलं आहे 😁😁) तात्पर्य : ट्रेकचा विषय उन्हाळा संपेपर्यंत मनातून काढून टाकला..
दोन तीन महिने हा हा म्हणता निघून गेले.. जून सुरू झाला आणि वातावरणाने जणू कात टाकायला सुरवात केली.. आकाशात ढग दाटून येऊ लागले, हवेत थोडातरी गारवा जाणवू लागला.. आता परत माझ्या मनाने ट्रेकसाठी उचल खाल्ली..
ग्रुप वरती कोणता ट्रेक लागतोय याची मी आतुरतेने वाट बघू लागले.. काय आश्चर्य !! या महिन्यातले सगळे ट्रेक एकापेक्षा एक भारी !! ट्रेकर्ससाठी सह्याद्रीत मनसोक्त भटकण्याची मेजवानी घेऊन आलेले..
म्हणतात ना, सब्र का फल मीठा होता हैं !
कोणता बुक करू??.. खूप विचाराअंती ठरलं की तीन महिन्यांची गॅप पडली आहे तर सुरवात त्यातल्या त्यात "सोप्या" ट्रेक पासून करावी..
नवऱ्याशी खलबतं करून राजमाची ट्रेक आणि काजवा दर्शन यावर शिक्कामोर्तब केलं..
नेहमीप्रमाणेच रोहितशी बोलून ट्रेकचं बुकिंगही करून टाकलं आणि आम्ही लागलो तयारीला ..
काय उत्साह होता नवऱ्याचा !! ट्रेक म्हणजे आमच्यासाठी रोजच्या धावपळीच्या जीवनातील एक विरंगुळा.. सह्याद्रीच्या दर्शनाने मन आणि शरीर दोन्ही ताजंतवानं होऊन जातं..
राजमाचीला जाण्यासाठी दोन, तीन पर्याय आहेत.. ज्याला जो सोयीस्कर पडेल त्याने तो निवडावा..
१)पायी लोणावळ्याहून तुगांर्ली मार्गे राजमाची गावात पायी जाता येते. ही वाट एकदंर १५ कि.मी लांबीची आहे. या मार्गे किल्ल्यावर जाण्यास ३ ते ४ तास लागतात.
२)पायी कर्जतहून कोंदीवडे या गावात बसने किंवा गाडीने यावे. कोंदिवडे येथून खरवंडी मार्गे किल्यावर जाणारी पाउलवाट उभ्या चढाची आहे. किल्यावर पोहोचण्यास सुमारे ३ तास लागतात.
३)लोणावळा किंवा खंडाळा येथून कुणेगाव - फणसराई मार्गे गडावर मोठी चारचाकी किंवा दुचाकीने उधेवाडी ह्या गडाच्या माचीवर वसलेल्या गावात पोहोचता येते. हा मार्ग कच्च्या मातीचा असून काही ठिकाणी थोडे डांबरीकरण केलेले आहे. तसेच ओढ्यांवर पुलही बांधण्यात आलेले आहेत.
आम्ही तिसरा मार्ग निवडला.. जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून खंडाळा मार्गे निघालो...आजचा आमचा ड्रायव्हर ज्या स्पीडने गाडी चालवत होता आणि इतर गाड्यांना ओव्हरटेक करत होता, हे बघून आम्हाला जेम्स बाँडची आठवण झाली.. त्यात त्याची हेअरस्टाईल तर अगदी भन्नाटच होती.. त्याला बघून चुकून तो ड्रायव्हर झाला की काय? असा विचार माझ्या बापडीच्या मनात चमकून गेला..
शेवटचे काही किलोमीटर खूप कच्चा रस्ता आहे..जसा कच्चा रस्ता सुरु झाला आणि तो काही संपण्याचं नावचं घेईना, हे ड्रायव्हरच्या लक्षात आल्यावर.. "भाई ये कहा लेके आये मुझे.. मुझे तो बोला था , लोनावला जाना हैं..ये कौंनसा लोनावला हैं" 😁😁..
झालं! त्याचा अवतार पाहून आता आमच्या चाणाक्ष नजरेने
हेरलं की , हा बाबा आता पुढं गाडी नेईल की नाही.. पण थोडीतरी माणुसकी त्याच्यात होती.. जेवढी जमेल तेवढी गाडी त्याने काळजी घेत घेत पुढे नेली..
एका ठिकाणी आल्यावर मात्र.. "अभी इधरसे तुम लोग चलके जावं'.. अशीच त्याची नजर सांगत होती..
टूर लीडर्सनीही जास्त हुज्जत न घालता.. "चला मंडळी.. आता पायीच प्रस्थान करायचं आहे ". अशी विनंतीवजा सूचना केली.. सगळे ट्रेकर्स अजिबात न कुरकुरता पटापट गाडीतून उतरले.. मुंबईहून आलेले दोन टेम्पो ट्रॅव्हलर्स आणि पुण्याहून आलेली एक ,अशा आमच्या ग्रुपच्या तीन गाड्या तिथेच थांबल्या..
अशा प्रकारे ,आमचा रात्रीच्या किर्र अंधारात बॅटरीच्या उजेडात राजमाचीकडे पायी प्रवास सुरू झाला.. रोहितने लीड घेतली,आकांक्षा आणि सिद्धेश हे लीडर्स सगळ्यात पाठी राहिले..
पायाखालचा रस्ता सपाट आणि मातीचा होता.. चालताना काहीच त्रास जाणवत नव्हता.. मध्येच कोणीतरी ओरडलं, लाइट्स ऑफ, लाइट्स ऑफ.. तेंव्हाच कळलं, पुढे काजवे असणार.. आम्ही दोघं लगबगीने पुढे गेलो..
समोरचं चमचमणारं झाड बघून डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता.. असंख्य काजवे एकाच वेळी चमकत होते . जणू काही झाडावर शेकडो दिव्यांची रोषणाई केली आहे .. हे दृश्य बघून हॉलिवूड मधल्या हॅरी पॉटर सारख्या सिनेमाची आठवण झाली..
खरंच, जादूच होती ती ! डोळे दिपवणारा निसर्गाचा अध्दभूत चमत्कार!
काहीजण तो चमत्कार कॅमेरात कैद करण्याचा प्रयत्न करत होते. आम्हीही एकदा प्रयत्न केला पण कॅमेरात काहीच दिसत नाही हे लक्षात आल्यावर , नाद सोडून दिला आणि नुसतं मन भरेपर्यंत तो नजरा डोळ्यात साठवत राहिलो..
काजवा दर्शनाने आमच्या ट्रेकची सुरवात मन उल्हासित करणारी झाली..
हा चमत्कार याची देही याची डोळा पाहण्याचा योग आला हे आमचं भाग्य ..
थोड्या वेळात मात्र भानावर येताच पुढं निघालो.. अजून बरंच अंतर पार करायचं होतं.. मध्ये मध्ये काजव्यांनी बहरलेली झाड आम्हाला जागीच खिळवून ठेवत होती. आम्हीही त्या मोहमयी वातावरणाचा आनंद घेत घेत पुढे जात होतो..
आता हळू हळू उजाडायला लागलं होतं.. वातावरण ढगाळ असल्याने सूर्यदेव दर्शन देतील की नाही सांगू शकत नव्हतो..
दीड -दोन तास पायपीट करून आम्ही एकदाचे उधेवाडीला पोहचलो.. गावात गेल्यावर बघितलं तर काही गाड्या आणि बसेस तिथं पर्यंत आल्या होत्या.. आम्ही मनातल्या मनात आमच्या ड्रायव्हरचा उद्धार केला.. पण असुदे..जर इथ पर्यंत बसने आलो असतो तर निसर्गाची किमया मनसोक्त बघता आली नसती..
शेवटी काय ,जो होता हैं, वो अच्छे के लिये ही होता है!!
हॉटेल अतुल मध्ये आमची फ्रेश होण्याची सोय केली होती.. गावात पोहचल्यावर , आज इथ किती पर्यटक आले आहेत याचा अंदाज आला.. आज या ठिकाणी पर्यटकांची जत्राच भरली होती.. काजव्यांचा हंगाम ठराविक काळापुरता मर्यादित असल्यामुळे बरेच जण राजमाची ट्रेक पेक्षा , काजवा दर्शनसाठी आले असावेत..
सकाळचे सहा वाजले होते.. आम्ही सगळे फ्रेश झालो.. चहा, नाष्टा उरकला.. नेहमी प्रमाणे ग्रुप मेंबर्सनी आपापली ओळख थोडक्यात करून दिली.. चाळीसजण होतो आम्ही, पुणे मुंबईचे मिळून..
लीडर्सनी सगळ्यांना महाराष्ट्र देशाचे बॅच दिले आणि टी शर्ट वरती लावायला सांगितले.. बरेच ग्रुप असल्यामुळे आपले मेंबर्स ओळखण्याचा सोपा मार्ग..
मस्त पोटपूजा करून आम्ही ट्रेकसाठी तयार झालो..
उधेवाडी ही २०, २२ घरांची पाणभरे कोळी लोकांची वाडी आहे. वाडीलगतचं मारुतीचे मंदिर आहे. तेथून पुढे दक्षिण दिशेला संरक्षित वन आहे.
सह्याद्रीच्या लोणावळा खंडाळा पासून निघणाऱ्या डोंगररांगेमुळे निर्माण झालेला परिसर 'उल्हास नदीचे खोरे' म्हणून ओळखला जातो.
याच परिसरातून उल्हास नदी उगम पावते.याच 'उल्हास नदीच्या खोऱ्यांच्या प्रदेशात मुंबईपुणे लोहमार्गावर लोणावळ्याच्या वायव्येस १५ कि.मी अंतरावर राजमाची किल्ला वसलेला आहे.
राजमाची हा एकच किल्ला आहे आणि त्याच्या माचीवर दोन बालेकिल्ले आहेत.. एक श्रीवर्धन आणि दुसरा मनरंजन..
आम्ही गावातून बाहेर पडून गडावर जाणाऱ्या दगडी पायवाटेकडे आलो.. दगडी पायऱ्या आणि मध्ये मध्ये सपाट पायवाट आपली चढाई थोडी सोपी करतात.. थोडंसं अंतर चालून आल्यावर डाव्या हाताला गुहा दिसतात.. थोडंसं पुढं जाउन बघितलं की समजतं ही पाण्याची टाकं आहेत..
दगडी पायऱ्या चढत आपण एका सखलपट्टीवर येऊन पोहचतो.. यावर भैरवनाथाचे एक मंदिर आहे. मंदिरासमोर तीन दिपमाळा आणि लक्ष्मीची मूर्ती आहे. इथून डावीकडे जाणारी वाट मनरंजन आणि उजवीकडची वाट श्रीवर्धन या बालेकिल्ल्यांवर जाणारी आहे.
यापैकी आम्ही श्रीवर्धन गडाला भेट दिली..राजमाचीच्या दोन बालेकिल्ल्यांपैकी सर्वात उंच असा हा बालेकिल्ला.
या किल्ल्यात आपल्याला विविध शैलीतील बांधकाम दिसून येतं.
विविध शैलीतील स्थापत्यकलेचे कारण म्हणजे विविध कालखंडात विविध साम्राज्यांनी त्यावर केलेलं राज्य
श्रीवर्धनची तटबंदी , बुरुज आणि दरवाजाची कमान अजूनही सुस्थितीत आहे .. दरवाजाच्याच बाजुला पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. किल्ल्याच्या माथ्यावर जाणाऱ्या वाटेवरच एक गुहा आहे, हे बहुतेक अन्नधान्याचे कोठार असावे..बाजूलाच पाण्याची दोन टाकं आहेत.
माथ्यावरील बुरुजावर ध्वजस्तंभ तसेच वास्तूंचे भग्न अवशेष आहे.. गडाच्या माथ्यावरून लोहगड , तुंग, कोरीगड , घनगड, खंडाळा, सोनगिरी, माथेरान , ढाक हा परिसर दिसतो.
याठिकाणी आमचा ग्रुप फोटो झाला आणि सगळे जण इकडे तिकडे रेंगाळले..
लीडर्सनी सगळ्यांना एक तासाचा वेळ देऊन खाली एका पॉइंटला भेटण्यास सांगितले..
इथून आम्ही दोघं गडाच्या समोरचं असणाऱ्या चिलखती बुरुजाकडे निघालो..तुम्ही जर राजमाची किल्ला असं गुगलवरती सर्च केलत तर जो बुरुज दिसतो तो हाच..
तिकडे जाणारी पायवाट सुकलेल्या गवतामुळे थोडी निसरडी झाली होती..
इथून घोड्याच्या नालेच्या आकाराचा कातळ कडा दिसतो, त्याचं कड्यावरून पावसाळ्यात कातळधार धबधबा कोसळतो.. पावसाळ्यात इथलं वातावरण अवर्णनीय असणारं यात शंकाच नाही..
बुरुजाच्या खाली एक चोर दरवाजा आहे.. त्या दरवाज्याची कमान त्यावरील उत्तम कोरीव कामामुळे बघण्यासारखी आहे..
थोडा वेळ आराम करून आम्ही गड उतरायला सुरुवात केली..
खाली पोहचलो तर अजून जेवण तयार नव्हतं . मिळेल ती जागा पकडून प्रत्येकजण आडवा झाला..
ट्रेक तर छानच झाला होता पण बऱ्याच जणांना एक प्रश्न सतावत होता, आता या रणरणत्या उन्हात बसपर्यंत चालणं होणार का ?? रात्री काजवे बघण्याचा उत्साह आणि उन नसल्यामुळे सगळे आनंदाने चालत आले होते परंतु आता दिवसभराचा थकवा आणि त्यात हे चटका देणारं उन..
तासाभरात लीडर्सनी जेवण तयार असल्याचे सांगितलं आणि त्याबरोबरच अजून एक सुखद धक्का दिला की आमची बसपर्यंत वाहनाने जाण्याची सोय केली आहे.. मला वाटतं, हे ऐकूनच बऱ्याच जणांची पोटं भरली असणार..
जेवण शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचं होतं..सगळ्यांनी जेवणावर आडवा हात मारला.
जेवण झाल्यावर थोड्याच वेळात गाड्या आल्या.. गाड्या बघितल्यावर आमची ही राईड किती भन्नाट होणार आहे याची खात्री पटली.. त्या मालवाहू जीप होत्या.. काहीही असो, आपल्याला चालायला लागणार नाही या विचाराने
सगळे पटापट गाडीत चढले आणि आमच्या सारथ्याने तुफान वेगाने जीप दामटवायला सुरवात केली..
जसजसं जीपचा वेग वाढत होता.. आम्ही गाडीत कोंबलेल्या मेंढरांसारखं इकडून तिकडं हेलपाटतं होतो.. मध्येच कोणीतरी आर्त स्वरात किंचाळत होतं.. त्यात आमची जीप ओपन होती.. वरती तिला छप्पर नव्हतं.. मग काय , एखादं झुडूप आल की पुढचा ओरडायचा खाली वाका , खाली वाका.. की सगळे क्षणाचाही विचार न करता नतमस्तक व्ह्यायचे 😀😀
भरीस भर म्हणून आमच्या पुढं आमच्याच ग्रुपची दुसरी जीप होती तिचा धुरळा आमच्या अंगावर उडत होता.. सगळ्याची अवस्था मातीत लोळून आलेल्या डुकरांसारखी झाली होती.. 😂😂
जर कोणी आम्हाला विचारलं कसा झाला ट्रेक तर नक्कीच आम्ही सांगू , नुसता धुरळा 😎😎!!
पण काहीही म्हणा, असा थरारक प्रवास आम्ही कधीच अनुभवला नव्हता.. या राईड पुढं जंगल सफारी, डेझर्ट सफारी म्हणजे, किस झाड की पत्ती !!
हुश्श!! पोहचलो बाबा एकदाचे आमच्या बसजवळ.. सगळ्यांनी आपापले कपडे झटकून बसमध्ये बसून घेतलं..
ट्रेकच्या आठवणी मनात साठवत, पुन्हा भेटण्याचं आश्वासन देत, मुंबईकर मुंबईकडे आणि पुणेकर पुण्याकडे रवाना झाले..