The pain of a difficult place .... in Marathi Women Focused by Dr.Swati More books and stories PDF | अवघड जागेचं दुखणं....

Featured Books
Categories
Share

अवघड जागेचं दुखणं....



"अति तिथे माती "ही म्हण आपण लहानपणाासून शाळेत ऐकत आलेलो आहोत, ही म्हण मी डॉक्टर झाल्यावर मला पेशंटचे गैरसमज दूर करण्यासाठी उपयोगी पडेल असं वाटलं नव्हतं..

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक कधी करू नये . हा नियम जसा वाईट गोष्टींना लागू होतो तसाच काही चांगल्या गोष्टींनाही लागू होतो..

याच अनुषंगाने ,आज मी तुम्हाला स्वच्छता , नाही नाही अति स्वच्छता तीही स्त्रीच्या योनीची कशी घातक ठरू शकते याबद्दल थोडसं सांगणार आहे...
नवीनच लग्न झालेली माझी एक पेशंट..

मॅडम.. माझ्या लघवीच्या जागी फोड आले आहेत आणि खूप दुखतय तिथं.. काहीतरी औषध द्या.. दुखणं सहन होत नाहीये..

मी तिला काही जुजबी प्रश्न विचारले.. त्यातून मला समजलं, की तिने बिकिनी वॅक्सिंग केलं होतं.. त्यानंतर हे फोड आले....

मी तिला वेदनाशामक गोळ्या आणि अँटिबायोटिक्स दिली.. कारण ते फोड चांगलेच मोठे होते.. तिला किती दुखत असेल हे मी समजू शकत होते..

मला खूप वाटतं होत तिला चांगलं फैलावर घ्यावं पण तिची अवस्था बघून मी विचार केला की ती बरी झाली की सांगेन समजाऊन तिला..

आज मला याच विषयावर थोडसं बोलायचं आहे.. योनीची स्वच्छता राखणे म्हणजे नेमकं काय ?

योनीची स्वच्छताच जर तुम्हाला करायची आहे तर.. नुसतं तिथले केस कात्रीने बारीक केले तरी चालतात की ..
बिकिनी वॅक्सिंग , शेविंग, हेअर रीमूविंग क्रीम लावल्याने बऱ्याच मुली किंवा स्त्रियांना त्रास झालेला मी बघितला आहे..

शेविंग करताना रेझरने नकळतपणे कापलं जाण्याची खूप शक्यता असते.. एक तर ती जागा खूप नाजूक असते त्यामुळे थोडं जरी तिथं कापलं गेलं तरी इन्फेक्शन होऊन फोड येऊ शकतात..
कधी कधी शेविंग नंतर येणारे केस खूप राठ असतात मग त्यामुळे तिथे खाज यायला लागते त्यावेळी तर अशी अवस्था होते की रोगापेक्षा उपाय भयंकर !!!

बिकिनी वॅक्सिंग तर माझ्या समजण्या पलिकडची गोष्ट आहे.. ज्या स्त्रिया मॉडेलिंग किंवा तत्सम क्षेत्रात आहेत त्याचं ठीक आहे.. त्यांची ती गरज आहे.. आणि त्यांच्या जवळ तसे प्रोफेशनल वॅक्सिंग करणारे असतात.. त्यामुळे त्यांना असं इन्फेक्शन होण्याचं प्रमाण कमी असतं.

पण आपल्या सारख्या मिडल क्लास स्त्रिया किंवा मुली , ज्यांना मुळातच बिकिनी वॅक्सिंग करण्याची गरजच नसते आणि आपण ज्या ब्युटी पार्लरमध्ये जातो तिथे असं काही खूप जबाबदारीने करणारे प्रोफेशनल असतीलचं असं नाही.. मग त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता वाढते ..

मला सांगा ,एक साधी केसतुडी झाली तर किती दुखतं ? मग त्या नाजुक भागात वॅक्सिंग करताना काय वेदना होत असतील.? त्या सहन करायच्या आणि चुकून त्या चं इन्फेक्शन झालं तर होणारा पुढचा त्रास अजून वेगळा..

आजकाल "पँटी लायनर" हा एक नवीन प्रकार मुली किंवा स्त्रिया वापरतात...

नॉर्मली सगळ्याच स्त्रियांना किंवा मुलींना थोडंतरी व्हाइट डिस्चार्ज ( श्वेत पदर ) योनीमार्गे येतो आणि हे नॉर्मल आहे.
पण काही जणींना तेसुद्धा नको असतं म्हणून दिवस दिवसभर ते पँटी लायनर, पँटीला लावून ठेवले जातात..
त्याचीही ॲलर्जी होऊ शकते. जसं लहान बाळाला नॅपी रॅशेस येतात अगदी तसचं.
कारण ते लायनर वेळीच बदलले नाहीत तर त्रास हा होणारचं ना...

पाळीच्या वेळी सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर आपल्याला अनिवार्य आहे.. (आजकाल नॅपकिन ऐवजी सिलिकॉन कपही बाजारात उपलब्ध आहेत ) पण पँटी लायनर एक फॅशन म्हणून न वापरण्यासाठी मी केलेला हा खटाटोप...

बरं, ज्यांना खरचं खूप व्हाइट डिस्चार्ज स्रवतो , अश्या स्त्रियांना किंवा मुलींना सार्वजनिक ठिकाणी , ऑफिस किंवा प्रवासात नामुष्की ओढवण्याची शक्यता असते, तिथं हे ठीक आहे.. उगाचच स्वच्छतेच्या नावाखाली, गरज नसताना ही असली उत्पादनं वापरणं हानिकारक ठरू शकतं..

अगदी हेच , मी योनीच्या स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या काही केमिकल्ससाठीही सांगेन.. याचं तर येवढं फॅड आहे की काही मुली आणि स्त्रियांमध्ये , ते नाही वापरलं तर योनी स्वच्छ होणारचं नाही असा गैरसमज आहे.. हे सगळं सोशल मीडियाने काहींच्या डोक्यात भरवलेलं भूत आहे.. टी. व्हीं . वरील जाहिरातींना भुलून कित्येक जणी अशी केमिकलयुक्त उत्पादनं वापरतात आणि स्वतःच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतात.. त्यांना काय माहित , अशा उत्पादनांच किती मोठं मार्केट आहे आणि त्याचा त्या त्या कंपन्यांना प्रचंड फायदा होतो..पण याचा बळी कोण ठरतं , तर आपण सामान्य माणूस..

खरं बघता..आपल्या योनीची रचना शरीराने अशीच केली आहे की तिच्या स्वच्छतेची काळजी आपलं शरीर नैसर्गिकरित्या घेत असतं . योनीची स्वतःची अशी pH level असते, म्हणून स्वत: ला स्वच्छ करण्यास आणि स्वयंपूर्ण मार्गाने स्वतःचे नियमन करण्यास ती सक्षम असते..
शरीराच्या इतर भागांप्रमाणे, योनीमध्ये पीएच पातळी असते जी जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करण्यासाठी आणि चांगल्या मायक्रोफ्लोराच्या विकासास प्रोत्साहन देण्यासाठी एका विशिष्ट श्रेणीमध्ये ठेवणे आवश्यक असते आणि त्याची काळजी आपलं शरीर घेत असतं..

आणि आपण अशी केमिकल्स , व्हजायनल सेंट, व्हजायनल डौचींग करून या नैसर्गिक स्वच्छ्ता सिस्टीमची पूर्ण वाट लावून टाकतो..

आणि मग काय, होतात सुरू डॉक्टरांच्या वाऱ्या..

हा एवढा अट्टाहास कशासाठी..??

स्वच्छ्ता की अती स्वच्छता ..

एक डॉक्टर आणि एक स्त्री म्हणून मी सल्ला देईन की ,

नुसतं केस बारीक करून सुद्धा योनीची योग्य स्वच्छता राखली जाते.. रोजची आंघोळ करताना केलेली योनीची स्वच्छता पुरेशी असते. तीही हळूवारपणे , उगाचंच साबण लावून ती जागा घास घास घासणे हा सुद्धा निव्वळ मूर्खपणाचं...

स्वच्छताच राखायची असेल तर स्वच्छ अंघोळ करा ( जर कामावर जात असाल तर दोन वेळा कमीत कमी) स्वच्छ कपडे घालणं,ओले कपडे अंगावर न ठेवणं ,स्वतःचा साबण ,स्वतःचे कपडे , स्वतःचा टॉवेल शेअर न करणं.बाहेरून आल्यावर घामेजलेले कपडे बदलणं,जास्त घट्ट कपडे , घट्ट इनरवेअर न घालता कंफर्टेबल आणि सुती कपडे वापरणं..
या काही जुजबी गोष्टी स्वच्छतेसाठी गरजेच्या आहेत..

ना की बिकिनी वॅक्सिंग, पँटी लायनर, योनी स्वच्छ करणारी केमिकल्स..व्हजायनल सेंट ,व्हजायनल डौचींग... वगैर वगैर..

बघा नक्कीच विचार करा..

डॉ. स्वाती अनिल मोरे
कांदिवली पूर्व