Sakshidaar - 2 in Marathi Thriller by Abhay Bapat books and stories PDF | साक्षीदार - 2

Featured Books
Categories
Share

साक्षीदार - 2

प्रकरण २
फिरोज लोकवालाची त्वचा खडबडीत होती त्याने लोकरी सारख्या कापडाचा सूट घातला होता. त्याचे डोळे सौम्य तपकिरी, पण मृत आणि निर्जीव वाटत होते. त्याचे नाक मोठे होते, प्रथम दर्शनी तो सौम्य आणि निरुपद्रवी वाटत होता.
"ठीक आहे," तो म्हणाला, "आपण येथे बोलू शकता."
पाणिनी ने मानेनेच नाही म्हंटले. “ या जागेत तुम्ही यांत्रिक करामती करून ठेवल्या असतील,आपल्यातले बोलणे रेकोर्ड होण्यासाठी.मला अशा ठिकाणी बोलायचंय जिथे आपल्या दोघांशिवाय कोणी नसेल.” पाणिनी म्हणाला
“ कुठे?” फिरोज लोकवाला ने विचारलं
“माझ्या ऑफिसात.” पाणिनी म्हणाला
फिरोज लोकवाला हसला. “ म्हणजे मी इथे जे केलंय असं तुम्हाला वाटतंय तेच तुमच्या ऑफिसात तुम्ही केलं असेल. मी सुचवीन तुम्हाला ठिकाण.”
“ चल तर मग तयार हो ,बाहेर जाऊ आपण.”
“ कुठे जायचं डोक्यात आहे?”
“ एखाद्या हॉटेलात बसू.” पाणिनी म्हणाला
“ म्हणजे तू आधीच ठरवून ठेवलेले हॉटेल !” --फिरोज लोकवाला
“ नाही, आपण टॅक्सी करू, ड्रायव्हर ला एक राउंड मारायला सांगू, वाटेत तुला वाटेल त्या हॉटेल च्या जवळ आलो की तू गाडी थांबवायला सांग,मग आपण त्या हॉटेलात जाऊ,” पाणिनी म्हणाला
“ ठीक आहे तुझा प्रस्ताव ,मी दोन मिनिटात आलो.माझ्या सहकाऱ्यांशी शी बोलून अंदाज घेऊन येतो की अत्ता मी बाहेर गेलं तर अडण्यासारखं नाही ना काही.तू इथेच थांब. ” --फिरोज लोकवाला
“ ठीक आहे”.पाणिनी म्हणाला आणि तिथे बसला.
फिरोज लोकवाला त्याच्या केबिन च्या बाहेर गेला.. बाहेरच्या कार्यालयातून सहकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे, बोलण्याचे अस्पष्ट आवाज येत होते.. पाणिनी पटवर्धन शांत बसला , दरम्यान एक सिगारेट शिलगावली.त्याने जवळजवळ दहा मिनिटे वाट पाहिली. मग फिरोज लोकवाला आत आला. “ चला, निघू या.”
दोघे बाहेर पडले. टॅक्सी केली. “ आम्हाला या गजबजलेल्या रस्त्याने जरा राउंड मारून आण.आम्ही थांबायला सांगे पर्यंत फिरवत रहा.” पाणिनी म्हणाला
पाणिनी गाडीत काहीच बोलत नव्हता.
“ आपण इथे बोलू शकतो.” --फिरोज लोकवाला
पाणिनी ने नकारार्थी मान हलवली. “ मला अशा ठिकाणी थांबायचं आहे जिथे मोठ्याने आणि ओरडून बोलावं लागणार नाही.”
“ मला सवय आहे ओरडा आरडा करायची आणि ऐकायची.” --फिरोज लोकवाला
गाडी डावीकडे वळली.कोपऱ्यावर पाणिनी ला एक हॉटेल दिसले. “ थांबवा इथे.हॉटेल दिसतंय.”
“ इथे नको.कारण हे तू निवडलं आहेस. आणि हे फारच जवळचं आहे. मी दुसरं एखादं बघतो” तो पाणिनी ला म्हणाला. “चालवत रहा गाडी तुम्ही.” --फिरोज लोकवाला ड्रायव्हरला म्हणाला.
पाणिनी हसला. “ड्रायव्हरला विशिष्ट असं हॉटेल सांगू नको.त्याला गाडी चालवत राहू दे. एखादं दिसलं पटकन तर पाहू. ” पाणिनी म्हणाला
“ आपण दोघेही अती सावध पवित्रा घेतोय नाही का?” --फिरोज लोकवाला
पाणिनी पटवर्धन ने सुद्धा होकारार्थी मान हलवली. फिरोज लोकवाला ने ड्रायव्हरला खूण केली “आम्ही उतरतो इथे त्या हॉटेल जवळ घे”
एका हॉटेल कडे निर्देश करून तो म्हणाला. ड्रायव्हरने त्याच्याकडे बघितलं त्यालाही आश्चर्यच वाटलं पण गाडी थांबवली.पाणिनी ने टॅक्सी चे बिल दिले आणि ते दोघे एका स्वस्तातल्या हॉटेलात आज शिरले.
“या हॉटेलमधल्या फॅमिली रूम मध्ये बसायचं का?” त्यानं पाणिनी ला विचारलं.
“ठीक आहे मला चालेल” पाणिनी पटवर्धन म्हणाला.
ते दोघे लॉबी मधून चालत पोटमाळ्यावर च्या फॅमिली रूम मध्ये आले आणि एका टेबलावर समोरासमोर खुर्च्या मांडून बसले
“ ठीक आहे आपण सुरुवात करू बोलायला “ फिरोज लोकवाला म्हणाला.
पाणिनी ने मानेनेच हो अशी खूण केली
“ तर मग तू पाणिनी पटवर्धन आहेस तर?. वकील ! म्हणजे तू कोणाचा तरी वकील आहेस आणि तुला माझ्या कडून काहीतरी हवय. बोल आता” फिरोज लोकवाला म्हणाला.
“ मला तुझ्या मासिका संदर्भात काहीतरी बोलायचं आहे.” पाणिनी त्याला म्हणाला.
“ बऱ्याच लोकांना हवं असत” लोकवाला म्हणाला
“ तुला काय हवय नेमकं?”
“ पहिल्यांदा आपण तुमची काय पद्धत असते त्याच्यावर चर्चा करू आणि अगदी स्पष्ट बोलतो, थेट पैशाच्या संदर्भात व्यवहार करायचा का?” पाणिनी पटवर्धन ने त्याला विचारलं
लोकवाला ने मानेने नकार दिला “आम्ही काय ब्लॅकमेल करणारे लोक वाटलो का तुला? आमच्याकडे जाहिरात देणाऱ्यांना कधीकधी आम्ही विशेष अशी सेवा देतो.” तो म्हणाला
“ असं करता काय तुम्ही! “ आश्चर्य दाखवत पाणिनी ने विचारलं.
“ बस एवढेच ” लोकवाला म्हणाला
“ मी कशाची जाहिरात द्यायची म्हणे तुम्हाला?” पाणिनी ने विचारलं. लोकवाला ने आपले खांदे उडवले. “ मला काय करायचे त्याच्याशी ? ” तो म्हणाला. “ तुला द्यायची नसेल तर नको देऊ जाहिरात. आम्ही आमच्या मासिकातले किंवा वर्तमानपत्रातली विशिष्ट जागा तुम्हाला विशिष्ट दिवसासाठी विकतो एवढच.” लोकवाला म्हणाला.
“ अच्छा “ पाणिनी पटवर्धन उद्गारला
“आता बोल काय हवय तुला?” --लोकवाला
“काल रात्री सागरिका हॉटेलमध्ये एक खून झालाय. म्हणजे तिथे गोळीबार झाला. मला हे माहीत नाहीये की तो खून होता की नाही. आणि जो माणूस या गोळीबारात मेला त्याने त्या हॉटेलमध्ये बंदुकीचा धाक दाखवून इतरांना वेठीस धरायचा प्रयत्न केला म्हणजे होल्डअप” पाणिनी म्हणाला
पाणिनी पटवर्धन ने त्याला पार्श्वभूमी सांगितली. फिरोज ने आपली नजर पाणिनी वर रोखत विचारलं, “बर मग ? “
पाणिनी पटवर्धन पुढे सांगायला लागला
“मला असं समजलं की या सगळ्या प्रकारात काहीतरी रहस्य दडलंय म्हणजे जिल्हाधिकारी या सगळ्याची अत्यंत सविस्तर अशी चौकशी करणारे.”
“ हे बघा मिस्टर पटवर्धन. तुम्ही अजून मला ठोस असं काहीच सांगितलेलं नाहीये ” तो म्हणाला.
“ मी सांगतोय अजून.” पाणिनी म्हणाला
“ठीक आहे”
“कोणीतरी मला सांगितलं. तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या साक्षीदारांची यादी जी जिल्हाधिकाऱ्याला दिली गेली आहे ती अजून पूर्ण नाहीये म्हणजेच त्यात अजून काही नावं टाकायची शिल्लक आहेत.”

फिरोज ने चमकून पाणिनी पटवर्धन कडे पाहिले. “तुम्ही कोणाचं वकीलपत्र घेतलय?” त्याने विचारलं
“तुमच्या मासिकात किंवा पेपरात जाहिरात देण्यास इच्छुक असणाऱ्या एका व्यक्तीचं” पाणिनीने गूढ पणे उत्तर दिलं
“ ठीक आहे बोला पुढे सगळ सांगून टाका उरलेलं मोकळेपणाने” फिरोज म्हणाला
“ उरलेलं सगळं तुला ठाऊक आहे” पाणिनी म्हणाला.
“ जरी मला माहिती असलं तरी मी ते मान्य करणार नाही. मी जाहिरातीची जागा विकण्या पलिकडे काही करत नाही. तुला माझ्याशी स्पष्टपणे आणि काही आडपडदा न ठेवता बोलायला लागेल.”— फिरोज म्हणाला
“ठीक आहे ” पाणिनी म्हणाला.
“तुमच्या पेपरचा जाहिरात दार म्हणून माझी अशी अपेक्षा आहे की जिल्हा आयुक्तांना आणि पोलिसांना दिल्या गेलेल्या यादीत वगळण्यात आलेल्या महत्त्वाच्या साक्षीदाराच्या नावाचा उल्लेख तुमच्या पेपर मध्ये मला यायला नको आहे, आणि असाही प्रश्न तुमच्या पेपर मधून तुम्ही उपस्थित करता कामा नये की त्या साक्षीदाराला जबानी घेण्यासाठी पोलिसांनी का बोलावल नाही?. आणि या व्यतिरिक्त तुमच्या पेपरचा जाहिरात दार या भूमिकेतून माझी अशी सुद्धा अपेक्षा आहे की या महत्त्वाच्या साक्षीदाराच्या बरोबर त्याचा कोणी सहकारी होता का याबद्दलची कुठलीही शेरेबाजी तुमच्या पेपरात छापून येता कामा नये आता माझी ही अपेक्षा पूर्ण होण्यासाठी जाहिरात दार म्हणून मला किती खर्च येईल सांग " पाणिनी म्हणाला

"अच्छा , आता आमच्या वर्तमानपत्राचे धोरण काय असावे हे सुद्धा तुम्हाला ठरवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला जाहिरातीचा जास्त खर्च येईल त्याच्यासाठी एक करार करावा लागेल आणि त्या कराराअंतर्गत ही जाहिरात द्यावी लागेल. मी एक कराराचा मसुदा तुमच्यासाठी तयार करतो आणि एका विशिष्ट दिवसासाठी आमच्या वर्तमानपत्रातील विशिष्ट जागा तुमच्यासाठी राखून ठेवतो तुमच्याकडून करार मोडला गेला तर त्यासाठी तुम्हाला काही नुकसान भरपाई द्यावी लागेल त्याबद्दलचा उल्लेख या करारात केला जाईल"
“मी करार मोडला तर त्याचे पैसे मला लगेच भरावे लागतील?” पाणिनी पटवर्धन ने विचारलं
“अर्थातच” फिरोज लोकवाला म्हणाला
“आणि करार केला की मी तो लगेच मोडू शकेन?” पाणिनी ने विचारलं.
“ नाही, नाही तसं नाही चालणार. तुम्हाला एक किंवा दोन दिवस थांबावच लागेल” फिरोज म्हणाला
“ आणि या एक-दोन दिवसात म्हणजे जो माझा थांबण्याचा कालावधी आहे त्याच्यात माझ्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली जाणार नाही ? “ पाणिनी पटवर्धन ने विचारलं
“अर्थातच.” फिरोज लोकवाला म्हणाला.
पाणिनी ने आपल्या पाकिटातून एक सिगारेट काढून ती शिलगावली आणि फिरोज लोकवाला च्या डोळ्याला डोळा देऊन पाहिले त्याचे डोळे नेहमीप्रमाणे थंड आणि भावना हीन होते.
“ठीक आहे.” पाणिनी म्हणाला “मला जे काही सांगायचं होतं ते सांगून झाले आता मी ऐकणार आहे तुला काय म्हणायचंय ते”
“मला या सगळ्यावर विचार करायला जरा वेळ लागेल” फिरोजम्हणाला.
पाणिनी ने आपलं मनगटावरील घड्याळ त्याला दाखवलं. “ तुला मी दहा मिनिट देतो विचार करायला” तो म्हणाला.
“ नाही जास्त वेळ लागणार या सगळ्याचा विचार करायला.”
“ नाही जास्त वेळ नाही मिळणार.” पाणिनी म्हणाला
“ मी म्हणतोय की जास्त वेळ लागेल” फिरोज निक्षून म्हणाला..
“तुला मी दहा मिनिट दिली आहेत.” पाणिनी पटवर्धन ने ठासून सांगितलं
“ हे बघा मिस्टर पटवर्धन, तुम्ही तुमच्या कामाला माझ्याकडे आलाय;. मी तुमच्याकडे आलो नाहीये”
“मूर्खपणा करू नकोस”. पाणिनी म्हणाला “एक लक्षात घे की, मी माझ्या अशिलाचे प्रतिनिधित्व करतो आहे.. तू तुझा प्रस्ताव मला द्यायला पाहिजे मलाही बघायचंय की तू दिलेला प्रस्ताव मी माझ्या अशिला पर्यंत पोचवून त्याला स्वीकारायला लावीन किंवा नाही. आणि माझ्या अशिला पर्यंत पोचणे हे तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये.”
त्याच्या भुवया उंचावल्या. “असं आहे का?” त्याने विचारलं.
“ हो असंच आहे “ पाणिनी म्हणाला
“ठीक आहे मी दहा मिनिटात विचार करून सांगतो पण मला माझ्या ऑफिसमध्ये बोलावं लागेल.”
“ठीक आहे कर फोन ऑफिसला तुझ्या मोबाईल वरून आणि बोल काय बोलायचे ते मी थांबतो इथे” पाणिनी म्हणाला
फिरोज लोकवाला ने मोबाईल वापरला नाही.तो परत लिफ्ट पर्यंत गेला आणि खाली तळ मजल्या पर्यंत गेला पाणिनी पटवर्धन ने पोटमाळ्यावर च्या रेलिंग वरून पाहिलं फिरोज लोकवाला फोन करायला गेला नव्हता पण तो हॉटेल च्या बाहेर पडला होता.पाणिनी पटवर्धन ने लिफ्ट चे बटन दाबले आणि खाली आला रस्ता ओलांडून पलीकडे गेला पलीकडच्या बाजूने त्यांने इमारतीकडे नजर टाकली दहा मिनिटानंतर फिरोज लोकवाला औषधाच्या दुकानातल्या फोन बूथ बाहेर पडून पुन्हा हॉटेलमध्ये जायचे तयारीत दिसला. फिरोजने मोबाईल कसा नाही वापरला याचे पाणिनी ला आश्चर्य वाटले कदाचित तो ऑफिस मधे विसरला असावा किंवा त्याला पाणिनी पासून लांब जाऊन बोलायचे असावे आणि थोडा वेळकाढू पणा करायचा असावा. पाणिनी पटवर्धन ने पुन्हा रस्ता ओलांडला आणि फिरोजबाहेर पडत असतानाच पाणिनी त्याच बूथ मध्ये शिरला.

टेलिफोन बूथ मध्ये पाणिनी ला शिरताना पाहून फिरोज एकदम चमकला आपले डोळे मोठे करून त्याने पाणिनी कडे बघितलं.
“ मी विचार केला की माझ्या अशिलाला आत्ताच फोन करून ठेवावा म्हणजे मी तुला लगेच त्याचा निरोप देऊ शकलो असतो पण त्याचा फोन लागला नाही. कोणी उचलत नाहीये त्याचा फोन.” खुलासा देण्याचं नाटक करत पाणिनी म्हणाला “ मी आत टाकलेलं नाणे परत बाहेर यायची वाट बघतोय.”
फिरोज ने मान हलवली पण त्याचे डोळे पाणिनी वरील अविश्वास दर्शवत होते.
“ मरु देत ते कॉईन.” तो म्हणाला. “ आपली वेळ त्यापेक्षा महत्त्वाची आहे.”
“ तुझी असेल.” पाणिनी म्हणाला त्याने पुन्हा टेलीफोन बूथ मधला रिसिवर खडकडवला आणि नाणे बाहेर येत नाही म्हटल्यावर आपले खांदे उडवले. ते दोघेही नंतर लिफ्टने पुन्हा पोटमाळ्यावर आले आणि आधी बसलेल्या खुर्चीत येऊन बसले.
“ बर मग फिरोज काय ठरवले आहेस तू?” त्याने विचारलं
“ मी विचार करत होतो.” फिरोज म्हणाला.आणि थोडा अडखळला.
“ बर, मला वाटलं की तू निर्णय घेतला असशील ” पाणिनी त्याला म्हणाला
“मिस्टर पटवर्धन जी हकीकत तुम्हाला सांगितली आहेस, त्यात तू कोणाचीही नावे घेतली नाहीयेस, कदाचित न घेतलेली नावे राजकारणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असतील.” फिरोज म्हणाला.
कदाचित ती महत्त्वाची नसतीलही” पाणिनी त्याला म्हणाला
“ इथे बसून उगाच वेळ घालवण्यात काही अर्थ नाहीये आपल्या चर्चतून निष्पन्न काहीच होत नाहीये. आता सरळ सांग ना तुझी काय किंमत आहे? “ पाणिनीने त्याला आव्हान दिलं
“ आपण जाहिरातीबद्दल जो करार करणार आहोत त्याच्यात एक तरतूद कशी असली पाहिजे की तो करार मोडला गेला तर वीस हजार एवढ्या रकमेचे नुकसान भरपाई म्हणून बिल लावले जाईल.”. फिरोज म्हणाला
“अरे वेडा बिडा आहेस की काय तू ? ” पाणिनी म्हणाला.
“ हे बघ मिस्टर पटवर्धन. तू तुला गरज होती म्हणून तू माझ्याकडे आलायस, त्यामुळे माझ्या अटी मीच सांगणार.”
पाणिनी खुर्चीतून उठून उभा राहिला. “ तुझं वागणं अस आहे की जणू काही तुला धंदा करायचाच नाहीये.” आणि सरळ उठून लिफ्टच्या दिशेने चालायला लागला फिरोज लोकवाला त्याच्या मागोमाग आला.
“ मला वाटतं की पुन्हा तुला कधीतरी त्या जाहिरातीचं काम पडेलच. आमचे रेट तसे वाजवी असले तरी कमी जास्त होऊ शकतात तुला माहिती आहे.” फिरोज त्याला सूचकपणे म्हणाला. “अच्छा म्हणजे तुला असे म्हणायचे आहे का, की तुम्ही तुमचे रेट कमी सुध्दा करू शकता?” पाणिनी म्हणाला.
“ मला असं म्हणायचं आहे की ते वाढू सुद्धा शकतात.”
पाणिनी चालता चालता अचानक थांबला आणि फिरोज लोकवाला कडे बघून एकदा म्हणाला, “ ऐक, मला माहिती आहे कि मी कशाच्या विषयाशी संबंधित तुझ्याशी बोलायला आलो होतो ते.आणि मी तुला सांगतो की तू असा यांच्यापासून पळ काढू शकणार नाहीस हे डील सोडून ”. पाणिनी म्हणाला.
“ सोडून जाऊ शकणार नाही म्हणजे ?” फिरोज ने उर्मटपणाने विचारलं.
“ तुला पूर्ण माहिती आहे मला काय म्हणायचं आहे ते.” पाणिनी म्हणाला “अरे तुम्ही लोकांनी हे ब्लॅकमेलिंग चालवलय आणि अनेक लोकांना लुटताय तुम्ही. हे आत्ताच तुला मी जाणीव करून देतोय त्याचे काय परिणाम होतील पहा.”
“अशा अनेक लोकांनी यापूर्वी मला सांगायचा प्रयत्न केलाय. मी भीक नाही घालत अशा लोकांना” फिरोजम्हणाला.
“ मिस्टर फिरोज मी तुला काही सांगायचा प्रयत्न केला नाहीये, मी तुला सांगितलंय.” पाणिनी म्हणाला
“ हो मी ऐकलंय. आवाज वाढवायची गरज नाही ”
“ ठीक आहे मला काय म्हणायचंय याची तुला जाणीव झाली आहे, आत्ता,. या क्षणापासून मी तुम्हा लोकांच्या मागे लागलोय लक्षात ठेव “ पाणिनी म्हणाला
फिरोज हसला. “ तुझं बोलणं झालं असेल तर लिफ्टचे बटण दाब आणि सरळ खाली निघून जा अन्यथा दारापासून दूर हो म्हणजे मला बटण दाबायचे आहे.” पाणिनी ने लिफ्ट चं बटण दाबलं आणि दोन्ही एकत्र खाली उतरले जेव्हा ते रस्त्यावर पोचले तेव्हा फिरोज लोकवाला हसला
“ चला आता आपले मार्ग वेगळे झाले. काही कटुता नको आपल्यात” तो पाणिनी ला म्हणाला
“ हुं ! कटुता नको म्हणे ! मसणात जा ! ” पाणिनी त्याच्याकडे बघून तुच्छतेने म्हणाला

प्रकरण-2 समाप्त