लग्नानंतर हा माझा पहिला वाढदिवस होता. नवऱ्याने तर मला खूप गिफ्ट्स दिले. संध्याकाळी आम्ही सगळे तयार होऊन बाहेर जेवायला जाणार तितक्यात सासूबाईंचा आवाज आला. त्यांनी नवऱ्याला बोलावले आणि म्हणाल्या "मी काही तुमच्यासोबत बाहेर येऊ शकणार नाही. माझा गुडघा खूप दुखत आहे. मी घरीच आराम करते तुम्ही सगळे जाऊन या." आईला घरी एकटे सोडून जाणे नवऱ्याला पटले नाही. त्याने बाहेरचा प्लॅनच कॅन्सल केला. घरी जेवण मागवले. माझा मूड खराब झाला. सासूचा गुडघा आजच दुखायचा होता का. माझ्या आयुष्यातले चार आनंदाचे क्षण तिला बघवतच नाहीत, असं म्हणून मी त्या दिवशी न जेवताच झोपून गेले.
माझ्या मैत्रिणीने मला सासू किती खाष्ट असते हे सांगून ठेवले होते. त्याचा प्रत्यय मला हळूहळू येत होता. लग्नाला अवघे सहा महिने झाले होते आणि सासूने तिचे रंग दाखवायला सुरुवात केली होती. मला आहे आवड बाहेर फिरायला जायची, मनसोक्त जगायची. पण सासूच्या डोळ्यात हे सलत. पावसाळ्याचे दिवस होते. वातावरण इतके सुंदर झाले होते. मी नवऱ्याला घेऊन लोणावळ्याला निघाले. आमच्या बाईसाहेबांना हे समजताच त्यांनी भुणभुण सुरु केली. सुट्टीच्या दिवशी घरी बसा आराम करा. कशाला पावसात भिजायला बाहेर जाताय. उगाच आजारी पडलात तर त्रास तुम्हालाच होणार आहे. शिवाय तुझ्या नवऱ्याला पटकन सर्दी होते. त्याला सायनसच दुखणं आहे. यावेळेस मी मात्र काही ऐकलं नाही.
पावसात भिजून मी जर आजारी पडले तर कामाचा ताण त्यांच्यावर येईल हे समजण्याइतकी भोळी मी नव्हते. आम्ही दोघे मस्त फिरून आलो. त्याच रात्री नवऱ्याला ताप आला, सर्दीने त्याचे डोके दुखू लागले. रात्र कशीबशी काढली आणि दुसऱ्या दिवशी त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेले. पावसात भिजल्याने सायनसचा त्रास त्याला सुरु झाला होता. मी घरी येऊन सगळा राग सासूबाईंवर काढला. तुमच्या अशा कटकटीने आम्हाला नीट जगता येत नाही. तुमचीच नजर लागते असे म्हणून त्यांना चांगले चार शब्द ऐकवले. "यात माझी काय चुकी? मी तर तुमच्या भल्यासाठी सांगितले होते. तू मलाच बोलतेस." असे म्हणून त्या अश्रू गाळू लागल्या. पण त्यांच्या नाटकी रडण्याला मी काही फसणारी नव्हते.
आमच्या एका नातेवाईकांकडे लग्न होते. आम्ही दोघी तयार होऊन निघणार तितक्यात सासूबाईंनी मला अडवले. "अगं लग्न थोडं आडबाजूला आहे. हायवेपासून खूप आतमध्ये रिसॉर्ट आहे. आपण दोघीच गाडीतून जाणार. तू एवढं सोनं घातलंस, मला भीती वाटतीये. फक्त मंगळसूत्र आणि वरची छोटी चैन राहूदेत बाकी काढून ठेव." त्यांनी असं म्हणताच मी त्यांच्यावर ओरडले. “तुमच्याकडे दागिने नाहीत म्हणून मला घालू नको म्हणताय हे समजतंय मला. मी लहान नाही. माझी काळजी मला घेता येते”, असं म्हणून आम्ही दोघी निघालो. हायवेपासून आतमध्ये गाडीने टर्न घेतल्यावर दोघेजण बाईकवरून समोर आले. त्यांनी हात दाखवून आम्हाला थांबवले आणि पत्ता विचारू लागले. मी खिडकी खाली घेऊन त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार इतक्यात त्यांनी माझं आठ तोळ्यांच मंगळसूत्र हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला.
मी आरडाओरडा केला. सासूबाई घाबरून गेल्या पण त्याही मला धीर देण्याचा, ओरडून मदत मागण्याचा प्रयत्न करत होत्या. तितक्यात काहीजणांनी त्या मुलांना पकडले. आम्हाला पोलीस स्टेशनला जावे लागले. मला माझी चूक कळली होती. सासूबाई बरोबर होत्या. मी उगाच त्यांच्याबद्दल गैरसमज केला. पोलिसांनी चौकशी करताना मला अनेक प्रश्न विचारले. "एवढे दागिने घालायचे कशाला. तुम्हाला स्वतःची काळजी घेता येत नाही का?" असं बोलल्यावर सासूबाई पुढे आल्या. त्या म्हणाल्या, "यात तिची काही चूक नाही. घरातल्या सुनेने अंगभर दागिने घालून चार पाहुण्यांमध्ये मिरवले तर मान राहतो म्हणून मीच तिला दागिने घालण्याचा आग्रह केला." तेव्हा अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आले.
माझ्या निष्पाप सासूवर मी उगाच वेळोवेळी आरोप केले. तिला नेहमी दोष दिला. माझ्या चुका माझ्या नजरेसमोर येऊ लागल्या. आज माझे डोळे उघडले. माझ्या वागण्याचा आणि बोलण्याचा त्यांच्या मनावर किती आघात झाला असेल, याची मला जाणीव झाली. कोणाच्या तरी कान भरण्याने मी माझं सासूसोबतच सुंदर नातं पार खराब करून टाकलं होतं. सासू ही वाईटच असते असे माझ्या मनावर कोरून त्याप्रमाणे तिच्याशी कुचके वागले. आता ही चूक माझ्याकडून होणार नाही. त्या मोठ्या आहेत आणि जे काही बोलतात ते हक्काने आणि माझ्या चांगल्यासाठीच बोलतात हे मी समजून घेतलंय. माझ्या आईचा जेवढा अधिकार माझ्यावर आहे तितकंच प्रेम आणि हक्क मी सासूला देणार. आजपासून त्यांची सून नाही तर मुलगी म्हणून जगण्याचा प्रयत्न मी करतेय. यात मी यशस्वी होऊन आमचं नातं सुंदर व्हावं, एवढीच मला आशा आहे.