आतापर्यंत आपण पाहिले,
पाटलांच्या सुनेच्या आत्महत्येमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते! घटनेच्या तपासणीचे आदेश पोलीस उप निरीक्षक संजीव नाईक यांना देण्यात आले होते.
आता पुढे!
काही वर्षांपूर्वी चुकीच्या आरोपांखाली संजीव नाईक यांची बदली करवण्यात पटलांचाच हात होता. पाटलांच्या कार्यकाळात त्यांनी पाटलांना सळो की पळो करून सोडल्यामुळे नाईकांवर त्यांचा राग होता.
पाटलांची दुसरी बाजू आयुक्तांना माहीत असल्याने त्यांच्यासाठी या घटनेचा न्यायपूर्वक तपास करणे, वर्दीला न्याय मिळवून देण्यासारखे होते.
रुग्णालयातून ते थेट पोलीस ठाण्यात पोहचले. पाण्याचा ग्लास पूर्ण खाली करत त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि काळ्या रंगाचा पेन उचलून घेत काही तरी विचार करत ते पांढऱ्या रंगाच्या फळ्यापाशी जाऊन उभे राहिले.
डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाटलांच्या सुनेच्या मृतदेहाचे प्रत्येक बारकावे त्यांनी त्यावर लिहून घेतले. सोबतंच तपासणी दरम्यान कनिष्ठांकडून घेतलेल्या झडतीत हस्तगत झालेले वैद्यकीय प्रमाणपत्र परत परत नजरेखालून घातले.
सर्व पुराव्यांच्या अभ्यासावरून अशा काही गोष्टी समोर आल्या; ज्यामुळे या घटनेला वेगळे वळण लागले!
निरीक्षकांनी शिपायांची एक तुकडी स्वतःसोबत घेतली. पाटलांच्या घराशेजारच्या लोकांकडून त्यांच्याविषयी माहीत करून घेण्याचे त्यांनी शिपायांना आदेश दिले.
पोलिसांची तुकडी आदेशानुसार तात्काळ रवाना झाली. सोबत संजीव नाईक ही असणार होते.
पाटलांच्या घरापासून साधारण काहीच अंतरावर एक व्यक्ती संशयित नजरेने पोलिसांच्या गाडीकडे पाहताना नजरेस पडली.
पोलिसांनी गाडी त्यादिशेने वळवली. हे पाहताच ती व्यक्ती सतर्क झाली. पोलिसांना संशय आला आणि त्यांनी गाडी थांबवून घेतली. गाडीतून उतरत नाईकांनी त्यांच्यावर नजर रोखून धरली.
"पाटल्यांच्या सुनेविषयी तुम्हाला काही कल्पना आहे का?"
जवळ पोहचत उपनिरीक्षकांनी त्या व्यक्तीला प्रश्न केला.
"हो, म्हणजे! त्यांनी आत्महत्या केल्याचे समजले आणि धक्काच बसला!"
"का?"
"गर्भवतीने आत्महत्या करणं! थोडं संशयास्पद नाही का वाटत?"
"पाटलांविषयी तुम्हाला आणखी काही माहिती?"
"माहिती तशी काही खास नाही. हो पण एक विचित्र गोष्ट पाटील कुटुंबियां विषयी आहे!"
"ती कोणती?"
"नाही म्हणजे बघा ना, पाटील माजी कॅबिनेट मंत्री असून देखील बुआ-बाजीवर कसे विश्वास ठेवतात?"
"म्हणजे?"
"सुमन सांगत होती, म्हणजे माझी बायको हो, पाटलांच्या सुनेने तिला एकदा सोबत नेले होते!"
"आणि ते कशाला?"
"पाटलांच्या सुनेला मुलगी होत नव्हती म्हणून!"
"त्या बाबांचा पत्ता मिळेल का?"
"हो का नाही? घ्या. १०८, कपिल नगर, कैवल्य बिल्डिंग."
"काही वाटल्यास आम्ही परत येऊ!"
"हो हो, चालेल."
पोलीस निरीक्षकांचा ताफा बाबाच्या अड्ड्याकडे वळला. बाबाचा पत्ता जास्तच आत असल्यामुळे शोधण्यात जरा वेळ निघून गेली.
साधारण तीन तासांच्या प्रदीर्घ शोधानंतर शेवटी त्यांचा पत्ता सापडला!
शिपायांनी जागेचा तपास सुरू केला; मात्र तिथे त्यांना काहीही सापडले नाही.
नाईकांनी सगळीकडे बाबाचे सर्च वॉरेंट जारी केले. बाबाला गजाआड करण्यात काही दिवस निघून गेले आणि शेवटी खूप प्रयत्ना अंती ते हाती लागले.
बाबाची पोलीस कोठडीत तात्काळ रवानगी करण्यात आली. नाईकांना बाबाची असलीयत माहीत असल्याने त्यांचा आधीपासूनच बाबावर राग होता.
बाबाला आत बसवत विचारपूस करायला सुरुवात करण्यात आली. समोर पोलीस उप निरीक्षक संजीव नाईक बसून होते.
"बाबाजी सांगा, पाटील कुटुंबीय आणि तुमच्यात काय संबंध होते?"
"अतिगुह्यतरं तत्वं सर्वमंत्रौघविग्रहम। पुण्यात् पुण्यतरं चैव परं स्रेहाद् वदामि ते।।"
"बाबाजी सांगणार आहात, की आम्ही आमची पद्धत वापरायची?"
"हे बघा, तुम्ही मला विनाकारण उचलून आणलंय! मला सोडा. माझा आणि पाटील कुटुंबीयांचा काहीही संबंध नाहीये."
"खरंच का?"
"होय!"
"शिंदे!"
असं म्हणताच शिंदेंनी नाईकांच्या हाती काठी दिली. हातात काठी पाहून बाबा पुन्हा मोठ्याने मंत्रोपचार करू लागले.
"हा ढोंग जरा बंद करा. कारण तुमच्या मागील काळ्या इतिहासाला आम्ही उजाळा दिलाय!"
"अतिगुह्यतरं तत्वं सर्वमंत्रौघविग्रहम। पुण्यात् पुण्यतरं चैव परं स्रेहाद् वदामि ते।।"
"कितीही मंत्रोपचार करा, तुम्ही वाचू शकणार नाही."
"माझ्या विरोधात पुरावे काय?"
"सलोनी! तुम्ही म्हणाल तर पिक्चर इथेच सुरू करतो?"
हे नाव ऐकताच बाबाच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले!
"आता तरी सांगाल, की पूर्ण इतिहास वाचून दाखवायची वाट पाहताय?"
परत मोठ्याने मंत्रोपचार सुरू झाला!
आता नेमके या भोंदू बाबाचे गूढ काय?
.
.
.
.
क्रमशः
©® खुशाली ढोके.