पुरातन व आगळ्या-वेगळ्या वस्तू गोळा करण्याचा माझा छंद अगदी काॅलेज जीवनापासूनचा आहे. गेल्या पंधरा वर्षात मी अश्या खूप वस्तू गोळा केल्यात.त्यात जुनी नाणी,शिवकालीन हत्यारे,दगडांच्या व लाकडाच्या कोरीवमूर्त्या,उत्कृष्ट कलाकुसर असलेली भांडी ,तबके अश्या
बर्याच वस्तू होत्या. काही जुनी कागदपत्रे-दस्तएवज जे संस्कृत,मोडी व पाली भाषेत होते. या कागदपत्रांचं भाषांतरे मी मराठीत तज्ञांकडून करून घेतलीत. या खटाटोपात बराच पैसा खर्च झाला होता. बरीच धावपळ झाली होती. शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला होता. पण म्हणतात ना हौसेला मोल नसत म्हणून! माझ्या मित्रांच्या सल्ल्यानुसार या सारख्या वस्तूंची योग्य जोपासना व्हावी म्हणून मी एक वस्तूसंग्रहालय बनवलय. या छोट्याशा संग्रहात मी जमवलेल्या सर्व वस्तू अत्यंत विचारपूर्वक व कल्पकतेने मांडलेल्या आहेत.प्रत्येक वस्तू कुठे मिळाली,कुणाकडून मिळवली ---संबंधित वस्तूचे ऐतिहासिक मूल्य व महत्व थोडक्यात लिहून मी त्या-त्या वस्तूंच्या शेजारी ठेवलल आहे. आवड व सवड असणार्या व्यक्तींना अल्प अस मूल्य देवून या वस्तू बघता याव्यात अभ्यासता याव्यात यासाठी मी ही सारी सोय केलीय.
पण मधल्या दालनात अगदी डावीकडे कोपरा आहे .तिथे दोन अश्या वस्तू आहेत की ज्यांची काहिचं माहीती लिहिलेली नाही. बरेचजण मला त्या संदर्भात विचारतात. पण मी याबद्दल फारसं बोलत नाही. मी स्वतः त्या वस्तूंजवळ जाण टाळतो. त्या वस्तू नजरेला पडल्या तरी माझ्या अंगावर काटा उभा राहतो.दरदरून घामही येतो. मन थरारून जात. त्या आठवणी नकोश्या वाटतात. त्यावेळी जे घडलं ते अनाकलनीय व गूढ होते. कल्पनेच्या पलीकडचे होते,अविश्वसनिय होते. त्यामुळे मी बोलायचे टाळतो. पण आजही मला ते सार आठवते ---अगदी बारीक-सारीक संदर्भा सहीत.
त्यावेळी माझ जुन्या वस्तू बद्दलचे वेड माहीत असलेल्या एका परिचिताने मला माहीती दिली की गगनबवड्याच्या खालच्या बाजूस 'खोटले' नावाच्या गावात एक जाहगिरदार राहतात. त्यांच्याकडे काही जुनी हत्यारे, नाणी व कांही मूर्ती आहेत.थोडासा प्रयत्न केल्यास काही वस्तू मिळू शकतात. हे समजताच मी बेचैन झालो. गगनबवडा येथे जाण्याच मी निश्चित केले. एके दिवशी पुणे कोल्हापूर बसने मी कोल्हापूर गाठले. दुपारी जेवण कोल्हापुरात घेतले. कोल्हापूर कणकवली गाडी पकडून गगनबवडा येथे आलो.सायंकाळचे साडे-चार वाजले होते. बसस्थानकावर चौकशीअंती कळल की खटले गावात बस जात नाही. परंतु गावाच्या फाट्यावरून जाणारी बस ठिक सहा वाजता सुटते. फाट्यावरून सुमारे तासभर पायवाट तुडवल्यावर गावात पोहचता येईल. दिवस नोव्हेंबर होते. दिवस लहान असल्याने काळोख लवकर पडायचा. त्यात पुन्हा थंडीचे दिवस. त्यामुळे गावात जावे की पुन्हा गगनबवडा मध्ये?याचा मी विचार करू लागलो.पण माझी उत्सुकता--- माझ वेड मला बेचैन करु लागल. अखेर थोडा ईकडे-तिकडे फिरून मी पुन्हा पावणेसहाला स्टॅंडवर आलो. पण मला पाहिजे असलेल्या एसटीचा पत्ता नव्हता. अखेर चहाची बस सव्वासहाला प्लॅटफॉर्मवर लागली.तोपर्यंत पार अंधार पडला होता. गाडीत सुमारे पंधरा-सोळा माणसं होती. खोटले गावात जाणारा एखादा सोबती मिळेल म्हणून चौकशी केली. पण त्या गावात जाणारा एकही माणूस नव्हता. तरीसुद्धा गावात कस जायचं? वेळ किती लागेल?याची चौकशी केली. जहागीरदार सर्जेराव पाटील यांच्याविषयी काही माहिती मिळते का याची चाचपणी केली. एकाकडून कळल की सर्जेराव हा दिलदार व धार्मिक प्रवृत्तीचा माणूस आहे. हे ऐकून मी थोडा खूष झालो.माझ काम होईल अस मला वाटू लागल.
' खोटले' गावाचा फाटा आल्यावर कंडक्टरने मला जाणीव करून दिली. मी बॅग उचलली,खांद्यावर अडकवली. बस थांबल्यावर मी खाली उतरलो. काळ्या-कभिन्न अंधारात मी त्या निर्मनुष्य रस्त्यावर एकटाच उभा होतो.वर आकाशात चमचमणारे तारे---मधे मधे येणारे पक्ष्यांचे आवाज---व थंड वारा याची जाणीव मनाला होत होती. खांद्यावरच्या बागेतून बॅटरी काढली. माझ्या छंदापाई मला खूपवेळा रात्रीचा प्रवास करावा लागत असे. बॅटरीच्या प्रकाशात डाव्या बाजूला झाडांच्या व झुडुपांमधून खाली उतरत जाणारी पायवाट मला दिसली. बागेतून स्वेटर व कानटोपी काढली व अंगावर चढवली.रात्र जसजशी वाढत जाईल तसतशी थंडी वाढत जाणार होती. थंडीमुळे चालण्याचा फारसा त्रास होणार नाही हे माझ्या लक्षात आल.
बॅटरीच्या प्रकाशात मी एका लयीत चालायला सुरुवात केली. जवळपास साडेसात वाजले होते. एव्हाना रातकिड्यांची किर्र _किर्र सुरू झाली होती.मध्येच फरफटत जाणार्या प्राण्याचे आवाजही येत होते. मी यापूर्वी बर्याच वेळा रात्रीचा पायी प्रवास केला होता. पण यावेळी परिस्थिती वेगळी होती. एक अनामिक भिती म्हणा किंवा जाणीव---माझ्या मनावर दडपण आणत होती. मध्येच गाडीतून रानकुत्र्यांचा आवाज येत होता.दुरपर्यत कुणाची जाग नव्हती.दिवेही दिसत नव्हते. मनावरचा ताण घालविण्यासाठी मी आवडती गाणी गुणगुणायला सुरुवात केली. अर्धा एक तास चालण्यामुळे माझ अंग गरम झाल होते. थंडीची फारसी जाणीव होत नव्हती. पण ही रानातली वाट संपण्याची चिन्ह दिसत नव्हती.माझ्या चालण्याचा वेग मंदावला होता. थोडी विश्रांती घेण्यासाठी कुठे मोकळी जागा मिळते काय हे मी पाहत होतो.पण सुरक्षित मोकळी जागा मला दिसेना. एवड्यात आकाशात मोठा प्रकाश दिसला. एक तेजस्वी उल्का वेगाने माझ्या समोरूनच जळत गेली.क्षणभर सारे आकाश उजळ्यासारखे झाले व पुन्हा तोच गडद काळा अंधार चोहीकडून माझ्यावर चाल करून येतोय असे मला वाटू लागले.चार ते पाच मिनिटे आणखी चालल्यावर माझ्या समोर एक नव संकट उभ राहिले. अचानक बॅटरीचा प्रकाश अतिशय मंद झाला.कशीबशी पायाखालची वाट तेवढीच दिसत होती. खर म्हणजे मी बाहेर पडताना बॅटरी पूर्ण चार्ज केली होती. त्यामुळे बॅटरीच अस अचानक मंद-मंद होत जाण मला आश्चर्यकारक वाटू लागले. अश्या स्थितीत पुढे चालण अवघड होत.उगाचच रात्रीच्या वेळी गावात जायचं धाडस केल अस वाटू लागले. त्यापेक्षा रात्री बावड्याला थांबून सकाळी गावात आलो असतो तर बर झाल असत अस वाटू लागल.
तेवढ्यात बॅटरीच्या मंद प्रकाशात समोर एखाद शेतघर किंवा मांगर असावा अस वाटू लागल. पण तिथपर्यंत पोहोचेन पर्यंत बॅटरी पूर्णपणे बंद झाली. सुरुवातीला काहीच दिसेना. पण काळोखाला डोळे सरावल्यामुळे थोडंफार दिसू लागल. खर म्हणजे मीही आता त्या अंधाराचा भाग बनून गेलो होतो. बहुधा एखादा वापरात नसलेला असा तो पडीक मांगर होता. बाजूला कडुनिंबाच झाड असावं.मी चाचपडत दगडी पायरी चढलो. थोडावेळ स्तब्ध उभा राहिलो.नंतर जाणवल सांगायला आत एक खोली होती. बाहेर ऐसपैस जागा होती. डाव्या बाजूला कडेला एक लाकडी बाक होता. बहुधा भात वगैरे झोडपण्यासाठी त्याचा वापर होत असावा. आतल्या खोलीचे दरवाजा बंद होता व त्याला बाहेरून फक्त कडी लावलेली होती. मी माझी बॅग बाकड्यावर ठेवली.किमान मला एक सुरक्षित जागा सापडली होती. आता सकाळ पर्यंत इथेच विश्रांती घेऊन पहाटे उठून जहागीरदारांच्या वाड्यावर जायचं अस मी ठरवले. गगनबवड्यावरून येताना मी सोबत गरज पडेल म्हणून भाजी चपाती घेतली होती. भाजी-चपाती खाऊन वाॅटरबॅगमधील पाणी पिऊन मी बाकड्यावर पहुडलो.
सुमारे साडे आठ वाजले असतील.एवड्या लवकर मी कधीच झोपलो नव्हतो.तरीही प्रवास व चालणे यामुळे शरीराने व मनाने मी थकलो होतो.समोर दिसणार्या निरभ्र आकाशातील तारे मी निरखित बसलो.रातकिड्यांचा आवाज---पानांची सळसळतं याखेरीज सारे वातावरण स्तब्ध होते. असा किती वेळ गेला कुणास ठाऊक---.या कुशीवरून त्या कुशीवर वळता-वळता कधी डोळे लागला मला कळलच नाही. असाच काही वेळ गेला---मला मध्येच जागं आली. कसला तरी आवाज कानी पडल्याचा भास झाला.शरीरावर व मनावर झोपेची गुंगी होती. त्यामुळे उठाव वाटत नव्हत.आवाज आतल्या खोलीतून येत होता.मी जिथे झोपलो होतो तिथेच माझ्या डोक्याजवळ खिडकी होती. अर्धवट बंद असलेल्या त्या खिडकीतून दिव्याच्या प्रकाश बाहेर येत होता. आता मात्र माझी झोप पार उडाली. आत कोण होत?दरोडेखोर्,भुरटे चोर की आणखी कुणी?माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. या रानात मी एकटा अनोळखी आणि आत जे कुणी आहेत त्यांना मी बाहेर आहे हे समजल तर माझ काय होईल?या भितीने माझ्या अंगावर काटा उभा राहिला. एक क्षण अस वाटल की गुपचुप उठाव आणि तिथून पोबारा करावा.पण पाय जड झाल्यात उचलतो नव्हते.मी तेथूनच अर्धवट उघड्या खिडकीतून आत पाहू लागलो.आत बहुधा दोनच माणसे असावित. मला समोरून जो इसम दिसत होता,तो भबरदार देहयष्टी असलेला होता. सावळ्या वर्णाचा,भरगच्च मिश्या असलेला---डोक्यावर फेटा गुंडाळलेला असा हा इसम एखाद्या खुर्चीत किंवा कट्ट्यावर तरी बसला होता. दुसरी व्यक्ती त्याच्या समोर उभी होती.तिची पाठ माझ्याकडे होती. या उभ्या असलेल्या व्यक्तीच्या हाती कंदील होता.
"या सर्जेराव पाटील---या. "तो खाली बसलेला इसम कूटिलपणे हसत म्हणाला. सर्जेराव पाटीलांच नाव ऐकून मी दचकली.मला ज्यांच्याकडे जायचं आहे तेच हे सर्जेराव पाटील नव्हेत ना? असा मला प्रश्न पडला. उत्सुकतेने मी कान देऊन ऐकू लागलो.
"मला माहीत होते की मी निर्वाणीचा निरोप दिल्यावर माझा लाडका भाऊ धावत येणार म्हणून!" पुन्हा तो समोरचा इसम बोलत होता.याचा अर्थ समोरचा माणूस हा सर्जेरावांचा भाऊ होता.
"हे बघ हिंमतराव---माझ्याकडे वेळ नाहीय--- मला इथे या वेळी का बोलावलं ते सांग.खरे म्हणजे माझी तुझ्याशी बोलण्याची जराही ईच्छा नाही. "सर्जेरावांच्या आवाजात त्रयस्थपणा व नाराजी होती. पण मला एक जाणवल ते म्हणजे दोघांचा आवाज अगदी सारखाच होता.फक्त हिंमतरावांच्या आवाजात कुटिलपणाची झाक होती एवढंच!
"हे बघ सर्जेराव,आपण दोघे जुळे भाऊ.तरीही पहिल्या जन्म माझा झाला म्हणून मी मोठा ---जेष्ठ----तुला माझ बोलणं ऐकावच लागेल."
मध्ये थोडा वेळ शांततेत गेला. कुणीच काही बोलल नाही.समोरच नाटक त्रयस्थपणे पाहण्याच्या माझ्या साठी ही शांतता असह्य होत होती. दोन जुळ्या भावांमध्ये या भीषण रात्री चाललेला थोडा संवाद ऐकण्याचा माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
"अरे, असा उभा का?बैस इथे या बाजल्यावर---हे बघ सर्जेराव,मला आता सतत,तोंड लपवत---लपून-छपून जगण्याचा कंटाळा आलाय---मला निवांतपणे जगावस वाटतय."
"मला वाटत---आता खूप उशीर झालाय. अरे,काय करायच ठेवलस तू?लूटमार,दरोडेखोर् व बाकांवर अत्याचार!सारख्या कुटूंबाचा कलंक लागलाय तुझ्यामुळे. पोलीस मागावर आहेत तुझ्या "सर्जेराव त्वेषाने बोलत होते.
"होय.मला माहीत आहे.एक भाऊ रामासारखा---तर दुसरा रावणासारखा!पण मला जे पाहिजे ते मी मर्दासारखा हिसकावून घेतो.बस्स !पण मला आता सरळ जीवन जगाचय---तुझ्यासारखे. "
"हे बघ हिंम्मतराव,त्यासाठी तू प्रथम पोलिसांच्या स्वाधीन हो."
"पोलिसांच्या स्वाधीन!छट्--- कधीच नाही. तिथे माझ्यासाठी एकतर फाशी किंवा जन्मठेप ठेवलेलीच आहे. मला आयुष्यभर तुरुंगात कितपत पडायच नाहीय.ऐषआरामात---रुबाबात जगायचंय!" हिंमतराव छद्मीपणे म्हणाला.
यावर सर्जेराव काहीच बोलले नाहीत. मघापासून माझ्या लक्षात न आलेली एक गोष्ट मला जाणवली ती म्हणजे हिंमतरावांच्या मांडीवर बंदूक होती व तो बंदुकिशी हाताने चाळा करत होता.
"माझ्या डोक्यात एक योजना आहे. त्यासाठी मी तुला इथे बोलावलंय. आता मी माझा अवतार संपवणार आहे---आणि तू इथून माघारी जाणार आहेस."
"म्हणजे?मी नाही समजलो."सर्जेराव असंमजसपणे म्हणाले.
अचानक माझ्या डोक्यात एक विचार चमकला.हिंमतरावांच्य डोक्यात काय चाललंय ते माझ्या लक्षात आल.त्या क्षणी माझ्या अंगावर काटा उभा राहिला.
"माझ्या डोळ्यात बंधुराया---आता तुझ्या जागी मी जाणार आहे.पण तो मी म्हणजे---हिंमतराव म्हणून नव्हे,तर सर्जेराव म्हणून---आणि इथे खरा सर्जेराव हिंमतराव म्हणून आत्महत्या करणार आहे. "
खदखदून हसत हिंमतरावांनी बंदूक उचलली.सर्जेरावांच्या अगदी जवळजात बंदूक रोखली. कदाचित अचानक घडलेल्या या घटनेने असेल,सर्जेराव झाल्यावरच खिळल्यासारखे उभे राहिले. प्रतिकार करणे किंवा पळून जाणे यापैकी कोणतीच गोष्ट त्यांनी केली नाही. अस काही घडेल अस त्यांना स्वप्नातही वाटल नसावं.गोळीचा आवाज व त्यापाठोपाठ किंकाळीचा आवाज अंधार चिरत दूरवर घुमला.
माझ्या हातापायांना कंप सुटला. ओरडावस वाटत होतं. पण घरातून आवाज येत नव्हता. सर्जेराव खाली पडले.त्याही स्थितीत मला जाणवल की सर्जेराव व हिंमतराव अगदी हुबेहूब एकसारखे दिसत होते. खाली रक्ताच्या थारोळ्यात तडफडत पडलेले सर्जेराव व खदखदून हसत बंदूक नाचवत असलेला हिंमतराव---खाली पडून विझताना चाललेला कंदील--हे बघता बघता माझ्या जाणिवांना माझी साथ सोडली. बेशुद्धीच्या खोल खोल गर्तेत मी ढकलला गेलो.
सकाळी भल्या पहाटे मला पक्ष्यांच्या किलबिलीने जागा आली. पूर्वेला क्षितीज नारिंगी रंगाने उजळेल होते.वातावरण प्रसन्न होते.काल भयाण वाटणारा निसर्ग आता सुंदर वाटत होता.मी बाकड्यावर उठून बसलो. झोपेच्या गुंगीतून मी बाहेर आलो होतो. अचानक मला कालचा प्रसंग आठवला व पुन्हा माझ्या अंगावर काटा उभा राहिला. सार शरीर भर थंडीतही घामाने भिजून गेले.मी एका खुनाचा एकमेव साक्षीदार होतो.आत सर्जेरावांचा प्रेत पडलेले असणार,या जाणीवेने मी घाबरलो.आवंढा गाळत मी धडपडत उठलो. वाॅटरबॅगमधील पाणी मी सपासप तोंडावर मारलं.तत्काळ पुन्हा बावडयाला जावं अस मी ठरवल. बॅग उचलून खांद्यावर लावताना माझ लक्ष खिडकीतून आत गेल.आत अजूनही अंधार होता. पण तरीही मला वाटल की आत कालच्या घटनेच्या कोणत्याही खुणा आता दिसत नाहित. त्याचवेळी माझ लक्ष दरवाज्याकडे गेले. दरवाज्याला कालच्यासारखीच बाहेरून कडी होती. माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले.
मी अलगद दरवाज्याची कडी काढली. दरवाजा पूर्ण उघडला. खोलीत प्रकाश शिरला. मी आत नजर टाकली आणि चरकलोच.तिथे काहीच नव्हते; ना सर्जेरावांचा मृतदेह---ना बंदूक! ना तो खाली पडून फुटलेले कंदील. मग मी जे काल रात्री पाहिल ते काय होत? की मला भास झाला--की मला स्वप्नात सार दिसल?मला काहीच समजेना. माझ डोकं गरगरायला लागले. मी सावधपणे खोलीत नजर फिरवली. खोली गेली कित्येक दिवस वापरली गेली नव्हती. समोरच्या भिंतीवर एक फळी ठोकलेली होती.त्यावर संगमरवरातील साधारण पाऊण फूट उंचीतली एक देखणी विठ्ठलाची मूर्ती होती.खर म्हणजे विठ्ठलाची मूर्ती नेहमी काळ्या दगडातली असते,पण ही अगदी वेगळी पांढराशुभ्र मूर्ती पाहून तिचे आगळेपण माझ्या लक्षात आल. दरवाज्याच्या डाव्या बाजूला भिंतीवर थोडा गंज चढलेली सर्वसाधारण तलवारीपेक्षा लहान पण खंजीरापेक्षा मोठी तलवार लटकवलेली होती. मी थोडा जवळ गेलो.हात न लावता निरीक्षण केल.त्या तलवारीच्या मुलीवर सुंदर नक्षीकाम केलल होत.पात्याच्या रूंदीवरून व प्रकारावरून मला जाणवल की ही तलवार अठराव्या शतकातली असावी.मी पुन्हा बाहेर आलो व दरवाजा अलगद बंद केला.
माझ्या शरीरातील सारे अवसान गळून गेले. काहीच लक्षात येत नव्हत.जर कालचा भास होता तर मग सर्जेराव व त्यांचा मला माहितीही नसलेला जुळा भाऊ मला का दिसला..?बंदुकिच्या गोळीचि व सर्जेरावांच्या किंकाळीचा आवाज मला ऐकू आला?या सगळ्याशी माझा काय संबंध?की मी एखाद्या आधी घडलेल्या किंवा पुढे घडणार्या घटनेची दृश्यं बघितली होती?काही क्षण विचार करून मी गावात जाण्याचे निश्चित केल.माझ्या प्रश्नांची उत्तरे प्रत्यक्ष जहागीरदारांच्या घरी गेल्याशिवाय मिळणार नव्हती.
मी खाली पायवाटेवर आलो.एव्हाना चांगलच उजाडल होत.मी समोर नजर टाकली. धुक्याचा आवरणात दाणे फेकल्यागत इतस्तत: पसरलेली वीस ते पंचवीस घरांची छप्परे मला पुसटशी दिसली. मनावरचे दडपण निश्चयाने झुगारून मी वाट चालू लागलो. आता पाऊलवाट संपली होती व शेतं सुरू झाली होती. शेताच्या बांधावरून मळलेल्या पाऊलवाटेवरून मी चालायला सुरूवात केली. वाटेत मला एक प्रौढ माणूस दिसला. माणूस बोलका होता. त्यानेच प्रथम बोलायला सुरुवात केली. त्याच्या बोलण्यातून कळलं की तो जहागीरदारांच्या वाड्यावर कामाला आहे. नशिबाने मला योग्य माणूस सापडला होता. त्याच्याशी गोष्टी करत करत मी बरीच माहिती काढली. सर्जेराव पाटील अतिशय चांगला माणूस आहे. आजूबाजूच्या दहा गावात त्यांच्या शब्दाला मान आहे.ते दानशूर आहेत. नोकर-चाकरांना ते आपलेपणाने वागवितात. मदत करतात. त्यांची बायको सौ.राजलक्ष्मी या अगदी शांत प्रवृत्तीच्या,सोज्वळ व सात्विक स्वभावाच्या आहेत. गावकर्यांच्या अडीअडचणींला धावून जातात. जहागीरदारांच्या पत्नी असूनही सर्वात मिसळतात.
त्या माणसाला मी सहज विचारले की जाहगिरदारांचा कुणी भाऊ वगैरे आहे का?तो थोडासा नाराजीने म्हणाला "साहेब भाऊ कसला पक्का वैरी होता तो." हिंमतराव नाव होतं त्याच. सर्व परिसरात धुमाकुळ घातला होता त्याने!चोरी-दरोडे-बलात्कार सार सार केल त्याने!पण बर झाल तीन महिन्यांपूर्वी स्वत:गोळी झाडून आत्महत्या केली त्याने.माझा मेंदू सुन्न झाला. अंग शहारल. म्हणजे मी जे दृश्य बघितल होत ते तिन महिन्यांपूर्वी घडलेल एका काळरात्र होते. माझ त्या ठिकाणी जाण हा योगायोग नव्हता,तर ती नियतीची योजना होती. आज जो माणूस जहागीरदार सर्जेराव पाटील म्हणून वावरत होता तो सर्जेराव नसून त्याचा जुळा भाऊ हिंमतराव होता. पण मी हे सांगून कुणालाही पटलं नसतं. उलट मीच संकटात सापडलो असतो.मी पुन्हा त्यांना विचारले,की हिंमतरावांनी आत्महत्या कुठे केली?त्यावेळी त्यांने संक्षिप्त उत्तर दिल की रानातल्या शेतघरात!आता माझ्या सार्या शंका मिटल्या होत्या.
बोलता-बोलता आम्ही जहागीरदारांच्या वाड्यावर आलो.एक दगडी दिमाखदार वाडा माझ्या नजरेला पडला.आजूबाजूला छान बगीचा केला होता. त्या वेळी जाहगिरदार (हिंमतराव?)घरात नव्हते. माझ स्वागत सौ.राजलक्ष्मी यांनी केल. त्यांना पाहताच माझ्या ह्रदयात कालवाकालव झाली.उंच-शरीराने प्रमाणबध्द,नऊवारी साडी,कपाळावर ठसठसीत कुंकू---राजघराण्यातल्या स्री सारखं त्यांच चालणं व बोलणं डौलदार होता. त्यांच्या चेहर्यावर सात्विकपणाचे तेज होत.कुलीन प्रतिव्रतेची लक्षण तिच्या वागण्यात दिसत होती. मी माझ्या येण्याचा हेतू त्याना सांगितला. त्या म्हणाल्या,की दुपारी जाहगिरदार आल्यावर त्यांच्याशीच या संदर्भात बोलाव. त्यांनी माझी उत्तम उठबस केली. दुपारी जाहगिरदार आल्यावर मी त्यांना भेटायला गेलो.त्यांना बघून मी दंग झालो.काल रात्री शेतघरात ज्या हिंमतरावांना मी पाहिले तेच आणि अगदी तसेच दिसत होते.जगासमोर सर्जेराव बनून वावरणारा दुसरा कोणी नसून हिंमतराव होता,या बद्दल माझ्या मनात कोणतीही शंका राहिली नाही. मला दया आली त्या माऊलीची.त्या स्वाध्वीची!खरंच तिला हे समजल तर---पण नकोच तिला हे कधीच न समजो...किमान तिच्या मनाच्या पावित्र्यात तरी धोका पोहचणारी नव्हता. त्या मुळे मी त्या तथाकथित जाहगिरदारांना माझ हेतू सांगितला. माझ्या अपेक्षेप्रमाणे त्यांनी गोडगोड बोलून मला वाटाण्याच्या अक्षता लावल्या.
माझ्या मनात हिंमतरावां बद्दल प्रचंड संताप खदखदत होता. त्यांन जे कूटिल व हिडीस अस कारस्थान यशस्वी केल थे मला माहीत असूनही मी उघड करू शकत नव्हतो. मी मुद्दामच वेळ घालवण्यासाठी गावात फेरफटका मारला.गावातल्या शंकराच्या देवळात काही काळ घालवला व संध्याकाळी मी पुन्हा गगनबवड्याच्या दिशेनं जाण्यास सुरूवात केली. गावातली वाट संपून पुन्हा शेतातील उंच-सखोल पायवाट सुरू झाली. इथून पुढे सगळा निर्मनुष्य भाग होता. कळसुत्री बाहुलीप्रेमाने माझी पावलं आपोआप त्या शेतघराकडे वळली.मी नेमकं काय करतोय किंवा मला नेमकं काय करायच ते माझ मलाच कळत नव्हते!कुणीतरी अदृश्य शक्ती मला आपल्या ईच्छेप्रमाने नाचवत होती.मी(मी,खरच मीच होतो का?)व्हरांड्यात प्रवेश केला. समोरच्या फळीवरची विठ्ठलाची मूर्ती मी उचलली. खरं म्हणजे एखाद्याची परवानगी न घेता वस्तू घेणे मला कधीच आवडल नसत.पण आज जे काही होत ते आपोआपच माझ्या हातून घडत होत.त्यानंतर मी भिंतीवरील छोटेखानी तलवार काढून घेतली. एव्हाना अंधारून आल होत.मी ती मूर्ती बॅगेत ठेवली व तलवार खिडकीवर ठेवली आणि बाकड्यावर बसून राहिलो.थोड्याच वेळात मी अंधाराचा भाग बनून गेलो. मी अगदी शांत बसून होतो.कुठच्यातरी घटनेची--प्रसंगाची मी वाट बघत होतो.मला फक्त माझ्या श्वासाचा आवाज ऐकू येत होता. असे काही तास झाले कुणास ठाऊक! माझ्या हातात रेडिअमचे रात्रीच्यावेळी सुध्दा दिसणार घड्याळ होत पण थे बघण्याची मला ईच्छा नव्हती. शेवटी मला ज्याची अपेक्षा होती ते घडल.माझ लक्ष अर्धवट उघड्या खिडकीवरच होत.अगदी कालच्यासारखीच आत हालचाल सुरू झाली. कंदिलाच्या प्रकाशात कालचच दृश्य पुन्हा सुरू झाल.सार अगदी तसच घडत होते. माझ शरीर सूक्ष्म पणे कंप पावतो होत.अचानक मी ती छोटी तलवार उचलली अलगद पावलं टाकत मी दरवाज्याजवळ गेलो.दरवाज्याला मी मुद्दामहून कडी लावली नव्हती. मी त्या क्षणाची वाट पाहत होतो आणि त्या नाट्यांचा अंतिम क्षण आला.बंदुकीच्या गोळीचा व त्यानंतर सर्जेरावांच्या किंकाळीचा अंधार चिरत जाणारा आवाज!बस्स---त्या क्षणी मी आत घुसलो. खाली तडफडत पडलेले सर्जेराव----बंदूक नाचवत खदखदा हसणारा हिंमतराव आणि कंदीलाचे विझता-विझता भगभगणारी वात हे सारे बघून मी बेभान झालो.द्वेशाने पुढे होत मी हातातली तलवार हिंमतरावांच्या छातीत खुपसली----आणखी एक किंकाळी(?)आसमंतात धुमली. चेहरा वेडावाकडा करत हिंमतराव खाली कोसळला.
मी तलवार खसकन मागे ओढली.तिथं एकही क्षण न थांबता बॅग उचलून फाट्याच्या दिशेने चालू लागलो. काल अचानक बंद पडलेली बॅटरी आता ह्यापैकी प्रकाश देत होती.मन शांत झाल होत.शरीर घामेघूम झाल होत. एक अनाम भिती माझ्या मनात पसरली. (मी पुन्हा मी झालो होतो का?)मी सुमारे अर्ध्या तासात फाट्यावर आलो.तिथे झावळांची शेड होती. तिथे त्या अंधारात मान गुडघ्यावर घालून मी गप्प राहिलो.सकाळी सव्वा आठच्या गाडीने मी बावड्याला परतलो. पुरी रात्र मी झोपलो नव्हतो. बावड्याला स्टॅंड शेजारी एका लाॅजवर मी खोली घेतली. दुपारपर्यंत झोप काढली. दोन वाजता उठून फ्रेश झालो. थोड जेवण घेतलं व पुण्याला जाणारी बस पकडण्यासाठी मी स्टॅंडवर आलो. गाडीची वाट पाहत थांबलो. एवड्यात माझ्या कानावर शब्द पडले.एकजण दुसर्याला सांगत होता,
"अरे,खोटल्याला गेलो होतो. तिथले जाहगिरदार सर्जेराव पाटील काल रात्री दोन वाजता अॅटॅक येवून वारले. त्यांच्या अंत्यविधीसाठी गेलो होतो. झटका येण्याअगोदर ते माझ्या काळजातील कुणीतरी तलवार खुपसली असे जोरजोराने ओरडत होते म्हणे. त्यांचा चेहरा वेडावाकडा झाला होता. पण एक चांगला माणूस अकालीच गेला. "
हे ऐकल्यावर मी शांत झालो.जे मला अपेक्षित होते तेच घडले होते.
आज माझ्या वस्तूसंग्रहालयात विठ्ठलाची संगमरवरी मूर्ती व ती अठराव्या शतकातली तलवार आहे. पण मी तिथे काहीच लिहिलेले नाही--कस लिहिणार?तुम्हीच सांगा बर!