Jagnyach karan shodha in Marathi Moral Stories by संदिप खुरुद books and stories PDF | जगण्याचं कारण शोधा

Featured Books
Categories
Share

जगण्याचं कारण शोधा

रात्री मी गाढ झोपेत असताना एकच्या सुमारास अचानक माझ्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला. दिवसभराच्या कामकाजामुळे खूप थकवा आल्याने मला गाढ झोप लागली होती.माझ्या डोळयांच्या पापण्या जड झाल्यासारख्या वाटत होत्या. मी कसेतरी अर्धवट डोळे उघडून उशालाच ठेवलेला मोबाईल पाहिला. माझा मित्र मल्हारचा फोन होता.मल्हारचा फोन इतक्या रात्री का आला असेल याचा मला प्रश्न पडला. मी फोन उचलला.

        “हॅलो!”

        “हॅलो! तू लवकर सरकारी दवाखान्याकडे ये.” मल्हार जरा घाईत आणि घाबरतच बोलला.

        त्याच्या अशा बोलण्याने मला काळजी वाटु लागली. माझी झोप कुठल्या कुठे उडून गेली. काय झाले असेल याचाच विचार करत मी त्याला विचारले,

“ काय झालं मल्हार?”

        “तू आधी इकडे ये.आल्यावर सांगतो.” असे म्हणत त्याने फोन ठेवून दिला.

        मी दवाखान्याकडे आलो. तो दवाखान्याच्या बाहेर माझीच वाट पाहत उभा होता. सोबत त्याची आईही होती.

        मी, “काय झालं मल्हार?”

        “अरे तिला इथे ॲडमीट केले होते. आई तिच्याजवळ थांबली होती. मी घरी गेलो होतो. तेवढयात आईचा फोन आला. तिने दवाखान्यात खूप राडा केला.डॉक्टर, नर्सेसना शिव्याशाप दिल्या. तिच्या हाताला लावलेले सलाईन तिने स्वत: हाताने उपसले आहे. तिचा हात रक्ताने माखला आहे.”

        मी, “मग वहिणी कुठे आहेत सद्या?”

        तो,“ती दवाखान्याच्या पाठीमागील मसणवाटयाकडे गेली आहे. मला एकटयाला तिकडे जायला भिती वाटु लागली. त्यामुळे तुला सोबत बोलवून घेतले.”

        आम्ही दोघे वहिणीला शोधण्यासाठी दवाखान्याच्या पाठीमागील मसणवाटयाकडे निघालो. मल्हार व मी अगदी लहाणपणापासूनचे मित्र. तो आणि मी लहाणपणी कोठेही सोबतच असायचो. पण जसे मोठे झालो, लग्न झाले तसे जबाबदारीचे ओझे पाठीवर पडले. तेव्हापासून त्याची व माझी भेट क्वचितच व्हायची. त्यातच सहा महिण्यांपुर्वी मी दुसऱ्या कॉलनीत नवे घर घेतल्यामुळे व ऑफीसच्या कामामुळे त्याची व माझी भेट होणे मुश्कीलच झाले. खूप दिवसातून त्याची भेट झाली.तीही अशा वेळी.

        मी त्याला विचारले,

         “नेमकं काय झालं आहे वहिणीला.”

        तो,“अरे ती गरोदर आहे. तिला पाचवा महिना चालू आहे. पण ती अशात खूपच वेडयासारखं वागत आहे. परवा तर मी झोपेत असतानाच ‘आता तुझा जीवच घेते’ असं म्हणत तिने माझा जोरात गळा दाबला. मी झोपेतून दचकून उठलो. कसा तरी तिच्या तावडीतून सुटलो. त्या रात्री मला कसलीच झोप लागली नाही. घरातील धारदार वस्तुही मी लपवून ठेवल्या आहेत. कारण कधी तिच्या मनात काय येईल व ती कधी काय करेल सांगता येत नाही. एखादे वेळेस रात्री ती अचानक उठते. लहान मुलासारखं काहीही खायला मागते. रात्री दुकान बंद असतात. मग तिला कोठून आणून द्यायचे. त्यामुळे मी बऱ्याच खायच्या वस्तु घरी आणून ठेवल्या आहेत.आई पण तिला खूप भित आहे. कोणी म्हणतं तिला भुतबाधा झाली असेल.”

        त्याचे बोलणे ऐकून माझ्या काळजाचं पाणी-पाणी झालं. बोलत-बोलत आम्ही आता दवाखान्याच्या कंपांउंडच्या बाहेर आलो. कंपांउंडला लागूनच मसणवाटा होता. मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात आम्ही वहिणीला शोधू लागलो. मसणवाटयात सगळीकडे समाध्याच समाध्या होत्या. बाजूलाच उंचच उंच वाढलेली, खुरटी बाभळीची झाडं होती. माझं हदय भितीनं जोरजोरानं धडधडू लागलं. कारण योगायोग म्हणजे आज अमावस्याची रात्र होती.

        मल्हार त्यांना आवाज देवू लागला.

        “अंजू! कोठे आहेस? मी आलो आहे.”

        तो वहिणीला आवाज देत होता. पण त्याच्या आवाजाला प्रतिउत्तर आले नाही. आम्ही काही अंतर पुढे गेलो आणि एका जागेवर थांबलो. कारण एका समाधीवर अंजू वहिणी बसल्या होत्या. त्या आमच्याकडेच पाहत असुरी हास्य करत होत्या. त्यांचा हात व चेहरा रक्ताने माखलेला होता. केस मोकळे सोडलेल्या अवस्थेत डोळे मोठे करून त्या क्षणात हसत तर क्षणात रागाने आमच्याकडेच पाहत होत्या. त्यांचे ते भयावह रुप पाहून मला तर धडकीच भरली. 

        मल्हार त्यांना म्हणाला, “बघ. कोण आलं आहे?”

        त्यांनी डोळे मोठे करून रागाने माझ्याकडे पाहिले. त्यावेळी तर त्यांच्या अंगात खरेच भुत शिरले आहे असे मला वाटले. मी पळून जाण्याच्या बेतात होतो. पण कशी तरी हिंमत एकवटून मी मनातल्या मनात देवाचं नाव घेत उभा राहिलो.

        तेवढयात मल्हार त्यांना म्हणाला, “चल आपण घरी जावु.”

        त्याच्या बोलण्याने त्यांचे माझ्यावर रोखलेले डोळे आता त्याच्यावर रोखले गेले.मला जरा हायसं वाटलं. त्या त्याच्याकडे पाहत रागातच ओरडल्या, “हेच माझं घर आहे. येथून चालते व्हा नाहीतर दोघांनाही मारून टाकेन.”

        त्यांच्या त्या धमकीने तर माझ्या अंगातील आवसानंच गळालं.पण मल्हार धाडस करत माझ्याकडे पाहत म्हणाला,

        “ती अशी ऐकणार नाही. मी तिचा एक हात धरतो. तू एक हात धर. तिला ओढतच घेवून जावू.”

        असे बोलून त्याने माझी प्रतिक्षा न करताच पुढे होत त्यांचा एक हात घट्ट धरला.मी ही पुढे होवून भितभितच त्यांचा एक हात धरला.त्या कर्कश आवाजात मोठमोठयाने ओरडून दोघांनाही हिसके देवू लागल्या.त्यांच्या त्या भयावह ओरडण्याने माझ्या काळजाचं पाणी-पाणी झालं.माझ्या मनात उत्पन्न झालेल्या भितीमुळे त्यांचा हात माझ्या हातामधून सुटला. पण दणकट देहाच्या मल्हारने पूर्ण ताकद लावून त्यांना खांद्यावर उचलून घेतले.तो झपाझप पावलं टाकत पुढे चालू लागला. मी टार्चच्या प्रकाशात त्याला रस्ता दाखवू लागलो. वहिणी मोठमोठयाने किंचाळु लागल्या. त्या गरोदर असल्याने अशी झटापट करणं योग्य नव्हतं. पण दुसरा पर्याय नसल्याने मल्हारने त्यांना खांद्यावर उचललं होत. आम्ही दोघेही दवाखान्यात आलो. डॉक्टरांनी त्यांना काहीतरी इंजेक्शन दिले. त्यामुळे त्या थोडया शांत झाल्या व त्या इंजेक्शनने त्यांना गुंगी आली व त्यामुळे त्यांना झोप लागली.

        डॉक्टर म्हणाले, ”त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. वेळ न दवडता उद्या सकाळीच यांना मानसोपचार तज्ञांकडे घेवून जा.” डॉक्टर निघून गेल्यानंतर मल्हार अचानक रडू लागला. त्याच्या आईला वहिणीजवळ बसवून मी त्याला बाहेर घेवून आलो.

        मी, “कधी पासून होतंय वहिणीला असं.”

        “लहाणपणी ती झोका खेळताना खाली पडली व त्यावेळी तिच्या डोक्याला मार लागला.तेव्हापासून तिच्या डोक्यावर परिणाम आहे. पण आधी नॉर्मल होतं. कधीतरीच असं करायची. असं तिच्या भावांनी सांगीतलं. पण काही दिवसांपासून ती जरा जास्तच वेडयासारखं करत आहे. परवा तर तिने स्वत:चे तोंड व नाक दाबून धरले होते.मी तिला विचारले असे का करतेस? तर म्हणाली, मी पोटातील बाळाला असं करून मारणार आहे. तेव्हापासून तर मला खूप काळजी वाटत आहे. तिच्यासोबत रहायचे म्हणजे मृत्युसोबत राहिल्यासारखं आहे. कधी कधी ती मला घरातील काही वस्तु फेकून मारते.कधी- कधी रात्रीच उठून घराबाहेर पडते. मी तिला कसेतरी समजावून परत घरी घेवून येतो. आता आईचंही वय झालं आहे. त्यामुळे तिला घरातील काम करता येत नाही. त्यामुळे मला बाहेरचं काम करून घरातील कामही करावं लागतं. त्यामुळे मला या जीवनाचा खूप कंटाळा आला आहे. माझ्या जीवनात सुख असं राहिलंच नाही. पण मी तरीही हिंमत हरणार नाही. मला माझ्या होणाऱ्या बाळाला मोठे करायचे आहे. आईला जपायचं आहे. आणि हिला सुद्धा या आजारातून बरे करायचे आहे. कारण यांना माझ्याशिवाय कोणीच नाही. मीच यांचं सर्वस्व आहे.”

        मी,“आधीच वहिणीच्या आजाराविषयी सांगीतले नाही म्हणून तू त्यांच्या भावांना जाब विचारला नाहीस का?”

        मल्हार,”अरे तिचे ते सख्खे भाऊ नाहीत. सावत्र भाऊ आहेत. ती लहान असतानाच तिची आई वारली. त्यानंतर तिच्या वडीलांनी दुसरे लग्न केले. आता काही दिवसांपुर्वीच तिचे वडीलही वारले. तिला प्रेम असं कोणाचं भेटलंच नाही. त्यामुळे तिच्या घरच्यांनाही आता काही विचारून फायदा नाही. आता ती माझी जीवनसाथी आहे. आता तिचं दु:ख ते माझं दु:ख.”

        पहाटेचे तीन वाजले होते. बोलत-बोलत त्याने मोबाईलमध्ये वेळ पाहिला व तो म्हणाला, “तू आता घरी जा.तुला उद्या ऑफीसला जायचे असेल?”

        मी, ”हो. उद्या ऑफीसमध्ये मिटींग आहे. त्यामुळे झोप पूर्ण व्हायला हवी.”

        मी त्याचा निरोप घेतला. घरी आल्यावर बिछान्यावर अंग टाकले. मी झोपण्याचा प्रयत्न केला. पण काही केल्या मला झोप येईना. थोडया वेळापुर्वीचा  प्रसंग माझ्या डोळयासमोर येऊ लागला. मल्हारचे ते प्रेरणादायी शब्द माझ्या कानात घुमु लागले. खरंच एखादा माणूस इतका सहनशील असू शकतो यावर माझा विश्वास बसत नव्हता.

        मल्हारचे हे दुसरे लग्न होते. मल्हारची पहिली पत्नी खूप शिकलेली होती. मल्हार तिच्यापेक्षा कमी शिकलेला होता. ती शहरातील होती. त्यामुळे गावात तिचे मन रमत नव्हते. आईला येथेच सोडून आपण शहरात राहण्यास जावू असे म्हणून ती मल्हारला सतत तगादा लावायची. पण जायचे तर आईला सोबत घेवूनच जायचे असं मल्हार म्हणायचा. त्यामुळे त्या दोघांमध्ये सतत वाद व्हायचा. एके दिवशी वाद खूपच शिगेला पोहचला आणि ती रागाच्या भरात माहेरला निघून गेली. त्यानंतरही त्यांचे फोनवर बोलणे व्हायचे. पण काही झाले तरी मी आईला सोडणार नाही असे मल्हारने तिला दरडावून सांगीतले. तेव्हा तिने रागातंच त्याला घटस्फोट मागीतला. तेव्हा त्याचाही नाईलाज झाला व त्याने तिला घटस्फोट दिला.त्यानंतर मल्हारचे दुसरे लग्न झाले. सर्व मित्रांना वाटले होते. आजच्या परिस्थितीत एक लग्न होणे मुश्कील आहे. बरीचशी मुलं लग्नाला आली आहेत. पण त्यांना कोणी मुली देत नाहीत.अशा वेळी मल्हारचे दुसरे लग्न झाले व त्याला सुंदर पत्नी मिळाली. त्याचे कारण मला आज समजले.

        नियती मल्हारची अग्नीपरीक्षा घेत होती.पण मल्हारही हार मानायला तयार नव्हता. इतक्या तणावग्रस्त जीवनातही त्याने होणारे बाळ, आई व आपल्या पत्नीला आपलं जगण्याचं कारण मानलं होतं.एवढं दु:ख असतानाही त्याने आपलं जगण्याचं कारण शोधलं होतं. आज मल्हारला मुलगा झाला आहे. त्याच्या पत्नीला मानसोपचार तज्ञांच्या गोळया चालू आहेत. ती ही आता आपल्या मुलाला पाहून आनंदात राहते. ती घरातील सर्व कामही करते. मल्हारची आई आपल्या नातवाला आनंदात सांभाळते. सगळयांचा आनंद पाहून मल्हारही आनंदात राहतो. आपल्या कुटुंबासाठी जिद्दीने कामाला लागतो. मल्हारचा संघर्ष पाहून मी ही शिकलो. आपल्यावर अवलंबून असणाऱ्या आपल्या माणसांसाठी संघर्ष करायचा. कितीही दु:ख असलं तरी आपल्या जगण्याचं कारण शोधायचं. जीवनात प्रत्येक माणसाला संकटे येतातच. पण त्या संकटांना न घाबरता संयम आणि धैर्य राखून त्याचा सामना करायचा. कालांतराने ते संकट आपोआप नाहीसं होवून आपल्या जीवनात पुन्हा आनंद येतोच.