Srushtiche sangeet paus in Marathi Anything by Mamta Sarda books and stories PDF | सृष्टीचे संगीत हा पाऊस

Featured Books
Categories
Share

सृष्टीचे संगीत हा पाऊस

" सृष्टीचे संगीत हा पाऊस"
. ममता सारडा

"वैदर्भी , आता तुझा सहावा महिना सुरू होईल , आमच्या राणी चे सगळे डोहाळे पूर्ण झाले की नाही ...?आणखी काही हवं का आमच्या लाडकी ला ? "माझ्या सासूबाई मला विचारत होत्या.
"आई , माझे सगळे डोहाळे पूर्ण झाले आहेत ,आईस्क्रीम खाऊन झाले , आंबे, उसाचा रस , लस्सी, पन्हे , टरबूज, सगळे झाले , आता ..बस , एकदाची ही गर्मी जाऊदेत आणि छान मस्त पाऊस यावा... मग मला छान पावसात चिंब भिजायचंय.."

"असं ..तर,. आमच्या सुनबाईला आता पावसाचे डोहाळे लागलेत."
मी विचार केला... खरच ...आता मला पावसाचे डोहाळे लागलेत की काय ? पाचवा महिना फारच कठीण गेला. आता पाचवा संपून सहावा महिना लागत आहे आणि पूर्ण विदर्भाला, महाराष्ट्राला, संपूर्ण धरतीला पावसाचे डोहाळे लागलेत
धरतीने स्वतःला सूर्यकिरणात भरपूर तापवून घेतलंय .सृष्टीचा कण न कण होरपळून निघालाय...आता नाही हे सहन होत ...बस ...एक पावसाची सर येईल आणि हा ग्रीष्मदाह संपेल. तळपत्या सुर्याने सर्व अंगाला भेगा पाडल्यात.. अंगावरचा कोरडेपणा आता जीवघेणा झालाय ..आता अंगावरचा रोम-न-रोम पावसाच्या पहिल्या स्पर्शाला आसूसलाय.
पावसाच्या सरींनो ...,लवकर या.... थंडगार तुषारांचा जमिनीवर शिडकावा करा .....तेव्हाच आता हा शुष्क पणा जाईल ..
दाह जाऊन अंग थंड होईल.
मातीच्या सुवासाने वातावरण दरवळून निघेल ...
"अरे ,...हे काय ...! माझ्यात धरतीचा प्रवेश झाला..,... की ....मी धरतीत एकरूप झाले...,?"
माझ्या आणि धरतीच्या भावना एकच... माझ्याच काय .... पूर्ण महाराष्ट्राच्या याच भावना
आम्ही सर्व .....मी ......ही धरती..... माझा संपूर्ण विदर्भ ., महाराष्ट्र .....पावसाची आतुरतेने वाट पाहतोय.
नुसत्या पावसाच्या कल्पनेने माझे अंग शहारून गेले.... माझे मन मोहरून गेले ...
केव्हा येईल पाऊस ...,?
एके दिवशी उष्मा अचानक वाढेल..
" काय ही गर्मी... !" अशी तक्रार सुरू असतानाच अचानक संध्याकाळी आभाळ भरून येईल आणि सर सर सर.... सर सर सर..... पावसाला सुरुवात होईल.
किंवा असे पण होईल ....नुसते आभाळ भरून येईल..... आता छान जोरात पाऊस येईल असा विचार करणार आणि पावसाची वाट पाहत बसणार... तो काय आभाळातून नुसता क्षणापुरता हलका वर्षाव होईल... अगदी अंगणात सडा पडावा तसा... आणि कशी जिरवली.... असे म्हणत वाकुल्या दाखवत ढग निघून पण जातील.
पण एकदा का पावसाला सुरुवात झाली की मी रोज हातात कॉफीचा मग घेऊन खिडकीत उभे राहून पावसाची मजा पाहणार .
पावसाच्या पण किती तऱ्हा... किती नखरे ...!
कधी कधी पाऊस एखाद्या साध्या बुजलेल्या मुली सारखा थांबत थांबत पडतो... एकदम पडू की नको.. असा! कधी एखाद्या चंचल ललनेप्रमाणे हवेसोबत अवखळपणा करतो. पावसाच्या धारा कधी इकडे.. तर कधी तिकडे ..अशा दिशा बदलतात. असे वाटते पाऊस आणि वारा यांचा पकडापकडीचा खेळ सुरू आहे.
कधी पाऊस ईतक्या जोमाने... इतक्या त्वेषाने... येतो की खिडकीवर., छपरांवर ...,टिनांवर.. होणारा टपटप आवाज घोड्यांच्या टापांचा ची आठवण करून देतो...
कधी त्याचा आवेग इतका जास्त असतो की असे वाटते मेघराजाने धरतीवर आक्रमण केले आहे.... त्याचे जल सैनिक गल्लीबोळात घोडदौड करीत आहेत ....त्यांच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक अडथळ्या सोबत त्यांची धुमश्चक्री सुरू आहे...

कधी कधी मेघ अतिशय उत्साहात भरपूर पण एकदम शिस्तीत, एकदम सरळ रेषेत वर्षाव करतात... मग हळूहळू तो उत्साह कमी होऊ लागतो ....भरपूर वर्षाव केल्यानंतर जणूकाही त्याला थकवा येतो आणि मग मृग धारा
आळशी...पणे ,कंटाळवाणे ..झाल्यासारखे हळूहळू खाली येतात.
कधी आभाळात एक संथ पणा असतो ...हलके काळे ढग.... हलका वारा आणि पाऊस हलके.. हलके.. संथपणे ....बेफिकिरीने ...पडत असतो .....जसे काही पाऊस चाळणीतून चाळल्या सारखा सांडतोय.
पण मला कोणता पाऊस आवडतो सांगू ...या सर्वांपेक्षाही वेगळा असा एक पाऊस ...
कधी जास्त वारा.. आणि कमी पाऊस... याचा मजेदार मिलाप होतो आणि मग जलबिंदुंचे तुषार कारंज्याप्रमाणे माझ्या चेहऱ्यावर उधळतात. .. तेव्हा मला पावसाची खरी मजा येते आणि मग बेछूट होऊन कोणतेही बंधन न ठेवता अंगणात आपसूकच पावलं वळतात.
मनाचा मोर तर आधीच न्हाऊन निघालेला असतो सोबतच संपूर्ण तनावर पावसाच्या धारा झेलण्यास रोम रोम आतुर झालेला असतो आणि मग पावसात मनसोक्त नखशिखांत भिजण्या शिवाय गत्यंतर नसते.

तहानलेल्या या धरतीला आता चिंबचिंब भिजायचं
पहिल्या पावसाच्या थेंबांनी इतकं
का लाजायचय

आणि मग आधीच काळजात गुणगुणणार्या ... हृदयात जपून ठेवलेल्या... पाऊसगाण्यांची वाट उत्स्फूर्तपणे मोकळी होते

पावसाची गाणी....
..मधुर ..धुंद.. भिजलेली.. चिंब गाणी...
खरेच पावसाची धुंदी अशी की एक सामान्य माणूस ही कवी होऊन जातो तर मग जे आमचे महाराष्ट्राचे नामवंत कवी आहेत त्यांनी तर पावसाला असे काही अलंकृत केले आहे की त्याला काही तोड नाही.
यात अग्रक्रमी येतात ते बालकवी आणि एकदम लहानपणी वाचलेल्या त्यांच्या या ओळी...
"श्रावण मासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरुनी ऊन पडे"

लहानपणी ही नुसती एक कविता होती पण कोणास ठाऊक त्या अजाण वेळी सुद्धा ..काही समज नसतानासुद्धा.. खोलवर .. हृदयात घर करण्याची... कोणत्यातरी कप्प्यात दडून बसण्याची क्षमता त्या ओळी मध्ये होती. आणि आज पावसाचे विविध रंग पाहताना आपसूक त्या ओळी बाहेर येतात कारण प्रत्येक ओळीतील प्रत्येक शब्दाचा भावार्थ मी प्रत्यक्ष अनुभवत असते अक्षरशः जगत असते आणि बालकवींच्या सुंदर शब्दांचा खरा अर्थ आज कळतो.

अशी कित्येक पावसाची गाणी कित्येक महान कलाकारांनी अजरामर करून ठेवली आहेत कारण या पाऊस गाण्यांमधून
पाऊस कधी रिमझिमतो
पाऊस कधी बरसतो
कधी पाऊस कोसळतो

पण सर्व कवींना आपल्या आवेगात घेणारा , सर्व सृष्टीला आपले वेड लावणारा हा पाऊस.. धरतीवर इतक्या सहजासहजी आपल्या कृपेचा वर्षाव करत नाही. त्याची विनवणी करावी लागते ..मनधरणी करावी लागते.
पावसाची वाट पाहणाऱ्या तृषार्थ धरणीचे वर्णन करताना केशवसुत म्हणतात.
" ग्रीष्माने तपली धरा
करपली हि काय की वाटते
चारा व्यर्थ गुरे पहा हडकती
नेत्री धुळे दाटते"
शेतकरी बंधूंना तर अक्षरशः डोळ्यात पाणी आणून आळवणी करावी लागते.
जेव्हा दीर्घ प्रतीक्षेनंतर काळ्यासावळ्या ढगांची गर्दी दिसते तेव्हा त्या ढग दाटी मध्ये बालकवींना विविध रंग दिसतात.
"व्योम पटी जलदां ची झाली दाटी,
कृष्ण कुणी काजळीच्या शिखरावाणी;
नील कुणी इंद्र मण्यांच्या कांतीहुनी
गोकर्णी मिश्र जांभळे जसे कुणी "

पण इतके विविध रंग लेऊन सुद्धा कधी कधी ढग हुलकावणी देतात, फसवणूक करतात ..तेव्हा संयमाचा बांध सुटतो.
म्हणून कवी आरती प्रभू म्हणतात,
" जमते आहे ढगात पाणी ,
अजून परंतु ढगची फुटेना,;
आणि विजेचा जराजराही
त्या पाण्यातून देठ तुटेना!"
शेतकऱ्यांचा टाहो ऐकूनही सावळ्या आभाळाला पान्हा फुटत नाही... तेव्हा परत आर्जव करावा लागतो ,
"झंझावात यावरी बसूनिया
या पश्चिमाब्धी वरी
लाटा झोडीत, गर्जना करीत
ये बा मेघराजा तरी!"
कवी मंगेश पाडगावकर सुद्धा आपल्या परीने विनंती करतात ,
"या मेघांनो ,आभाळ भरा,
या धरतीवर अभिषेक करा;
विहंगांचे मधुगान हरपले,
या मातीचे श्वास करपले ,
वाहू दे सुखाचा पुन्हा झरा
सुकून गेल्या वनावनावर,
संचित झाल्या मनामनावर
करुणेची संतत धार धरा!"

शेवटी ना धो महानोर आभाळाला दानशुर होऊन सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन करतात ;
" या नभाने या भुईला दान द्यावे"

पण हे काय ....काय हे मेघराज.. जितकी त्याची आळवणी करावी तितका त्याचा अहंकार वाढतो आहे,.. दिग्गजांच्या विनंतीलाही तो बदत नाही आहे ...
पण ..शेवटी.. मेघराजा झुकतो तो निर्व्याज निरागसते पुढे ..जेव्हा कोवळी बालके अंगणात फेर धरून म्हणतात..
" ये रे ये रे पावसा..... "
आणि मग
त्याला निरागस बालकांचा हट्ट मोडवत नाही आणि त्याचा अहंकार गळून पडतो.
"तुला देतो पैसा "...
या आमिषाला मात्र बळी न पडता फक्त छोट्या बालकांची गंमत करावी.. त्यांच्यासोबत खेळावे... म्हणून तो धावत येतो., तर काय... ही बालके "पैसा झाला खोटा ..".. म्हणून त्याची टिंगल करतात.
शेवटी काय.. तर सृष्टीला.. धरतीला जे हवे होते ते साध्य झाले.
तृषार्ध धरती पहिल्यावहिल्या पर्जन्य राजाला.. कवेत घेऊन.. प्रेमाने कवटाळते.. मृदगंधाची ..सुवासाची अत्तर कुपी शिंपडुन त्याचे स्वागत करते.
आणि मग कवी वा रा कांत म्हणतात "गिरी शिखरांवरुन.. .
सोगे सुटले ढगांचे"
आणि मग काय पहावे ..धरती आणि पर्जन्य राजाची.. अशी काही मैत्री होते की या मैत्रीच्या अनेक रंगांची ..अनेक रूपांची उधळण होते.
कवियत्री पद्मा म्हणतात,
" आषाढातील पाऊस उंच लयीत पडणारा, कोसळणारा ..,झोडपणारा.. कधी हळूच कुरवाळणारा..,
आषाढ़ातील पाऊस धरतीला निववणारा ,
तडकणाऱ्या खडकांना सचैल स्नान घालणारा.."

दाहक ग्रीष्म ऋतू नंतर येणारा हा वर्षा ऋतू चराचर सृष्टीला नव चैतन्य देतो आणि मग सुरु होतो खेळ सावळ्या मेघांचा ..चिंब धारांचा ...रंगीत इंद्र धनुचा... भिजल्या धरणीचा... हिरव्या
उगवाईचा...
आषाढानंतर मग "रंगारी श्रावण " रंग उधळीत येतो ..आपल्या भिजल्या कुंचल्याने.. सृष्टीचे पूर्ण रंगरूप बदलतो. श्रावणाच्या या कॅनवास मध्ये हिरव्या रंगाच्या किती छटा... अगदी मोजता नाही येणार... इतक्या..

" सुंदर सजून सृष्टी सारी
अंगात हिरवी कंचोळी
गवत फुलांच्या पात्या वरती
दवबिंदू झुलती निळी निळी "

हिरव्या सोबत हा निळा रंग वनी नाचणार्या मोरा प्रमाणे आमच्या कवींनाही फार आवडतो

आकाशातील विविध निळ्या छटा कवी बोरकरांचे मन मोहून घेतात
" गडद निळे गडद निळे
जलद भरुनी आले
शीतल तनु चपल चरण
अनिलगण निघाले"

हा निळा रंग पाहून मंगेश पाडगावकर म्हणतात;
"निळ्या निळ्या घुंगरांनी खळाळले रान;
ओथंबल्या आभाळाचे ओलावले भान
काळ्या काळ्या कपारीत कल्लोळ
दुधाचा
एका एकी कोसळला पाऊस मधाचा "
कवी ग्रेस यांचे ओल्या आभाळातून चमकणाऱ्या चंद्र तारखा लक्ष वेधून घेतात
" हा श्रावण गळतो दूर
नदीला पूर
,तरुवर पक्षी;;
घन ओले त्यातून चंद्र दिव्यांची नक्षी"

श्रावणातील रंगीत पावसाचे संगीतही अवर्णनीय
पाऊस कधी सर सर बरसतो
कधी रिपरिप रुणझुणतो
पाऊस कधी झर्यांमधून झुळझुळतो कधी रानावनातून सुळसुळतो
तर पाऊस कधी डोंगर कपारीतून खळखळतो

असा हा पाऊस विविध रूपे घेऊन सर्वत्र आपली सत्ता गाजवीत असतो.. पण निसर्गात.. पावसाच्या जितक्या विलक्षण छटा... त्याहूनही अधिक कैकपटीने तो सुंदर दिसतो., पाडगावकरांच्या कवितेमध्ये

"पाऊस आला कृष्णाच्या रंगाचा राधेच्या उत्सुक उत्सुक अंगाचा
पाऊस आला गोकुळातल्या माळावर पाऊस आला यशोदेच्या भाळावर"

आतापर्यंत धरतीची आणि मेघराजाची मैत्री अधिकच घट्ट झाली असते.. धरतीच्या मैत्रीखातर मेघराज अधिकच दानशूर होऊन आपल्या खजिन्याची लयलूट करतो... डोंगरमाथे हिरव्या पाचू प्रमाणे चमकू लागतात.. चांदेरी वीजा काळ्या ढगांमधून चमकतात
.. काळ्या मातीच्या उदरातून सोनेरी कोंब जन्म घेऊन वाऱ्यासोबत डोलू लागतात.
..वसुंधरा ही मग आपल्या पर्जन्यमित्राच्या पाहुणचारासाठी स्वतःला... निसर्गाला सजवून घेते.आणि त्याच्यासाठी पायघड्या घालते.

बालकवी म्हणतात ,
हिरवे हिरवे गार गालिचे ,
,हरित तृणांच्या मखमालीचे"
ऊन पावसाच्या पाठशिवणीच्या खेळात अवचित दर्शन देणारा सप्तरंगी इंद्रधनुष्य धरतीच्या शृंगाराला पूर्ण करतो.
कधीकधी पावसाचा उन्माद बेधुंदपणे वाढतो आणि विजेसोबत नृत्य करू लागतो
त्यातच कवी सुरेश भटांना उन्मत्त शृंगार दिसतो.

"काळ्या काळ्या मेघां आडून
क्षणभर चमकुन गेली बिजली;
जणू मोकळ्या केसांमधून
पाठ तुझी गोरी दिसली !"
पण जर या उन्मादाचे रौद्र रुपात परिवर्तन झाले तर कवी नारायण सुर्वे मेघराजाला हटकतात ,
" तुझा उन्मत्त गडगडाट
हाकवित आणतोस
किरमिजी राखी रंगाचे
गुबगुबीत कळप ओढताना
आसूड कडाडतोस
उगारतोस गिलोटिन विजेचे "

आणि मग पाऊस ओशाळतो
आपले रूप बदलतो
रूप बदलेल पाऊस ...पण तो बरसतच राहील .
तो बरसतच राहील शब्दांमधून
तो भिजतच राहील कवितांमधून..

असा हा पाऊस...
" सृष्टीची कविता हा पाऊस
सृष्टी चे गाणे हा पाऊस;
सृष्टी चे संगीत हा पाऊस
सृष्टीचे जीवन हा पाऊस!"


ममता सारडा नागपूर
7387895611