सगळ्यात अगोदर मी तिच्या नकळत सतीशला भेटायचं ठरवलं.. कोणत्याही नाण्याला दोन बाजू असतात आणि असे प्रॉब्लेम्स हल्ली बऱ्याच जणांना येतात.अशा वेळी विचारविनिमय करून मग त्यावर सल्ला देणं कधीही चांगलं..
सतीश माझाही कॉलेज मित्र असल्याने सहज एकदा वाट वाकडी करून त्याच्या ऑफिसमध्ये गेले.. आमचे साहेब कामात एकदम गढून गेले होते.. मला बघितल्यावर , अगं इकडे कुठे तू ??
आले सहज, मित्राला भेटायला अपॉइंटमेंट लागते का ?? मी हसत हसत विचारलं..
अगं असं नाही ...You are most welcome..
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या..मग तोच म्हणाला, कशी झाली तुमची ट्रीप .नीला खुश आहे आल्यापासून.
सतीश, मला थोडं पर्सनल बोलायचं आहे. येथे बोलू शकतो का की बाहेर जाऊया ?
त्याने थोडा विचार केला.तस पण ऑफिसची वेळ संपत आली होती.
अगं बोल , आता कोण नाही डिस्टर्ब करणार मला..
मी त्याला नीलाने सांगितलेलं सगळं सांगितलं..
त्याचा चेहरा पार उतरला.. बहुतेक मला नीलाने सगळं सांगितलं हे त्याला कुठंतरी खटकलं असावं..
मी त्याला म्हटलं , हे बघ, मी तुमच्या दोघांचीही मैत्रीण आहे. त्यामुळे तू असं मनाला लावून घेऊ नकोस..
मला खरचं तुम्हा दोघांना परत छान पहिल्यासारखं बघायचं आहे..
त्यालाही ते पटलं असावं.त्याने त्याचा टाय थोडा सैल केला आणि खुर्चीवर आरामात रेलून बसला..
स्वाती, मी तिच्यावर आजही खूप प्रेम करतो गं..
पण लग्नाअगोदर आणि लग्नानंतर तेही एक मूल झाल्यावर थोडा फरक पडतोचं ना ..
आपल्यावरती नवनवीन जबाबदाऱ्या येतात..
नीला थोडे दिवस नोकरी करत नव्हती.. त्या वेळी किती आर्थिक ताण होता माझ्यावर.मी कधी तिला भासवलं नाही.
खूप काम केलं त्या काळात..पण तिला आणि प्राजूला काही कमी पडू दिलं नाही..
नीलाही तशी समजूतदार आहे..पण कधी कधी तिचा हा समजूतदारपणा कुठे जातो तेचं कळत नाही..
ऑफिस मधून कधी कधी खूप उशीर होतो.काही वेळा कामासाठी आऊटडोअरला जावं लागतं..
त्यावेळी तिला वाटत मी तिला टाळतोय. आजकाल स्पर्धा एवढी वाढलीय की नोकरी टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला बऱ्याच तडजोडी कराव्या लागतात..
वेळ प्रसंगी सुट्टीच्या दिवशीही घरातून काम करावं लागतं..
काम करून थकून जातो गं मी ..
त्यामुळे आमचं बेडरूम लाइफही डिस्टर्ब झालं. माझ्या शरीरात ती उर्जाचं राहत नाही.
मलाही सगळ समजतं..पण काय करू ? कधी कधी खूप रिलॅक्स असतो..पण नेमकं त्यावेळी तिचा काही तरी प्रॉब्लेम असतो.. कधी पिरियड्स असतात, कधी प्राजूची तब्बेत बरी नसते, कधी पाहुणे आलेले असतात..मग त्यावेळी मी करावी का चीड चीड ??
पण परिस्थिती नुसार माणूस थोडातरी बदलतो. त्यातून आपण उपाय काढायचा की भांडत बसायचं..??
तिची हल्ली वाढलेली चीड चीड बघून मी लवकर घरीच जात नाही..
किंवा कधी कधी मित्रांकडे जातो..मग ती अजून रागावते..
आता तूच सांग.काय करायचं?
घरी आले. शांतपणे याच्यावर विचार केला.खरं पाहिलं तर दोघांचही चुकतं नव्हतं. परिस्थिती नुसार दोघांनीही समजूतदारपणा दाखवायला हवा होता..पण दोघांत संवाद कमी पडला आणि सगळा घोळ झाला..
आपण ब-याच महिलांना असं बोलताना ऐकतो की लग्नानंतर आमचे पतीदेव पूर्णच बदलले आहेत. आता त्यांच्याजवळ माझ्यासाठी जराही वेळ नाहीये. ब-याच मुलींचा किंवा मुलांचा हा समज असतो की लग्नाआधी प्रेमात जसं सगळं सुरु होतं अगदी तसंच लग्नानंतर देखील सुरु रहावं पण असं काहीही घडत नाही.
लग्नाअगोदरच किंवा लग्नझाल्यावरच सुरवातीचा रोमान्स दीर्घकाळ टीकेलच असं नाही. लग्नानंतर आयुष्यातील नवीन प्रवासाला सुरुवात होते.. साहजिकच परिस्थितीदेखील बदलते. जबाबदारीचं ओझं, ताणतणाव वाढला की त्याचा परिणाम कोणत्याही नात्यावर होतो. आर्थिक चिंता, मुलांची जबाबदारी, स्वतःसाठी कमी वेळ मिळणं, पत्नी-पत्नी एकमेकांना पुरेसा वेळ देऊ न शकणं यामुळे गैरसमज वाढू शकतात. पत्नी-पत्नीमध्ये योग्य संवाद न होणं, संवादाची कमतरता यामुळे वैवाहिक आयुष्यात समस्या अधिक वाढतात. दररोज तोच दिनक्रम, तेच तेच पुन्हा करणं यामुळे जोडीदाराला कंटाळा आलेला असतो , शिवाय पुरेसा वेळ नसल्यानं नवीन काहीतरी करण्याची संधीही मिळत नाही. सर्वसाधारणपणे ही कारणं यामागे असू शकतात..
कामाच्या वेळा वेगवेगळ्या असणे, स्त्री पुरुषा मध्ये वयोमानानुसार होणारे हार्मोनल बदल, मुलं लवकर न झोपणे. दिवसभराचा थकवा या अनेक बाबींचा परिणाम बेडरूम लाईफ वर होतो. मुले वाढविणे व मुले जन्मास घालवणे या कारणात जर स्त्री गुंतून पडली तर तिचा सेक्समधील इंटरेस्ट मंदावू शकतो आणि त्याचाही परिणाम नवरा बायकोच्या नात्यावर होवू शकतो..
काही वेळा तर जोडीदाराकडून हवा तसा वेळ किंवा हवं तसं शरीरसुख मिळत नाही म्हणून विवाहबाह्य संबंधात जाणंही घडतं
लग्नानंतर अनेकदा नातं तुटण्याचं कारण हे संशय असतं.. या अशा घडामोडी घडल्या की अचानक संशयाला वाव निर्माण होतो. कधी स्त्री तर कधी पुरुष आपल्या जोडीदाराबद्दल संशय व्यक्त करतो. जर संशय असेल तर तो सिद्ध करणारा ठोस पुरावा जमवून जोडीदाराला जाब विचारायला हवा. पण वारंवार उगाच तुम्हाला वाटतं म्हणून जोडीदारावर संशय घेणं त्याला तुमच्यापासून दूर घेऊन जाऊ शकतं.
लग्न झाल्यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव आणि ती निभावण्याची तयारी ठेवून आपल्या भूमिका व दृष्टिकोनांमध्ये बदल करायला हवेत..
कोणत्याही जोडप्यामध्ये वाद होतातच पण ते किती ताणायचे हे आपल्या हातात असत.
एकमेकांच व्यापात गुरफटून जाणं, पूर्वी इतकी ओढ न राहणं किंवा पूर्वी इतकी ओढ असावी हा अट्टाहास असणं प्रायोरिटिज चेंज होणं, शरीरात होणारे हार्मोनल बदल अन् त्यात मग संवादाची कमतरता अशाने संशयवृत्ती वाढीस लागणं अन् मग गैरसमज होणं... अन् त्यामुळे पुन्हा दुरावा निर्माण होणं.. असं हे दृष्टचक्र सुरू होतं..
प्रत्येक वेळी पती-पत्नीच्या नात्यात गोष्टी आपोआप न सांगता कळायला पाहिजेत असं नसतं. एकमेकांचा स्वभाव, सवयींबद्दल चर्चा, एकमेकांचा जगण्याबद्दलचा दृष्टीकोन काय आहे? जोडीदारामध्ये काय बदल अपेक्षित आहेत? एकमेकांच्या आनंदाची परिभाषा काय आहे? एकमेकांचे विचार समजून घेणं, एकमेकांना वेळ देणं ,सुसंवाद साधणं गरजेचं आहे.पण संवाद महत्वाचा.
नीला आणि सतीश मध्येही योग्य रित्या संवाद झाल्यावर त्यांच्यात आलेला दुरावाही मिटला..
थोडक्यात, आपल्याला हवे तसे सगळेच कधी मिळत नाही; पण जे मिळाले आहे, ते मनापासून आणि आनंदाने स्वीकारलं तर वैवाहिक जीवन नक्कीचं आनंदी होईल.. जसं आता आमच्या नीला आणि सतीशचा सुखी ,समाधानी संसार नव्याने परत सुरू झाला आहे..
डॉ. स्वाती अनिल मोरे
कांदिवली पूर्व