काळरात्र होता होता...
३.
अपेक्षेप्रमाणे, त्यांनी मनात खोलवर साचलेलं आपलं दुःख उघडं करत त्याला वाट करून द्यायला सुरुवात केली,
"आजपर्यंत कुठलीही गोष्ट माझ्या मनासारखी घडली नाही.
कदाचित मला मिळालेला जन्मही मला नकोसा होता. म्हणूनच की काय, माझ्या जन्माच्या वेळी माझी आई मला कायमची सोडून गेली. लहानपणी आईच्या मायेचं सुख कधी अनुभवायला मिळालेच नाही.
तारुण्यात असताना एक जीवलग वाटावा असा मित्र भेटला, ज्याच्यावर आपलं सगळं जीवनच अर्पण करावं असं वाटलं, पण त्याचं जगणं म्हणजे 'लिहिणं' होतं.
एकदा, त्याला मी म्हणाले, " कथा, कविता लिहिण्याचा छंद पाळणं, म्हणजे भिकेचे डोहाळे लागण्यासारखे आहे. अशा कथा आपल्या जीवनावर जातात.
आजपर्यंत कुठल्या लेखकाचं जीवन सुखात गेले आहे का?, लेखकाकडे खूप पैसा आहे, असं कधी ऐकले आहेस का? दुःख आणि त्रासच त्यांच्या वाट्याला आलेला असतो. तेच त्यांचे सोबती असतात.
तू लिहिणं सोडून दे. मी जीवनभर तुला साथ देईन. आपण सुखी समाधानी राहू, पण त्यानं लिहणं सोडलं नाही.
जन्मापासून दुःखच माझ्या वाट्याला मिळालं होतं; आता पैसा श्रीमंतीचं सुख मिळवायची इच्छा होती, पण ती त्या जीवलगा सोबत पुर्ण होऊ शकत नव्हती, म्हणून मी त्याच्याशिवायचा माझा वेगळा प्रवास सुरू केला."
त्या अजून पुढे काही बोलणार इतक्यात मी मधेच बोललो," तुम्ही त्यावेळी घेतलेला निर्णय योग्यच असणार आहे, कारण तुमच्या प्रेमासाठी तो त्याचं साधं लिहणं सोडू शकत नव्हता?! म्हणजे त्याचं तुमच्यावर खरं प्रेमच नसणार आहे. बरोबर ना?"
मी त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे समर्थन करीत जोडूनच एक प्रश्न विचारला.
"नाही, तसं काही नव्हतं. तोही माझ्यावर खूप मनापासून प्रेम करत होता. माझी काळजी घेत होता. मला जपत होता. तरीही...
तरीही मी माझा मार्ग बदलला, कारण तो त्याचं लिहणं सोडू शकत नव्हता. मला अजूनही आठवतेय, की तो त्यावेळी म्हणाला होता,
'लिहणं हा माझा श्वास आहे, त्याला काही क्षणासाठी मी थांबवू शकतो; पण बंद! कधीच करू शकत नाही.'
आणि मला माझ्या जीवलगाचा श्वास बंद होताना, त्याची घुसमट होताना पाहायचं नव्हतं...",
एक मोठ्ठा सुस्कारा सोडत त्या पुन्हा पुढे बोलू लागल्या, "माझ्या जीवनात पुर्ण रंग भरलेच नाहीत. जे भरले ते फुलले नाहीत. सगळं कसं कोरडं कोरडं. आयुष्यभर ज्या ज्या वेळी सुख मिळवण्याचा प्रयत्न केला, त्या प्रत्येक वेळी माझ्या नशिबी फक्त दुःखच आले."
वाटलं सांगावं, की 'सुख मिळवायचं नसतं; ते अनुभवायचं असतं.' पण हे सगळं ऐकून घेण्याची त्यांची आत्ता मानसिकता आहे का?...
आपलं जीवनावरचं तत्त्वज्ञान मांडण्याची हीच ती योग्य वेळ आहे असं समजून मी बोलायला सुरुवात केली,
"जीवनात सुख दुःखचा पाठशिवणीचा खेळ चालणारच. दुःखाचा डोंगर सरत नाही, म्हणून कोणी मरतं का?"
"हे सगळे पुस्तकी शब्दांचे खेळ आहेत साहेब. खऱ्या आयुष्यात असले शब्दांचे जुमले चालत नसतात. या व्यवहारी जगात जो तो आपआपल्या फायद्याचा विचार करतोय. या जगात कोणाच्याच सुखदुःखासी कोणालाच काही घेणे देणे नाही. माझं दुःख मलाच माहीत, माझ्या दुःखाची वेदना तुम्हाला नाही कळणार. "
" कळतंय मला. तुमच्या भावना मी समजू शकतो, पण... म्हणून का कुणी मरत असतं का?"
आता मात्र त्यांच्या रडण्याचा, मुसमुसत बोलल्याचा आवाज ऐकू येऊ लागला.
"आत्तापर्यंत, ना मी कुणाला सुख देऊ शकले; ना मला कुणी सुख दिले. मग माझ्या मनानं वाळवंट झालेल्या शरीराने नुसतंच कशासाठी जगत राहायचं ? मला आता जगण्याची कसली इच्छाच उरली नाही. ही दुनियाच स्वार्थी लोकांनी भरलेली आहे. या स्वार्थी दुनियेत तुमचाही काहीतरी स्वार्थ असेल, म्हणूनच तर तुम्ही मला इतकं समजावण्याचा प्रयत्न करत असावेत."
"खरं सांगू मॅडम, माझा आत्तापर्यंत कसलाच स्वार्थ नव्हता. आजपर्यंत जी लोकं आपल्यावर विश्वास दाखवतात, त्यांचा विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न करत आलो आहे, पण आत्ताच्या या क्षणापासून मला वाटायला लागलंय, की तुमच्याकडून एक स्वार्थ ठेवायला हरकत नसावी. तेही तुमची हरकत नसेल तर..."
"कोणता स्वार्थ?"
" आत्ता तुम्ही जे गीत गायले ते माझ्या अंगात स्फुर्ती निर्माण करणारं होतं. तुमच्या सुमधुर आवाजातील गायनाने मला ऐकतच राहावं असं वाटलं. मला आनंदी जगण्याचं अजून एक नवं कारण मिळालं.
तुम्ही जसं म्हणालात ना, की मी कुणाला सुख देऊ शकले; ना मला कुणी सुख दिले आहे. मग नुसतंच कशासाठी जगत राहायचं..
तर नुसतंच जगत राहू नका. माझ्या जगण्यासाठी तुम्ही जसं नवं कारण बनलात, तसं हजारो लाखो लोकांच्या जगण्याचं कारण बनून तुम्ही जगा.
तुम्ही आत्ता जे गीत गायलं, ते ऐकून गाणी गाणं तुम्हाला खूप आवडत असावं, असं मला वाटतं."
"जुनी गाणी गाणं हा माझा खूप आवडता छंद होता. कॉलेजच्या पहिल्या वर्षीच्या गॅदरिंगमध्ये हे गाणं मी गायलं न् माझा आवाज ही माझी ओळख झाली. या गाण्याच्या प्रभावानेच खूप सारे मित्र मला मिळाले होते. त्यावेळी मी खूप उत्साही, खूश असायचे, पण काळाच्या ओघात सगळं सगळं मागं पडत गेलं."
त्यांच्या या अशा बोलण्याने माझ्या विचारांना सर्मथन दिल्यासारखे झाले. माझ्यात अजून थोडा उत्साह संचारला. मी पुढे बोलू लागलो,
"अजूनही तुमचा तोच उत्साह तुमच्यात निर्माण करून खूश राहू शकता. लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे किंवा कोणत्या तरी स्पर्धेत नंबर मिळावा यासाठी नव्हे किंवा आपल्याला कसलातरी लाभ व्हावा यासाठी नव्हे, तर आपल्या स्वतःच्या मनाला आनंद देण्यासाठी तरी तुम्ही तुमचा हा छंद जोपासत राहिलं पाहिजे, असे मला वाटते.
तुमचा आवडता छंद आयुष्यभर जोपासत राहिलात तर बघा, मोजता येणार नाही इतका आनंद तुम्हाला मिळत राहील. तुम्हाला आयुष्यात कधीच मरावंसं वाटणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत जगावंसं वाटेल.
तुमचा हा छंद तुमच्या आणि दुसऱ्यांच्या जगण्याचं कारण बनेल, तुम्ही अस्तित्वात असताना आणि नसताना सुद्धा."
क्षणभर निशब्द शांतता...
"आत्तापर्यंत मला कुणीही इतकं समजावून सांगितले नव्हते. तुम्ही माझ्याशी कसलीही ओळख नसताना मला जगण्याचं कारण सांगून बळ दिलंय. जगत राहण्याचा मंत्र दिलाय, तो आयूष्यभर मनात जपून ठेवावा असा आहे, तो मी नक्की ठेवेन.
तुम्ही बघालच, यापुढे मी कधीच मरणाचा विचार डोक्यात आणणार नाही. आयुष्याचं गीत गात जीवनात रंग भरत राहणार. माझ्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल असे वागणार नाही. मी आनंदी जीवन जगणार.. आणि तुमचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. खूप खूप धन्यवाद सर."
"अहो, आभार कसले मानताय, गणेश माझा सहकारी, मित्र. माझ्या मित्रासाठी इतकंही करू शकत नाही!,"
"म्हणजे तुम्ही आमच्या नवीन घरात गृहप्रवेश सोहळ्याला आमच्या घरी नक्कीच आला असणार, बरोबर ना?"
समोरून अचानक आलेल्या या वेगळ्याच प्रश्नाने मला गोंधळात टाकले. कारण त्या सोहळ्यासाठी ना गणेशने मला बोलावले होते; ना मी गेलो होतो. हे सगळं यांना कसं सांगावं! तरीही वेळ मारून नेण्यासाठी मी त्यांना बोललो," मॅडम, त्यावेळी तुमच्या नव्या घरी त्या सोहळ्यासाठी मला येणं शक्य झाले नाही, पण लवकरच तुमच्या घरी येऊन तुम्हा सर्वांना भेटून जाईन. बरं ठेवू मी फोन?"
असे म्हणत मी तिकडून रिप्लाय येण्याअगोदरच फोन ठेवून दिला.
पावसात चिंब भिजून आलेलो, तरीही इतकावेळ फोनवर बोलत खुर्चीवर तसाच बसून होतो, त्यामुळे कपड्यातील पाणी अंगात मुरलेलं. अंगावरचे कपडे बदलले. थोडीशी कणकण जाणवू लागलेली. जेवण उरकून घेऊन कागद आणि पेन घेऊन लिहायला बसलो.
इतक्यात फोनची रिंग वाजली. पुन्हा गणेशचाच फोन होता. यावेळेस शुभाशुभ विचार काळजावर घेर धरून नाचू लागले. आता आणि काय झालं असेल? या विचाराने फोन उचलायला हात धजावत नव्हता. फोन उचलून कानाला लावला. तिकडून गणेश काही बोलणार इतक्यात मीच प्रश्न केला, " गणेश, तिथं सगळं ठीक आहे ना?"
तिकडून गणेशने हसून बोलायला सुरुवात केली, "सगळं कसं मनासारखं झालंय बघ. तु अशी काय जादू केली आहेस, की माझी बायको आयुष्यात कधीच मरणाचा विचारही करणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत जगत राहणार आहे, असं म्हणतेय.
असं काय सांगितलंस रे तू, की ज्यामुळे माझ्या बायकोच्या डोक्यातून आत्महत्येचा विचार जाऊन, मी कधीच मरणार नाही, असं म्हणतेय? आत्तापर्यंत कुणाचंही न ऐकून घेणाऱ्या माझ्या बायकोने तुझं कसं काय सगळं ऐकून घेतलं? सुरवात कशी केलीस?"
गणेश आश्चर्यचकित होऊन प्रश्नांवर प्रश्न विचारीत होता. त्याच्या बोलण्यात मला उत्सुकता जाणवत होती.
"काही नाही रे, सुरवातीला नमस्कार मॅडम म्हणून बोलायला सुरुवात केली आणि मी गणेशचा मित्र बोलतोय म्हणून सांगितलं. बाकीचा माझ्या अनुभवाचा कस लावून त्यांना मरणाच्या विचारांपासून दूर केलं. नंतर...."
मी अजून काही स्पष्टीकरण देणार इतक्यात, माझं वाक्य पुर्ण व्हायच्या अगोदरच त्याने बोलायला सुरुवात केली, " बरं ते असूदे, तुला एक सांगायचं होतं, म्हणूनच आमची जेवणं उरकल्यानंतर आणि इतका उशीर झालेला असताना सुद्धा तुला फोन लावला. माझा मुंबईत नोकरी करण्याचा विचार आहे, त्यामुळे आम्ही हे घर आणि शहर दोन्ही सोडून कायमचं मुंबईला जाणार आहोत. तसंही तुझं बोलणं, तुझे विचार माझ्या बायकोच्या मनावर खोलवर परिणाम करणारे ठरले असतीलच, त्यामुळे तुला आमच्या घरी कधीच येण्याची गरज पडणार नाही."
इतकं बोलून अचानक गणेशने फोन ठेवून दिला. शेवटी तो ना ठेवतो बोलला; ना आभार मानले.
आपल्या बायकोला आत्महत्या करण्यापासून वाचवण्यासाठीची गणेशच्या मनाची जी तगमग होती, ती बघून त्याच्या बायकोच्या जीवनाची काळरात्र होता होता, त्यांच्या आयुष्याची मशाल व्हावी व ती सदैव पेटती रहावी यासाठी मी प्रयत्न केला होता.
पण गणेशचं वागणं पहिल्यापासूनच मला न समजण्यासारखं आणि कोड्यात टाकणारे होते,
हे माहीत असूनही माझं छोटंसं मन अंतर्मनाच्या पटलावर धक्के देत लहान पोरासारखं विचारीत होतं,
''हा असं का वागला असावा?' ...
समाप्त***
©_सुभाष मंडले
(9923124251)