vegla - 3 in Marathi Fiction Stories by Nisha G. books and stories PDF | वेगळा - भाग ३

Featured Books
Categories
Share

वेगळा - भाग ३

भाग ३

दुसर्या दिवशी शाळा सुटल्यावर ठरल्याप्रमाणे बाबू अशोकला भेटला ,घरी जाताना अशोक ने बाबुला विचारल , “आज संध्याकाळी तू भेटशील मला ?”

“ भेटेन कि , काही काम होत का “ बाबूच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होत.

“हो , जरा एका ठिकाणी येशील माझ्या सोबत ,माझे घरचे मला एकट्याला पाठवायचे नाहीत , म्हणून तुला विचारतोय “

“ बर , पण नक्की जायचय कुठे , कारण मला देखील घरी सांगाव लागेल आईला “ बाबू म्हणाला.

“अस आहे का , आईला सांग दत्त मंदिरात जातोय म्हणून, ठीक आहे , संध्याकाळी भेटू मग “ अस म्हणून अशोक लगबगीने त्याच्या घराकडे निघून गेला.

संध्याकाळी बाबू ने आई ला अशोक ने सांगितल्या प्रमाणे मंदिरात जातोय अस सांगून घरातून काढता पाय घेतला, सोबत पुस्तक घेतलं आईला शंका येऊ नये म्हणून.

अशोक मंदिरात त्याची वाट पाहत बसला होता .बाबू ला बघताच “आलास तू ,चल निघूया” अस म्हणून दोघे चालू लागले.

बाबू निमूट अशोक सोबत चालत होता , दहा - पंधरा मिनिट चालल्यावर त्यांना डोंगर चढ लागला.

“ अशोक आपण नेमक कुठ चाललो आहोत.” बाबू ने अशोक ला विचारलं

“थोड थांब जास्त वेळ नाही आता “ अशोक ने उत्तर दिल.

जवळ जावळ पाच ते सात मिनिटानंतर डोंगर झाडी लागली आणि तिकडे एक मुलगी बसली होती.

अशोक आणि बाबूला पाहताच ती उठून उभी राहिली .

“बाबू , हि सरिता , सरिता हा बाबू “ अशोकने घाई घाईत त्यांची ओळख करून दिली.

बाबू तू बस इथे आम्ही जरा तिकडे जाऊन बसतो जरा बोलायचं आहे मला सरिताशी” अस म्हणून अशोक सरिताला घेऊन जरा लांब जाऊन बसला.

बाबू ला काही कळेना पण त्याच्या कडे पर्याय न्हवता तो त्यांच्या कडे पाठ करून पुस्तक चाळत बसला .

जवळ जवळ वीस मिनिट झाली , बाबू ला तिकडे बसून बसून आता झोप यायला लागली वाचनात देखील लक्ष लागेना .

बाबू अशोक ला बोलवायला उठणार आणि वळणार तितक्यात अशोकच त्याला त्याच्या दिशेने येताना दिसला.

“चल झाल , निघूया आपण “ अशोक पुन्हा घाईघाईतच बाबू सोबत पावलं टाकू लागला.

बाबू ने घर येई पर्यंत जवळ जवळ तीन-चार वेळा अशोक ला सरिता बद्दल विचारून बघितल , पण अशोक मात्र हो सांगतो तुला सगळ अस म्हणून झपझप पावलं टाकत होता.

घर आल , “ बाबू चल आता उशिर झालाय खूप ,तुझ्या पण घरचे वाट बघत असतील , उद्या भेटू , “ अस म्हणून अशोक निघून गेला .

बाबू मुकाट्याने घरी आला, मोरीत जाऊन हातपाय धुतले , आई देवा समोर निरांजन लावीत होती ,

“बराच वेळ लागला आज तुला बाबू “ आई ने त्याच्याकडे न बघताच विचारल.

“ हो , झाला थोडा वेळ , “ बाबू ने देखील खाली मान घालून उत्तर दिल .

आई ने पुढे काही विचारल नाही .

रात्री जेवण झाल्यावर बाबू आपल अंथरून घेऊन त्याच्या नेहमीच्या झोपायच्या जागी गेला .

आज आकाशात पूर्ण चंद्र दिसत होता , सोबत चांदण्या देखील होत्या , बाबू त्याच्याही नकळत चांदण्या मोजू लागला.
आणि त्याच्या डोळ्यावर झोपेची ग्लानी चढू लागली .

बाबू ला स्वप्न पडलं.
अशोक आणि तो त्याच डोंगरावर , डोंगर झाडी च्या दिशेने चालले होते , आणि त्या झाडा खाली एक मुलगी त्यांची वाट पाहतेय अस त्याला दिसत होत, जवळ जाऊन पाहतो तर काय ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ती बायडा होती, तिच्या नेहमीच्या वेशात , जुनेरसा टॉवेल गुंडाळून आणि वाहणार नाक पुसत. बाबू ला पाहताच ती घाबरली आणि त्याच्या समोर हात जोडून “ बाबू तू कुणाला सांगू नकोस, मी अशोक ला चोरून भेटते , नाहीतर माझा आबा मला खूप मारील, नाही न सांगणार , बोल ना , अरे बोल ना, अस म्हणून तिने त्याचा दंड धरून गदा गदा हलवायला सुरुवात केली. बाबू ला तीच पकडन अजिबात आवडलं नाही , तिचा हात तो सोडवून घेत होता , पण तिची पकड अजूनच मजबूत होती , त्याला ती सोडत नाही म्हणून त्याने तिच्या हातावर चिमटे काढायला सुरुवात केली , आणि तेव्हाच त्याचा तो दंड सोडून त्याला त्याच्या हातावर जोराचा फटका बसला, आणि तो झोपेतून खडबडून जागा झाला , उठून पाहतो तर काय त्याचा लहान भाऊ चंदू रागारागाने त्याच्या कडे पाहत उभा होता ,
“बावळट आहेस का, चिमटे कसले काढतोयस, आई कधीची हाक मारतेय , तिच्या हाकेने उठला नाहिस म्हणून तिने मला पाठवलं तुझ्यामुळे एक तर झोप मोड झाली माझी आणि वरून तू मलाच मार, पुन्हा जर अस केलस ना तर बघ”अस म्हणून चंदू रागारागाने घरात निघून गेला .
बाबू ला काही कळेना स्वप्न पडल , आणि स्वप्नात बायडी , शी .. आजच्या दिवसाची सुरुवात पण कसली खराब झाली ,
बाबू चिडचिड करतच उठला .

शाळेत नेहमी प्रमाणे अशोक सोबत होताच , पण तो काही कालच्या प्रसंगा बद्दल स्वता:हून काही बोलेना , बाबुला पण त्याला सारखं सारखं विचारायचा कंटाळा आला होता, ते दोघे एकमेकांशी काहीही न बोलता नुसते चालत होते शेवटी घर आल दोघे एकमेकांचा निरोप घेऊन निघणार ,
तेवढ्यात अशोकने बाबुला विचारल “बाबू , तू काल संध्याकाळी कुठे होतास हे कोणाला बोलला नाहीस ना”

“नाही , पण अशोक “ बाबू काही बोलणार तेवढ्यात अशोकने बाबुला थांबवलं आणि तो त्याला म्हणाला ,

“बाबू ती सरिता होती , डोंगराच्या पलीकडच्या वस्तीत राहते , जस तुला बायडा आवडते ना, तशी मला सरिता आवडते , पण आम्हा दोघांबद्दल कुणालाच काहीच बोलू नकोस, माझ्या वडलांना जर कळल तर ते तिच्या घरी जातील, आणि मग मला आणि सरिता ला पुन्हा कधीच भेटणं शक्य होणार नाही.” अशोक भराभर बोलून गेला.

“ते सगळ ठीक आहे पण तुला मी कधी सांगितलं कि मला बायडा आवडते?” बाबू कपाळावर अठी पडत बोलला.

“पण मग त्या दिवशी तिची इतकी चौकशी का करत होतास” अशोक ने बाबुला आश्चर्याने विचारल .

“सहज” बाबू ने चटकन उत्तर दिल.

“आणि मी जेव्हा माझ्या सोबत चल म्हणालो , तेव्हा तू बायडा बद्दल मी काहीतरी सांगेल म्हणूनच आला होतास ना?’ अशोक त्याच्या नजरेला नजर देत म्हणाला.

बाबू ला काय बोलाव ते सुचेना तो गप्प राहिला कारण अशोकला राग येऊ नये म्हणून फक्त तो अशोक सोबत गेला होता आणि त्या गोष्टीचा अर्थ मात्र अशोक ने भलताच लावला होता.

अशोक बोलू लागला “ खर सांगू का बाबू , त्या दिवशी बायडाच्या घरी काहीतरी घडल ना, तेव्हा मी तिकडे न्हवतोच, मी सरिताला भेटायला डोंगरावर गेलो होतो, संध्याकाळ झाली म्हणून पळतच धापा टाकत आलो आणि काहीवेळ तिकडे श्वास घेत उभा असतानाच तू आलास ,आणि तू मला विचारल , काय सांगणार मी , उगीच इकडच तिकडच बोलत राहिलो, आणि इथुंपुढे डोंगरावर जाताना तुला माझ्या सोबत तुला घेऊन जायचं अस मनोमन ठरवून तिकडून मी काढता पाय घेतला, बाबू तू काळजी नको करूस मी तुझ कुणाला सांगणार नाही हव तर तू पण घेऊन ये बायडाला तिकडे डोंगरावर”

बाबू ला ह्यावर काय बोलाव हे कळेना.

क्रमश: