आतापर्यंत आपण बघीतले,
भावरूपा आणि हजुरआमा दोघींकडून कळत-नकळत घडलेल्या गुन्ह्यात न्यायालयाकडून शिक्षा सुनावण्यात आली होती. घडलेल्या प्रकारामुळे दित्याच्या मनावर याचा खोलवर परिणाम झाला होता.
आता पुढे!
दित्या आधीपेक्षा जास्तच शांत झाली होती. प्रशासकीय आदेशानंतर तिचे समुपदेशन करण्यात आले. तिथे तिला मानसिक स्थैर्य प्राप्त व्हावे याकरिता दिनचर्या ठरवून देण्यात आली. त्यानुसार तिने स्वतःस बदलण्याचे खूप प्रयत्न केले. पण काही जखमा कधीच भरल्या जात नसतात; याचे अनुभव दित्याला उपचार घेत असता आले. किती जरी तिने स्वतःस समजावण्याचा प्रयत्न केला असला; तरी तिची आमा गुन्हेगार आहे हे तिच्या बालमनाला पटण्यासारखे नव्हते!
काहीच दिवसांत दित्या घरी परतली आणि तिची जगण्यासाठीची धडपड सुरू झाली.
अशातंच तिची भेट झाली एका व्यक्तीशी! ती व्यक्ती साधारण पंचविशी गाठलेली, चेहऱ्यावर वेगळंच तेज, डोळे जणू बदला पूर्ण झाल्याचे समाधान व्यक्त करत असावेत! ध्रीती नाव होते तिचे.
एके दिवशी दित्या बसली असता ध्रीती, दित्या शेजारी येऊन बसली.
"काय करत आहेस?" ध्रीतीने दित्याची विचारणा केली.
"काही नाही! तू कोण?" दित्याने गोंधळून तिच्याकडे पाहिले.
"मी ध्रीती, काहीच दिवस झालेत; इथे राहायला आले आहे." ती शांतपणे उत्तरली.
"बरं!" असं म्हणत दित्या परत तिच्या विचारांत हरवली.
"तुझ्या बाबतीत जे घडलं ते खूप वाईट होतं! पण असं कुठंवर तू स्वतःस त्रास करवून घेणार?" खांद्यावर हात ठेवत ध्रितीने विचारले.
"तू कोण माझ्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करणारी?" दित्या चिडून म्हणाली.
"दित्या नको त्रास करवून घेऊस स्वतःला. हे बघ, तुला आयुष्यात पुढे जावंच लागेल. असं थांबून चालणार नाही. कोणाच्या जाण्याने आपल्याला फरक पडू नये. नाहीतर आपलं आयुष्य संपून जातं. माझं ऐक, स्वतःला सावर आणि तुझ्या आमाच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी झट." ध्रिती दित्याची समजूत काढत म्हणाली.
तिच्या गोष्टींचा दित्यावर सकारात्मक परिणाम झाला. तिने लगेच वर ध्रीतीकडे पाहिले. पण तिथे ती नव्हती.
होती फक्त गर्दी!
दित्याच्या ध्रीतीवर मोठ्याने ओरडल्यामुळे तिथे ती गर्दी जमली होती.
तिने आश्चर्यचकित होत गर्दीकडे बघीतले. गर्दीतून दित्याची मैत्रीण धान्वी दित्याजवळ आली. तिने दित्याला भानावर आणत जे विचारले ते ऐकून दित्याच्या चेहऱ्यावर भीती उमटली!
"को संग कुरा गर्दै हुनुहुन्थ्यो? (तू कोणाशी बोलत होतीस?)"
"ध्रीती सोबत!" असं म्हणत तिने ध्रिती बसलेल्या ठिकाणाकडे न बघताच हातवारे केले.
"यहाँ कोही छैन! (इथे कोणीही नाहीये!)"
"यो कसरी सम्भव छ?? (हे कसे शक्य आहे?)"
जागेवरून उठत परत एकदा तिने ध्रीती बसलेल्या ठिकाणी गोंधळून पाहिले. ती तिथे नसलेली बघून तिने पूर्ण तांडा धुंडाळून काढला. पण तिला ती कुठेही दिसली नाही. ती परत धान्वी जवळ आली.
"धान्वी, मला आमाला भेटायला जायचं आहे. तू घराकडे लक्ष असू दे!"
असं म्हणत शेवटी तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली. ध्रीती विषयी तिला तिच्या आमा कडून जाणून घ्यायचे होते. ती थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केबिनच्या दिशेने निघाली. त्यांच्याकडून तिने रडतंच तिच्या आमाला भेटण्याची परवानगी मागीतली.
पोलिसांच्या मदतीने दित्याला तिची आमा आणि हजुरआमा असलेल्या ठिकाणी रवाना करण्यात आले. पळतंच दित्या भावरूपा जवळ गेली.
"आमा!"
"दित्या!"
"आमा मी आले."
"बच्चा तिमी किन यहाँ छौ? (बाळा तू का आलीस ईथे?)"
"आमा मला काही सांगायचे आहे!"
भावरूपा आणि हजुरआमा दोघींनी एकमेकींकडे आश्चर्यकारक नजरेने पाहिले.
"दित्या! काय झाले बाळा?"
"आमा मी आज ध्रीतीला भेटले."
"काय?" भावरुपा आणि हजुरआमा दोघी मोठ्याने ओरडत म्हणाल्या.
"हो, आज सकाळी!"
"अग पण हे कसे शक्य आहे?" भावरुपाने चकित होऊन प्रश्न केला.
"का?" निरागसपणे दित्याने विचारणा केली.
"ध्रिती तर पंधरा वर्षां आधीच आपल्या सर्वांमधून निघून गेली!" भावरूपा भावनेच्या भरात बोलून गेली.
"काय?" दित्याच्या पायाखालून जमीन सरकली आणि ती जागीच कोसळली!
"दित्या, सांभाळ स्वतःला!"
शिपायांनी दित्याला प्यायला पाणी देत शांत केले. भावरूपाने तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत पुढे तिला ध्रीतीचे सत्य सांगायला सुरुवात केली.
"बाळा, ध्रीतीने आत्महत्या केली होती."
हे ऐकताच दित्याचा तिच्या कानावर विश्वासंच बसत नव्हता!
"काय???? पण तिने असे का केले?"
"उद्गमने चौपाडीवर असताना तिच्या सोबतंही…..! (मोठा श्वास घेत ती थांबली आणि पुढे सांगू लागली.) त्यानंतर ती नैराश्यात गेली आणि शारीरिक दुःख सहन न झाल्याने एक दिवस तिने स्वतःला संपवले!"
"काय?"
"हो बाळा!"
"आमा, चौपाडीमुळे किती मुलींना स्वतःचे आयुष्य संपवावे लागले ग? आपण का त्या प्रथेचा वेळीच विरोध केला नाही?" दित्याने निराश होत प्रश्न उपस्थित केला.
"कसं असतं बाळा, प्रथेला विरोध केला; तर समाज आपल्याला जगू देत नाही."
"आमा, हा समाज हे सर्व ठरवतोच कसा? आपण त्याचा स्वीकार करतो म्हणूनच ना!"
"हो बाळा!"
"आमा, एक सांगू?"
"बोल ना बाळा?"
"तू उद्गमचा नाश करून गुन्हा केला नाहीस; तर एका पाशवी वृत्तीला संपवून कितीतरी जीव वाचवलेस. मला गर्व आहे आमा तुझ्यावर!"
"दित्या बाळा, जरी तुझ्या नजरेत मी दोषी नसले; तरी न्यायव्यवस्थेच्या व्याख्येत मी नेहमीच एक गुन्हेगार असेल! जा बाळा, आजपासून तू तुझ्या भविष्यासाठी प्रयत्न कर. आम्ही आता सोबत नसू म्हणून स्वतःला नैराश्यात ढकलू नकोस. आपलं आयुष्य कसं चांगलं करता येईल यावर भर दे."
"नक्की आमा. मी एक दिवस खूप मोठी व्यक्ती बनून दाखवेन!"
"चला भेटण्याची वेळ संपलेली आहे." मागून शिपायाच्या आवाजाने भावरूपाने दित्याचा हात सोडला आणि तिला जाण्याचा इशारा करत अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
समाप्त!