ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला
भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मीं नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी " सागरा प्राण तळमळला "अशी जेव्हा मला साद घातली होती , तेव्हा माझा ऊर अफाट अभिमानाने भरून आला ; कारण भारतीय स्वातंत्र्याची आस मलाही होती . स्वर सम्राज्ञी लता दीदींच्या आवाजामुळे गाणं अगदी खूपच सुरेख झाल होत.
मी समुद्र बोलतोय . आज न राहवून मी माझ्या मनातील वेदना खंत व्यक्त करतोय . माझी व्यथाच जगजाहीर करीत आहे. पूर्वी पासून समुद्र किती अथांग आहे , किती शुभ्र निळाशार, किती तो असीम आहे . अशी वाक्ये माझ्या कानावर अनेकदा पडायची ,माझी कित्येकदा स्तुती व्हायची. तेव्हा मला फार आनंद होत असे . माझ्यावर कित्येक कविता रचल्या गेल्या.
कुसुमाग्रज यांनी तर ' कोलंबसाचे गर्वगीत ' या कवितेत "हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे डळमळू दे तारे , कथा या खुळ्या सागराला / अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा , किनारा तुला पामराला " असे आव्हान दिले , तेव्हा माणसाच्या ध्येयासक्तीला किनारा नाही , याचा मलाही अभिमान वाटला . पण आजचे निराशाजनक चित्र पाहून मात्र जीव खचतो माझा !
पूर्वी माझ्या किनाऱ्यावरून मी अफाट , मैलोनमैल पसरलेली धरती न्याहाळायचो . त्या धरणीमायची साथ मला असायची . तिच्या आतुरतेने
कुशीत जाण्यासाठी मी लाटा उसळून उसळून आतुरतेने तळमळायचो .
पण याच माझ्या किनाऱ्यावर आज तुम्ही मानवाने उत्तुंग , टोलेजंग , उंचच उंच इमारती उभारून धरणीमाय अदृश्य केली आहे . आजचा मानव आकाशाला गवसणी घालायला निघाला ; पण जमिनीवरचे पाय विसरला .मानव चंद्रावर जरी पोचला असला तरी तिकडे पण तुम्ही इथल्यापेक्षाही बेकार अवस्था कराल यात काय शंका नाहीच.
तुमच्या इच्छा आकांक्षा पुरवायला तुम्ही माझाच जागी आता टोलेजंग उंच उंच इमारती थाटून , माझ्या मार्गातून ब्रिज बांधून ठेवले आहेत. माझे मार्ग बदल केले. अरे मी माझ्या मनाप्रमाणे ना राहू शकत ना वाहू शकत. तुम्ही तर मला पण बंधनात बांधू पाहत आहात की काय?तुम्ही मानव प्रचंड वेगाने भौतिक सुखे पदरात पाडून घेत आहात.पण माझ्या मायेचा पदर तुम्हाला पारखा झाला .
लौकिक सुखाच्या हव्यासापोटी तुम्ही चंगळवादी हव्या असलेल्या संस्कृतीला जन्म दिला . .
तुम्ही तर आता प्रगती व यश यांच्या चुकीच्या संकल्पना मनात घोळवू लागला व निसर्गाला पारखा झाला . जवळ जवळ या निसर्गाचा नाश करीत आहात.
मी समुद्र तुम्हाला भरभरुन देणारा तुमच्यावर पित्या प्रमाणे प्रेम करणारा , आजवर मी माझ्या गर्भातुन तुम्हाला खनिज तेल , वाळु , मीठ , मासे , मौल्यवान मोती देत आलो . पण तुम्ही मला काय दिले ?? नाही ना आठवत ... मी सांगतो तुम्ही मला आजवर दिलात ते फक्त प्लास्टिक कचरा , केमिकलचे सांड पाणी , मलमूत्र , प्लास्टर ऑफ पेरिसची हानिकारक माती , मोठाल्या बोटीं मधुन निघणारे हानिकारक तेल ... अजुन बरेच काही ... तरीही मी गप्प राहिलो फक्त तुमच्यासाठी , पण आता नाही रहावल म्हणून तुम्हाला विनवणी करतोय ऐकाल ना माझं ... ??
इथे माझ्या लाटा पाहायला प्रेमी युगुल येता. हात हाती घेऊन प्रेमाची वचन घेता पण सोबत आणलेला कचराही मला वाहून जाता. असे वागून काय मिळतं असेल तुम्हाला ? माझ्या कडे फेरफटका मारायला येतानाही सोबत आणलेल्या वस्तू इकडेच फेकून का जाता.त्यामुळे मला किती अस्वच्छ वाटत असेल असा एकदाही मनात विचार कसा नाही येत.
पुर्वार्धापासुन मी मानवाला पहात आलोय अगदी त्याच्या अंगावर कपडे नसल्या पासून ते आत्ता त्याच्या अंगावर कोट येई पर्यन्त ... मी खुश आहे मानवाने प्रगती केली मानव सुधारला , पण खरच मानव सुधारला की फक्त दिसण्यापुरते सुधारला ? पहिल्यापेक्षा मानव आता अधिक घाण करु लागलाय . हे पर्यावरण हा निसर्ग मानवाने टिकवला तरच तो ही टिकू शकेल याचा जणू त्याला विसरच पडलाय . माणूस आता स्वार्थी झालाय .
ही पहा हे मासे कशी निपचित पडलेली आहेत . यांच्या मृत्युचे कारण तुम्ही आहात . तुम्ही केलेल्या प्रदूषणामुळे यांना आपला जिव गमवावा लागलाय . याच प्रायश्चित्त करण्या ऐवजी तुम्ही यावर दुर्लक्ष करताय असे कसे काय तुम्ही करु शकता ? हे प्रेमी युगुलानों माझ्या किनार्यावर येता ना वेळ घालवायला पण कधीतरी माझ्यावर ही प्रेम करा ना ...
याच पंचमहाभूतांपैकी मी एक ' भूत ' तुम्हांला सांगत आहे . तुम्ही वेळीच सावध झाला नाहीत , तर तुमच्या भविष्यातील भूत तुमच्याच मानगुटीवर बसेल नि मग प्राण दयायला माझ्याकडे याल , तेव्हा माझी माया पण आटलेली असेल !
समाप्त
अर्चना डूबल