Chukiche Paaul - 14 - last part in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | चुकीचे पाऊल! - १४ -(शेवट)

Featured Books
Categories
Share

चुकीचे पाऊल! - १४ -(शेवट)



आता पर्यंत आपण बघीतले.

ईशाच्या सांगण्यानुसार त्यांच्या शाळेत शैक्षणिक अभ्यासक्रमा सोबतंच लैंगिकता शिक्षणाचा समावेश असलेल्या आधुनिक शिक्षण पद्धतीमुळे मनात एक विश्वासाची भावना निर्माण झाली होती.

आता पुढे..!

रात्री सगळे सोबत जेवण करून, झोपी गेलो. सकाळी ईशाच्या पप्पांना पॅरेंट्स मिटिंगची कल्पना देत, ऑफिससाठी तयार व्हायला मदत केली. नंतर ते ऑफिस साठी निघून गेल्यावर आम्ही दोघी तयार होऊन स्कूल बसची वाट बघत, बस स्टँड वर जाऊन थांबलो.

परत एकदा मी शाळेचे दिवस अनुभवत होते. थोड्याच वेळात बस आली आणि सगळी मुलं एका रांगेत दारातून आत शिरली.

मी, ईशा सोबतंच आत शिरले. माझं लक्ष न राहवून समोर ड्रायव्हरच्या केबिनच्या दिशेने गेले आणि मी बघून आश्चर्याने थक्क राहिले! तिथे एक महिला चालक आणि तिच्याच शेजारी एक महिला सहायक बसून होती. जी मुलांना सांभाळायला बस मध्ये असायची. त्यांना बघून मला, ईशाच्या शाळेतील प्रवेशावेळी देण्यात आलेली माहिती खरी असल्याची खात्री पटली.

थोड्याच वेळात सर्व शाळेत पोहचलो. पालकांच्या बसण्याची व्यवस्था सेमिनार हॉलमध्ये करण्यात आली होती. ईशाने मला सेमिनार हॉलमध्ये जाऊन बसण्याचा इशारा केला. सगळे पालक जमायला उशीरंच होता. साधारण अर्ध्या-पाऊण तासाने हॉल निम्मा भरला.

मीटिंगला सुरुवात झाली. मीटिंग विद्यार्थ्यांमधील होणाऱ्या शारीरिक बदलांविषयी व्यक्त होण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. प्रत्येक पालकांकडून त्यांच्या मुलांविषयी, त्यांच्यातील शारीरिक बदल तसेच वागणुकी विषयी विचारणा करण्यात आली. प्रत्येक पालक त्यांच्या मुलांच्या रोजच्या वागणुकीचा तपशील देत होते. मात्र, कोणीही त्यांच्या शारीरिक बदलांविषयी स्पष्ट नव्हतं!

शेवटी मी, ईशा विषयी ज्या आत्मविश्वासाने पूर्ण हॉल समोर, रोज अनुभवत असलेल्या ईशाच्या बारीक-सारीक शारीरिक बदलांना मांडले. तेव्हा मात्र सगळे माझ्याकडे कौतुकाने बघत राहिले.

मला न राहवून मुख्याध्यापिका मॅडम यांनी परत उठवत विचारलेच!

"मॅडम, आपल्याला मुलांच्या शारीरिक वाढ तसेच विकासाबद्दल आणखी काय सुचवावं वाटेल?"

"आदरणीय शिक्षकगण, मला पुन्हा एकदा व्यक्त होण्याची संधी आपण दिलीत त्याबद्दल खूप-खूप आभार. मला सांगायला खूप अभिमान वाटतो आहे; की आज शिक्षण व्यवस्था मुलांच्या संगोपनावर तसेच त्यांच्या शारीरिक वाढ आणि विकासावर भर देते आहे. आमच्यावेळी कुठे तरी या सर्व गोष्टींची उणीव मनात नेहमीच होती. माझ्यासारख्या कित्येक जणींनी आजवर काही न काही सहन केले असेलंच हे निश्चित! मात्र, असं काही होण्याची शक्यता आजच्या सकारात्मक शिक्षण पद्धतीमुळे कमी झाली आहे. मुली आज सेल्फ डिफेन्सवर भर देत आहेत. त्यांचं चांगलं-वाईट त्यांना समजावं यासाठी शासन-प्रशासन त्याचप्रमाणे आपण शिक्षकगण ही तितकेच प्रयत्नरत असल्याचं बातम्यांतून आमच्यापर्यंत पोहचतंच. मात्र, जे काही शाळेत शिकवण्यात येतं त्याचं योग्य ते अवलंबन रोज मुलं करतात, की नाही? हे बघणं आम्हा पालकांचं कर्तव्य आहे, असे मला वाटते. पण जर आपण मुलांसोबत त्यांच्या मित्रांप्रमाणे वागलो; तर सकारात्मक बदल घडण्यास वेळ लागणार नाही. याबाबत पूर्ण खात्री आहे." : मी, एका सकारात्मक आत्मविश्वासाने बोलले आणि पूर्ण सेमिनार हॉल मध्ये टाळ्यांच्या कडकडाट घुमला.

आज सर्वांनाच माझ्या बोलण्याचं कौतुक वाटत होतं. ईशा तर माझ्याकडे अभिमानाने बघतंच राहिली.

"धन्यवाद मॅडम, आपण खूप छान अनुभव सामायिक केलेत. नक्कीच सर्वांनी मिळून जर मुलांच्या संगोपना सोबतंच त्यांच्या शारीरिक वाढ आणि विकासावर भर दिला; तर इतरत्र कुठेही न भरकटता, त्यांना त्यांच्या भविष्याकडे वाटचाल करण्यास मदत मिळेल. मुलांसोबत काही वाईट घडल्याचा अनुभव आल्यास १०९८ या चाईल्ड हेल्प लाईन वर संपर्क साधून आपण कळवू शकता. ते नक्कीच तुमची मदत करतील आणि योग्य ती शिक्षा त्या घृणास्पद कृत्य करणाऱ्या मानसिकतेला कायद्यांच्या विविध कलमांतर्गत करण्यात येईल. खरंच आज गरज आहे ती, मुलांसोबतच्या मैत्रीपूर्ण संवादाची, त्यांच्यासोबत त्यांचे मित्र म्हणून वागण्याची. तेव्हाच न घाबरता ते आपले प्रश्न मोकळेपणाने मांडू शकतील आणि देशाचे भवितव्य घडविण्यात न घाबरता ते सक्षम होतील." मुख्याध्यापिका मॅडम एका विश्वासाने बोलल्या.

खऱ्या अर्थाने आज "चुकीच्या पावलाची" आयुष्यातली गरज मला समजली होती. आयुष्यात पडलेले एक चुकीचे पाऊल, पुढे कितीतरी आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवू शकते. हे मला समजले होते.

आज सर्वच एक शिकवण घेऊन घरी परतणार होते.

शिकवण होती, "आपल्या मुलांसोबतच्या मैत्रीपूर्ण संवादाची!"

त्या संवादामुळेच आज ईशाचा माझ्यावरील आणि माझा तिच्यावरील विश्वास आणखीच दृढ झाला होता.

समाप्त!

सदर कथा ही काल्पनिक असून, कथेतील संकल्पना वास्तविक जीवनात अंगिकारली जावी हीच रास्त इच्छा आहे.

कथेची संकल्पना ही माझ्या आईच्या मदतीने सुचली आणि मी हा मुद्दा रेखाटला. कितपत तो वाचकांच्या मनाला भिडला यात न जाता, माझ्या मनात असलेल्या भावना मी मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि त्यातून मिळालेले समाधान हे शब्दात मांडता येण्यासारखे नाहीत.

आज मी या कथेचा शेवट करत आपण सर्व वाचकांचा निरोप घेते.

लवकरंच भेटत आहोत; एका नवीन विषयासोबत!

तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित रहा.

धन्यवाद!

#वाचकांची_खुशी

© खुशाली ढोके.