Chandra aani Nilya betaverchi safar - 1 in Marathi Fiction Stories by बाळकृष्ण सखाराम राणे books and stories PDF | चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 1

Featured Books
Categories
Share

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 1

बाटलीतला संदेश
दूरवर समोर पसरलेला अथांग सागर....पाण्याच्या उसळत्या लाटांवर चमकवणारे सायंकाळचे सूर्यकिरण...मध्येच लाटांवर हेलकावे खात डोलणार्या कोळ्यांच्या नावा...पाण्यात सूर मारत झेपावणारे समुद्रपक्षी अस छान दृश्य होत ते! जिथे आकाश व समुद्र एकमेकांना भेटत होते त्या ठिकाणी तर वेगवेगळ्या रंगाची गर्दी उसळली होती. लाल...गुलाबी...जांभळ्या रंगाची...सतत विविध असे सुंदर आकार धारण करणारी आकाश शिल्पे तिथे पसरली होती. कधी हत्तींचा आकार....कधी होडींचा आकार तर कधी......
पर्वत हातावर घेऊन उडणाऱ्या रामभक्त हनुमंताचा आवेश दाखविणारा
देखावा... किती सुंदर दृश्य होते ते. हा सारा देखावा किनाऱ्यावरच्या वाळूत
होडीला टेकून चंद्रा देहभान विसरून पाहात होता. मध्येच त्याचे लक्ष डाव्या
बाजूच्या डोंगरकपारीमध्ये पाण्याच्या जोरदार लाटामुळे तयार झालेल्या
गुहांकडे गेले. तिथे समुद्री लाटा किनाऱ्यावर आदळून हजारो पांढरी-सोनेरी
फेसांची फुले वर उसळत होती. समोर दूरवर मामा-भाच्याचे दोन मोठे दगड
दिसत होते. कोळीवाड्यातले लोक सांगायचे की, तिथे मामा व त्याचा
भाचा मासे पकडायला गेले होते. पण एक भल्या मोठ्या लाटेने त्यांची होडी
त्या दगडावर आदळली व फुटली. दोघेही पाण्यात फेकले गेले व मरण
पावले. चंद्रा बऱ्याच वेळा आपल्या बाबांसोबत तिथे गेला होता. प्रत्येक
वेळा त्याला त्या मामा-भाच्यांची आठवण होई. आत्ता तिथेही अनेक पांढरे
समुद्र पक्षी घिरट्या घालत होते.
चंद्राला गंमत वाटली. तो अगदी दर दिवशी हे दृश्य पाहायचा पण
दर वेळी त्याला ते नवे भासायचे. त्याची सागराबद्दलची ओढ वाढायची.
त्याला वाटायचं की समुद्राचं आणि आपलं अतूट नातं आहे. त्याचे बाहू
स्फुरण पावायचे... मनात साहसी, धाडसी विचार डोकावून जायचे. असंच
उठावं आणि होडी घेऊन ह्या अफाट दर्यावर बेभान होऊन भटकावं. असंख्य
गमती बघण्यात नवीन बेटे शोधावीत ... नवीन देश पाहावेत. पण प्रत्येक
वेळी तो मनात उठणाऱ्या या विचित्र इच्छेला दाबून टाकायचा. त्याला
माहीत होते की त्याच्या आईला किंवा त्याच्या बापाला यातलं काही
कळलं तर ते त्याला कधीच समुद्रावर एकट्याने जाऊ देणार नव्हते.
आकाशीच्या चंद्राचं आणि सागरचं जसं अतूट नातं होतं तसंच
ह्या चंद्राची समुद्राशी मैत्री जडली होती. कार्तिकी पौर्णिमेला ज्या वेळी
चंद्रकिरणांनी समुद्राच्या पाण्याला स्पर्श केला त्या वेळी त्याचा जन्म झालाहोता. म्हणूनच त्याच्या बापानं त्याचं नाव चंद्रा ठेवलं होतं. कोजागरीच्या
चांदण्याची शीतलता त्याच्या रूपाने कोळीवाड्यात अवतरली होती. चंद्राचा
बाप सरजू कोळ्यांचा प्रमुख. सारे कोळी सरजूच्या शब्दाला मान देत. त्यामुळे
सावळ्या वर्णाचा गोजीरवाणा चंद्रा साऱ्या कोळीवाड्याचा लाडका बनला
होता. चंद्रा जसजसा मोठा होत गेला... चालायला लागला तेव्हा सरजूबरोबर
तो किनाऱ्यावर जाऊ लागला. लहानपणापासूनच त्याला सागराविषयी ओढ
वाटू लागली. सरजूने त्याला लहानपणीच समुद्राच्या पाण्यावर पोहायला
शिकवलं होतं. खरं म्हणजे कोळ्यांच्या मुलांना समुद्राचा किंवा पाण्याची
भीती का वाटावी? कोळीवाड्यातल्या मुली आणि बायका सुद्धा पट्टीच्या
पोहणाऱ्या होत्या. फेसाळत्या लाटात डुंबायला चंद्राला खूप आवडायचं.
त्याचा बाबा त्याला असंख्य नवलाईच्या गोष्टी सांगायचा. सरजू कसलेला
नावाडी होता. पिळदार शरीराचा सावळ्या वर्णाचा सरजू साहसी होता. भर
वादळात तो होडी समुद्रात लोटायचा. त्याच्या दणकट बाहूंत कमालीची
ताकद होती.
चंद्रा थोडा मोठा झाल्यावर सरजू त्याला आपल्यासोबत मासेमारीला
नेऊ लागला. प्रत्येक वेळी तो चंद्राला उपयुक्त माहिती द्यायचा. वल्ही कशी
मारावीत. वाऱ्याची दिशा ओळखून शीड कसं ओढावं. वादळ तुफान
येण्याची चिन्हे कोणती, कोणत्या ठिकाणी कोणत्या वेळी कसले मासे
मिळतात... अशा एक ना दोन असंख्य गोष्टी त्याच्या बापाने त्याला सांगितल्या
होत्या. त्यामुळे चंद्राचं समुद्राबद्दलचं कुतूहल अधिकच वाढलं होतं. आणखी
अशा किती गोष्टी सागराच्या पोटी दडलेल्या असतील याचाच तो सतत
विचार करत राहायचा. एक ना एक दिवस होडी घेऊन या दर्यावर एकटेच
भटकायला जावं, हे त्याने पक्के ठरवले. या अफाट आणि अथांग दर्याशी
नाते जोडावे, त्याच्या उसळत्या लाटांवर होडी लोटून आनंदात गात राहावं असच त्याला सतत वाटायच. त्याला नव जग, नवा प्रदेश पाहायचा होता.
तिथली झाडे पशु-पक्षी, सागरी प्राणी या साऱ्याची माहिती त्याला करून
घ्यायची होती. बाहेरच्या जगातील माणसाची ओळख करून घ्यायची
होती.
चंद्राच्या गावच्या लोकांना बाहेरच्या जगाबद्दल फारशी माहिती
नव्हती. आपला राजा कोण हेही त्यांना माहीत नव्हते. कधीतरी राजाचे
शिपाई येत शेतसारा वसूल करून नेत. एवढाच त्यांचा व राजाचा संबंध
होता. कधी तरी एखाद-दुसरं मालवाहू जहाज यायचं. जहाजावरचे अरबी
व्यापारी आपला माल इथल्या लोकांना विकत. त्या बदल्यात इथले गुलाबी
रंगाचे मोती जे चंदेलच्या समुद्राचं वैशिष्ट्य होते ते घेऊन जात असत.
वर्षाच्या विशिष्ट कालावधीत इथल्या समुद्रात मोती आढळत. अरबांना
मोत्याचं खूप आकर्षण होतं आणि चंदेलचे मोती म्हणजे त्यांच्यासाठी खास
होते. बाहेरच्या जगात या मोत्यांना चांगली किंमत यायची. त्यामुळे अरब
व्यापारी मुद्दामहून थोडा वेळ तरी इथे थांबत. हे अरब लोक आपला देश,
कुटुंब सोडून दर्यावर वर्ष-वर्ष भटकत. या अरबांकडूनही चंद्राला समुद्राच्या
सफरीच्या असंख्य गोष्टी समजत. त्यामुळे अरबांचे जहाज येण्याची तो
उत्सुकतेने वाट पाहायचा.
एव्हाना सूर्य पार समुद्रात बुडाला होता. आकाशाचे रंग आत गहिरे
होत चालले होते. एवढ्यात वाघ्या धावत त्याच्याजवळ आला. वाध्या हा
त्याचा लाडका कुत्रा होता. तो सतत त्याच्यासोबत असायचा. ते दरदिवशी
संध्याकाळी किनाऱ्यावर एकतरी फेरी मारायचे. वाघ्याला जवळ आलेला पाहताच
बघताच चंद्रा हसला.
"चल वाघ्या! एक फेरी मारू या!'
अस म्हणून तो मुलायम वाळूत झपाझपा पाय उचलत चालू


लागला. त्याच्यासोबत वाघ्या धावू लागला. वाळूत इवले इवले खेकडे
तुरुतुरू पळत ढपकन वाळूत गडप व्हायचे. चंद्राला त्याची गंमत वाटायची.
चालण्याच्या नादात चंद्रा बराच पुढे गेला. सोबत वाघ्या नसल्याची जाणीव
होताच तो वळला. पाहतो तो वाघ्या पाण्यात शिरला होता.
"वाघ्या ! वाध्या!” चंद्रानं हाक दिली.
हाकेबरोबर वाघ्या पाण्यातून बाहेर आला. पण त्याच्या तोंडात
कोणती तरी चमकती वस्तू होती. चंद्राला उत्सुकता वाटली. वाघ्या भलतीसलती वस्तू उचलून आणणार नाही याची खात्री होती. एवढ्यात वाघ्या
पळत आला आणि चंद्रासमोर त्याने तोंडातली ती वस्तू टाकली. ती
विचित्र आकाराची हिरवट रंगाची काचेची बाटली होती. तिचे तोंड बंद
होते. आत गुंडाळलेली कसलीतरी वस्तू होती.
चंद्रानं काळजीपूर्वक बाटलीचे बूच काढले. बाटली उलटी करताच
त्यातून लांबसडक गुंडाळलेलं चपट्या आकाराचं पान बाहेर आलं. हे
कसल्या झाडाचं पान आहे हे चंद्राला कळेना. थोडं निरखून बघताच चंद्राला
त्यावर कोरलेला मजकूर दिसला. त्याने वाचायला सुरुवात केली.
वेड्यावाकड्या अक्षरातून शब्द जुळवत त्याने तो मजकूर वाचला. त्यात
लिहिले होते,
"देव करो अन् हा संदेश कोणाच्या तरी हाती पडो. अन्यथा, ह्या
भयावह निळ्या बेटावरून माझी आणि माझ्यासोबत असलेल्या अमोल
खजिन्याची सुटका होणे शक्य नाही. इथल्या रानटी माणसांपासून आणि
विचित्र रानटी प्राण्यांपासून फार काळ लपून राहणे अशक्य आहे. तरी देव
करो व माझा हा संदेश मद्र देशाचा राजा भद्रसेन याला त्वरित मिळो...'
त्या पुढची अक्षरे अस्पष्ट व अर्धवट होती.

संदेश वाचताच चंद्राच्या मनात खळबळ उडाली. त्या अज्ञात निळ्या बेटावर आपणच जावं आणि ह्या माणसाची सुटका करावी असा विचार त्याच्या मनात आला.
" दादा! दादा..."
त्याची लहान बहीण गौरी पळत त्याच्याकडे येत होती. चंद्राने घाईने बाटली समुद्रात फेकली आणि तो संदेश पैरणीत ठेवला.
" चल तू हो पुढे.मी आलोच वाघ्याला घेवून!"
चंद्रा वाघ्याबरोबर तिच्या मागोमाग चालू लागला.

----------- भाग १ समाप्त---------------