दोन्ही घरी लग्नाची तयारी सुरू होती.. कपडेलत्ते,दागिने,देण्याघेण्याच्या वस्तू,आहेर,रुखवत, जानकीला देण्याच्या भेटवस्तू अशी बरीच खरेदी सुरू होती..जानकी आणि रघुवीर च्या मनात मात्र वेगळंच होत हे लग्न करण्याची त्यांची कारण वेगळी होती घरच्यांना ह्याची कानोकान खबर नव्हती .दोन्ही घरचे लोक खूप आनंदी होते.. जानकीला मात्र टेंशन होत ,तीच आणि रघुवीरच अधेमधे फोनवर बोलणं व्हायचं आता दोघांमध्ये बऱ्यापैकी मैत्री झाली होती.आवडी निवडी कळू लागल्या होत्या पण अजूनही रघुवीर ने जानकीला रागिणी बद्दल काहीच सांगितले नव्हते..
रागिणीच्या मनातही सारखा रघुवीर चा विचार यायचा..तिचेही मन त्याच्यात गुंतत चालले होते पण अजूनही तिच्या मनातली गोष्ट मनातच होती..रघुवीर ने एक दिवस दिनेश ला त्याच्या मनातलं रागिणीबद्दल असलेलं प्रेम आणि जानकीसोबत झालेल्या कराराबद्दल सांगितलं..
" रघ्या तू पागल झाला का बे ..अबे त्या जानकीला कशाला फसवत आहे तू" दिनेश म्हणाला..
"तिला नाही फसवत आहे मी, अरे तिलाही माझ्यासोबत लग्न करण्यात काडीचा रस नाही आहे .आम्ही दोघांनी ते आधीच स्पष्ट केलं आहे त्यामुळे तिला फसवायचा प्रश्नच नाही." रघुवीर ने स्पष्टीकरण दिले..
" एक तर तुम्ही दोघ घरच्यांसोबत खोटं वागत आहात आणि दुसरं म्हणजे रागिणी बद्दल न सांगून तू जानकी ला फसवत नाही आहेस का?रघु अरे लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ नाही असा सहज मोडायला.तुमच्या दोघांसोबत तुमच्या घरच्यांच्याही भावना, अशा अपेक्षा त्यात जोडल्या गेल्या आहेत आणि किती सहजपणे तुम्ही या सगळ्यावर पाणी फिरवणार आहात..किती स्वार्थी झालास तू. मला सांग लग्न झाल्यावर जानकी तुझ्या प्रेमात पडली आणि तिने घटस्फोट ला विरोध केला तर काय करशील" ? दिनेश म्हणाला..
" दिन्या अरे रागिणी बद्दल जर मी जानकी ला सांगितलं असत तर कदाचित तिने लग्नाला नकार दिला असता आणि हे बघ मी जानकी पासून वेगळं झाल्यावर कुणाशीही लग्न करेल ह्याचं तिला काही एक देणं घेणं नसेल..शेवटी वेगळं झाल्यावर आम्ही आपापल्या आयुष्यात काय करतो त्यात बोलण्याचा अधिकार आम्हाला नसेल, तुला वाटते तस ती माझ्या प्रेमात आणि मी तिच्या प्रेमात पडण्याची शक्यता नाहीच नाही ..घरच्यांनाही ही कळू दे प्रत्येक वेळी त्यांनी घेतलेले निर्णय योग्य नसतात आणि का म्हणून सारख त्यांच्या मनानी ऐकायचं मी,शिक्षण, नोकरी आणि आता लग्नही त्यांच्याच मनानी करतोय .मला बँगलोर जायच आहे माझ्या आवडीचा जॉब करायचा आहे ,मी तिकडे गेल्यावर रागिणीसोबत लग्न करेल आणि माझ्या मर्जी प्रमाणे आयुष्य जगेल.
माझ्या प्रत्येक बाबतीत घरच्यांची मर्जी मी आता खपवून घेणार नाही. जानकी च म्हणशील तर तीही तिच्या मनाप्रमाणे तीच आयुष्य जगेल यात नुकसान कुणाच ही नाही .दिन्या स्वतःच्या आवडी प्रमाणे जीवन जगण्याने मी जर स्वार्थी वाटत असेल तर आहे मी स्वार्थी.." रघुवीर स्पष्टीकरण करत म्हणाला.
" तुला इतका विश्वास आहे का की रागिणी तुझ्याशी लग्न करेल म्हणून" ?दिनेश म्हणाला.
" विश्वास तर मला आहेच पण जर हे शक्य नाही झालं तरी माझं बँगलोर ला जायच स्वप्न पूर्ण होणार आणि तिथून परदेशात ..रागिणी ला लग्नाला तयार करण्याचा प्रयत्न मी सोडणार नाही.अजून एक तू सगळं कुणाला सांगणार नाही आहेस तुला शपथ आहे माझी" रघुवीर म्हणाला आणि तिथून निघून गेला..
" मी तर सांगणार रे कुणाला पण रघ्या तू खूप चुकीच वागत आहेस..स्वतःच्या आयुष्यासोबतच तू जानकी आणि दोन्ही कुटूंबाच्या भावनांशी खेळ करत आहे.. देव तुला सद्बुद्धी देवो." दिनेश स्वतःशीच म्हणाला.
लग्न महिनाभरावर आलं होतं.. वधू पक्ष असल्याने अग्निहोत्रींकडे कामाचा व्याप जास्त होता.लग्नाचा हॉल बुक झाला होता. पत्रिका छापायला गेल्या होत्या.लग्न जरी महिन्यावर होत तरी लग्नाचे कार्यक्रम जस कुळाचार, बांगड्या,मेहंदी,हळद,सीमांत पूजन हे सगळे कार्यक्रम लग्नाच्या आठ दिवस अधिपासून सुरू होणार होते.दोन तीन दिवसातच पत्रिका ही छापून आल्या.सगळ्यात पहिली पत्रिका देवाजवळ ठेवण्यात आली. सगळ्यांनी पत्रिका वाटण्याचे काम वाटून घेतले. अण्णा आणि अनंतराव स्वतः देवांच्या घरी पत्रिका घेऊन गेले. देवांकडची पत्रिका घेऊन जिजीआणि आप्पा अग्निहोत्रींकडे जाऊन आले.रघुवीर त्याच्या लग्नाची पत्रिका घेऊन रागिणीच्या जिथे काम करत होती त्या बँकेत गेला..ती कामात व्यस्त होती.
" हॅलो रागिणी" रघुवीर म्हणाला.
" रघुवीर ..तू इथे?" रागिणी म्हणाली.
" हो अग लग्नाची पत्रिका द्यायला आलो होतो..ही घे माझ्या अन जानकीच्या लग्नाची पत्रिका.लग्नाला नक्की यायच म्हणजे वाट पाहिलं मी तुझी" रघुवीर म्हणाला..रागिणी नाराज झाली होती. तिचा चेहरा उतरला.
" रघुवीर मी नाही येऊ शकत तुझ्या लग्नाला" रागिणी म्हणाली.
"अग पण का? " रघुवीर म्हणाला.
"आहेत माझी माझी अशी कारणं" रागिणी म्हणाली.
" रागिणी प्लिज .तू माझी बालमैत्रिण आहेस आणि लग्नाला येणार नाही म्हणजे कस वाटेल मला" रघुवीर म्हणाला.
"रघुवीर एक सांगू " रागिणी म्हणाली..
" हो बोल न" रघुवीर म्हणाला..
" नाही काही नाही" ती मनातलं सांगता सांगता राहिली..
" अग काय तू अशी..मनातलं बोलून मोकळं व्हावं माणसाने ..बर तुला हवा तितका वेळ घे मी वाट पाहतोय.. चल येतो मी" रघुवीर कोड्यात बोलून निघून गेला.रागिणी ही विचार करत राहिली नेमकं ह्याला काय म्हणायचं होत.
क्रमशः...