आता पर्यंत आपण बघीतले.
माझ्या पोटात, माझ्याकडून पडलेल्या चुकीच्या पावलांचा अंश कधीच उगम पावला होता! त्याच्या अस्तित्व निर्मितीची वास्तविकता मी प्रियांका गावडे यांना स्वतः सांगणार होते!
आता पुढे..!
जागेवरून उठत मी सांगायला सुरुवात केली.
"मॅडम, त्या रात्री जेवणं आटोपून सर्व उशिरापर्यंत झोपी गेले. मी माञ शामलच्या विचारात लोळत पडले होते. शामल, माझा आत्ये भाऊ! तो नोकरीच्या शोधात काही दिवसांसाठी आमच्या घरी राहायला आला होता. त्याचे विचार मला वेगळाच अनुभव करवून देत होते. पण, तेवढ्यात दारावर थाप पडली आणि मी भानावर आले. दार उघडले, तर शामल माझ्या खोलीबाहेर उभा होता. आम्हा दोघांना आतून एक वेगळीच ऊर्जा एकमेकांकडे खेचत असल्याचे जाणवले. थोडा वेळ आम्ही एकमेकांना बघत राहिलो. नंतर कोणाच्या तरी पावलांच्या आवाजाने तो माझ्या खोलीत शिरला. हे खूप सहज घडले. आवाज जास्तच ऐकू येऊ लागला व त्या भीतीने आम्ही आतून दार लावून घेतला! दोघांनी मोठा श्वास घेतला. नंतर नकळत नजरानजर झाली! आणि आम्ही दोघे एकमेकांत आकंठ बुडालो!" : मी श्वास घेत थांबले.
माझ्या सोबत घडलेला प्रकार ऐकून त्यांनी त्यावर थोडा विचार केला आणि पुढे बोलायला सुरुवात केली.
"आता मी जे काही विचारेल, त्यावर तू लगेच पॅनिक होऊ नकोस! ऐकून घे आणि शांत राहूनच उत्तर द्यायचा प्रयत्न कर." प्रियांका गावडे, माझी संपूर्ण मन:स्थिती अभ्यासल्या नंतर मला धीर देत बोलल्या.
"प्रयत्न करते." : मी, होकारार्थी मान हलवली.
"बेटा मला सांग, तुमच्यात कुठं पर्यंत काय-काय घडले? म्हणजे तू आणि तो कुठं पर्यंत एकमेकांच्या जवळ आलात?" : प्रियांका गावडे, धीर देत काळजीपूर्वक कुठलाही दबाव न आणता विचारत होत्या. माझ्याबाबतीत घडलेला प्रकार कुठल्या मनस्थितीत घडला याचा शोध त्या घेत असाव्यात असे मला वाटले.
मी पुढे सांगायला सुरुवात केली.
"आम्ही एकमेकांत हरवून गेल्यावर, त्याने मला कमरेत पकडत स्वतःकडे ओढून घेतले. त्यानंतर आमच्यात नकळत चुंबन झाले. मला आधी ते विचित्र वाटले पण, नंतर त्याने मला घट्ट मिठीत घेतले आणि मी त्याच्या उबदार स्पर्शाने पूर्णपणे हरवून गेले. नंतर त्यानेच मला उचलून बिछान्यावर लोटून दिले! मी सैरभैर झाले! पण, नंतर माझ्या सोबत काय घडले मला काहीच कल्पना नाही. कारण, मी स्वतःला भावनेच्या भरात शामलला सोपवून दिले होते. मी खूप मोठी चुक केली मॅडम!" : नकळतपणे गालांवरून अश्रू ओघळले आणि मी त्यांना बीलगले.
"पण यात चुकीचं आहे, असं कोण म्हणतं?" : प्रियांका गावडे यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवत शांतपणे विचारले.
"चुकीचं नाही! असं कसं? तुम्हीच माहिती देताना म्हणालात ना!" : मी, आश्चर्यचकित होत त्यांच्याकडे बघीतले.
"हो बाळा, यात काहीही चुकीचं नाही. पण योग्य ते वय आणि योग्य तो साथीदार असला तेव्हाच ते चुकीचं नसतं. तुझा शामलवर किती विश्वास होता?" : प्रियांका गावडे, महत्वाच्या मुद्द्याकडे वळल्या.
"विश्वास म्हणजे?" : मी, त्रासिक सुरात विचारले!
"तुझा त्याच्यावर विश्वास होता? की, फक्त तू त्याच्याकडे आकर्षित झालीस आणि हे घडलं?" : प्रियांका गावडे प्रश्नार्थी नजरेने!
मी त्यांच्याकडे बघत..
"फक्त आकर्षण! हो, फक्त आकर्षण होतं आमच्यात! तो मला बघताक्षणी आवडला म्हणून! म्हणूनच मी त्याच्यात हरवले." : मी, लटक्या सुरात उत्तरले.
"मग बेटा आता नीट ऐक, या विषयावर तुझ्याशी कधी बोललं गेलंच नाही किंवा तू कोणाशी या विषयी बोलण्याचं धाडस भीतीपोटी केलंच नाही आणि म्हणूनच तू अजूनही गोंधळलेल्या मनःस्थितीत आहेस. हे बघ, शारीरिक संबंध किंवा त्याचे भाव कोवळ्या वयात निर्माण होणे किंवा एखाद्या पुरुषा विषयी आकर्षण वाटणे, यात चुकीचे काहीच नाही. वयात आल्यावर त्या आपल्या मनात निर्माण होणाऱ्या भावना असतात. त्या आपल्यात असणं म्हणजे आपण चुकीचे नसतो. मात्र, भावनेच्या भरात वाहत, शामलने तुला वा तूने शामलला त्रास दिला असता, तेव्हा ते चुकीचं ठरलं असतं! हे बघ, एखाद्याविषयी प्रेमळ भाव असावेत मात्र, त्या भावनांचा त्यांना त्रास होणार नाही याची काळजी देखील आपणच घेतली पाहिजे." प्रियांका गावडे यांनी माझी समजूत काढली.
"खरंच मॅडम, आज तुमच्या माध्यमातून मला या विषयी इतकी महत्वपूर्ण माहिती मिळते आहे. नाहीतर आजवर हे बोललंच गेलं नव्हतं!" : मी त्यांचे आभार मानले.
पुढे एका महत्वाच्या आणि तितक्याच संवेदनशील विषयाकडे वळत त्यांनी बोलायला सुरुवात केली!
"बाळा मला सांग, तू कधी ऑनलाईन अश्लील व्हिडिओ किंवा तसे इतर कुठले व्हिडिओ वगैरे बघितले आहेस का? किंवा तुझ्यावर कोणी तसं काही दाखवण्याची बळजबरी केली आहे का?" : प्रियांका गावडे यांनी अतिशय संवेदनशीलतेने मुद्दा मांडत विचारले.
"हो, म्हणजे कोणी बघायला बळजबरी केली नाही. पण एकदा एका व्हिडिओ सजेशन लिंक वर मी कुतुहलाने क्लिक केले होते! कारण, त्यात जे फोटो दिसत होते त्याविषयी मला जाणून घ्यायची इच्छा होती. क्लिक करताच ती लिंक ओपन झाली आणि मी ते बघीतले! पहिल्यांदा किळसवाणे वाटले माञ नंतर नंतर इच्छा अधिकाधिक वाढत गेली आणि तेव्हापासून कधी तरी मी बघत असते." : हे सर्व मी त्यांना घाबरतंच सांगितले.
माझ्या त्या बोलण्यावर माञ त्यांनी एक गंभीर कटाक्ष टाकला आणि स्वतःजवळ असलेल्या पाण्याच्या बाटलीतून पाणी घटाघटा पिऊन शांत बसल्या. थोडा वेळ विचार करून त्यांनी पुढे बोलायला सुरुवात केली.
"बाळा, हे सतत बघणं चुकीचं! मी तर म्हणेल हे बघणंच चुकीचं! तुला आजवर हे कोणी सांगीतले नाही का?" : प्रियांका गावडे यांनी त्रासिक सुरात विचारणा केली.
"नाही! म्हणजे मीच कोणाला याविषयी काहीही बोलले नाही. हे चुकीचे असल्याची भावना आतून येत तर होती, माञ ते मी एकट्यात बघायचे. त्यामुळे जास्त विचार करणे मला गरजेचे वाटले नाही!" : या सर्व मुद्द्यांवर मी न लाजता बोलत होते आणि यामुळेच माझ्या प्रत्येक समस्येचे आज मला उत्तर मिळणार असल्याची विश्वासपूर्ण भावना मनात होती.
"हे बघ बाळा, तू यानंतर असलं काहीही बघायचं नाही. हे सर्व बघितल्याने आपलं मन नको त्या गोष्टींत गुंततं. नको त्या इच्छा निर्माण होतात, हार्मोनल इम्बॅलेन्सेसमुळे मोठ्या प्रमाणात आपल्या शरिरात बदल घडून येतात आणि मग आपलं माईंड डिस्ट्रॅक्ट होतं. त्यातून मोठमोठे गुन्हे देखील घडू शकतात!" प्रियांका गावडे यांनी या नाजुक विषयावर बोलत अतिशय संवेदनशीलपणे माझी समजूत काढली.
"मॅडम, तुम्ही सांगितलेल्या प्रत्येकच गोष्टीचे महत्त्व किती हे मी चांगलंच जाणते. जर याआधी मला कोणी मार्गदर्शन केले असते तर कदाचित आज माझी जी अवस्था आहे ती झाली नसती!" : मी, निराश होत मान खाली घातली.
मला निराश बघून प्रियांका गावडे यांनी परत एका विषयाकडे मला नेले!
"मला सांग, शामल नंतर या तीन महिन्यात तू आणखी कोणासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न तर केला नाहीस ना?" : प्रियांका गावडे यांनी विचारले.
"नाही, असे काहीच नाही! उलट या तीन महिन्यात मी शामलचाच विचार केला." : मी स्पष्ट सांगितले.
"मला वाटतं, आता आपण निघायला पाहिजे. कारण, माझ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली आहेत! तुझी काही प्रश्न असतील, तर विचारू शकतेस." : प्रियांका गावडे यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवत विचारले.
"मॅडम?" : पोटावर हात ठेवत मी त्यांच्याकडे प्रश्नार्थी नजर टाकली!
"माझ्यावर विश्वास आहे ना?"
त्यांच्या या प्रतिप्रश्नावर माञ मी पूर्ण विश्वासाने मान हलवली!
माझा होकार मिळताच, आम्ही दोघी वर्गाच्या दिशेने जायला निघालो. माञ मनात एक प्रश्न होताच! तो विचारायला म्हणून मी त्यांना हात पकडत थांबवून घेतले!
"मॅडम…!"
.
.
.
.
क्रमशः
© खुशाली ढोके.