अमरावती पोहचत पर्यंत रघुवीर ला जानकी पसंत आहे नाही हे विचारत विचारत सगळ्यांनी वैतागून टाकले पण रघुवीर नंतर सांगतो हेच उत्तर देत होता..घरी आल्यावर ही पुन्हा जिजींनी त्याला विचारलं तरीही त्याच उत्तर तेच विचार करून सांगतो..आणि तो त्याच्या खोलीत निघून गेला..
" काय एवढा विचार करतोय काय माहिती..इतकी गोड मुलगी आहे जानकी ,सुंदर तितकीच सालस आहे हो मला तर बाई फार आवडली" जिजी म्हणाल्या..
" हो मला सुध्दा खूप आवडली जानकी.
खूप चांगल्या संस्कारात वाढलेली मुलगी आहे.मला तर अस झालय की कधी लग्न करून ती आपल्या घरी येतेय" रमाताई म्हणाल्या..
" एकुलती एक मुलगी इतक्या लाडात वाढलेली पण जिजी कामाचा किती उरक आहे तिला खरच अशीच मुलगी हवी होती आपल्याला" गौरी ताई म्हणाल्या..
" हो न ..शिवाय बाकी घरची मंडळी किती छान आहेत वाटलंच नाही आपण त्यांना भेटलोय..आता रघुनी पटकन होकार कळवायला हवा" राधताई म्हणाल्या.
" लाखात एक मुलगी आणि तीच कुटुंब आहे हे लग्न जमणं खरतर सौभाग्य राहील आपलं पण आता रघुनी नको अडथळे आणायला..चला ग आपण देवाजवळ दिवा लावू आणि प्रार्थना करू की ही लग्न जमू दे बाबा" जिजी त्यांच्या सुनांना घेऊन देवघरात गेल्या..तिकडे रघुवीर च्या डोक्यात सतत जानकी बद्दल विचार सुरू होते..
" आजवर पाहिलेल्या मुलींमध्ये सगळ्यात गोड मुलगी आहे जानकी,नुसती सुंदर नसून खर बोलणारी, मनातलं स्पष्ट सांगणारी आहे आणि किती निरागस स्वप्न आहेत तिचे .खरच अशी मुलगी पाहिलीच नाही मी कधी. मी तिला जे काही म्हणालो ते ती घरच्यांना सांगणार नाही याची खात्री वाटते मला, पहिल्याच भेटीत इतका विश्वास कसा काय निर्माण झाला असेल तिच्याबद्दल??किती सहजपणे मी तिच्याशी मनातलं बोलुन टाकलं ..आता ती काय निर्णय घेते याची ओढ लागली आहे मला" रघुवीर मनातल्या मनात विचार करत होता..
तिकडे अग्निहोत्रींकडे जानकी ला सगळ्यांनी भांडवून सोडलं होत. रघुवीर आणि देव कुटुंब किती छान आहे याच भरभरून कौतुक ते जानकी समोर करत होते.. पण मीनाक्षी ताईंची अण्णांनी ओळख करून न दिल्याने सगळे थोडे नाराज झाले..माईंनी मात्र पाहुण्यांना मीनाक्षी ताईंची ओळख करून दिली होती. जानकी तिच्या खोलीत विचारात बसली होती.
" किती बिनधास्त मुलगा आहे हा रघुवीर ,काहीही आयडिया येतात याला.इतकं सोप्प असत का सगळं,लग्न म्हणजे भातुकली नाही कधीही मांडली कधीही मोडली.घरचे लोक इतके आनंदी आहे त्यांचा विश्वासघात करायचा. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे अण्णा ,माई ..फुलासारखं जपणारे आई बाबा, आमची जानू आमचा अभिमान आहे म्हणणारे काका,काकू..कायम मला प्रोटेक्ट करत आलेला माझा दादा, माझी जिवलग मैत्रीण, गाईड माझं सगळं काही असलेली वहिनी .माझे दोन लहान भाऊ ,चिमकुले भाचे काय आदर्श ठेवतील ते माझा..आणि आतू तिला कळलं तर ती काय म्हणेल..माझ्या घरच्यांना फसवायच। मी??नाही नाही मी अस नाही करू शकत..पण रघुवीर म्हणतोय तेही योग्यच आहे.मर्जी विरुद्ध लग्न करून मी जर आनंदी नसेल तर मग घरचे तरी कसे आनंदी राहतील.. त्याचा प्लॅन तसा चांगला आहे पण रिस्क आहे खूप त्यात.काय करू मी काही कळत। नाही आहे" जानकीच्या मनात विचारांचं वादळ घोंगावत होत.
"जानू ,काय ठरवलंय तू" मनु जानकीच्या जवळ जात म्हणाली..
" अजून काहीच नाही ग वहिनी..तू बस न इथे " जानकी मनुच्या मांडीवर डोकं ठेवत म्हणाली..
" थकलीस का जानू? मनु जानकीच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली..
" वहिनी काय करू हेच कळत नाही आहे ग..
जानकी म्हणाली..
" तुला खर सांगू का ..लोक खूप छान आहेत अग ते,आपल्यासारखेच साधे,सरळ आणि कुटूंबातील सदस्यांवर भरभरून प्रेम करणारे.तू खूप आवडली आहेस त्यांना,आपल्याही घरी सगळयांनाच रघुवीर आवडला आहे. फक्त तुझ्या निर्णयाची वाट पाहतोय आम्ही.तुला माहितीय अण्णा इतके खुष आहेत,"म्हणत होते आपल्या जानूच कन्यादान फक्त अनंता आणि अरुंधतीच नाही करणार तर मी ,शारदा,जयंता, जयश्री ,चैतन्य आणि मनु असे सगळे मिळून मनुच कन्यादान करू .शेवटी एकुलती एक मुलगी आहे आपली". जानू आत्यांच्या लग्नाच्या वेळी कन्यादानाच स्वप्न अपूर्ण राहील ग अण्णांच ते तुझ्या लग्नाच्या वेळी त्यांना पूर्ण करायच आहे. त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यांत पाणी होत हे सगळं बोलतांना. खूप आशा लावून आहेत ते तुझ्या निर्णयाकडे..माझं तुला एकच म्हणणं आहे हा तुझा आयुष्याचा प्रश्न आहे आणि तू तुझं हे आयुष्य रघुवीर अन त्याच्या कुटूंबासोबत घालवण्याचा निर्णय घेशील तर खरच तो योग्य असेल..बघ विचार कर आणि निर्णय सांग" मनु जानकीला समजावून निघून गेली..ओंकारने रघुवीरचा नंबर जानकी ला दिला. रात्रभर विचार करून शेवटी तिने निर्णय घेतला आणि घाबरतच रघुवीरला फोन केला..
" हॅलो ..कोण बोलतोय" झोप मोडल्याने रघुवीर त्रासिक आवाजात म्हणाला..
"मी जानकी बोलतेय" जानकी म्हणाली.
" जानकी!!!! तू एक एक मिनिट , मी स्वप्नात तर नाही आहे न.." रघुवीर ला विश्वास बसत नव्हता..
" दिवास्वप्न पाहत असतो का रे तू, नाही जरा घडयाळ बघ साडे आठ होत आले आहे..बर मला तुला खुप महत्वाच सांगायच आहे" जानकी म्हणाली.
" अग सांग न मग लवकर किती वाट पाहतोय तुझ्या फोनची..मला घरी माझा निर्णय कळवायचा आहे आता तुझ्या निर्णयावर माझा निर्णय अवलंबून असल्याने मला घरी काही सांगता आलं नाही" रघुवीर म्हणाला..
" खूप विचार करून ठरवलं आहे की , मी तयार आहे तुझ्याशी लग्न करायला" जानकी एका श्वासात बोलून गेली..
" हॅलो, रघुवीर काय झालं ? ऐकतो आहेस न?" रघुवीर ची तिकडून काही प्रतिक्रिया मिळाली नाही म्हणून जानकी म्हणाली.
" मला विश्वास बसत नाही आहे अग, शॉक झालो होतो थोडासा..ए नक्की न तू खरच पूर्ण विचार करून निर्णय घेतला आहेस न" रघुवीर म्हणाला..
" हो पूर्ण विचार करूनच निर्णय घेतलाय मी पण तू तुझा विचार तर नाही बदलवलास रात्रीतून" जानकी म्हणाली..
"नाही ग मी तर ठाम आहे .बरं ऐक आता आपल्याला एकच करायच आपला निर्णय घरी सांगायचा आणि लग्न होइपर्यंत ते म्हणतील तस ऐकायचं , होऊ दे त्यांच्या मनाने सगळं आणि मग लग्न झालं की आपण आखलेला प्लॅन वापरायचा ,की सगळं नंतर आपल्या मनासारखं ..आता पटकन तू तुझ्या घरी होकार कळव मी माझ्या घरी कळवतो" रघुवीर म्हणाला..
" ठीक आहे" इतकं बोलून जानकीने फोन कट केला..
रघुवीर ने त्याच्या घरी तर जानकीने तिच्या घरी लग्नाला होकार कळवला. विचारता काय दोन्ही घरी आनंदी आनंद साजरा करण्यात आला. अण्णांनी लगेच आप्पांना फोन केला.पुढच्या बोलणीसाठी आणि देवांचं घर बघण्यासाठी अग्निहोत्रींना अमरावती येण्याचे आमंत्रण दिले.
आता पुढील बोलणी रघुवीच्या घरी होणार होती..सगळे प्रचंड आनंदी होते रघुवीर आणि जानकी च्या मनात मात्र आपण घरच्यांना फसवतोय ह्याची हुरहूर होती..
शेवटी जानकी आणि रघुवीर च एकदाच लग्न ठरलं होतं.नातेवाईकांना ही फोन करून कळवण सुरू झालं होतं..येत्या रविवारी अग्निहोत्री कडले जेष्ठ मंडळी देवांच्या घरी जाणार होते.जानकी मनातून आनंदी नव्हती .घरच्यांना फसवतोय ही सल तिच्या मनाला टोचत होती पण सगळ्यांसमोर आनंदी असण्याचं ती दाखवत होती. दोन्ही घरी उत्साहाच वातावरण होत.लग्नात काय काय करायच ह्याची योजना आखली जात होती.
एकदाचा रविवार उजाडला आणि अग्निहोत्री मंडळी देवांच्या वृंदावनात पोहचली.
त्यांचं छान स्वागत करण्यात आलं.जानकी ,मंदार आणि मिनाक्षीताई सोडून सगळेच तिथे गेले होते.अण्णांनी सोबत त्यांच्या गुरुजींना देखील नेले होते जेणे करून साक्षगंध आणि लग्नाचा मुहूर्त काढता येईल.रघुवीर ला आशा होती की घरच्यांसोबत जानकी येईल पण जानकी न आल्याने त्याचा हिरमोड झाला.
जिजींनी सगळयांना त्यांचं संपूर्ण घर दाखवल
सगळ्यांना घर फार आवडलं.. जेवणं आटोपली.मग सगळे बैठकीत जमून मूळ मुद्यावर आले..
" आप्पासाहेब ..मला अस वाटत की आपण साखरपुडा आणि लग्नाचा शुभ दिवस ठरवून घेवूया.." अण्णा म्हणाले..
" हो हो मी ही तेच म्हणणार होतो.." आप्पा म्हणाले..
गुरुजींनी पंचाग,रघुवीर आणि जानकीची पत्रिका बघून साखरपुडा आणि लग्नाच्या काही तारखा काढल्यात.त्यात सगळ्यांच्या सोयीच्या तारखा बघून दोन तारखा नक्की करण्यात आल्या.