क्लिनिक मध्ये कधी कधी अशा केस येतात की आपलं मन सुन्न होतं..
कॉलेज मध्ये जाणारी मुलगी वाटली ती मला.. तिचा चेहरा पाहूनच माझ्या लक्षात आलं की काही तरी गडबड आहे..मी अगोदर हसून तिला बसायला सांगतलं, नाव विचारलं.... खरं सांगितलं की नाही माहीत नाही..काय करतेस ? "कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे." म्हणाली.. जरा स्थिर झाल्यावर विचारलं, आता सांग, काय झालं ? ..
"मॅम , माझी पाळी नाही आली... नेहमी अनियमित असते. दोन महिने होऊन गेले अजून आली नाही.. म्हणून आले" ..
"आई नाही का आली बरोबर ?" ..
तर शांत . थोडी इकडे तिकडे चुळबुळ केली.. "तिला टेन्शन येईल, म्हणून नाही आणलं " ..
"बरं, तुझी काही औषध चालू होती का किंवा अभ्यासाचं टेन्शन?
जेवण पण नीट करत नाहीत तुम्ही हल्लीच्या पोरी "...
कधी कधी होत असं, नको घेऊ टेन्शन,येईल पाळी "..
येवढं सांगुनही तिच्या चेहऱ्यावरचे भाव काही बदलले नाहीत..
मग मीच जरा हिम्मत करून विचारलं, "तुला काय वाटतं , काय असावं कारण?" ..
ती शांतच, पायाकडे नजर , मला आता हळू हळू अंदाज यायला लागला... . काहीतरी गडबड आहे .पण मला तिलाच बोलतं करायचं होतं...
"मॅडम.. मी प्रेगनन्सी टेस्ट केली .. पॉजिटिव आहे.. मॅम मला यातून काही तरी मार्ग दाखवा.. घरी समजलं तर आई बाबांना हा धक्का सहन होणार नाही "..
मुलगी सज्ञान जरी असली तरी एक फॅमिली फिजिशियन म्हणून मी यात जास्त काही करू शकत नव्हते.. तिला सांगितलं,"हे बघ, तू तुझ्या आई बाबांना घेऊन ये.. मी बोलते त्यांच्याशी.. माझ्या परीने जरी मी जास्त काही करू शकत नसले तरी तुझ्या पालकांशी बोलून गायनॅकोलॉजिस्टचा सल्ला घेऊ या की आपण !" ...
तिला काही हे पटलेलं दिसलं नाही.. अगदी काकुळतीला येऊन म्हणाली "तुम्हीच करा की काही तरी" ..
मी ठाम नाही म्हंटले.. तिला समजावलेही , " तू कुठेही इकडे तिकडे जाऊ नकोस, अजून त्रास करून घेशील स्वतःला , एकदा स्वतःच्या आई बाबांना विश्वासात घे.. नक्की सगळं ठीक होईल"...
ती निघून गेली....
पण जाताना माझं मन मात्र सुन्न करून गेली..
परत काही ती येणार नव्हती.. काय करेल.. ?
एक आई म्हणून माझं मन कासाविस झालं..
मला पण एक मुलगी आहे.. आणि आजच्या पिढीतील ही एक वाढती समस्या आहे..
अशा काही गोष्टी मुलं वयात आली की नैसर्गिक रित्या होऊन जातात.. त्यात हल्लीच्या मुलींना खूप लवकर येणारी मासिक पाळी, त्यांच्यात लवकर होणारे हार्मोनल बदल, वाढतं मिडीया एक्सपोजर , सहज उपलब्ध होणारे पॉर्न, आई बाबांनी दिलेलं अति स्वातंत्र्य .. अशी खूप कारण आहेत अशा केस आजकाल वाढायला..
काही पालक खूप अलर्ट असतात.. त्यांना आपल्या मुलांत झालेला बदल लगेच समजतो.. तर काही त्यांच्या कामामध्ये येवढे बिझी असतात की त्यांना वाटते मुलांच्या सगळ्या भौतिक गरजा पूर्ण केल्या की आपलं काम झालं....
पालकांनो.. हे सगळं द्याच ,पण त्याचबरोबर , दिवसातला थोडा वेळही त्यांना द्या.. कोणत्याही विषयावर बोला पण बोला, संवाद साधा, तो महत्वाचा.. रोज संवाद झाला तर मुलंही हळू हळू मोकळी होतील.. त्यांना सुद्धा हक्काचं कोणी तरी हवच असतं की बोलायला.. ती हक्काची व्यक्ती त्यांना घरातच मिळूदे की .... कधी चुकूनमाकून एकादी चूक झालीच तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा.. कोणत्या परिस्थितीत ती चूक झाली हे नीट समजून घ्या..
कधी कधी त्या चुका नसतात. जसं की वयात आल्यावर झालेला पहिला संभोग... या नैसर्गिक भावना आहेत.. असं काही जर तुमच्या पाल्याकडून चुकूनमाकून झालंच तर त्याने अगोदर येऊन तुम्हाला म्हणजे पालकांना सांगितलं पाहिजे.. येवढं तुमचं नात घट्ट ठेवा.. पालकांनी सुध्दा असं जर काही आपल्या मुलाने किंवा मुलीने सांगितले तर त्याचा राईचा पर्वत न करता , शांतपणे त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं..त्यावर त्यांना अशा प्रकारे समजवावं की परत असे काही पाऊल उचलताना ते नक्कीच दहादा विचार करतील..
पण तीच गोष्ट जर परत परत होत असेल तर मात्र नक्कीच कुठे तरी आपल्याला कडक अंमलबजावणी करावी लागेल.
मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते..
प्रत्येक मुलाला हे लक्षात आणून दिले पाहिजे की संभोग/सेक्स म्हणजे टाईम पास नाही , ती काही यांत्रिक घडामोड नाही.. शरीराबरोबर दोन मनंही तिथे जुळली जातात.. या भावनेचाही आदर करा.. काही गोष्टी कंट्रोल पण करता आल्या पाहिजेत.. हल्लीच्या पिढीला हे सगळ हवं आहे पण जबाबदारी नको म्हणून तर लिव्ह इन रिलेशनशिप चे प्रमाण वाढतय .. त्यामुळे ओघानेच येणारे ब्रेकअप्स,सेपरेशन,त्यानंतर येणारा एकटेपणा आणि डिप्रेशन..
हल्ली शाळेत असतानाच मुलांना सेक्स एज्युकेशन दिलं जातं... त्याचा उपयोग त्यांनी त्यांच्या भल्यासाठी करावा ..
मिडीयावर येणाऱ्या कंडोमच्या जाहिराती.. आय पिलच्या जाहिराती .. यामुळे किती तरी जणं ही गोष्ट घरापर्यंत येऊ देत नाहीत.. अगदी सहज हाताळून मोकळे होतात.. गोष्ट सहज उपलब्ध झाली की, तिची किंमत कमी होते...पण कधी कधी अशा गोष्टींची खूप मोठी किंमत मोजावी लागते..
"सुजाण पालकांबरोबर सुजाण मुले" ही काळाची गरज आहे..
सूज्ञास सांगणे न लगे...
आजची पिढी खूप जबाबदार आहे..
त्यांनी आयुष्यातील हे सुखही तेवढ्याच जबाबदारीने उपभोगावे ..
हीच एका आईची अपेक्षा..
डॉ. स्वाती अनिल मोरे
कांदिवली पूर्व