empty place in Marathi Short Stories by Hiramani Kirloskar books and stories PDF | एक कमी

Featured Books
Categories
Share

एक कमी

आॅफिसचा दरवाजा उघडताच आॅफिसचा रंगच बदलून गेला होता. न्यु ईयर ची तयारी जोरात चालू होती. ख्रिसमसमुळे काही दिवस आॅफिसचा मोहोल उत्साही होता. आणि आज तर काय? न्यू ईयर सेलिब्रेशनचा दिवस...प्रत्येकाचे प्लान अगदी चोख ठरले होते...तशीच ती आत आली..डेक्सवर बॅग ठेवलीच होती की मयु बाजूला उभी. डोळ्यावरच्या दोन्ही भुवया उडवत म्हणाली,
" काय?"
" कुठे काय?" मयू जवळ डोळे मोठे करत ती म्हणाली.
" नाही म्हटल काय? काय प्लान काय आजचा?"
तिच्या प्रश्नाला आता काय उत्तर द्याच विचार करतच होती की मयूने बोलण सुरु केल.
" ठरवल नसशील तर ऐक आॅफिस पार्टी सोड आपण बाहेर चिल्ल करु. प्लान रेडी आहे आणि तुझा चुचा पण येणार आहे." आणि दोघीही हसायला लागल्या.
"अरे मला तस ही घरी जायच आहे. हाफ डे आहे आज तरी घरी लवकर पोहचू दे!"
"तुला झालय काय? घर कुठे पळून जातय? चिल्ल करु थोड यार..." मयू तिला समजवत होती पण तिच उत्तर तेच होत. खांदे उडवत मयू म्हणाली,
" देख यार इरादा बदल जाये तो, बोल दे इधर हि हूँ मैं!"
आणि तिच्या नेहमीच्या ग्रुप मध्ये संध्याकाळचे प्लान्स ठरवायला गेली.

आॅफिसची काम रोज सारखी चालू झाली पण हाफ डे आहे करायच काय? विचार करत तिने डेक्सवरचा मोबाईल उचलला. लाॅक उघडल. दोन मिनिट विचार करत बसली. काॅल करु की मेसेज... काही ठरवता येत नव्हत म्हणून जाऊ दे बोलून मोबाईल बाजुला ठेवला. किबोर्डवर बोट सवयी सारखी चालयला लागली. अचानक सगळ काम थांबवून तिने मोबाईल उचलला आणि सरळ आॅफिसच्या मागे स्मोकिंग साईट वर आली. घाईत सिगरेटच्या पॅकेट मधून सिगरेट काढून पेटवली. एक कश घेतला तस तिने मोबाईलवर नंबर डाईल केला. दोन वेळा रिंग झाली. समोरुन काॅल उचलला.
" हा हॅलो.... अरे काही नाही असच काॅल केला...सहजच... अरे नाही.... अच्छा ऐक ना मी काय म्हणते? म्हणजे आज काय प्लान आहे का तुझा?...ओ गुड..गुड... ओके म्हणजे वेळ आहे तर भेटशील का आज..." म्हणताना अजून एक कश घेतला. " रिअली....ओ ग्रेट... ओ के मग भेटू...म्हणजे मी चारला निघेन...कुठे भेटायच?.... ओ के....डन.... सी यू" म्हणत तिने काॅल कट केला. सुटकेचा श्वास सुटल्यासारख झाल तिला... सिगरेटचा एक दम घेत. सिगरेट पायाखाली टाकत जळता अॅश पायाने विझवत ती पुन्हा डेक्सवर येऊन बसली.

चार वाजयला पंधरा मिनिटं बाकी होती पण तिची नजर घड्याळाच्या काट्यावरच होती. तेवढ्यात मयू पुन्हा तिला विचारायला आली.
" साॅरी यार, तुम्ही करा इनजोय..."
तिच उत्तर ऐकून मयू निराश झाली. हाताने इशारा करत ग्रुपला नाही म्हणाली.
"बर, ठीक आहे. आजच्याच दिवशी बर तुला घरी लवकर जायच आहे? चल ना यार... मुड खराब असला तर ठिक होईल...निदान आज तरी नाही नको बोलुस."
" मयू" नजर बारीक करत ती म्हणाली," बस नौटंकी चुचाने पाठवल का तुला इथे?"
" काय खराबी आहे त्याच्यात यार. मान्य आहे जरा लाल करतो आपली... बट आॅफिस मध्ये हाच एक पिस आहे. नजर शेकून घ्यायला."
" तुम्ही जा पुढे मला वाटल तर येईन मी ओ के."
" ओ के, अड्डयावर ये सरळ." म्हणत मागे पावल टाकत मयू निघाली.

आॅफिस मधून एक एक बाहेर निघत होता. ग्रुप निघाला तसा तिने लगेच पी.सी. बंद केला बॅग आवरली. आणि बाहेर आली. आजुबाजुला एक नजर फिरवली आणि रिक्षेत बसली.

किती तरी वेळ दरवाज्याची बेल वाजत होती. दरवाजा उघडून बघते तर समोर मयु उभी होती. " अग किती वेळ बेल वाजतेय." आत येत मयु त्रासिक स्वरात म्हणाली. दोन पावल आत येत समोरचा घराचा नजरा बघून तिथेच थांबली आणि तिच्याकडे आश्चर्याने बघत हसत म्हणाली," घराचा पसारा करणारी तु, आज घर येवढ निटनेटक? कस जमल तुला हे?" तिच्या बोलण्यावर दुर्लक्ष करत ती म्हणाली," घरात बसून दुसर करायला काहि नव्हत. म्हटलं घर तरी ठिकठाक करु. बाईला एक महिना सुट्टी दिलीय आता भोगतेय." दोघीपण हसायला लागल्या.
सोफ्यावर बसत तिच्याकडे बघत मयु म्हणाली," तु अचानक सात दिवसाची सुट्टी घेतलीस. कुणालाच काही खबर नाही. फोन हि उचलत नव्हतीस. इथे येईपर्यंत मनात नको नकोत्या शंका आल्या. आता तर खात्री पटली तु आजारी आहेस. अग काय हे? दिवसभर आॅफिसची काम करणारी तु? अचानक सुट्टी काय घेतेस? घर काय आवरतेस? काय चाललय काय तुझ?"
" अग काही नाही असच सुट्टी घेतली." आणि किचन मध्ये गेली. जुसचे दोन ग्लास हातात घेऊन ती बाहेर आली. मयुला ग्लास देत ती पण सोफ्यावर बसली. मयुच्या लांबलचक प्रश्नांना तिच येवढस उत्तर मयुच्या पचनी पडत नव्हत. सवयी प्रमाणे प्रत्येक गोष्ट जाणून घेतल्याशिवाय तिला चैन पडणार नव्हती. खुप आढेवेढे घेत शेवटी ती मयुला बोलली. " बर ऐक तस हि तुला ऐकल्या शिवाय चैन पडायची नाही."

"तुला आठवत मागच्या सप्टेंबर मध्ये बॉसच्या लग्नाची ऐनिवर्सरी होती. त्यादिवशी दुपारी मिटिंग आटपून निघालो आणि बाॅसला मिसेस साठी काही गिफ्ट घ्यायच होत. म्हणून आम्ही एका आर्ट गॅलरी मध्ये एखाद पेंटिंग बघायला गेलो. तस बाॅसला असला हि शौक आहे माहित नव्हत मला. दोन प्लोरची गॅलरी होती म्हटलं कितीसा वेळ लागतोय तिथे म्हणत मी हि नाईलाजान गेले सोबत. पहिला प्लोर फिरयालाच एक दिड तास घालवला या माणसानं. मागू मी आणि टीम चालतोय. फिरता फिरता दुसर्‍या प्लोरवर आलो. बाॅसला खाली एक दोन पेंटींग आवडल्या होत्या. तरी कशाला वर आला कुणास ठावूक? आम्ही पुरते वैतागलेलो. दुसर्‍या प्लोरवर गेलो तसे काही लोक कुजबुजताना दिसले. जास्तीत जास्त काॅलेजची पोर होती तिथे. टाइमपास करत माॅल कमी पडले की इथे येत असतील. त्यांच कुजबुजन बाॅसने ऐकल आणि तो पुढे गेला. आम्ही पेंटींग्ज जवळ बघल नाही बघल करत त्याच्या मागे होतो. पुढे गेल्यावर त्या लोकांच कुजबजण्याच कारण समजल. एक मुलगा कधी पासून एका पेंटींग जवळ एकटक बघत उभा होता. हे चित्रकार काय म्हणून अशा न्यूड पेंटिंग बनवतात काय माहित? त्या मुलाला बघून आम्हाला हि हसायला आलं. तो त्या पेंटिंग जवळ आसुसलेल्या नजरेन बघत होता आदी असच वाटल. लोक त्या पेंटिंग कडे बघल न बघल करत जात होती पण हा मुलगा तिथेच उभा बघून. बाॅस उत्सुकतेने त्यांच्या जवळ गेला. बाॅस काय पागल झालाय जो त्यांच्याशी बोलायला गेलाय. म्हटल बघू काय प्रकार आहे म्हणून मी हि तिथे गेले. बाॅस त्यांच्या मागे उभा राहिला आणि त्याला म्हणाला,"काय म्हणतेय पेंटींग?" अचानक कानावर बाॅसचा आवाज पडला तसा तो गांगरला. त्याला बोलायला काहीच सुचेना. त्यांच्या तोंडून फक्त "अह" निघाल.
"तुम्ही मला विचारताय का?" स्वतःला सावरत त्याने विचारल.
"हो म्हणजे तुम्ही खूप वेळ पेंटिंग बघताय म्हणून विचारल'!"

तस ते पेंटींग अगदीच न्यूड नव्हत. म्हणजे त्यात एका म्हाताऱ्याला जेल मध्ये साखळदंडांनी बांधल होत. केसांच्या जटा झालेल्या, चेहरा एकदम काळवंटलेला, हाडांचा सापळा झालेला. अंगावर फक्त एक कमरेला बांधलेला फाटका कपडा तो ही मळलेला. त्याचे दोन्ही हात लोखंडी साखळ्यांनी बांधले होते आणि त्याच्या समोर एक सुंदर मुलगी होती. पण ती अशी का बनवली पेंटींग बनवणाऱ्याने समजल नाही. म्हणजे नखशिखांत सुंदर मुलगी त्या म्हातार्‍या कैद्या समोर आपली छाती उघडी करुन. खाली वाकून तिने आपला एक स्तन त्या म्हातार्‍या कैद्याच्या तोंडा जवळ दिला होता. येवढी वाहियाद पेंटींग तो मुलगा बघत असताना लोक त्याच्यावर हसणार नाही तर काय? त्यात बाॅस त्याला आपला स्मार्टनेस दाखवायला कि काय त्याच्याशी बोलायला गेला.

तो बॉसच्या विचारण्यावर काय बोलतोय हे आता ऐकायला मला तरी इन्टरेस्ट नव्हता. मी दोन पावल पुढे गेले आणि त्याचा आवाज कानावर आला. त्याच पहिलच वाक्य येवढ विचित्र होत.
" निर्बल प्रेम, माया, वात्सल्य भय आणि आदर आहे हि पेंटींग!!"
त्याच वाक्य ऐकून बाॅस हि हादरला... मी पुढे जात होती तिथेच थांबले... कुणाला काहीच समजेना हा काय बरळतोय? या वासनाधिन मुलीत आणि त्या म्हातार्‍या कैद्याच्या रासलिलांन मध्ये याला निर्बल प्रेम, माया, वात्सल्य, भय आणि आदर दिसतो. एक तर हा मुर्ख असला पाहिजे किंवा नजर कमजोर असली पाहिजे याची. किंवा कामसूत्र कामक्रिडेचे जास्तच ज्ञान असाव. पेंटींग सुंदर होती यात वाद नाही पण त्या दोघांमधला किती तरी वयाचा फरक होता. हा फरक या आडमुठ आणि बावळट मूर्ख मुलाला दिसला नाही? एक तर हि वेश्या व्यवसाय करणारी कुणी असावी आणि तो म्हातारा कैदी आपले आंबट शौक पुर्ण करत असावा. अस दिसत असताना त्याच उत्तर ऐकून क्षणभर कानावर विश्वास बसला नाही. दिसायला ठिक ठाक असणारी माणसं आतून येवढी मूर्ख असतील अस वाटत नव्हतं पण आज साक्षात नमुनाच उभा होता आमच्या समोर.

" साॅरी, मला समजल नाही काय बोललास पून्हा बोलशील जरा?"
चेहर्‍यावर कसलीच लाज न बाळगता त्याने पुन्हा बाॅसला तेच वाक्य हसत ऐकवल. बाॅसला काय झाल काय माहित? येवढा गंभीर तो मिटिंगमध्ये हि नसतो तेवढा गंभीर चेहरा करत त्याला म्हणाला,
" का? काय आहे यात प्रेम आणि वात्सल्य सारख?"
त्या मुलाच्या दुसर्‍या वाक्याने तर पूर्ण खात्री पटली हा मूर्ख आहे आणि बाॅस महामुर्ख.
तो म्हणाला," या पेंटींग मध्ये एका मुलीच आपल्या वडिलांनवरच अत्यंत निःस्वार्थी प्रेम दिसून येतय. तिच्या चेहर्‍यावरच्या हावभावत चित्रकाराने काळजी आणि ममता स्पष्ट रेखाटलेली दिसून येते. तुम्हाला वाटेल की मी हे काय बरळतोय?."
"साहाजिकच आहे!!" आश्चर्याने बघत बाॅस त्याच्या उत्तरावर म्हणाला." तू या निकषावर कसा आलास की यांच नात वडील-मुलीच आहे? एक वेश्याच एका म्हाताऱ्याच्या आंबट शौक पुरवणार का नाही वाटलं तुला?"
बाॅस हि माझ्या मताशी सहमत होता ऐकून बर वाटल. अस वाटत होत की बाॅस त्या मुर्ख मुलाशी बोलण्यात उगाच वेळ घालवतोय. म्हणून मी त्या दोघांजवळ आले आणि बाॅसला चला बोलणार होते की तो मुलगा म्हणाला,
" सर, या पेंटींग मागे एक गोष्ट आहे. तुम्हाला माहित नसावी किंवा तुम्ही ऐकली नसावी."
त्याच्या बोलण्याने आता दोघां आश्चर्य वाटलं.
" कसली गोष्ट? बर सांग!! काय आहे गोष्ट?" उत्सुकतेने बाॅस ने विचारल.
आता आम्ही दोघही कान टवकारून त्याच्या बोलण्याची वाट पाहत होतो.
" तुम्हाला माहित असेल नसेल पण हि या गॅलरी मधली सगळ्यात बोलकी पेंटिंग आहे हि. अस का? तर मला हि निटस आता आठवत नाही पण मी हि गोष्ट कुठे तरी वाचलेली." त्याच्या बोलण्यात ठामपणा नव्हता पण आत्मविश्वास शब्दातून दिसून येत होता.
" हि गोष्ट ग्रीक की रोमन आहे मी विसरलो पण तिथलीच आहे. काल्पनिक आहे की मायथोलाॅजिकल हे हि आठवत नाही. पण गोष्ट लक्षात आहे. एका म्हाताऱ्या माणसाला तिथल्या न्याय व्यवस्थेने मरे पर्यंत उपाशी राहण्याची शिक्षा सुनावली. हे ऐकून तिच्या मुलीला राहवल नाही तिने दया अर्ज केला. पण तो नाकारण्यात आला. मग त्या मुलीने वडील मरे पर्यंत रोज त्यांना भेटायची मागणी केली. आणि न्यायव्यवस्थेने तिची मागणी मान्य केली. ती रोज आपल्या वडिलांना भेटायला तुरुंगात जायची. लपवून काही खाण्याची वस्तू घेऊन जाऊ नये म्हणून तुरुंगातले पहारेकरी तिची झडती घ्यायचे. वडिलांनी अशा अवस्थेत तिला बघवत नव्हत. आई-वडीलांनी आपल्याला लहानच मोठ करताना खूप काही सहन केल होत. याची तिला जाणिव होती. म्हणून वडिलांना जिवंत ठेवण्यासाठी ती आपल्या स्तनाच दुध रोज त्या म्हातार्‍या वडिलांना देत राहिली. खुप दिवस हे असच चालू होत. हा म्हातारा अजून मरत कसा नाही म्हणून आता पहारेकरी तिच्यावर नजर ठेवायला लागले. आणि एक दिवस तिला दुध पाजताना पकडण्यात आल. तिला पकडून न्यायव्यवस्थे समोर उभ करण्यात आल. सगळया परिस्थितीला समजून घेत आणि त्या मुलीच वडिलांन साठीच प्रेम बघून न्यायव्यवस्थेने आपला निर्णय बदलला आणि त्या म्हातार्‍या कैद्याची सुटका करण्यात आली. म्हणून मी म्हणालो हि या गॅलरी मधली सगळ्यात बोलकी पेंटिंग आहे. ज्यात निर्बल प्रेम, माया, वात्सल्य भय आणि आदर आहे!!"
दोन सेकंद आठवल्यासारख तो म्हणाला.," हं आता आठवल. हि युरोप ची सगळ्यात महाग पेंटिंग "हंस सेबल बेहम” ची आहे. पण इथे ज्यांनी कोणी हि पेंटींग आर्ट गॅलरीची थिम म्हणून इनस्पायर होऊन बनवली आहे. पण कमाल बनवली आहे."
पेंटिंग जवळ पुन्हा बघत तो पुढे म्हणाला," या पेंटींग चे खूप अर्थ लावता येतील पण मला दिसली ती एक कमी म्हणजे ऐम्टीनेस. जगण्यात आलेल एक खालीपण, एका मुलीच वडींनासाठीच खालीपण आहे यात, एक ओढ आहे, मनाची तगमग आहे, कुणीतरी आपल्याला त्यांच्यापासून दूर करतय याच दुःख आहे. सगळी बंधन झुगारून आपल्या माणसासाठी दुनियेशी लढायला भाग पडेल इतकी ताकद आहे. खरतर प्रत्येक माणसात एक कमीपण असत. कुणासाठी कुणीतरी येवढच बैचन असत. मग ते आपल्या माणसांसाठी असेल. प्रेमासाठी असेल किंवा आयुष्यातल्या ठरवलेल्या स्वप्नांचा मागोवा घेतानाची धडपड असेल. प्रत्येक वेळी हे कमीपण प्रत्येकाला जाणवते. एक कमी जी प्रत्येकात असते किंबहुना असायला हवी. कोणतीच गोष्ट पुर्ण नसतेच कधी. ती पूर्ण होण्याचा एक ठराविक मार्ग असू शकतो. पण त्याठिकाणावर पोहचण्या पेक्षा त्या ठिकाणी पोहचण्याच्या प्रवासात खरी गंमत असते. ते महत्त्वाच आहे. आणि त्या प्रवासाची सुरुवात म्हणजे एक कमी."

हि गोष्ट आणि त्याचा पेंटिंगकडे पाहण्याची समज ऐकून आम्ही निशब्द झालो. काही बोलाव सुचेना. दोन मिनिटं त्या पेंटिंग कडे आता बाॅस आणि मी एकटक पाहत राहिलो. स्वतःच्या तोकड्या विचार शक्तीची दोघांना हि आता लाज वाटायला लागली. नाण्याची एकच बाजू आपण नेहमी बघत असतो हे त्यावेळी जाणवल. तो 25-26 वर्षाचा मुलगा जो काही मिनिटांपूर्वी मूर्ख आणि वासनाधिन वाटत होता. त्याच्या नजरेला नजर देण आता शक्य होत नव्हत. तेवढ्यात आमच्या मॅनेजर ने बाॅसला उशीर होतोय म्हणून निरोप पाठवला. तस बाॅस भानावर आला आणि त्या मुलाला हात मिळवून काही बोलला माझ लक्षच नव्हत. जाताना माझ्या खांद्यावर हात ठेवत निघायच आहे म्हणून बाॅस ने सुचवल. तस एक नजर त्या मुलावर टाकत मी टिम सोबत चालायला लागले. थोड पुढे जाऊन राहवल नाही म्हणून पुन्हा मागे बघितल तर तो नव्हता तिथे.

भारावलेल्या सारखी अवस्था होती माझी. एक धुंदी होती, एक जाणीव होती. आॅफिस मध्ये बसून मोठमोठ्या बाता मारताना आपण किती आव आणून बोलतो. आपल्या किती जग माहिती आहे. आपल्या येवढी दुनिया कुणी पाहिलीच नाही कधी. हा समज होता आमचा. या एका मुलाने अगदी सहज तो गैरसमज दुर केला. जिना उतरताना बाॅसने मॅनेजरच्या कानात काही सांगितल तस तो निघाला. तस आम्ही गाडीत येउन बसलो. कोणीच कुणाशी काही बोलत नव्हत. काही दिवसांनी बाॅसच्या घरी माझ जाण झाल. तिच पेंटिंग मला बाॅसच्या स्टडीरुम मध्ये दिसली. पुन्हा त्याच ते पेंटींग बद्दलच मत आठवल. एक कमीपण.